व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २०

आणखी चांगल्या प्रकारे प्रार्थना कशा करता येतील?

आणखी चांगल्या प्रकारे प्रार्थना कशा करता येतील?

“त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करा.”​—स्तो. ६२:८.

गीत ४५ माझ्या मनातले विचार

सारांश a

आपण नियमितपणे यहोवाला प्रार्थना करून जीवनातल्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्याच्याकडे मार्गदर्शन मागू शकतो (परिच्छेद १ पाहा)

१. आपल्या उपासकांनी काय करावं अशी यहोवाची इच्छा आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

 आपल्याला सांत्वनाची आणि मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा आपण कोणाकडे वळलं पाहिजे? साहजिकच आपण यहोवाकडे वळलं पाहिजे आणि त्याला प्रार्थना केली पाहिजे. आणि आपण हेच करावं अशी यहोवा देवाची इच्छा आहे. आपण त्याला वारंवार ‘प्रार्थना करावी’ असं त्याला वाटतं. (१ थेस्सलनी. ५:१७) जीवनातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल आपण अगदी मनमोकळेपणाने त्याला प्रार्थना करू शकतो आणि त्याच्याकडे मदत मागू शकतो. (नीति. ३:५, ६) यहोवा खूप उदार मनाचा देव आहे त्यामुळे आपण त्याला कितीही वेळा प्रार्थना करू शकतो.

२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो याबद्दल आपण खरंच त्याचे किती आभार मानले पाहिजेत! पण आपल्या या धावपळीच्या जीवनात प्रार्थनेसाठी वेळ काढणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. शिवाय आपण आणखी चांगल्या प्रकारे प्रार्थना केली पाहिजे असंही आपल्याला वाटेल. आनंदाची गोष्ट म्हणजे, याबद्दल शास्त्रवचनांतून आपल्याला भरपूर प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळू शकतं. या लेखात आपण येशूच्या उदाहरणाचं परीक्षण करू या आणि जाणून घेऊ या, की प्रार्थनेसाठी आपण वेळ कसा काढू शकतो. तसंच, आणखी चांगल्या प्रकारे प्रार्थना करण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी आपण प्रार्थनेत बोलू शकतो तेसुद्धा आपण या लेखात पाहू या.

प्रार्थनेसाठी येशूने वेळ काढला

३. प्रार्थनेबद्दल येशूला काय माहीत होतं?

यहोवाला आपल्या प्रार्थना किती महत्त्वाच्या वाटतात हे येशूला माहीत होतं. पृथ्वीवर येण्याच्या बऱ्‍याच काळाआधी त्याच्या पित्याने विश्‍वासू स्त्री-पुरुषांच्या प्रार्थनेचं कसं उत्तर दिलं हे त्याने स्वतः पाहिलं होतं. उदाहरणार्थ हन्‍ना, दावीद, एलीया आणि अशा इतर विश्‍वासू जणांच्या प्रार्थनेचं यहोवाने उत्तर दिलं तेव्हा येशू आपल्या पित्यासोबतच होता. (१ शमु. १:१०, ११, २०; १ राजे १९:४-६; स्तो. ३२:५) आणि म्हणूनच येशूने आपल्या शिष्यांना वारंवार आणि पूर्ण विश्‍वासाने प्रार्थना करायला सांगितलं.​—मत्त. ७:७-११.

४. प्रार्थनेच्या बाबतीत येशूच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

प्रार्थना करण्याच्या बाबतीत येशूने आपल्या शिष्यांसमोर एक चांगलं उदाहरण मांडलं. आपल्या संपूर्ण सेवाकार्यादरम्यान त्याने कितीतरी वेळा प्रार्थना केली. येशू सहसा खूप व्यस्त असायचा आणि त्याच्या आजूबाजूला नेहमी लोक असायचे. त्यामुळे प्रार्थनेसाठी त्याला वेळ काढावा लागायचा. (मार्क ६:३१, ४५, ४६) उदाहरणार्थ, एकांतात प्रार्थना करता यावी म्हणून एकदा तो अगदी पहाटेच उठला. (मार्क १:३५) तसंच आणखी एकदा एक महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी त्याने अख्खी रात्र देवाला प्रार्थना केली. (लूक ६:१२, १३) शिवाय आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने वारंवार देवाला प्रार्थना केली. कारण ज्यासाठी त्याला पृथ्वीवर पाठवलं होतं त्यातली सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी त्याला पूर्ण करायची होती.​—मत्त. २६:३९, ४२, ४४.

५. प्रार्थनेच्या बाबतीत आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

येशूच्या उदाहरणातून आपण हे शिकतो, की आपण कितीही व्यस्त असलो तरी प्रार्थनेसाठी आपण वेळ काढला पाहिजे. आणि येशूसारखंच आपण एक विशिष्ट वेळ ठरवली पाहिजे. त्यासाठी आपण सकाळी लवकर उठू शकतो किंवा रात्री उशिरा प्रार्थना करू शकतो. यावरून आपण दाखवून देतो, की प्रार्थनेच्या या खास भेटीबद्दल आपण यहोवाचे किती आभारी आहोत. आपल्याला प्रार्थना करण्याचा बहुमान मिळाला आहे ही गोष्ट लीन नावाच्या एका बहिणीला पहिल्यांदा कळली तेव्हा तिला कसं वाटलं याबद्दल ती म्हणते: “मी यहोवाशी केव्हाही बोलू शकते हे मला कळलं तेव्हा यहोवा मला एका जवळच्या मित्रासारखा वाटला आणि मला आणखी चांगल्या प्रकारे प्रार्थना करावीशी वाटली.” आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना असंच वाटतं. तर चला, आता आपण अशा पाच महत्त्वाच्या गोष्टी पाहू या ज्यांबद्दल आपण आपल्या प्रार्थनेत बोलू शकतो.

पाच महत्त्वाच्या गोष्टी

६. प्रकटीकरण ४:१०, ११ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा कोणत्या गोष्टी मिळण्यासाठी योग्य आहे?

यहोवाची स्तुती करा. प्रेषित योहानने एक अद्‌भुत दृष्टान्त पाहिला होता. त्यात त्याने पाहिलं की २४ वडील स्वर्गात यहोवाची उपासना करत आहेत. यहोवा “गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यासाठी” योग्य आहे असं म्हणून ते यहोवाची स्तुती करत होते. (प्रकटीकरण ४:१०, ११ वाचा.) विश्‍वासू स्वर्गदूतांकडेसुद्धा यहोवाची स्तुती आणि सन्मान करायची असंख्य कारणं आहेत. ते स्वर्गात त्याच्यासोबत असल्यामुळे त्याला खूप जवळून ओळखतात. तसंच यहोवा जे काही करतो त्यातून त्यांना त्याचे सुंदर गुण पाहायला मिळतात. त्यामुळे जेव्हा ते यहोवाला काम करताना पाहतात तेव्हा त्यांना त्याची स्तुतीच करावीशी वाटते.​—ईयो. ३८:४-७.

७. आपण कोणत्या गोष्टींसाठी यहोवाची स्तुती करू शकतो?

आपणही प्रार्थनेत यहोवाची स्तुती केली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपल्याला किती प्रेम आणि कदर आहे हे त्याला सांगितलं पाहिजे. त्यामुळे बायबल वाचताना आणि त्याचा अभ्यास करताना यहोवाचे कोणते गुण तुम्हाला खासकरून आवडतात ते पाहण्याचा प्रयत्न करा. (ईयो. ३७:२३; रोम. ११:३३) आणि मग त्या गुणांबद्दल तुम्हाला कसं वाटतं ते प्रार्थनेत त्याला सांगा. यासोबतच यहोवा तुम्हाला आणि जगभरातल्या भाऊबहिणींना कशा प्रकारे मदत करत आहे याचा विचार करा. तो सतत आपली काळजी घेतो आणि संरक्षण करतो यासाठी आपण त्याची स्तुती केली पाहिजे.​—१ शमु. १:२७; २:१, २.

८. यहोवाचे आभार मानण्याची कोणती काही कारणं आपल्याकडे आहेत? (१ थेस्सलनीकाकर ५:१८)

यहोवाचे आभार माना.  प्रार्थनेत यहोवाचे आभार मानण्याची कितीतरी कारणं आपल्याकडे आहेत. (१ थेस्सलनीकाकर ५:१८ वाचा.) आपल्याकडे असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आपण त्याचे आभार मानू शकतो. कारण शेवटी प्रत्येक चांगली देणगी देणारा तोच आहे. (याको. १:१७) उदाहरणार्थ, या सुंदर पृथ्वीसाठी आणि सृष्टीतल्या अद्‌भुत गोष्टींसाठी आपण त्याचे आभार मानू शकतो. याशिवाय आपल्याला जीवन दिल्याबद्दल तसंच कुटुंब, मित्र आणि एक सुंदर आशा दिल्याबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाने आपल्याला त्याच्यासोबत मैत्री करण्याची संधी दिली याबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो.

९. यहोवा आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आपण कदर का बाळगली पाहिजे?

यहोवाने खास माझ्यासाठी काय केलं आहे आणि त्याबद्दल मला त्याचे आभार कसे मानता येतील याचा विचार करण्यासाठी कदाचित आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. आपण अशा जगात जगत आहोत जिथे कोणीही उपकाराची जाणीव ठेवत नाही. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कदर बाळगण्याऐवजी लोक सहसा आपल्याला आणखी काय-काय पाहिजे याचाच जास्त विचार करतात. आपलीही वृत्ती अशीच झाली तर आपल्या प्रार्थना, विनंत्यांची एक मोठी यादीच बनून जाईल. आपण जर काळजी घेतली नाही तर आपणही त्यांच्यासारखेच होऊ शकतो. आणि मग प्रार्थनेत यहोवाचे आभार मानण्याऐवजी प्रत्येक वेळी कोणत्या न्‌ कोणत्या गोष्टीची आपण त्याच्याकडे विनंतीच करत असू. आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून यहोवा आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आपण कदर बाळगली पाहिजे आणि ती व्यक्‍तही केली पाहिजे.​—लूक ६:४५.

प्रार्थनेत यहोवाचे आभार मानल्यामुळे आपल्याला धीर धरायला मदत होऊ शकते (परिच्छेद १० पाहा)

१०. आभार मानण्याची वृत्ती असल्यामुळे एका बहिणीला आपल्या परीक्षेचा कसा सामना करता आला? (चित्रसुद्धा पाहा.)

१० आपल्यामध्ये आभार मानायची वृत्ती असेल तर जीवनातल्या कठीण प्रसंगांचाही आपल्याला सामना करता येईल. १५ जानेवारी २०१५ च्या टेहळणी बुरूज  अंकात क्यूंग-सुक नावाच्या एका बहिणीचा जो अनुभव दिला होता त्याचाच विचार करा. तिला फुप्फुसाचा कॅन्सर झाला होता आणि तो खूप वाढला होता. ती म्हणते: “आजाराबद्दल समजल्यावर मला खूप मोठा धक्का बसला! आता आयुष्यात काहीच उरलं नाही असं मला वाटलं. खूप भीतीही वाटली.” मग या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तिला कशामुळे मदत झाली? ती सांगते की रोज रात्री झोपायच्या आधी ती घराच्या छतावर जायची आणि दिवसभरात कोणत्या पाच गोष्टींसाठी तिला यहोवाचे आभार मानावेसे वाटतात याबद्दल ती मोठ्याने प्रार्थना करायची. त्यामुळे तिचं मन शांत व्हायचं आणि यहोवाबद्दल असलेलं प्रेम तिला व्यक्‍त करता यायचं. आपले विश्‍वासू सेवक कठीण प्रसंगातून जात असतात तेव्हा यहोवा त्यांना कसं सांभाळतो हे तिने अनुभवलं. आणि आपल्या जीवनात समस्यांपेक्षा आशीर्वाद कितीतरी जास्त असल्याचं तिला जाणवलं. या बहिणीसारखंच आपणही कदाचित एखाद्या कठीण परीक्षेतून जात असू. पण अशा वेळीसुद्धा यहोवाचे आभार मानण्याची कितीतरी कारणं आपल्याकडे आहेत. आपण जर प्रार्थनेत यहोवाचे आभार मानले तर आपल्याला परीक्षेचा सामना करता येईल आणि आपलं मन शांत ठेवता येईल.

११. येशू स्वर्गात परत गेल्यानंतर त्याच्या शिष्यांना धैर्याची गरज का होती?

११ धैर्याने साक्ष देण्यासाठी यहोवाकडे मदत मागा.  स्वर्गात जाण्याआधी येशूने “यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” साक्ष देण्याच्या त्यांच्या जबाबदारीबद्दल त्यांना आठवण करून दिली. (प्रे. कार्यं १:८; लूक २४:४६-४८) याच्या काही काळानंतरच यहुदी धर्मगुरूंनी प्रेषित पेत्र आणि योहान यांना पकडलं आणि न्यायसभेसमोर आणलं. त्यांनी त्यांना धमकावून अशी आज्ञा दिली की त्यांनी प्रचारकार्य थांबवावं. (प्रे. कार्यं ४:१८, २१) मग पेत्र आणि योहान यांनी काय केलं?

१२. प्रेषितांची कार्यं ४:२९ आणि ३१ मध्ये सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी काय केलं?

१२ यहुदी धर्मगुरूंनी पेत्र आणि योहान यांना धमकावलं तेव्हा ते त्यांना म्हणाले: “आम्ही देवाऐवजी तुमचं ऐकावं, हे देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल का, हे तुम्हीच ठरवा. पण आमच्याबद्दल विचाराल, तर ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.” (प्रे. कार्यं ४:१९, २०) पेत्र आणि योहान यांना सोडण्यात आलं तेव्हा यहोवाची इच्छा पूर्ण करता यावी यासाठी त्यांनी यहोवाला प्रार्थना केली. ते म्हणाले: “तुझं वचन पूर्ण धैर्याने सांगत राहायला तुझ्या सेवकांना बळ दे.” त्यांनी मनापासून केलेल्या या प्रार्थनेचं यहोवाने उत्तर दिलं.​—प्रेषितांची कार्यं ४:२९, ३१ वाचा.

१३. जिनयुक या बांधवाच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१३ सरकारी अधिकाऱ्‍यांनी आपल्याला प्रचारकार्य बंद करायला सांगितलं तरी प्रचारकार्य करत राहून आपण शिष्यांचं अनुकरण करू शकतो. जिनयुक नावाच्या एका भावचंच उदाहरण घ्या. त्याला आपल्या विश्‍वासासाठी तुरुंगात टाकण्यात आलं होतं. तिथे त्याला एकांतवासाची शिक्षा भोगणाऱ्‍या काही कैद्यांना मदत करायचं काम सोपवलं होतं. पण त्यांच्याशी बोलताना या कामाशिवाय तो दुसऱ्‍या कोणत्याच गोष्टीबद्दल त्यांच्याशी बोलू शकत नव्हता. अगदी बायबलबद्दलसुदधा नाही. पण मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन, धैर्याने तसंच सांभाळून आणि विचार करून त्यांच्याशी सत्याबद्दल बोलता यावं म्हणून त्याने यहोवाकडे प्रार्थना केली. (प्रे. कार्यं ५:२९) तो म्हणतो: “यहोवाने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. आणि मला साक्ष देण्याचं धैर्य आणि बुद्धी दिली. त्यामुळे कोठडीच्या दरवाजावरच पाच-पाच मिनिटांचे कितीतरी बायबल अभ्यास मी सुरू करू शकलो. मग दररोज रात्री मी पत्र लिहायचो आणि दुसऱ्‍या दिवशी ती पत्र कैद्यांना द्यायचो.” आपणसुद्धा अशी खातरी बाळगू शकतो की यहोवा आपल्याला सेवाकार्य करत राहण्यासाठी मदत करेल. जिनयुक या बांधवासारखंच आपणही धैर्य आणि बुद्धीसाठी यहोवाला प्रार्थना करू शकतो.

१४. समस्यांचा सामना करत असताना कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? (स्तोत्र ३७:३, ५)

१४ समस्यांचा सामना करण्यासाठी यहोवाकडे मदत मागा.  आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. कोणाला आजाराचा तर कोणाला भावनिक समस्यांचा. काहींच्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला आहे, कोणाला कौटुंबिक समस्या आहेत, तर कोणाला छळ किंवा इतर काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यातच महामाऱ्‍या आणि युद्धं यांमुळे या समस्यांचा सामना करणं आणखीनच कठीण झालं आहे. पण अशा वेळी यहोवाजवळ आपलं मन मोकळं करा. एखाद्या जवळच्या मित्राला जसं तुम्ही सांगाल तसं तुमच्या परिस्थितीबद्दल सगळं काही यहोवाला सांगा. आणि याची खातरी बाळगा की ‘तो तुमच्या वतीने कार्य करेल.’​—स्तोत्र ३७:३,  वाचा.

१५. ‘संकटात धीर धरायला’ प्रार्थनेमुळे कशी मदत होऊ शकते याचं एक उदाहरण द्या.

१५ आपण जर यहोवाला प्रार्थना करत राहिलो तर “संकटात धीर” धरायला आपल्याला मदत होईल. (रोम. १२:१२) आपले सेवक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे यहोवाला माहीत आहे आणि ‘तो त्यांच्या मदतीची याचना’ ऐकतो. (स्तो. १४५:१८, १९) हे किती खरंय ते २९ वर्षांच्या एका पायनियर बहिणीने, क्रिस्टीने अनुभवलं. तिला अचानक आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे ती खूप निराश झाली. नंतर तिला कळलं की तिच्या आईलाही एक जीवघेणा आजार झाला आहे. क्रिस्टी म्हणते: “मी दररोज यहोवाला कळकळून प्रार्थना करायचे. आणि येणाऱ्‍या प्रत्येक दिवसाचा सामना करण्यासाठी त्याच्याकडे बळ मागायचे. त्या काळात मी एकही सभा चुकवली नाही आणि व्यक्‍तिगत अभ्यासही करत राहिले.” ती पुढे म्हणते: “त्या कठीण काळाचा सामना करण्यासाठी प्रार्थनेमुळेच मला मदत झाली. यहोवा नेहमी माझ्यासोबत आहे हे मला माहीत होतं. आणि त्यामुळेच त्या काळात मला खूप आधार मिळाला. माझ्या आरोग्याच्या समस्या काही लगेच सुटल्या नाहीत. पण यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं. त्याने माझं मन शांत ठेवायला मला मदत केली.” आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवू या, की “देवाची भक्‍ती करत जीवन जगणाऱ्‍या लोकांची परीक्षेतून सुटका कशी करावी . . . हे यहोवाला माहीत आहे.”​—२ पेत्र २:९.

मोहाचा प्रतिकार करण्याकरता (१) मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा (२) प्रार्थनेनुसार काम करा आणि (३) यहोवासोबतचं तुमचं नातं मजबूत करा (परिच्छेद १६-१७ पाहा)

१६. मोहाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज का आहे?

१६ मोहाचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाकडे मदत मागा.  आपण अपरिपूर्ण असल्यामुळे वाईट गोष्टी करण्याच्या मोहाविरुद्ध आपल्याला सतत झगडावं लागतं. आणि आपला हा संघर्ष आणखी कठीण करण्यासाठी सैतान पुरेपूर प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी सैतान बऱ्‍याचदा खालच्या दर्जाचं मनोरंजन वापरतो. अशा मनोरंजनाचा वापर करून तो आपल्या मनात वाईट विचार पेरतो. अशा विचारांमुळे आपलं मन भ्रष्ट होतं आणि आपल्या हातून गंभीर चूक होऊ शकते.​—मार्क ७:२१-२३; याको. १:१४, १५.

१७. मोहाचा प्रतिकार करण्यासाठी प्रार्थनेसोबत आपण आणखी काय केलं पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)

१७ चुकीच्या गोष्टी करण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे. प्रार्थना कशी करायची हे शिष्यांना शिकवताना येशूने त्यांना अशी विनंती करायलाही सांगितलं: “आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर त्या दुष्टापासून वाचव.” (मत्त. ६:१३) यहोवा आपल्याला मदत करायला तयार आहे. पण त्यासाठी आपण त्याच्याकडे मदत मागितली पाहिजे. तसंच आपण आपल्या प्रार्थनांप्रमाणे वागलंही पाहिजे. आणि सैतानाच्या या दुष्ट जगात प्रचलित असलेले चुकीचे विचार आणि कल्पना यांपासून दूर राहायचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. (स्तो. ९७:१०) त्याऐवजी बायबलचं वाचन आणि अभ्यास करून आपण आपल्या मनात चांगले विचार पेरले पाहिजेत. तसंच सभांना गेल्यामुळे आणि सेवाकार्यात भाग घेतल्यामुळे आपले विचार शुद्ध राहू शकतात. आपण जर असं केलं तर यहोवासुद्धा आपल्याला वचन देतो की आपण सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो आपल्यावर येऊ देणार नाही.​—१ करिंथ. १०:१२, १३.

१८. प्रार्थनेच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच काय केलं पाहिजे?

१८ या शेवटच्या कठीण काळात यहोवाला विश्‍वासू राहण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने खूप जास्त प्रार्थना करण्याची गरज आहे. यहोवाला मनापासून प्रार्थना करण्यासाठी दररोज वेळ काढा. आपण यहोवासमोर “आपलं मन मोकळं” करावं अशी त्याची इच्छा आहे. (स्तो. ६२:८) तो आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल त्याचे आभार माना आणि त्याची स्तुती करा. धैर्याने सेवाकार्य करण्यासाठी त्याच्याकडे मदत मागा. समस्यांचा धीराने सामना करण्यासाठी आणि मोहांचा प्रतिकार करण्यासाठी त्याच्याकडे मदतीची याचना करा. यहोवाला नियमितपणे प्रार्थना करा आणि त्यासाठी कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्‍तीला आड येऊ देऊ नका. पण यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत ४२ देवाच्या सेवकाची प्रार्थना

a आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं, की आपल्या प्रार्थना एका जवळच्या मित्राला प्रेमाने लिहिलेल्या पत्रासारख्या असाव्यात. पण प्रार्थनेसाठी वेळ काढणं नेहमीच सोपं नसतं. शिवाय प्रार्थनेत काय म्हणावं हेही काही वेळा सुचत नाही. या लेखात या दोन्ही गोष्टींबद्दल चर्चा केली जाईल.