व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २१

प्रकटीकरण​—आपल्या भविष्याबद्दल ते काय सांगतं?

प्रकटीकरण​—आपल्या भविष्याबद्दल ते काय सांगतं?

“आमेन! प्रभू येशू, ये.”​—प्रकटी. २२:२०.

गीत ५४ खरा विश्‍वास बाळगू या!

सारांश *

१. आज सर्वांनी कोणता महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे?

 आज सर्वांनी एक महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. यहोवालाच या संपूर्ण विश्‍वावर राज्य करायचा अधिकार आहे ही गोष्ट मान्य करून ते यहोवाची बाजू घेतील, की त्याचा क्रूर शत्रू असलेल्या दियाबल सैतानाची बाजू घेतील हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि प्रत्येकाला हा निर्णय घ्यावाच लागेल. दोन्ही दगडांवर पाय ठेवून चालणार नाही. प्रत्येक जण जो निर्णय घेईल त्यावरून हे ठरेल, की त्याला कायमचं जीवन मिळेल की नाही. (मत्त. २५:३१-३३, ४६) ‘मोठ्या संकटादरम्यान’ यहोवाच्या विश्‍वासू सेवकांवर खूण केली जाईल, ज्यामुळे त्यांचा येणाऱ्‍या नाशातून बचाव होईल. (प्रकटी. ७:१४; यहे. ९:४, ६.) पण ज्यांनी स्वतःवर जंगली पशूची खूण करून घेतली आहे त्यांचा नाश होईल.​—प्रकटी. १४:९-११;

२. (क) इब्री लोकांना १०:३५-३९ मध्ये आपल्याला काय करायचं प्रोत्साहन मिळतं? (ख) प्रकटीकरणाचं पुस्तक आपल्याला कशी मदत करू शकतं?

इब्री लोकांना १०:३५-३९ वाचा. तुम्ही जर यहोवाच्या राज्याला पाठिंबा द्यायचं ठरवलं असेल, तर तुम्ही एक योग्य निर्णय घेतला आहे. आणि इतरांनीही हा योग्य निर्णय घ्यावा म्हणून त्यांना मदत करण्याची नक्कीच तुमची इच्छा असेल. यासाठी प्रकटीकरणाच्या पुस्तकातली माहिती तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकते. या लक्षवेधक पुस्तकातून आपल्याला कळतं की जे यहोवाचा विरोध करतात, त्यांच्यासोबत शेवटी काय होईल. शिवाय जे त्याच्या शासनाला एकनिष्ठपणे पाठिंबा देतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील हेसुद्धा या पुस्तकातून कळतं. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. असं केल्यामुळे यहोवाची सेवा करत राहण्याचा आपला निश्‍चय आणखी पक्का होईल. तसंच, शिकलेल्या या गोष्टींचा वापर करून आपण इतरांनाही योग्य निर्णय घ्यायला आणि यहोवाची सेवा करत राहायला मदत करू शकतो.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

या लेखात आपण पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: जे देवाच्या शासनाला पाठिंबा देतात, त्यांच्यासाठी भविष्यात काय राखून ठेवलं आहे? याउलट, जे प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेल्या गडद लाल रंगाच्या जंगली पशूला पाठिंबा देतात, त्यांचं पुढे काय होईल?

देवाच्या विश्‍वासू सेवकांसाठी काय राखून ठेवलं आहे?

४. प्रेषित योहान स्वर्गात येशूसोबत कोणत्या गटाला पाहतो?

एका दृष्टान्तात प्रेषित योहान यहोवाच्या शासनाला पाठिंबा देणाऱ्‍या दोन गटांना पाहतो. या दोन्ही गटांतल्या लोकांना कायमच्या जीवनाचा आशीर्वाद मिळतो. पहिल्या गटात १,४४,००० लोक आहेत. (प्रकटी. ७:४) त्यांना येशूसोबत स्वर्गात एक सरकार किंवा एक राज्य स्थापन करण्यासाठी पृथ्वीवरून निवडण्यात आलं आहे. त्याच्यासोबत ते स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करतात. (प्रकटी. ५:९, १०; १४:३, ४) दृष्टान्तात योहान त्यांना येशूसोबत सीयोन पर्वतावर म्हणजेच स्वर्गात उभं असलेलं पाहतो.​—प्रकटी. १४:१.

५. १,४४,००० जणांपैकी उरलेल्या लोकांसोबत लवकरच काय होईल?

या १,४४,००० जणांपैकी एक असण्यासाठी प्रेषितांच्या काळापासून आजपर्यंत हजारो जणांना निवडण्यात आलं आहे. (लूक १२:३२; रोम. ८:१७) पण योहानला असं सांगण्यात येतं, की शेवटल्या काळात त्यांच्यापैकी खूप कमी लोक पृथ्वीवर जिवंत असतील. मोठं संकट सुरू होण्याआधी या ‘उरलेल्या’ लोकांवर शेवटला “शिक्का” मारण्यात येईल. यावरून हे सूचित होईल, की त्यांना यहोवाची पसंती मिळाली आहे. (प्रकटी. ७:२, ३; १२:१७) मग मोठ्या संकटादरम्यान कधीतरी या उरलेल्या लोकांना स्वर्गात घेतलं जाईल. आणि अशा रीतीने १,४४,००० जणांपैकी ज्या विश्‍वासू लोकांचा आधीच मृत्यू झाला आहे त्यांच्यासोबत ते स्वर्गात असतील. तिथे ते देवाच्या स्वर्गीय राज्यात येशूसोबत राज्य करतील.​—मत्त. २४:३१; प्रकटी. ५:९, १०.

६-७. (क) योहान आणखी कोणत्या गटाला पाहतो, आणि त्याच्याबद्दल आपल्याला कोणती माहिती मिळते? (ख) प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायातल्या भविष्यवाणीच्या पूर्णतेबद्दल अभिषिक्‍त जनांपैकी उरलेल्या लोकांना, तसंच ‘मोठ्या लोकसमुदायालाही’ उत्सुकता का असली पाहिजे?

स्वर्गात असलेल्या त्या गटाला पाहिल्यानंतर योहानला एक “मोठा लोकसमुदाय” दिसतो. १,४४,००० जणांच्या गटाची संख्या मर्यादित आहे. पण मोठ्या लोकसमुदायात किती लोक असतील, याबद्दल बायबलमध्ये सांगितलेलं नाही. (प्रकटी. ७:९, १०) या मोठ्या लोकसमुदायाबद्दल आपल्याला कोणती माहिती मिळते? योहानला असं सांगण्यात आलं: “जे मोठ्या संकटातून बाहेर येतात ते हेच आहेत. त्यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.” (प्रकटी. ७:१४) मोठ्या संकटातून वाचल्यानंतर हा “मोठा लोकसमुदाय” पृथ्वीवर राहील आणि त्याला भरपूर आशीर्वाद मिळतील.​—स्तो. ३७:९-११, २७-२९; नीति. २:२१, २२; प्रकटी. ७:१६, १७.

प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायात दिलेल्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत आपण स्वतःला पाहू शकतो का? आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची, आपल्याला या भविष्यवाणीच्या पूर्णतेत स्वतःला पाहता आलं पाहिजे. देवाच्या सेवकांच्या दोन्ही गटांसाठी तो खरंच किती आनंदाचा काळ असेल! यहोवाच्या शासनाला आपण पाठिंबा दिला, याचं आपल्याला त्या वेळी मनापासून समाधान असेल. मोठ्या संकटाबद्दल प्रकटीकरणाचं पुस्तक आपल्याला आणखी कोणती माहिती देतं?​—मत्त. २४:२१.

देवाचा विरोध करणाऱ्‍यांसाठी काय राखून ठेवलं आहे?

८. मोठ्या संकटाची सुरुवात कशी होईल, आणि त्या वेळी बहुतेक लोक काय करतील?

याआधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, या जगातली सरकारं लवकरच मोठ्या बाबेलवर म्हणजेच खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यावर हल्ला करतील. (प्रकटी. १७:१६, १७) आणि हीच मोठ्या संकटाची सुरुवात असेल. या घटनेमुळे अचानक बरेच लोक यहोवाची उपासना करू लागतील का? नाही. उलट, प्रकटीकरणाच्या ६ व्या अध्यायातून आपल्याला कळतं, की त्या वेळी जे लोक यहोवाची सेवा करत नाहीत ते संरक्षणासाठी या जगातल्या राजकीय आणि व्यापारी संघटनांकडे धाव घेतील. या संघटनांची तुलना पर्वतांशी केली आहे. हे लोक देवाच्या राज्याची बाजू घेणार नाहीत आणि यामुळे यहोवा त्यांना आपला विरोधी समजेल.​—लूक ११:२३; प्रकटी. ६:१५-१७.

९. मोठ्या संकटादरम्यान यहोवाचे लोक वेगळे का दिसून येतील, आणि त्यामुळे काय होईल?

मोठ्या संकटाच्या त्या कठीण काळात, यहोवाचे विश्‍वासू सेवक इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे दिसून येतील. कारण संपूर्ण पृथ्वीवर फक्‍त तेच असे लोक असतील जे यहोवाची सेवा करतील आणि ‘जंगली पशूला’ पाठिंबा देणार नाहीत. (प्रकटी. १३:१४-१७) त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे यहोवाचा विरोध करणारे लोक त्यांच्यावर खूप संतापतील. आणि त्यामुळे राष्ट्रांचा एक समूह संपूर्ण पृथ्वीवर देवाच्या लोकांवर हल्ला करेल. रागाने वेडेपिसे झालेले हे विरोधी, देवाच्या लोकांवर जो हल्ला करतील त्याला बायबलच्या भविष्यवाणीत मागोगच्या गोगचा हल्ला असं म्हटलं आहे.​—यहे. ३८:१४-१६.

१०. प्रकटीकरण १९:१९-२१ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवाच्या लोकांवर हल्ला होईल तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असेल?

१० यहोवाच्या लोकांवर हा क्रूर हल्ला केला जाईल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल? तो म्हणतो: “त्या दिवशी माझा क्रोध भयंकर भडकेल.” (यहे. ३८:१८, २१-२३) यानंतर काय होईल ते आपण प्रकटीकरणाच्या १९ व्या अध्यायात वाचतो. तिथे सांगितलं आहे, की यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी आपल्या मुलाला पाठवेल. मागोगच्या गोगविरुद्ध असलेल्या या लढाईत ‘स्वर्गातली सैन्यं’ म्हणजे विश्‍वासू स्वर्गदूत आणि १,४४,००० जण येशूसोबत लढतील. (प्रकटी. १७:१४; १९:११-१५) या लढाईचा शेवट कसा होईल? यहोवाचा विरोध करणाऱ्‍या सगळ्या लोकांचा आणि संघटनांचा संपूर्ण नाश होईल!​—प्रकटीकरण १९:१९-२१ वाचा.

लढाईनंतर एक लग्न

११. प्रकटीकरणाच्या पुस्तकात शेवटी कोणती खास घटना घडते?

११ जरा कल्पना करा, देवाच्या शत्रूंचा नाश झाल्यावर त्याच्या विश्‍वासू सेवकांना कसं वाटेल! किती आनंदाचा क्षण असेल तो! मोठ्या बाबेलचा नाश होईल तेव्हा तर स्वर्गात जल्लोष होईलच, पण आणखी एक घटना घडेल ज्यामुळे तिथे खूप मोठा आनंद साजरा केला जाईल. (प्रकटी. १९:१-३) खरंतर, याच घटनेने प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा शेवट होतो आणि ती घटना म्हणजे ‘कोकऱ्‍याचं लग्न.’​—प्रकटी. १९:६-९.

१२. प्रकटीकरण २१:१, २ मध्ये सांगितल्याप्रमाणे कोकऱ्‍याचं लग्न केव्हा होईल?

१२ हे लग्न केव्हा होईल? हर्मगिदोनची लढाई सुरू होण्याआधी १,४४,००० जणांपैकी सगळेच्या सगळे स्वर्गात असतील. पण त्या वेळी कोकऱ्‍याचं लग्न होणार नाही. (प्रकटीकरण २१:१, २ वाचा.) कोकऱ्‍याचं लग्न हर्मगिदोनच्या युद्धानंतर  म्हणजे देवाच्या सगळ्या शत्रूंचा नाश झाल्यानंतर होईल.​—स्तो. ४५:३, ४, १३-१७.

१३. कोकऱ्‍याच्या लग्नात कोणकोण सामील आहेत आणि ही घटना त्यांच्यासाठी खास का आहे?

१३ कोकऱ्‍याच्या लग्नात कोणकोण सामील आहेत आणि ही घटना त्यांच्यासाठी खास का आहे? जेव्हा एका स्त्री आणि पुरुषाचं लग्न होतं तेव्हा जसं ते एक होतात, तसंच या लाक्षणिक लग्नामुळे राजा येशू ख्रिस्त आणि त्याची “वधू” म्हणजे १,४४,००० जण एक होतील. या खास घटनेनंतर १,४४,००० जण येशूसोबत पृथ्वीवर १,००० वर्षं राज्य करायला सुरुवात करतील.​—प्रकटी. २०:६.

एक पवित्र शहर आणि त्यामुळे आपल्याला मिळणारे आशीर्वाद

प्रकटीकरणाच्या २१ व्या अध्यायात नवीन येरुशलेम म्हटलेल्या एका लाक्षणिक शहराबद्दल सांगण्यात आलं आहे जे “स्वर्गातून, देवापासून खाली उतरताना” योहानला दिसतं. देवाच्या राज्याच्या हजार वर्षांच्या काळात देवाच्या आज्ञा पाळणाऱ्‍या त्याच्या सेवकांना त्यामुळे बरेच आशीर्वाद मिळतील (परिच्छेद १४-१६ पाहा)

१४-१५. प्रकटीकरणाच्या २१ व्या अध्यायात १,४४,००० जणांची तुलना कशासोबत करण्यात आली आहे? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१४ प्रकटीकरणाच्या २१ व्या अध्यायात १,४४,००० जणांची तुलना एका सुंदर शहरासोबत केली आहे. त्याला ‘नवीन यरुशलेम’ असं म्हटलं आहे. (प्रकटी. २१:२, ९) या शहराला १२ दगडांचा पाया आहे आणि त्यावर “कोकऱ्‍याच्या १२ प्रेषितांची १२ नावं लिहिलेली” आहेत. योहानला ही गोष्ट इतकी खास का वाटली? कारण त्या दगडांपैकी एका दगडावर त्याला स्वतःचं नाव लिहिलेलं दिसलं. हा खरंच त्याच्यासाठी किती मोठा बहुमान आहे!​—प्रकटी. २१:१०-१४; इफिस. २:२०.

१५ हे लाक्षणिक शहर इतर सर्व शहरांपेक्षा खूपच वेगळं आहे. या शहराचा मुख्य रस्ता शुद्ध सोन्याचा आहे. त्याची १२ फाटकं मोत्यांची आहेत. तसंच त्याच्या भिंती आणि पाये मौल्यवान रत्नांनी सजवलेले आहेत. आणि हे शहर चौकोनी आहे. त्याच्या रुंदीइतकीच त्याची लांबी आहे. (प्रकटी. २१:१५-२१) पण योहानच्या लक्षात येतं की या शहरात एक गोष्ट नाही. तो पुढे काय म्हणतो याकडे लक्ष द्या. “त्या नगरात मला मंदिर दिसलं नाही, कारण सर्वसमर्थ देव यहोवा आणि कोकरा हेच त्याचं मंदिर आहे. त्या नगराला सूर्याच्या किंवा चंद्राच्या प्रकाशाची गरज नाही. कारण देवाच्या तेजाने ते नगर प्रकाशित होतं आणि कोकरा त्याचा दीप आहे.” (प्रकटी. २१:२२, २३) नवीन यरुशलेम शहर ज्यांनी मिळून बनलं आहे ते १,४४,००० जण खुद्द यहोवासोबत असतील. त्यामुळे त्यांना मंदिराची गरज पडणार नाही. (प्रकटी. २२:३, ४) तसंच ते देवाची पवित्र सेवा करत असताना, स्वर्गात आधीच महायाजक बनलेला येशू पुढाकार घेईल. (इब्री ७:२७) म्हणूनच असं म्हणण्यात आलं आहे, की यहोवा आणि येशूच या शहराचं मंदिर आहेत.

“नदी” आणि “झाडं” ज्या तरतुदींना सूचित करतात त्यांचा फायदा कोणाला घेता येईल? (परिच्छेद १६-१७ पाहा)

१६. देवाच्या राज्याच्या हजार वर्षांच्या काळात लोकांना कोणते आशीर्वाद मिळतील?

१६ या शहराबद्दल विचार करणं अभिषिक्‍त जनांसाठी खूप रोमांचक आहे. पण ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे त्यांनीसुद्धा या शहराबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असलं पाहिजे. कारण देवाच्या राज्याच्या हजार वर्षांच्या काळात नवीन यरुशलेममुळे त्यांना बरेच आशीर्वाद मिळतील. योहानने या आशीर्वादांना “जीवनाच्या पाण्याची नदी” असं म्हटलं आहे. या नदीच्या दोन्ही बाजूंना “जीवनाची झाडं” आहेत आणि “त्या झाडांची पानं राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी” आहेत. (प्रकटी. २२:१, २) त्या वेळी सर्व मानवांना देवाच्या या तरतुदींचा फायदा घेता येईल. आणि देवाच्या आज्ञा पाळणारे सर्व लोक हळूहळू परिपूर्ण होतील. तिथे कोणीही आजारी पडणार नाही. कोणीही शोक करणार नाही. आणि कोणाच्याही डोळ्यांत दुःखामुळे अश्रू येणार नाहीत.​—प्रकटी. २१:३-५.

१७. हजार वर्षांच्या काळात देवाच्या सुंदर तरतुदींचा फायदा कोणाकोणाला घेता येईल? (प्रकटीकरण २०:११-१३)

१७ या सुंदर तरतुदींचा फायदा कोणाकोणाला घेता येईल? सर्वात आधी हर्मगिदोनातून बचावलेल्या मोठया लोकसमुदायाला तसंच नवीन जगात जन्माला आलेल्या लहान मुलांनाही यांचा फायदा होईल. पण प्रकटीकरणाच्या २० व्या अध्यायात असंही म्हटलं आहे, की मेलेल्यांचं पुनरुत्थान होईल. (प्रकटीकरण २०:११-१३ वाचा.) ज्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत देवाची विश्‍वासूपणे सेवा केली अशा “नीतिमान” लोकांचं पुनरुत्थान होईल. तसंच, ज्यांना यहोवाबद्दल शिकून घेण्याची संधी मिळाली नाही, अशा “अनीतिमान” लोकांचंही पुनरुत्थान होईल. (प्रे. कार्यं २४:१५; योहा. ५:२८, २९) पण याचा अर्थ हजार वर्षांच्या काळात सगळ्यांचंच पुनरुत्थान होईल का? नाही. यहोवाची सेवा करायची संधी मिळूनही ज्या दुष्ट लोकांनी ती नाकारली, त्यांना पुन्हा उठवलं जाणार नाही. त्यांना संधी मिळाली होती, पण त्यांनी दाखवून दिलं की पृथ्वीवरच्या नंदनवनात कायमचं जीवन जगायच्या ते लायक नाहीत.​—मत्त. २५:४६; २ थेस्सलनी. १:९; प्रकटी. १७:८; २०:१५.

शेवटची परीक्षा

१८. १,००० वर्षांच्या शेवटी पृथ्वीवर कशी परिस्थिती असेल?

१८ १,००० वर्षांच्या शेवटी पृथ्वीवर असलेले सर्व जण परिपूर्ण झालेले असतील. त्यानंतर आदामकडून वारशाने आलेल्या पापाचे दुष्परिणाम कोणालाही भोगावे लागणार नाहीत. (रोम. ५:१२) मानवांना आदामच्या पापापासून पूर्णपणे मुक्‍त करण्यात आलेलं असेल. अशा प्रकारे १,००० वर्षांच्या शेवटी ते परिपूर्ण झालेले असतील आणि या अर्थाने ते “पुन्हा जिवंत” होतील.​—प्रकटी. २०:५.

१९. हजार वर्षांच्या शेवटी प्रत्येकाला कोणती संधी मिळेल?

१९ आपल्याला माहीत आहे की सैतानाने जेव्हा परिपूर्ण असलेल्या येशूची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हासुद्धा येशू यहोवाला एकनिष्ठ राहिला. पण सैतानाला जेव्हा परिपूर्ण मानवांची परीक्षा घ्यायची संधी दिली जाईल, तेव्हा तेसुद्धा येशूप्रमाणेच यहोवाला एकनिष्ठ राहतील का? १,००० वर्षांच्या शेवटी जेव्हा सैतानाला अथांग डोहातून सोडलं जाईल तेव्हा प्रत्येकाला या प्रश्‍नाचं उत्तर द्यायची संधी मिळेल. (प्रकटी. २०:७) या शेवटच्या परीक्षेत जे विश्‍वासू राहतील, त्यांना कायमचं जीवन आणि खरं स्वातंत्र्य अनुभवता येईल. (रोम. ८:२१) पण जे देवाच्या विरोधात जातील त्यांचा सैतान आणि दुष्ट स्वर्गदूतांसोबत कायमचा नाश केला जाईल.​—प्रकटी. २०:८-१०.

२०. प्रकटीकरणाच्या भविष्यवाण्यांवर चर्चा केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं?

२० या आणि याआधीच्या दोन लेखांमध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या माहितीची आपण थोडक्यात उजळणी केली. या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेत स्वतःला पाहणं तुम्हाला नक्कीच खूप रोमांचक वाटलं असेल. मग आपल्यासोबत यहोवाची उपासना करायला इतरांनाही मदत करायची तुम्हाला इच्छा होत नाही का? (प्रकटी. २२:१७) भविष्यात घडणार असलेल्या या जबरदस्त घटनांबद्दल चर्चा केल्यानंतर प्रेषित योहानप्रमाणेच आपणही असं म्हणायला प्रवृत्त होतो: “आमेन! प्रभू येशू, ये.”​—प्रकटी. २२:२०.

गीत ९ यहोवाचा जयजयकार करा!

[तळटीपा]

^ परि. 5 प्रकटीकरणाच्या पुस्तकावर आधारलेल्या तीन लेखांच्या मालिकेतला हा शेवटचा लेख आहे. या लेखात आपण पाहणार आहोत, की जे यहोवाला विश्‍वासू राहतात त्यांचं भविष्य आनंदी असेल. पण जे देवाच्या शासनाला विरोध करतात त्यांचा वाईट रीतीने अंत होईल.