व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २२

‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालत राहा

‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालत राहा

“एक राजमार्ग तिथे असेल, हो, ज्याला ‘पवित्रतेचा मार्ग’ म्हणतात तो तिथे असेल.”​—यश. ३५:८.

गीत ३१ देवासोबत चालत राहा!

सारांश a

१-२. बाबेलमध्ये राहणाऱ्‍या यहुद्यांना कोणता महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार होता? (एज्रा १:२-४)

 राजाकडून घोषणा झाली होती. जवळजवळ ७० वर्षं बंदिवासात असलेले यहुदी, मायदेशी म्हणजे इस्राएलला जाऊ शकत होते. (एज्रा १:२-४ वाचा.) हे फक्‍त यहोवाच घडवून आणू शकत होता. पण आपण असं का म्हणू शकतो? कारण बाबेल आपल्या गुलामांना सहसा बंदिवासातून मुक्‍त करत नव्हतं. (यश. १४:४, १७) पण बाबेलची सत्ता पलटली होती. आणि आता नवीन राजाने यहुद्यांना आपल्या मायदेशी जाण्यासाठी सांगितलं होतं. त्यामुळे प्रत्येक यहुदी व्यक्‍तीला आणि खासकरून कुटुंबप्रमुखांना आता एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. तो म्हणजे आपल्या मायदेशी जायचं की बाबेलमध्येच राहायचं. आणि हा निर्णय घेणं नक्कीच सोपं नव्हतं. का बरं?

कारण वयस्कर लोकांना हा खडतर प्रवास झेपण्यासारखा नव्हता. तसंच यहुद्यांपैकी बऱ्‍याच लोकांचा जन्म बाबेलमध्येच झाल्यामुळे तोच त्यांचा मायदेश होता. आणि इस्राएल हा त्यांच्यासाठी फक्‍त त्यांच्या पूर्वजांचा देश होता. याशिवाय काही यहुद्यांनी बाबेलमध्ये चांगली धनसंपत्ती मिळवली होती. त्यामुळे तिथलं ऐशआरामाचं जीवन सोडून आणि व्यवसाय सोडून एका परक्या देशात जाऊन राहणं त्यांना कठीण वाटलं असेल.

३. इस्राएलला परतणाऱ्‍या विश्‍वासू यहुद्यांना कोणता आशीर्वाद मिळणार होता?

पण विश्‍वासू यहुद्यांना हे माहीत होतं, की इस्राएलला परत जाण्यासाठी त्यांना जितके त्याग करावे लागतील त्यापेक्षा कितीतरी जास्त आशीर्वाद त्यांना मिळणार होते. आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद तर उपासनेच्या बाबतीत होता. कारण बाबेलमध्ये खोट्या देवी-दैवतांची ५० पेक्षा जास्त मंदिरं होती. पण यहोवाचं एकही मंदिर त्या शहरात नव्हतं. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे अर्पणं देण्यासाठी तिथे एकही वेदी नव्हती. आणि ती अर्पणं वाहण्यासाठी तिथे याजकांची कोणतीही व्यवस्था नव्हती. शिवाय, यहोवाच्या लोकांपेक्षा तिथे मूर्तिपूजा करणाऱ्‍या लोकांची संख्या जास्त होती. आणि त्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल जराही आदर नव्हता. त्यामुळे हजारो विश्‍वासू यहुदी आपल्या मायदेशी जाऊन शुद्ध उपासना करण्यासाठी खूप उत्सुक होते.

४. इस्राएलला परतणाऱ्‍या यहुद्यांना यहोवाने कोणतं वचन दिलं होतं?

बाबेलपासून इस्राएलला जाण्याच्या या खडतर प्रवासाला जवळपास चार महिने लागणार होते. पण यहोवाने त्यांना वचन दिलं होतं, की या प्रवासात येणाऱ्‍या प्रत्येक अडथळ्याला तो काढून टाकेल. याबद्दल यशयाने लिहिलं: “यहोवासाठी मार्ग मोकळा करा! वाळवंटातून जाणारा महामार्ग आपल्या देवासाठी तयार करा. . . . ओबडधोबड जमीन एकसारखी करा, आणि खडबडीत जमीन मैदानासारखी करा.” (यश. ४०:३, ४) या वचनात जे सांगितलंय त्याची कल्पना करा. वाळवंटातून आणि डोंगरांमधून जाणारा एक सपाट राजमार्ग. डोंगर-दऱ्‍यांमधून जाणाऱ्‍या चढउताराच्या मार्गावरून जाण्यापेक्षा एका सपाट आणि सरळ राजमार्गावरून जाणं त्यांच्यासाठी किती सोपं असणार होतं. हा खरंच त्यांच्यासाठी एक मोठा आशीर्वाद ठरणार होता.

५. बाबेलपासून इस्राएलला जाणाऱ्‍या लाक्षणिक राजमार्गाला कोणतं नाव देण्यात आलं होतं?

आज महामार्गांना सहसा नावं किंवा नंबर दिलेले असतात. यशयाने सांगितलेल्या या लाक्षणिक राजमार्गालासुद्धा एक नाव देण्यात आलं होतं. त्याबद्दल आपण असं वाचतो: “एक राजमार्ग तिथे असेल, हो, ज्याला ‘पवित्रतेचा मार्ग’ म्हणतात तो तिथे असेल. अशुद्ध असलेला कोणीही त्यावरून जाणार नाही.” (यश. ३५:८) त्या काळातल्या इस्राएली लोकांसाठी त्याचा काय अर्थ होता? आणि आज आपल्यासाठी त्याचा काय अर्थ होतो?

“पवित्रतेचा मार्ग”​—तेव्हा आणि आत्ता

६. राजमार्गाला पवित्र का म्हटलं आहे?

“पवित्रतेचा मार्ग”​—एका महामार्गासाठी दिलेलं हे किती सुंदर नाव आहे. पण या मार्गाला पवित्रतेचा मार्ग असं का म्हटलंय? कारण पुन्हा शुद्ध उपासना सुरू झालेल्या इस्राएल देशात ‘कोणत्याही अशुद्ध व्यक्‍तीला’ म्हणजे अनैतिक कामं करणाऱ्‍या, मूर्तिपूजा करणाऱ्‍या किंवा घोर पाप करणाऱ्‍या यहुदी व्यक्‍तीला राहू दिलं जाणार नव्हतं. कारण मायदेशी परतणारे यहुदी देवासाठी “एक पवित्र राष्ट्र” बनणार होते. (अनु. ७:६) पण याचा अर्थ त्यांना आपल्या जीवनात कोणतेच बदल करावे लागणार नव्हते असा नव्हता.

७. काही यहुद्यांना कोणते मोठे बदल करावे लागणार होते? उदाहरण द्या.

आधी सांगितल्याप्रमाणे बऱ्‍याच यहुदी लोकांचा जन्म बाबेलमध्ये झाला होता. आणि त्यामुळे तिथल्या विचारसरणीचा आणि त्यांच्या रितीरिवाजांचा प्रभाव त्यांच्यावर होता. यहुदी लोकांचा पहिला गट इस्राएलला आला त्याच्या बऱ्‍याच दशकांनंतर एज्राला असं दिसून आलं, की काही यहुद्यांनी मूर्तिपूजा करणाऱ्‍या स्त्रियांशी लग्न केलं होतं. (निर्ग. ३४:१५, १६; एज्रा ९:१, २) शिवाय पुढे राज्यपाल नहेम्यालासुद्धा या गोष्टीचं खूप आश्‍चर्य वाटलं, की इस्राएलमध्ये जन्माला आलेल्या काही मुलांना यहुद्यांची भाषासुद्धा येत नव्हती. (अनु. ६:६, ७; नहे. १३:२३, २४) या मुलांना देवाचं वचन ज्या हिब्रू भाषेत लिहिलं होतं ती हिब्रू भाषाच समजत नव्हती. मग ती देवावर प्रेम करायला आणि त्याची उपासना करायला कशी शिकणार होती? (एज्रा १०:३, ४४) त्यामुळे यहुद्यांना आपल्या जीवनात मोठे बदल करावे लागणार होते. पण ते इस्राएलमध्ये राहत असल्यामुळे हे बदल करणं त्यांना सोपं जाणार होतं. कारण तिथे हळूहळू यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू होणार होती.​—नहे. ८:८, ९.

१९१९ या सालापासून लाखो स्त्री-पुरुष आणि मुलं मोठ्या बाबेलमधून बाहेर पडले आहेत आणि त्यांनी ‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालायला सुरवात केली आहे (परिच्छेद ८ पाहा)

८. फार पूर्वी घडलेल्या घटना आज आपल्यासाठी का महत्त्वाच्या आहेत? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

काही जण म्हणतील, ‘ते सगळं ठीक आहे. पण एवढ्या आधी घडलेल्या या सगळ्या गोष्टींचा आज आमच्याशी काय संबंध आहे?’ संबंध आहे. कारण एका अर्थाने आज आपणही ‘पवित्रतेच्या मार्गावर’ प्रवास करत आहोत. आणि या मार्गावर चालत राहण्याची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे. मग आपण अभिषिक्‍तांपैकी असो किंवा ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असो. कारण “पवित्रतेचा मार्ग” आपल्याला आध्यात्मिक नंदनवनातून भविष्यात देवाच्या राज्यात मिळणाऱ्‍या आशीर्वादांकडे घेऊन जाणार आहे. b (योहा. १०:१६) इ.स. १९१९ पासून लाखो स्त्री-पुरुष आणि मुलं खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्य असलेल्या मोठ्या बाबेलमधून बाहेर पडले आहेत आणि त्यांनी या लाक्षणिक राजमार्गावर प्रवास सुरू केला आहे. कदाचित तुम्हीसुद्धा त्यांच्यापैकी एक असाल. हा मार्ग जवळजवळ १०० वर्षांआधी जरी सुरू झाला असला तरी हा रस्ता तयार करण्याचं काम बऱ्‍याच शतकांआधी सुरू झालं होतं.

रस्ता तयार करण्याचं काम

९. यशया ५७:१४ मध्ये “पवित्रतेचा मार्ग” तयार करण्याच्या बाबतीत जे म्हटलंय ते आपल्या काळात कसं पूर्ण झालं?

बाबेलमधून मायदेशी परतणाऱ्‍या यहुद्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये याची यहोवाने काळजी घेतली. (यशया ५७:१४ वाचा.) मग आजच्या काळातल्या ‘पवित्रतेच्या मार्गाबद्दल’ काय? १९१९ च्या बऱ्‍याच शतकांआधीपासून यहोवाने त्याची भीती बाळगणाऱ्‍या लोकांचा वापर करून, मोठ्या बाबेलमधून बाहेर पडायचा मार्ग तयार करायला सुरुवात केली. (यशया ४०:३ सोबत तुलना करा.) हा लाक्षणिक मार्ग तयार करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आणि त्यामुळे प्रामाणिक मनाच्या लोकांना मोठी बाबेल सोडून आध्यात्मिक नंदनवनात येणं आणि तिथं येऊन यहोवाची शुद्ध उपासना करणं शक्य झालं. ‘रस्ता तयार करण्याच्या या कामात’ कोणकोणत्या गोष्टी सामील होत्या ते आता आपण पाहू या.

बऱ्‍याच शतकांआधीपासून देवाला भिऊन वागणाऱ्‍या लोकांनी मोठ्या बाबेलमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळा करायला मदत केली (परिच्छेद १०-११ पाहा)

१०-११. छपाई आणि भाषांतराच्या कामामुळे बायबलचं ज्ञान कसं पसरत गेलं? (चित्रसुद्धा पाहा.)

१० छपाई.  १५ व्या शतकाच्या मध्यापर्यंत बायबलच्या प्रती हातानेच तयार केल्या जायच्या. या प्रती बनवायला खूप वेळ लागायचा. त्यामुळे बायबलच्या प्रती सहज मिळत नव्हत्या आणि त्या खूप महागही असायच्या. पण मग जेव्हा छपाई यंत्राचा शोध लागला तेव्हा बायबलच्या प्रती तयार करणं आणि त्यांचं वितरण करणं सोपं झालं.

११ भाषांतर.  बऱ्‍याच शतकांपर्यंत बायबल फक्‍त लॅटिन भाषेतच उपलब्ध होतं आणि ते फक्‍त शिकल्या सवरलेल्या लोकांना समजायचं. बायबलबद्दल आदर असलेल्या बऱ्‍याच लोकांनी सामान्य लोकांच्या भाषेत बायबलचं भाषांतर करायचं काम सुरू केलं. त्यामुळे आता पाळक जे शिकवत होते आणि बायबल जे शिकवत होतं त्यातला फरक लोक समजू शकत होते.

देवाला भिऊन वागणाऱ्‍या लोकांनी मोठ्या बाबेलमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळा करायला मदत केली (परिच्छेद १२-१४ पाहा) c

१२-१३. १९ व्या शतकात बायबलचा प्रामाणिकपणे अभ्यास करणारे काही जण खोट्या धार्मिक शिकवणी कशा उघड करू लागले याचं उदाहरण द्या.

१२ बायबल अभ्यासाचं साहित्य.  बायबलचा सखोल अभ्यास करणाऱ्‍या विद्यार्थ्यांना बायबलच्या अभ्यासातून बऱ्‍याच गोष्टी समजल्या. पण जेव्हा त्यांनी या गोष्टी इतरांना सांगायला सुरू केल्या तेव्हा पाळकांना ही गोष्ट आवडली नाही. उदाहरणार्थ, १९ व्या शतकात बऱ्‍याच प्रामाणिक मनाच्या माणसांनी चर्चच्या खोट्या शिकवणी उघड करणाऱ्‍या पत्रिका प्रकाशित करायला सुरुवात केली.

१३ उदाहरणार्थ, १८३५ च्या काळात हेन्री ग्रू नावाच्या एका व्यक्‍तीने मृतांच्या स्थितीबद्दल चर्चा करणारी एक पत्रिका प्रकाशित केली. त्या काळी चर्चमध्ये असं शिकवलं जायचं, की जन्मतः एका व्यक्‍तीमध्ये अमर आत्मा असतो. पण हेन्री ग्रू यांनी त्यांच्या पत्रिकेत शास्त्रवचनांतून हे सिद्ध केलं, की चर्चमध्ये शिकवलं जातं त्याप्रमाणे अमर जीवन हे सगळ्यांना जन्मतःच मिळत नाही. तर एखाद्याला अमर जीवन तेव्हाच मिळू शकतं जेव्हा देव त्याला ते देतो. १८३७ साली जॉर्ज स्टॉर्झ नावाच्या एका पाळकाला ट्रेनमधून प्रवास करताना एक पत्रिका सापडली. त्यांनी ती वाचली आणि त्यांना कळलं की आपल्याला खूप महत्त्वाचं सत्य सापडलंय. आणि मग त्यांनी ते इतरांनाही सांगायचं ठरवलं. मग १८४२ मध्ये त्यांनी “दुष्ट लोक अमर आहेत का?​—एक तपासणी” या लक्षवेधक विषयावर भाषणांची एक श्रृंखलाच सादर केली. पुढे जॉर्ज स्टॉर्झ यांनी केलेल्या लिखाणांचा चार्ल्‌झ टेझ रस्सल नावाच्या एका तरुण व्यक्‍तीवर खूप जबरदस्त प्रभाव पडला.

१४. लाक्षणिक रस्ता तयार करण्याचं जे काम पूर्वी करून ठेवलं होतं, त्याचा ब्रदर रस्सल आणि त्यांच्या साथीदारांना कसा फायदा झाला? (चित्रसुद्धा पाहा.)

१४ अशा प्रकारे लाक्षणिक राजमार्ग तयार करण्यासाठी पूर्वी जे काम करण्यात आलं होतं त्याचा ब्रदर रस्सल आणि त्यांच्या साथीदारांना कसा फायदा झाला? त्यांनी त्यांच्या अभ्यासात आधीच तयार करण्यात आलेल्या बऱ्‍याच बायबल शब्दकोशांचा, शब्दार्थसूचींचा आणि अनेक भाषांतरांचा उपयोग केला. याशिवाय, हेन्री ग्रू, जॉर्ज स्टॉर्झ यांसारख्या लोकांनी केलेल्या बायबल संशोधनाचासुद्धा त्यांना फायदा झाला. पुढे ब्रदर रस्सल आणि त्यांच्या साथीदारांनी बायबल विषयांवर मोठ्या प्रमाणात पुस्तकं आणि पत्रिका छापून हा लाक्षणिक रस्ता तयार करण्याच्या कामाला हातभार लावला.

१५. १९१९ मध्ये कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या?

१५ १९१९ मध्ये देवाचे लोक मोठ्या बाबेलच्या प्रभावातून बाहेर आले. या वर्षी ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला’ नियुक्‍त करण्यात आलं. आणि ही योग्यच वेळ होती कारण त्यामुळे ते प्रामाणिक मनाच्या लोकांना ‘पवित्रतेच्या मार्गावर’ प्रवास सुरू करायला मदत करू शकत होते. (मत्त. २४:४५-४७) पूर्वी मार्ग तयार करणाऱ्‍या या विश्‍वासू लोकांनी जे काम केलं त्याबद्दल आपण त्यांचे आभारच मानले पाहिजे. या राजमार्गावर प्रवास करणाऱ्‍या नवीन लोकांना यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल जास्तीत जास्त शिकून घेता आलं. (नीति. ४:१८) शिवाय त्यामुळेच यहोवाच्या अपेक्षांप्रमाणे त्यांना आपल्या जीवनात योग्य ते बदल करता आले. पण हे सगळे बदल त्याच्या लोकांनी एकदमच करावेत अशी यहोवाने अपेक्षा केली नाही. उलट त्याने हळूहळू आपल्या लोकांमध्ये सुधारणा केल्या. (“ यहोवा हळूहळू आपल्या लोकांना शुद्ध करतो,” ही चौकट पाहा.) आणि लवकरच असा एक काळ येईल जेव्हा आपण आपल्या प्रत्येक कार्याने देवाचं मन आनंदित करू. खरंच, तो किती आनंदाचा काळ असेल!​—कलस्सै. १:१०.

“पवित्रतेचा मार्ग” अजूनही खुला आहे

१६. १९१९ पासून ‘पवित्रतेच्या मार्गाचं’ दुरुस्तीचं आणि देखभालीचं काम कशा प्रकारे करण्यात आलं? (यशया ४८:१७; ६०:१७)

१६ पण कोणताही रस्ता चांगला राहावा म्हणून त्याची वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती करावी लागते. १९१९ पासून या ‘पवित्रतेच्या मार्गाचं’ काम चालूच आहे. आणि त्यामुळे बऱ्‍याच लोकांना मोठ्या बाबेलमधून बाहेर पडून या मार्गावर चालत राहणं शक्य झालं आहे. नवीनच नियुक्‍त झालेल्या विश्‍वासू दासाने आपलं काम सुरू केलं. आणि १९२१ मध्ये नवीन लोकांना सत्य शिकता यावं म्हणून बायबल अभ्यासाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. हे पुस्तक होतं, द हार्प ऑफ गॉड.  या पुस्तकाच्या ३६ भाषांमध्ये जवळजवळ ६० लाख प्रती वितरित करण्यात आल्या. आणि त्यामुळे बऱ्‍याच लोकांना सत्य शिकायला मिळालं. आणि आज आपल्याला बायबल अभ्यासासाठी एक सुंदर पुस्तक मिळालं आहे. ते म्हणजे, कायम जीवनाचा आनंद घ्या!  आणि या शेवटच्या काळात यहोवा आपल्याला ‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालत राहण्यासाठी त्याच्या संघटनेद्वारे नियमितपणे आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे.​—यशया ४८:१७; ६०:१७ वाचा.

१७-१८. “पवित्रतेचा मार्ग” आपल्याला कुठे घेऊन जाईल?

१७ तर आपण असं म्हणू शकतो, की जेव्हा एक व्यक्‍ती बायबल अभ्यास करायला तयार होते तेव्हा तिला ‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालायची संधी मिळते. पण काही जण त्यावर फक्‍त थोड्या अंतरापर्यंतच चालतात आणि मधूनच तो राजमार्ग सोडून देतात. तर काही जणांचा या मार्गावर शेवटपर्यंत चालत राहण्याचा पक्का निर्धार असतो. हा मार्ग शेवटी कुठे घेऊन जातो?

१८ ज्यांना स्वर्गीय जीवनाची आशा आहे त्यांना हा “पवित्रतेचा मार्ग,” “देवाच्या सुंदर बागेत” म्हणजे स्वर्गात घेऊन जातो. (प्रकटी. २:७) आणि ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे त्यांना हा मार्ग १,००० वर्षांच्या शेवटी मिळणाऱ्‍या परिपूर्णतेकडे घेऊन जातो. तेव्हा तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करत असाल तर मागे वळून पाहू नका. आणि नवीन जगापर्यंतचा तुमचा प्रवास पूर्ण होईपर्यंत या मार्गावर चालत राहायचं सोडू नका. “तुमचा प्रवास सुखाचा होवो,” हीच सदिच्छा!

गीत २१ पहिल्याने राज्यासाठी झटा!

a बाबेलपासून इस्राएलला जाणाऱ्‍या राजमार्गाला यहोवाने अलंकारिक भाषेत “पवित्रतेचा मार्ग” म्हटलं. अलीकडच्या काळातसुद्धा यहोवाने त्याच्या लोकांसाठी असा एक मार्ग मोकळा केला आहे का? हो, इ.स. १९१९ पासून लाखो लोकांनी मोठ्या बाबेलमधून बाहेर पडून ‘पवित्रतेच्या मार्गावर’ प्रवास सुरू केला आहे. आणि शेवटपर्यंत या मार्गावर टिकून राहणं आपल्यासाठी गरजेचं आहे.

c चित्राचं वर्णन: ब्रदर रस्सल आणि त्यांच्या साथीदारांनी, त्यांच्या काळाआधी तयार केलेल्या बायबल अभ्यासाच्या साहित्यांचा उपयोग केला.