अभ्यास लेख १९
प्रकटीकरण—आज आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे?
‘जो या भविष्यवाणीचे शब्द मोठ्याने वाचतो तो आशीर्वादित आहे.’—प्रकटी. १:३.
गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श
सारांश *
१-२. प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेली माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, याचं एक कारण कोणतं आहे?
एखाद्याने कधी तुम्हाला त्याचा फोटो ॲल्बम बघायला दिला आहे का? ॲल्बम पाहत असताना त्यात तुम्हाला अनेक अनोळखी चेहरे दिसतात. पण एका फोटोकडे तुमचं चटकन लक्ष जातं. का बरं? कारण त्या फोटोमध्ये तुम्ही आहात! तो फोटो पाहत असताना तुम्ही हे आठवायचा प्रयत्न करता की तो कुठे आणि केव्हा काढला होता. तसंच, त्या फोटोमध्ये आणखी कोण कोण आहे ते ओळखण्याचासुद्धा तुम्ही प्रयत्न करता. त्या ॲल्बममधल्या इतर फोटोंपेक्षा तो फोटो तुमच्यासाठी खास असतो.
२ प्रकटीकरणाचं पुस्तक त्या खास फोटोसारखं आहे. का? याची कमीतकमी दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे हे पुस्तक खास आपल्यासाठी लिहिण्यात आलं आहे. याच्या पहिल्याच वचनात आपण वाचतो: “येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण, जे देवाने त्याला यासाठी दिलं, की लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या सेवकांना दाखवाव्यात.” (प्रकटी. १:१) त्यामुळे या पुस्तकात जे लिहिलं आहे, ते इतर लोकांसाठी नाही तर आपल्यासाठी म्हणजे देवाच्या समर्पित सेवकांसाठी आहे. आणि म्हणून यातल्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत आपणसुद्धा सहभागी आहोत हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटायला नको. एका अर्थाने असं म्हणता येईल, की “या फोटोत” आपणसुद्धा आहोत.
३-४. प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या भविष्यवाण्या पूर्ण होण्याच्या वेळेबद्दल या पुस्तकात काय म्हटलं आहे, आणि त्यामुळे आपण काय करणं गरजेचं आहे?
३ प्रकटीकरणाचं पुस्तक आपल्यासाठी खास असण्याचं दुसरं कारण म्हणजे, त्यातल्या भविष्यवाण्यांची पूर्ण होण्याची वेळ. या वेळेबद्दल प्रेषित योहानने असं म्हटलं: “पवित्र शक्तीच्या प्रभावाखाली येऊन मी प्रभूच्या दिवसात पोहोचलो.” (प्रकटी. १:१०) योहानने हे शब्द इ.स ९६ मध्ये लिहिले. त्या वेळी “प्रभूचा दिवस” सुरू व्हायला अजून बराच काळ होता. (मत्त. २५:१४, १९; ) बायबलमधल्या भविष्यवाणीप्रमाणे तो दिवस १९१४ ला सुरू झाला, जेव्हा येशू स्वर्गात राजा बनला. तेव्हापासून, देवाच्या लोकांशी संबंधित असलेल्या प्रकटीकरणातल्या भविष्यवाण्या पूर्ण व्हायला सुरवात झाली. याचाच अर्थ आज आपण “प्रभूच्या दिवसात” जगत आहोत! लूक १९:१२
४ आपण या रोमांचक काळात जगत असल्यामुळे प्रकटीकरण १:३ मध्ये दिलेल्या प्रेमळ सल्ल्याकडे आपण खासकरून लक्ष देणं गरजेचं आहे. त्यात म्हटलं आहे: “जो या भविष्यवाणीचे शब्द मोठ्याने वाचतो आणि जे या भविष्यवाणीचे शब्द ऐकून त्यात सांगितलेल्या गोष्टींचं पालन करतात ते आशीर्वादित आहेत, कारण नेमलेली वेळ जवळ आली आहे.” खरंच, आपण या भविष्यवाणीचे शब्द ‘मोठ्याने वाचणं,’ ते ‘ऐकणं’ आणि त्यातल्या ‘गोष्टींचं पालन करणं’ खूप महत्त्वाचं आहे. तर मग यातले काही शब्द कोणते आहेत?
तुमची उपासना यहोवा स्वीकारतो का, ते तपासून पाहा
५. यहोवा आपली उपासना स्वीकारतो का, हे आपण तपासून पाहणं का गरजेचं आहे?
५ प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायापासूनच आपल्याला कळतं, की मंडळ्यांमध्ये काय चाललं आहे याची येशूला पूर्ण कल्पना आहे. (प्रकटी. १:१२-१६, २०; २:१) येशूने पहिल्या शतकातल्या सात मंडळ्यांना जे संदेश पाठवले त्यावरून हे स्पष्ट होतं. या संदेशांमध्ये येशूने त्या मंडळ्यांना काही स्पष्ट सूचना दिल्या होत्या. पहिल्या शतकातल्या त्या ख्रिश्चनांची उपासना यहोवाने स्वीकारावी म्हणून त्यांनी या सूचनांचं पालन करणं खूप महत्त्वाचं होतं. आणि त्या सूचना आज देवाच्या लोकांसाठीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मग यावरून आपल्याला काय समजतं? मंडळ्यांचं नेतृत्व करणाऱ्या ख्रिस्त येशूला आपली आध्यात्मिक स्थिती कशी आहे हे चांगलं माहीत आहे. आपलं संरक्षण करण्याच्या उद्देशाने येशू सतत आपल्यावर लक्ष ठेवतो. कोणतीही गोष्ट त्याच्या नजरेतून सुटत नाही. आपल्याला यहोवाची पसंती मिळावी म्हणून आपण काय करत राहणं गरजेचं आहे हे त्याला माहीत आहे. तर मग, येशूने दिलेल्या कोणत्या सूचनांप्रमाणे आपण आज वागलं पाहिजे?
६. (क) प्रकटीकरण २:३, ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे इफिस मंडळीमध्ये कोणती समस्या होती? (ख) यातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
६ प्रकटीकरण २:३, ४ वाचा. यहोवासाठी असलेलं आपलं सुरुवातीचं प्रेम आपण कमी होऊ देऊ नये. येशूने इफिस मंडळीला जो संदेश पाठवला होता त्यावरून आपल्याला कळतं की तिथल्या ख्रिश्चनांनी खूप संकटं सोसली होती. बऱ्याच वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला तरी त्यांनी यहोवाची सेवा करायचं सोडलं नव्हतं. असं असलं, तरी यहोवासाठी असलेलं त्यांचं सुरवातीचं प्रेम आटलं होतं. यहोवाने त्यांची उपासना स्वीकारावी म्हणून त्यांना आपलं प्रेम पुन्हा वाढवायची गरज होती. त्याचप्रमाणे आज आपणसुद्धा बऱ्याच संकटांचा सामना करून यहोवाची सेवा करत असू. पण आपण हे योग्य कारणांसाठी केलं पाहिजे. कारण यहोवा आपण काय करतो हेच पाहत नाही, तर ते का करतो हेसुद्धा तो पाहतो. आपण कोणत्या हेतूने त्याची उपासना करतो हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याची अशी इच्छा आहे, की त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आणि कदर असल्यामुळे आपण त्याची उपासना करावी.—नीति. १६:२; मार्क १२:२९, ३०.
७. (क) येशूने सांगितल्याप्रमाणे सार्दीस मंडळीत कोणती समस्या होती? (प्रकटीकरण ३:१-३) (ख) यातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
७ प्रकटीकरण ३:१-३ वाचा. आपण नेहमी जागृत आणि सतर्क राहिलं पाहिजे. सार्दीस मंडळीच्या ख्रिश्चनांची समस्या थोडी वेगळी होती. पूर्वी ते आध्यात्मिक कार्यांमध्ये उत्साही होते. पण हळूहळू देवाच्या सेवेतला त्यांचा आवेश कमी होत गेला. म्हणून येशूने त्यांना ‘जागे व्हा’ असा सल्ला दिला. त्यांच्या बाबतीत जे घडलं त्यावरून आपण काय शिकू शकतो? आजपर्यंत आपण यहोवाच्या सेवेत जे काही केलं ते तो विसरणार नाही यात काही शंका नाही. (इब्री ६:१०) असं असलं, तरी त्याच्या सेवेत आपण पूर्वी जे केलं त्याच्या भरवशावर आपण राहू शकत नाही. कदाचित पूर्वीइतकं करायला आता आपल्याला जमत नसेल. पण तरी आपण “प्रभूच्या सेवेत” व्यस्त राहिलं पाहिजे आणि शेवटपर्यंत जागृत आणि सतर्क राहिलं पाहिजे.—१ करिंथ. १५:५८; मत्त. २४:१३; मार्क १३:३३.
८. लावदिकीया मंडळीला दिलेल्या संदेशातून आपण काय शिकतो? (प्रकटीकरण ३:१५-१७)
८ प्रकटीकरण ३:१५-१७ वाचा. आपण आवेशाने आणि पूर्ण मनाने यहोवाची उपासना केली पाहिजे. येशूने लावदिकिया मंडळीला जो सल्ला दिला होता त्यावरून दिसून येतं, की या मंडळीची समस्याही जरा वेगळी होती. यहोवाच्या उपासनेच्या बाबतीत ते “कोमट” बनले होते. आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत त्यांना जराही उत्साह नसल्यामुळे येशूने त्यांना सांगितलं, की ते “दयनीय आणि दरिद्री” अवस्थेत आहेत. त्यांनी यहोवाबद्दल आणि त्याच्या उपासनेबद्दल ज्वलंत आवेश दाखवण्याची गरज होती. (प्रकटी. ३:१९) यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? यहोवाच्या सेवेत जर आपलाही आवेश थोडा कमी झाला असेल, तर यहोवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दल आपण आपली कदर वाढवली पाहिजे. (प्रकटी. ३:१८) जीवनातल्या सुखसोयींच्या मागे लागून आपण यहोवाच्या उपासनेला कधीच दुसऱ्या स्थानी ठेवू नये.
९. येशूने पर्गम आणि थुवतीरा मंडळ्यांना दिलेल्या संदेशांप्रमाणे आपण कोणता धोका टाळला पाहिजे?
९ आपण धर्मत्यागी लोकांच्या शिकवणींपासून दूर राहिलं पाहिजे. येशूने पर्गम मंडळीतल्या काही जणांना दोषी ठरवलं कारण ते मंडळीत फुटी पाडत होते. (प्रकटी. २:१४-१६) याउलट, थुवतीरा मंडळीतल्या बांधवांची त्याने प्रशंसा केली. कारण ते “सैतानाच्या गहन गोष्टींना” बळी पडले नाहीत. त्यांनी पुढेही सत्याला ‘घट्ट धरून ठवावं’ असं उत्तेजन त्याने त्यांना दिलं. (प्रकटी. २:२४-२६) या मंडळीतले विश्वासात कमजोर असलेले काही जण खोट्या शिकवणींच्या मागे लागून विश्वासापासून भरकटले होते. आणि त्यामुळे त्यांनी पश्चात्ताप करणं गरजेचं होतं. मग आज आपल्याबद्दल काय? आज आपणसुद्धा देवाच्या वचनाच्या विरोधात असलेल्या शिकवणींपासून दूर राहिलं पाहिजे. धर्मत्यागी लोक “देवाची भक्ती करायचा फक्त दिखावा” करतात पण त्यांच्या ‘जीवनावर तिचा प्रभाव नसतो.’ (२ तीम. ३:५) जर आपण देवाच्या वचनाचा नियमितपणे आणि सखोल अभ्यास केला, तर आपल्याला खोट्या शिकवणी लगेच ओळखून त्यांपासून दूर राहणं सोपं जाईल.—२ तीम. ३:१४-१७; यहू. ३, ४.
१०. पर्गम आणि थुवतीरा मंडळ्यांना येशूने जे सांगितलं त्यावरून आपल्याला आणखी काय शिकायला मिळतं?
१० आपण कोणत्याही प्रकारची अनैतिक कामं करू नयेत आणि ती खपवून घेऊ नयेत. पर्गम आणि थुवतीरा मंडळ्यांमध्ये आणखी एक समस्या होती. ते अनैतिक कामं खपवून घेत होते. आणि या गोष्टीसाठीही येशूने त्यांना दोषी ठरवलं. (प्रकटी. २:१४, २०) यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपण बरीच वर्षं यहोवाची सेवा केली असेल आणि आपल्याकडे बऱ्याच जबाबदाऱ्याही असतील. पण म्हणून यहोवा आपली अनैतिक कामं खपवून घेईल असा आपण कधीही विचार करू नये. (१ शमु. १५:२२; १ पेत्र २:१६) जगाचे स्तर कितीही घसरले तरी आपण यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांनुसार चालावं अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो.—इफिस. ६:११-१३.
११. आपण आतापर्यंत काय शिकलो? (“ शिकण्यासारख्या काही गोष्टी” ही चौकटसुद्धा पाहा.)
११ तर मग थोडक्यात आपण आतापर्यंत काय शिकलो? आपण पाहिलं, की यहोवा आपली उपासना स्वीकारतो की नाही हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. जर आपण असं काहीतरी करत असू ज्यामुळे यहोवा आपली उपासना स्वीकारणार नाही, तर मग आपण लगेच पावलं उचलून स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. (प्रकटी. २:५, १६; ३:३, १६) पण मंडळ्यांना दिलेल्या सल्ल्यामध्ये येशूने आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधलं. ती गोष्ट कोणती होती?
छळाचा सामना करायला तयार असा
१२. स्मुर्णा आणि फिलदेल्फिया इथल्या बांधवांना येशूने काय सांगितलं आणि आपण त्याकडे लक्ष देणं का महत्त्वाचं आहे? (प्रकटीकरण २:१०)
१२ आता आपण स्मुर्णा आणि फिलदेल्फिया मंडळ्यांना येशूने दिलेल्या संदेशांकडे लक्ष देऊ या. त्याने तिथल्या बांधवांना सांगितलं की त्यांनी छळाचा सामना करायला भिऊ नये, कारण जर ते विश्वासू राहिले तर त्यांना मोठं प्रतिफळ मिळेल. (प्रकटीकरण २:१० वाचा; ३:१०) आज आपण यातून काय शिकू शकतो? आपला छळ नक्कीच होईल हे आपण ओळखलं पाहिजे आणि तो सहन करायला तयार असलं पाहिजे. (मत्त. २४:९, १३; २ करिंथ. १२:१०) ही गोष्ट इतकी महत्त्वाची का आहे?
१३-१४. प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायात सांगितलेल्या घटनांमुळे देवाच्या लोकांवर कसा परिणाम झाला आहे?
१३ प्रकटीकरणाचं पुस्तक आपल्याला सांगतं, की ‘प्रभूच्या दिवसात’ म्हणजे आज आपल्या काळात देवाच्या लोकांचा छळ होईल. प्रकटीकरण १२ अध्यायात सांगितलं आहे, की येशू राजा बनल्यानंतर स्वर्गात लगेच एक युद्ध होतं. मीखाएल, म्हणजेच पुनरुत्थान झालेला गौरवी येशू ख्रिस्त आपल्या सैन्यांसोबत सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांसोबत लढतो. (प्रकटी. १२:७, ८) या युद्धात देवाच्या शत्रूंचा पराभव होतो आणि त्यांना पृथ्वीवर फेकून देण्यात येतं. यामुळे पृथ्वी आणि तिच्या रहिवाशांवर मोठी संकटं येतात. (प्रकटी. १२:९, १२) पण देवाच्या लोकांवर याचा काय परिणाम होतो?
१४ प्रकटीकरणाच्या पुस्तकात पुढे सांगितलं आहे की आता सैतानाला स्वर्गात जाणं शक्य नसल्यामुळे तो खूप क्रोधित होतो. आणि यामुळे तो पृथ्वीवर असलेल्या देवाच्या अभिषिक्त सेवकांवर हल्ला करतो. हे अभिषिक्त देवाच्या राज्याचे प्रतिनिधी आहेत आणि “येशूबद्दल साक्ष देण्याचं कार्य [त्यांना] नेमण्यात आलं आहे.” (प्रकटी. १२:१७; २ करिंथ. ५:२०; इफिस. ६:१९, २०) ही भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली आहे?
१५. प्रकटीकरणाच्या ११ व्या अध्यायात सांगितलेले ‘दोन साक्षीदार’ कोणाला सूचित करतात आणि त्यांच्या बाबतीत काय घडलं?
१५ क्रोधित झालेल्या सैतानाने प्रचाराच्या कामाचं नेतृत्व करणाऱ्या देवाच्या अभिषिक्त सेवकांवर हल्ला करायला त्यांच्या शत्रूंना चिथवलं. या अभिषिक्त जनांपैकी असलेले काही जबाबदार बांधव भविष्यवाणीत सांगितलेले ‘दोन साक्षीदार’ आहेत ज्यांना ठार मारलं जातं. * (प्रकटी. ११:३, ७-११) १९१८ मध्ये त्यांच्यापैकी आठ जणांना खोटे आरोप लावून दोषी ठरवण्यात आलं. आणि त्यांना बऱ्याच वर्षांसाठी जेलमध्ये टाकण्यात आलं. त्या वेळी कित्येक जणांना असं वाटलं की अभिषिक्त जनांचं काम आता ठप्प पडेल.
१६. १९१९ मध्ये कोणती आश्चर्यकारक घटना घडली, आणि तेव्हापासून आजपर्यंत सैतानाने काय करायचं सोडलेलं नाही?
१६ प्रकटीकरणाच्या ११ व्या अध्यायाच्या भविष्यवाणीत असंही सांगण्यात आलं होतं, की या ‘दोन साक्षीदारांना’ थोड्या काळानंतर पुन्हा जिवंत करण्यात येईल. त्या बांधवांना जेलमध्ये टाकण्यात आल्यानंतर पुढच्याच वर्षी एक आश्चर्यकारक घटना घडली. आणि तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली. १९१९ सालच्या सुरुवातीला या अभिषिक्त बांधवांना जेलमधून सुटका मिळाली आणि त्यानंतर त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोपसुद्धा मागे घेण्यात आले. जेलमधून सुटल्यावर हे अभिषिक्त बांधव राज्याच्या कामात पुन्हा व्यस्त झाले. पण सैतानाने देवाच्या लोकांवर हल्ला करायचं सोडलं नाही. तेव्हापासून आजपर्यंत सैतानाने देवाच्या लोकांचा मोठ्या प्रमाणात छळ केला आहे. याची तुलना ‘नदीच्या प्रवाहासोबत’ करण्यात आली आहे. (प्रकटी. १२:१५) म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकाला “धीराची आणि विश्वासाची गरज आहे.”—प्रकटी. १३:१०.
यहोवाने आपल्यावर सोपवलेलं काम जीव ओतून करा
१७. यहोवाच्या लोकांनी अपेक्षा केली नव्हती अशा मार्गाने त्यांना मदत कशी मिळाली आहे?
१७ प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायात पुढे असं सांगितलं आहे की देवाच्या लोकांनी अपेक्षा केली नव्हती अशा मार्गाने त्यांना मदत होईल. भविष्यवाणीत असं सांगितलं आहे, की “पृथ्वीने” आपलं तोंड उघडून ती “नदी” गिळून टाकली. (प्रकटी. १२:१६) आणि अगदी असंच घडलं आहे. बऱ्याच वेळा सैतानाच्या जगातल्या काही न्यायालयांनी यहोवाच्या साक्षीदारांची बाजू समजून घेऊन त्यांना मदत केली आहे. बऱ्याचदा यहोवाच्या लोकांनी न्यायालयीन खटले जिंकले आहेत आणि यामुळे काही प्रमाणात त्यांना त्यांचं काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. या स्वातंत्र्याचा त्यांनी कशा प्रकारे फायदा करून घेतला आहे? यहोवाने सोपवलेलं काम करण्यासाठी त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग केला आहे. (१ करिंथ. १६:९) या कामात काय सामील आहे?
१८. या शेवटल्या काळात आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आहे?
१८ येशूने असं सांगितलं होतं, की अंत येण्याआधी देवाचे लोक संपूर्ण पृथ्वीवर ‘देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश’ घोषित करतील. (मत्त. २४:१४) या कामात स्वर्गदूत त्यांना मदत करतील असंही सांगण्यात आलं होतं. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण असं वाचतो, की या स्वर्गदूतांकडे “पृथ्वीवर राहणाऱ्यांना, म्हणजे प्रत्येक लोकसमूहाच्या, राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या लोकांना घोषित करण्यासाठी सर्वकाळाचा आनंदाचा संदेश” आहे.—प्रकटी. १४:६.
१९. आनंदाच्या संदेशासोबतच यहोवावर प्रेम करणाऱ्यांनी आणखी कोणता संदेश घोषित करणं गरजेचं आहे?
१९ पण देवाचे लोक फक्त आनंदाचा संदेश घोषित करत नाहीत. तर प्रकटीकरण अध्याय ८ ते १० मध्ये सांगितलेल्या स्वर्गदूतांच्या कामालाही त्यांनी हातभार लावणं गरजेचं आहे. ते स्वर्गदूत देवाच्या राज्याचा विरोध करणाऱ्यांवर एकापाठोपाठ एक येणाऱ्या पीडा घोषित करतात. म्हणूनच यहोवाचे साक्षीदारसुद्धा आनंदाच्या संदेशासोबतच सैतानाच्या दुष्ट जगाच्या वेगवेगळया भागांवर येणाऱ्या देवाच्या न्यायदंडाचा संदेशसुद्धा घोषित करत आहेत. या न्यायदंडाच्या संदेशाला प्रकटीकरणाच्या भविष्यवाणीत “गारा आणि अग्नी” असं म्हणण्यात आलं आहे. (प्रकटी. ८:७, १३) जगाचा अंत किती जवळ आहे हे लोकांना सांगणं आज खूप महत्त्वाचं आहे. यामुळे ते आपल्या जीवनात आवश्यक बदल करू शकतील आणि यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी स्वतःचा जीव वाचवू शकतील. (सफ. २:२, ३) पण हा संदेश बहुतेक लोकांना आवडत नाही. आणि म्हणून तो सांगण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज आहे. मोठ्या संकटादरम्यान आपण जो शेवटचा न्यायदंडाचा संदेश घोषित करू, तो तर आणखीनच जहाल असेल.—प्रकटी. १६:२१.
भविष्यवाणीत सांगितलेल्या गोष्टींचं पालन करा
२०. पुढच्या दोन लेखांमध्ये आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत?
२० आपण प्रकटीकरणाच्या भविष्यवाणीत “सांगितलेल्या गोष्टींचं पालन” करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या भविष्यवाणीच्या पूर्णतेत आपणसुद्धा सामील आहोत. (प्रकटी. १:३) पण अंत येईपर्यंत आपण छळाचा सामना करत धैर्याने देवाचे संदेश कसे घोषित करत राहू शकतो? यासाठी दोन गोष्टींमुळे आपल्याला हिंमत मिळेल. पहिली म्हणजे, प्रकटीकरणाच्या पुस्तकात देवाच्या शत्रूंबद्दल काय म्हटलं आहे हे लक्षात घेणं. आणि दुसरी म्हणजे, जर आपण विश्वासू राहिलो तर भविष्यात आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील, हे समजून घेणं. पुढच्या लेखांमध्ये आपण याच दोन गोष्टींवर चर्चा करू या.
गीत २७ यहोवाला इमानी राहा!
^ परि. 5 आज आपण खूप रोमांचक काळात जगत आहोत. कारण प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या बऱ्याच भविष्यवाण्या आज पूर्ण होत आहेत. या भविष्यवाण्यांचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे? या आणि पुढच्या दोन लेखांमध्ये आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टींवर चर्चा करू. जर आपण या पुस्तकात दिलेल्या गोष्टींप्रमाणे वागलो तरच यहोवा देव आपली उपासना स्वीकारेल. पण आपण हे कसं करू शकतो ते या लेखात पाहू या.
^ परि. 15 १५ नोव्हेंबर २०१४ च्या टेहळणी बुरूज अंकात पृ. ३० वर दिलेला “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहा.