व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २०

प्रकटीकरण​—देवाच्या शत्रूंबद्दल यात काय सांगितलं आहे?

प्रकटीकरण​—देवाच्या शत्रूंबद्दल यात काय सांगितलं आहे?

“त्यांनी इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणलं.”​—प्रकटी. १६:१६.

गीत ४९ यहोवा आमचा दुर्ग!

सारांश *

१. प्रकटीकरणाच्या पुस्तकात देवाच्या लोकांबद्दल काय सांगितलं आहे?

 प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आपल्याला कळतं, की स्वर्गात देवाचं राज्य सुरू झालं आहे. आणि सैतानाला स्वर्गातून पृथ्वीवर फेकून देण्यात आलं आहे. (प्रकटी. १२:१-९) त्यामुळे स्वर्गात आता शांती आहे. पण आपल्यासाठी मात्र कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. का? कारण सैतान खूप क्रोधित झाला आहे आणि पृथ्वीवर यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत असलेल्यांवर तो हल्ला करत आहे.​—प्रकटी. १२:१२, १५, १७.

२. कोणती गोष्ट आपल्याला यहोवाला विश्‍वासू राहायला मदत करेल?

सैतान आपल्यावर वेगवेगळ्या मार्गांनी हल्ला करत असला, तरीसुद्धा आपण यहोवाला विश्‍वासू कसं राहू शकतो? (प्रकटी. १३:१०) भविष्यात काय होणार आहे, हे समजून घेतल्यामुळे आपल्याला असं करायला मदत होईल. उदाहरणार्थ, प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रेषित योहानने आपल्याला लवकरच कोणकोणते आशीर्वाद मिळणार आहेत ते सांगितलं आहे. यापैकी एक आशीर्वाद म्हणजे, देवाच्या शत्रूंचा पूर्णपणे नाश केला जाईल. हे शत्रू कोण आहेत आणि लवकरच त्यांचं काय होईल, याबद्दल प्रकटीकरणात दिलेल्या माहितीचं आता आपण परीक्षण करू या.

“चिन्हांच्या रूपात” देवाच्या शत्रूंची ओळख

३. प्रकटीकरणाच्या पुस्तकात देवाच्या शत्रूंना सूचित करणाऱ्‍या कोणत्या जंगली पशूबद्दल सांगितलं आहे?

प्रकटीकरणाच्या पहिल्याच वचनात असं म्हटलं आहे, की या पुस्तकातली माहिती “चिन्हांच्या रूपात,” म्हणजेच लाक्षणिक भाषेत सांगण्यात आली आहे. (प्रकटी. १:१) देवाचे शत्रू कोण आहेत हेसुद्धा लाक्षणिक भाषेत सांगितलं आहे. या पुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या जंगली पशूंचं वर्णन वाचायला मिळतं. उदाहरणार्थ, यापैकी “एक जंगली पशू समुद्रातून वर येताना” दिसतो. याला “दहा शिंगं आणि सात डोकी” आहेत. (प्रकटी. १३:१) त्यानंतर “आणखी एक जंगली पशू पृथ्वीतून वर येताना” दिसतो. हा जंगली पशू अजगरासारखा बोलतो आणि “आकाशातून पृथ्वीवर अग्नीचा वर्षावही करतो.” (प्रकटी. १३:११-१३) पुढे आपण एक वेगळ्या प्रकारचा पशू पाहतो. या “गडद लाल रंगाच्या जंगली पशूवर,” एक वेश्‍या बसलेली आहे. हे तीन जंगली पशू अशा शत्रूंना सूचित करतात, जे बऱ्‍याच काळापासून यहोवा देवाचा आणि त्याच्या राज्याचा विरोध करत आले आहेत. आणि म्हणूनच हे शत्रू नेमके कोण आहेत, हे समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.​—प्रकटी. १७:१, ३.

चार मोठे पशू

ते “समुद्रातून” बाहेर येतात (दानी. ७:१-८, १५-१७) ते अशा जागतिक महासत्तांना सूचित करतात, ज्यांनी दानीएलच्या काळापासून देवाच्या लोकांवर राज्य केलं आणि त्यांचा छळ केला. (परिच्छेद ४, ७)

४-५. दानीएल ७:१५-१७ यात जे सांगितलं आहे, त्यावरून आपल्याला प्रकटीकरणातल्या पुस्तकातल्या पशूंबद्दल काय समजतं?

देवाचे हे शत्रू नेमके कोण आहेत, हे जाणून घेण्याआधी हे वेगवेगळे पशू आणि वेश्‍या कोणाला सूचित करते हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण बायबलचीच मदत घेऊ शकतो. कारण प्रकटीकरणात सांगितलेल्या बऱ्‍याच चिन्हांबद्दल बायबलच्या इतर पुस्तकांमध्ये आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, दानीएल संदेष्ट्याला एक स्वप्न पडलं होतं आणि त्यात “समुद्रातून अतिशय मोठे असे चार प्राणी बाहेर” आले. (दानी. ७:१-३) दानीएल सांगतो की हे चार मोठमोठे प्राणी चार “राजांना” किंवा सरकारांना सूचित करतात. (दानीएल ७:१५-१७ वाचा.) यावरून आपल्याला कळतं, की प्रकटीकरणात वर्णन केलेले प्राणीसुद्धा राजकीय शक्‍तींना सूचित करत असावेत.

आता आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या काही चिन्हांचं परीक्षण करू या. असं केल्यामुळे या चिन्हांचा काय अर्थ होतो, हे आपल्याला बायबलच्या मदतीने समजून घेता येईल. सुरुवातीला आपण त्या जंगली पशूंबद्दल पाहू या. ते कोणाला सूचित करतात, हे आपण सर्वात आधी पाहू. मग आपण पाहू, की पुढे या जंगली पशूंचं काय होतं. आणि शेवटी आपण पाहू, की या सर्व गोष्टींचा आपल्याशी काय संबंध आहे.

देवाचे शत्रू नेमके कोण?

सात डोकी असलेला जंगली पशू

तो “समुद्रातून” बाहेर येतो. त्याला सात डोकी आणि दहा शिंगं आहेत आणि त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आहेत. (प्रकटी. १३:१-४) आजपर्यंत मानवांवर राज्य केलेल्या सगळ्या सरकारांना तो सूचित करतो. त्याची सात डोकी सात जागतिक महासत्तांना सूचित करतात, ज्यांनी देवाच्या लोकांवर राज्य केलं आणि त्यांचा छळ केला (परिच्छेद ६-८)

६. प्रकटीकरण १३:१-४ मध्ये सांगितलेला सात डोकी असलेला जंगली पशू कोणाला सूचित करतो?

सात डोकी असलेला जंगली पशू कोणाला सूचित करतो?  (प्रकटीकरण १३:१-४ वाचा.) हा जंगली पशू चित्त्यासारखा होता. पण त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे आणि तोंड सिंहाच्या तोंडासारखं होतं आणि त्याला दहा शिंगं होती. दानीएलच्या सातव्या अध्यायात उल्लेख केलेल्या चार प्राण्यांमध्येही आपल्याला ही सगळी वैशिष्ट्यं पाहायला मिळतात. पण प्रकटीकरणाच्या पुस्तकात ही सगळी वैशिष्ट्यं चार वेगवेगळ्या पशूंमध्ये नाही तर एकाच पशूमध्ये दिसून येतात. हा पशू कोणत्याही एका सरकारला किंवा जागतिक साम्राज्याला सूचित करत नाही. त्याच्याबद्दल असं सांगितलं आहे, की तो “प्रत्येक वंश, लोक, भाषा आणि राष्ट्र” यांच्यावर राज्य करतो. याचा अर्थ कोणत्याही एका देशाच्या सरकारापेक्षा त्याच्याकडे जास्त सत्ता आणि अधिकार आहे. (प्रकटी. १३:७) यावरून आपल्याला कळतं, की हा जंगली पशू आजपर्यंतच्या इतिहासात मानवजातीवर अधिकार गाजवलेल्या सगळ्या राजकीय सत्तांना सूचित करतो. *​—उप. ८:९.

७. जंगली पशूंच्या सात डोक्यांपैकी प्रत्येक डोकं कशाला सूचित करतं?

प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायातल्या जंगली पशूच्या सात डोक्यांपैकी प्रत्येक डोकं कशाला सूचित करतं?  या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण प्रकटीकरणाच्या १७ व्या अध्यायात याच जंगली पशूच्या ज्या मूर्तीबद्दल सांगण्यात आलं आहे, त्याकडे लक्ष देऊ या. प्रकटीकरण १७:१० यात असं म्हटलं आहे: “सात राजे आहेत: त्यांच्यापैकी पाच पडले आहेत, एक आहे आणि एक अजून आलेला नाही. पण, तो येईल तेव्हा त्याला थोडा काळ राहावं लागेल.” सैतानाने आजपर्यंत ज्या सगळ्या राजकीय सत्तांचा वापर केला आहे, त्यांच्यापैकी सात सत्ता खूप शक्‍तीशाली होत्या आणि म्हणून त्यांची तुलना ‘डोक्यांशी’ केलेली आहे. या जागतिक साम्राज्यांचा देवाच्या लोकांशी संबंध होता. कारण देवाच्या लोकांपैकी बरेच जण त्यांच्या क्षेत्रात राहायचे आणि त्यांनी त्यांचा छळसुद्धा केला. प्रेषित योहानच्या काळात यांपैकी पाच साम्राज्यं आधीच होऊन गेली होती. ती म्हणजे इजिप्त, अश्‍शूर, बाबेल, मेद-पारस, आणि ग्रीस. योहानला प्रकटीकरणाचे दृष्टान्त दाखवण्यात आले त्या वेळी रोम या सहाव्या जागतिक महासत्तेचं राज्य अजूनही सुरू होतं. मग सातवी आणि शेवटची जागतिक महासत्ता किंवा डोकं कोण असणार होतं?

८. जंगली पशूचं सातवं डोकं कोणत्या राजकीय महासत्तेला सूचित करतं?

आता आपण पाहू या, की दानीएलच्या पुस्तकातल्या भविष्यवाण्या आपल्याला जंगली पशूचं सातवं आणि शेवटचं डोकं कशाला सूचित करतं, हे समजून घ्यायला कशी मदत करतात. “प्रभूच्या दिवसात” म्हणजे या शेवटच्या काळात कोणती जागतिक महासत्ता राज्य करत आहे? (प्रकटी. १:१०) ती ब्रिटन आणि अमेरिका या दोन देशांनी मिळून बनलेली अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की प्रकटीकरण १३:१-४ मध्ये ज्या जंगली पशूबद्दल सांगितलं आहे, त्याचं सातवं डोकं म्हणजे हीच अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता आहे.

कोकऱ्‍यासारखी दोन शिंगं असलेला जंगली पशू

तो “पृथ्वीतून वर” येतो आणि “अजगरासारखा” बोलतो. तो “आकाशातून पृथ्वीवर अग्नीचा वर्षावही करतो” आणि ‘खोट्या संदेष्ट्यासारखा’ चमत्कार करतो. (प्रकटी. १३:११-१५; १६:१३; १९:२०) खोटा संदेष्टा म्हटलेला दोन शिंगांचा पशू अँग्लो-अमेरिकन महासत्तेला सूचित करतो. ही महासत्ता पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना फसवून त्यांना सात डोकी आणि दहा शिंगं असलेल्या “जंगली पशूची मूर्ती” बनवायला सांगते (परिच्छेद ९)

९. “कोकऱ्‍यासारखी दोन शिंगं” असलेला जंगली पशू कोणाला सूचित करतो?

प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायातून आपल्याला समजतं, की अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेला सूचित करणारं हे सातवं डोकं आणखी एका जंगली पशूसारखं कार्य करतं. या पशूला “कोकऱ्‍यासारखी दोन शिंगं होती, पण तो अजगरासारखा बोलू लागला.” हा पशू “मोठमोठी चिन्हं करतो; लोकांसमोर आकाशातून पृथ्वीवर अग्नीचा वर्षावही करतो.” (प्रकटी. १३:११-१५) प्रकटीकरणाच्या १६ व्या आणि १९ व्या अध्यायात या जंगली पशूला ‘खोटा संदेष्टा’ असं म्हटलं आहे. (प्रकटी. १६:१३; १९:२०) अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेबद्दल दानीएलनेही एक मिळती-जुळती गोष्ट सांगितली आहे. त्याने म्हटलं की ही महासत्ता “खूप मोठ्या प्रमाणावर नाश करेल.” (दानी. ८:१९, २३, २४, तळटीप) दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान अगदी हेच घडलं. त्या युद्धात जपानवर दोन अणुबॉम्ब टाकण्यात आले आणि तेव्हा हे युद्ध संपलं. हे अणुबॉम्ब ब्रिटन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी मिळून बनवले होते. एका अर्थाने असं म्हणता येईल, की अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेने ‘आकाशातून पृथ्वीवर अग्नीचा वर्षाव केला.’

गडद लाल रंगाचा जंगली पशू

त्याच्यावर मोठी बाबेल म्हटलेली एक वेश्‍या बसलेली आहे. या पशूला आठवा राजा असं म्हटलं आहे. (प्रकटी. १७:३-६, ८, ११) सुरुवातीला ती वेश्‍या जंगली पशूवर नियंत्रण करताना दिसते, पण नंतर तो पशू तिचा नाश करतो. ही वेश्‍या खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याला सूचित करते. आणि तो जंगली पशू आज संयुक्‍त राष्ट्रसंघाला सूचित करतो. ही संघटना सबंध जगातल्या राजकीय व्यवस्थेसाठी काम करते (परिच्छेद १०, १४-१७)

१०. “जंगली पशूची मूर्ती” कशाला सूचित करते? (प्रकटीकरण १३:१४, १५; १७:३, ८, ११)

१० यानंतर आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकात आणखी एका जंगली पशूबद्दल वाचतो. हा पशूसुद्धा सात डोकी असलेल्या जंगली पशूसारखाच दिसतो. पण फरक फक्‍त इतकाच आहे, की हा पशू गडद लाल रंगाचा आहे. त्याला “जंगली पशूची मूर्ती” आणि ‘आठवा राजासुद्धा’ म्हटलं आहे. * (प्रकटीकरण १३:१४, १५; १७:३, ८, ११ वाचा.) या ‘राजाबद्दल’ असं म्हटलं आहे, की तो “आधी होता, पण आता नाही आणि तरी पुन्हा हजर होईल.” हे शब्द संयुक्‍त राष्ट्रसंघाला अगदी अचूकपणे लागू होतात. कारण ही संघटना सुरुवातीला लीग ऑफ नेशन्स या नावाने अस्तित्वात होती. पुढे दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान तिचं अस्तित्व संपलं. नंतर ती संयुक्‍त राष्ट्रसंघ या नावाने पुन्हा अस्तित्वात आली आणि आज ती सबंध जगाच्या राजकीय व्यवस्थेसाठी काम करते.

११. जंगली पशू काय करतात, पण आपल्याला घाबरण्याची गरज का नाही?

११ जंगली पशू किंवा सरकारं लोकांना यहोवाचा आणि त्याच्या सेवकांचा विरोध करण्याचं प्रोत्साहन देतात. एका अर्थाने ते “संपूर्ण पृथ्वीवरच्या [राजांना]” हर्मगिदोनसाठी म्हणजेच “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी एकत्र करतात.” (प्रकटी. १६:१३, १४, १६) पण त्या वेळी आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नसेल कारण आपला महान देव यहोवा त्याच्या राज्याच्या बाजूने असलेल्या सर्वांना वाचवण्यासाठी लगेच पाऊल उचलेल.​—यहे. ३८:२१-२३.

१२. सगळ्या जंगली पशूंचं शेवटी काय होईल?

१२ सगळ्या जंगली पशूंचं शेवटी काय होईल?  याचं उत्तर आपल्याला प्रकटीकरण १९:२० मध्ये मिळतं, ज्या ठिकाणी म्हटलं आहे: “जंगली पशूला आणि त्याच्यासोबत खोट्या संदेष्ट्यालाही पकडण्यात आलं. त्याने त्या जंगली पशूसमोर चमत्कार करून, स्वतःवर जंगली पशूची खूण करून घेतलेल्यांना आणि त्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्‍यांना फसवलं होतं. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आलं.” याचा अर्थ देवाचे शत्रू म्हणजे ही सरकारं अजूनही सत्तेवर असतानाच त्यांचा कायमचा नाश केली जाईल.

१३. जगातल्या सरकारांमुळे देवाच्या लोकांसमोर कोणती समस्या निर्माण होते?

१३ या भविष्यवाण्यांचा आपल्याशी काय संबंध आहे?  ख्रिस्ती या नात्याने आपण देवाला आणि त्याच्या राज्याला एकनिष्ठ असलं पाहिजे. (योहा. १८:३६) त्यासाठी आपण या जगातल्या राजकीय गोष्टींच्या बाबतीत पूर्णपणे निष्पक्ष राहणं गरजेचं आहे. पण कधीकधी आपल्याला हे खूप कठीण जाऊ शकतं. कारण जगातली सरकारं आपल्याकडून अशी अपेक्षा करतात, की आपण आपल्या वागण्या-बोलण्यातून त्यांना पूर्ण पाठिंबा द्यावा. जे त्यांच्या दबावाला बळी पडतात, ते एका अर्थाने स्वतःवर जंगली पशूची खूण करून घेतात. (प्रकटी. १३:१६, १७) पण जे लोक ही खूण करून घेतात, ते यहोवाचा क्रोध ओढवून घेतील आणि ते कायमचं जीवन गमावून बसतील. (प्रकटी. १४:९, १०; २०:४) तर मग, कितीही दबाव आला तरीसुद्धा आपल्यापैकी प्रत्येकाने पूर्णपणे निष्पक्ष राहणं खरंच किती महत्त्वाचं आहे!

मोठ्या वेश्‍येचा भयानक आणि लाजिरवाणा अंत!

१४. प्रकटीकरण १७:३-५ मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रेषित योहानला कशामुळे आश्‍चर्य वाटतं?

१४ प्रेषित योहान पुढे म्हणतो, की त्याने असं काहीतरी पाहिलं ज्यामुळे त्याला “फार आश्‍चर्य” वाटलं. त्याने असं काय पाहिलं होतं? त्या जंगली पशूंपैकी एका पशूवर त्याला एक स्त्री बसलेली दिसली. (प्रकटी. १७:१, २, ६) त्या स्त्रीला एका “मोठ्या वेश्‍येच्या” रूपात दाखवण्यात आलं आहे आणि तिला “मोठी बाबेल” असं म्हणण्यात आलं आहे. ती ‘पृथ्वीवरच्या राजांसोबत’ “अनैतिक लैंगिक कृत्यं” करते.​—प्रकटीकरण १७:३-५ वाचा.

१५-१६. “मोठी बाबेल” कोणाला सूचित करते आणि आपण असं का म्हणू शकतो?

१५ “मोठी बाबेल” कोण आहे?  ही स्त्री कोणत्याही राजकीय संघटनेला सूचित करू शकत नाही. कारण ती जगातल्या राजकीय पुढाऱ्‍यांसोबत अनैतिक कामं करते, असं प्रकटीकरणात सांगण्यात आलं आहे. (प्रकटी. १८:९) खरंतर ती या शासकांवर अधिकार गाजवायचा प्रयत्न करते. कारण प्रकटीकरणात असं म्हटलं आहे, की ती या जंगली पशूवर बसलेली आहे. ती स्त्री सैतानाच्या जगातल्या लोभी व्यापारी संस्थांनाही सूचित करू शकत नाही. कारण त्यांना ‘पृथ्वीचे व्यापारी’ असं म्हणून एका वेगळ्या गटाच्या रूपात दाखवण्यात आलं आहे.​—प्रकटी. १८:११, १५, १६.

१६ बायबलमध्ये ‘वेश्‍या’ हा शब्द अशा लोकांसाठी वापरण्यात आला आहे, जे देवाची सेवा करण्याचा दावा तर करतात पण दुसरीकडे मूर्तीपूजा करतात किंवा इतर मार्गांनी या जगाशी मैत्री करतात. (१ इति. ५:२५, तळटीप; याको. ४:४) याउलट, जे देवाची विश्‍वासूपणे सेवा करतात त्यांना “शुद्ध” किंवा “कुमारी” असं म्हणण्यात आलं आहे. (२ करिंथ. ११:२; प्रकटी. १४:४) प्राचीन काळात बाबेल शहर खोट्या उपासनेचं केंद्र होतं. त्यामुळे मोठी बाबेल ही सर्व प्रकारच्या खोट्या उपासनेला सूचित करते असं म्हणता येईल. खरं पाहिलं तर मोठी बाबेल हे खोट्या धर्माचं जागतिक साम्राज्य आहे.​—प्रकटी. १७:५, १८; आनंद घ्या!  काही विषयांवर स्पष्टीकरण १, “मोठी बाबेल” पाहा.

१७. मोठया बाबेलचं शेवटी काय होईल?

१७ मोठ्या बाबेलचं शेवटी काय होईल?  या प्रश्‍नाचं उत्तर आपल्याला प्रकटीकरण १७:१६, १७ या वचनांमध्ये मिळतं. तिथे म्हटलं आहे: “दहा शिंगं आणि तू पाहिलेला जंगली पशू हे वेश्‍येचा तिरस्कार करतील. ते तिला उद्ध्‌वस्त आणि नग्न करतील तसंच, तिचं मांस खातील आणि तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकतील. कारण, देवाने आपला विचार पूर्ण करण्याचं त्यांच्या मनात घातलं.” याचा अर्थ जगातली राष्ट्रं, गडद लाल रंगाच्या जंगली पशूचा म्हणजेच संयुक्‍त राष्ट्रसंघाचा वापर करून खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यावर हल्ला करतील आणि त्याचा पूर्णपणे नाश करतील. असं करण्यासाठी स्वतः यहोवा त्यांना प्रवृत्त करेल.​—प्रकटी. १८:२१-२४.

१८. मोठ्या बाबेलशी आपला कोणताही संबंध नाही हे आपण कसं दाखवू शकतो?

१८ याचा आपल्याशी काय संबंध आहे?  आपण “आपला देव आणि पिता याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ उपासना” करत राहिली पाहिजे. (याको. १:२७) मोठ्या बाबेलच्या खोट्या शिकवणी, मूर्तिपूजक सणवार, खालावलेले नैतिक स्तर आणि भूतविद्येशी संबंधित असलेल्या प्रथा यांपासून आपण पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे. यासोबतच लोकांनी तिच्या पापाचे भागीदार होऊ नये म्हणून “तिच्यामधून बाहेर या” असा इशारा आपण त्यांना देत राहिलं पाहिजे.​—प्रकटी. १८:४.

देवाच्या सगळ्यात मोठ्या शत्रूचा न्याय

अग्नीच्या रंगाचा अजगर

सैतान जंगली पशूला शक्‍ती देतो. (प्रकटी. १२:३, ९, १३; १३:४; २०:२, १०) यहोवाचा सगळ्यात मोठा शत्रू असलेल्या सैतानाला १,००० वर्षांसाठी अथांग डोहात टाकलं जातं. त्यानंतर त्याला “अग्नी आणि गंधकाच्या सरोवरात” फेकून देण्यात येईल (परिच्छेद १९-२०)

१९. ‘अग्नीच्या रंगाचा मोठा अजगर’ कोण आहे?

१९ प्रकटीकरणाच्या पुस्तकात ‘अग्नीच्या रंगाच्या एका मोठ्या अजगराबद्दलही’ सांगितलं आहे. (प्रकटी. १२:३) हा अजगर, येशू आणि त्याच्या स्वर्गदूतांबरोबर लढतो. (प्रकटी. १२:७-९) तसंच, तो देवाच्या लोकांवर हल्ला करतो आणि जंगली पशूंना म्हणजेच मानवी सरकारांना अधिकार देतो. (प्रकटी. १२:१७; १३:४) हा अजगर कोण आहे? तो ‘जुना साप’ म्हणजेच दियाबल सैतान आहे. (प्रकटी. १२:९; २०:२) यहोवाच्या इतर सगळ्या शत्रूंच्या पाठीमागे खरंतर तोच आहे.

२०. अजगराचं शेवटी काय होईल?

२० अजगराचं शेवटी काय होईल?  प्रकटीकरण २०:१-३ यात असं सांगितलं आहे, की एक स्वर्गदूत सैतानाला अथांग डोहात फेकून देईल. याचा अर्थ त्याला कैद करून ठेवण्यात येईल. कैदेत असल्यामुळे ‘१,००० वर्षं पूर्ण होईपर्यंत तो राष्ट्रांना बहकवू’ शकणार नाही. शेवटी सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना “अग्नी आणि गंधकाच्या सरोवरात” फेकून देण्यात येईल. याचाच अर्थ त्यांचा कायमचा नाश केला जाईल. (प्रकटी. २०:१०) जरा कल्पना करा, सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत अस्तित्वात नसतील तेव्हा तो खरंच किती सुंदर काळ असेल!

२१. प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आपण जे काही शिकलो त्यातून आपल्याला प्रोत्साहन आणि दिलासा का मिळतो?

२१ प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेल्या चिन्हांचा अर्थ समजून घेतल्यामुळे आपल्याला खूप प्रोत्साहन आणि दिलासा मिळाला आहे. कारण या लेखात आपण यहोवाचे शत्रू नेमके कोण आहेत, हे तर पाहिलंच पण त्यासोबतच शेवटी त्यांचं काय होईल हेसुद्धा पाहिलं. खरंच ‘जो या भविष्यवाणीचे शब्द मोठ्याने वाचतो आणि जे या भविष्यवाणीचे शब्द ऐकतात ते आशीर्वादित आहेत.’ (प्रकटी. १:३) पण देवाच्या शत्रूंचा नाश झाल्यावर विश्‍वासू लोकांना कोणते आशीर्वाद मिळतील? याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत ३० यहोवाने राज्य आरंभिले

^ परि. 5 देवाचे शत्रू कोण आहेत हे प्रकटीकरणाच्या पुस्तकात चिन्हांच्या रूपात सांगण्यात आलं आहे. या चिन्हांचा काय अर्थ होतो हे समजून घेण्यासाठी दानीएलचं पुस्तक आपल्याला मदत करतं. या लेखात आपण दानीएल आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात असणाऱ्‍या काही मिळत्या-जुळत्या भविष्यवाण्यांचं परीक्षण करू या. असं केल्यामुळे देवाचे शत्रू कोण आहेत हे समजून घ्यायला आपल्याला मदत होईल. आणि नंतर आपण पाहू की भविष्यात या शत्रूंचं काय होईल.

^ परि. 6 सात डोकी असलेला हा पशू सगळ्या राजकीय सत्तांना सूचित करतो, असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याला “दहा शिंगं” आहेत. बायबलमध्ये बऱ्‍याचदा दहा ही संख्या पूर्णतेला सूचित करण्यासाठी वापरण्यात आली आहे.

^ परि. 10 पहिल्या जंगली पशूसारखे या मूर्तीच्या शिंगांवर “मुकुट” नाहीत. (प्रकटी. १३:१) कारण हा आठवा राजा “सातांपासून झाला आहे,” म्हणजेच त्यांच्याकडून त्याला अधिकार मिळाला आहे.​—जास्त माहितीसाठी प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!  या पुस्तकातला अध्याय ३५ पाहा.