व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रोत्साहन देणारं प्रेम दाखवत राहा

प्रोत्साहन देणारं प्रेम दाखवत राहा

“प्रेम उन्‍नती करते.”—१ करिंथ. ८:१.

गीत क्रमांक: २५, ५२

१. आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने शिष्यांसोबत कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली?

येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री शिष्यांसोबत असताना जवळजवळ ३० वेळा प्रेम या गुणाचा उल्लेख केला. त्याने शिष्यांना सांगितलं की त्यांनी “एकमेकांवर प्रेम करावं.” (योहा. १५:१२, १७) शिष्यांमध्ये असलेलं प्रेम इतकं उल्लेखनीय असणार होतं की इतरांना ते स्पष्टपणे दिसून आलं असतं. तसंच, या प्रेमावरूनच लोक शिष्यांना ख्रिस्ताचे खरे शिष्य म्हणून ओळखणार होते. (योहा. १३:३४, ३५) येशूने ज्या प्रेमाचा उल्लेख केला ते फक्‍त भावनांवर आधारित नाही. तर त्यात आत्मत्यागाचा समावेश आहे. येशूने म्हटलं: “कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही केलं, तर तुम्ही माझे मित्र ठराल.”—योहा. १५:१३, १४.

२. (क) आज यहोवाच्या सेवकांना कशासाठी ओळखलं जातं? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

आज यहोवाच्या लोकांना त्यांच्यात असलेल्या निःस्वार्थ व आत्मत्यागी प्रेमासाठी आणि कायम टिकणाऱ्‍या एकतेसाठी ओळखलं जातं. (१ योहा. ३:१०, ११) जगभरात असलेले यहोवाचे सेवक एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. मग ते कोणत्याही राष्ट्राचे, वर्णाचे, कोणतीही भाषा बोलणारे, किंवा कोणत्याही संस्कृतीचे असले तरीही. पण आज अशा प्रकारचं प्रेम दाखवणं इतकं गरजेचं का आहे? यहोवा आणि येशू आपल्याला प्रेम दाखवून प्रोत्साहन कसं देतात? आणि आपण इतरांना सांत्वन देऊन त्यांना आधार कसा देऊ शकतो?—१ करिंथ. ८:१.

आज प्रेम दाखवणं इतकं गरजेचं का आहे?

३. आजच्या कठीण काळाचा लोकांवर कसा परिणाम होत आहे?

आजचा काळ “अतिशय कठीण” आणि “कष्टमय व दु:खमय” आहे. (२ तीम. ३:१-५; स्तो. ९०:१०) आज बरेच लोक आपल्या जीवनात इतक्या समस्यांचा सामना करत आहेत की त्यांना जीवन नकोसं झालं आहे. दर वर्षी ८ लाख पेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात, म्हणजे प्रत्येक ४० सेकंदात एक व्यक्‍ती आत्महत्या करते. दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्या काही बांधवांनाही अशा समस्यांचा सामना करावा लागला असल्यामुळे त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे.

४. यहोवाच्या कोणत्या सेवकांना आपलं जीवन नकोसं झालं होतं?

बायबल काळातही देवाच्या काही विश्‍वासू सेवकांना आपल्या जीवनात खूप समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनाही जीवन नकोसं झालं होतं. उदाहरणार्थ, ईयोबला इतक्या वेदना होत होत्या की त्याने म्हटलं: “मला आपल्या जिवाचा वीट आला आहे; सर्वकाळ जगणे मला नको.” (ईयो. ७:१६; १४:१३) योनाही इतका निराश झाला होता की त्याने म्हटलं: “तर आता, हे परमेश्‍वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.” (योना ४:३) तसंच, एलीया संदेष्ट्यालाही इतकं एकटं वाटलं होतं की त्याने म्हटलं: “हे परमेश्‍वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर.” (१ राजे १९:४) पण यहोवाचं या सर्व सेवकांवर खूप प्रेम होतं आणि त्यांनी जगावं अशी त्याची इच्छा होती. अशा भावना व्यक्‍त केल्यामुळे यहोवाने त्यांना दोषी ठरवलं नाही. याउलट त्याने या सेवकांना जगण्याची आशा उत्पन्‍न करण्यासाठी मदत केली. यामुळे ते पुढेही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करू शकले.

५. आपल्या बंधुभगिनींना खासकरून आजच्या काळात आपल्या प्रेमाची गरज का आहे?

आज बरेच बंधुभगिनी खूप कठीण प्रसंगांचा सामना करत आहेत आणि त्यांना आपल्या प्रेमाची गरज आहे. काही बंधुभगिनींची टिंगल केली जाते किंवा त्यांचा छळ केला जातो. काही बांधवांवर कामाच्या ठिकाणी दबाव आणला जातो किंवा ते समोर नसताना त्यांच्याबद्दल वाईट बोललं जातं. किंवा काही बंधुभगिनी कामावर खूप तणाव असल्यामुळे किंवा खूप तास काम केल्यामुळेही पार थकून जातात. काहींच्या कुटुंबात गंभीर समस्या आहेत. कदाचित त्यांचा सोबती यहोवाचा उपासक नसेल आणि तो त्यांची सारखी टीका करत असेल. या व इतर दबावांमुळे बरेच बंधुभगिनी अक्षरशः गळून गेले आहेत आणि त्यांनाही जीवन नकोसं झालं आहे. अशा बंधुभगिनींना कोण मदत करू शकतं?

यहोवाचं प्रेम आपल्याला बळकट करतं

६. यहोवा करत असलेल्या प्रेमामुळे त्याच्या सेवकांना बळ कसं मिळतं?

यहोवा आपल्या सेवकांना याची खात्री पटवून देतो की त्याचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते कायम टिकून राहील. यहोवा इस्राएली लोकांना पुढील शब्द बोलला तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल याची कल्पना करा: “तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुजवर प्रेम करतो,” आणि “भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे.” (यश. ४३:४, ५) आपल्यापैकी प्रत्येक जण त्याच्या नजरेत खूप मौल्यवान आहे. * बायबल आपल्याला अभिवचन देतं: “परमेश्‍वर तुझा देव, साहाय्य करणाऱ्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुजविषयी आनंदोत्सव करेल.”—सफ. ३:१६, १७.

७. यहोवाची तुलना आईशी का करता येईल? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

आपल्या सेवकांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला तरी त्यांना सांत्वन आणि मदत देण्याचं अभिवचन यहोवा देतो. तो म्हणतो: “तुम्ही लहान मुलासारखे व्हाल. तुम्ही ‘दूध’ प्याल. मी तुम्हाला उचलून कडेवर घेईन. मी तुम्हाला मांडीवर खेळवीन. . . . आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.” (यश. ६६:१२, १३, ईझी-टू-रीड व्हर्शन) एका लहान बाळाला त्याची आई जवळ घेते किंवा त्याच्यासोबत खेळते तेव्हा त्याला किती सुरक्षित वाटत असेल याची कल्पना करा. तसंच, यहोवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही सुरक्षित राहावं अशी त्याची इच्छा आहे. ‘यहोवाच्या नजरेत माझं मोल नाही’ असा विचार मुळीच करू नका.—यिर्म. ३१:३.

८, ९. येशूच्या प्रेमामुळे आपल्याला बळ कसं मिळतं?

यहोवा आपल्यावर प्रेम करतो हे दाखवणारं आणखी एक कारण म्हणजे: “देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.” (योहा. ३:१६) येशूने दिलेल्या बलिदानावरून दिसून येतं की त्याचंही आपल्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं. बायबल सांगतं की “संकट, दुःख” या गोष्टीही आपल्याला “ख्रिस्ताच्या प्रेमापासून” वेगळं करू शकत नाही.—रोम. ८:३५, ३८, ३९.

कधीकधी जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा आपण शारीरिक किंवा भावनिक रीत्या खचून जातो किंवा यहोवाच्या सेवेतील आपला आनंद नाहीसा होतो. येशू ख्रिस्ताचं आपल्यावर किती प्रेम आहे यावर अशा वेळी विचार केल्यामुळे आपल्याला बळ मिळू शकतं. (२ करिंथकर ५:१४, १५ वाचा.) त्यामुळे आपल्या मनात जगण्याची आणि यहोवाची सेवा करत राहण्याची इच्छा निर्माण होते. आपल्याला नैसर्गिक विपत्ती, छळ, निराशा किंवा चिंता यांचा सामना करावा लागला, तरीदेखील ख्रिस्ताच्या प्रेमामुळे धैर्याने त्यांचा सामना करण्यास आणि जीवन जगत राहण्यास आपल्याला मदत मिळू शकते.

आपल्या बांधवांना आपल्या प्रेमाची गरज आहे

येशूच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळू शकतं (परिच्छेद १०, ११ पाहा)

१०, ११. निराश झालेल्या बंधुभगिनींना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी कोणाची आहे? स्पष्ट करा.

१० यहोवा त्याच्या प्रेमाद्वारे आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळीचाही उपयोग करतो. आपण आपल्या बंधुभगिनींवर प्रेम करतो तेव्हा आपण यहोवावरील आपलं प्रेम दाखवत असतो. यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते त्याच्या नजरेत मौल्यवान आहेत याची जाणीव करून देण्यासाठी आपण त्यांना जमेल ती मदत करतो. (१ योहा. ४:१९-२१) प्रेषित पौलने म्हटलं: “आता जसे तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत आहात व एकमेकांची उन्‍नती करत आहात, तसेच पुढेही करत राहा.” (१ थेस्सलनी. ५:११) प्रोत्साहन देण्याचं काम फक्‍त वडिलांचं नाही. तर प्रत्येक जण बंधुभगिनींना सांत्वन देऊन यहोवा आणि येशूचं अनुकरण करू शकतो.—रोमकर १५:१, २ वाचा.

११ मंडळीमध्ये काही लोक कदाचित तीव्र स्वरूपाच्या निराशेचा किंवा चिंतेचा सामना करत असतील आणि त्यांना औषधांची व वैद्यकीय मदतीची गरज पडू शकते. (लूक ५:३१) मंडळीतील वडील आणि इतर बंधुभगिनी हे डॉक्टरसारखा उपचार तर करू शकत नाही, पण ते त्या व्यक्‍तीला मदत आणि सांत्वन नक्कीच देऊ शकतात. असं करणं खूप महत्त्वाचं आहे. मंडळीमधल्या प्रत्येक व्यक्‍तीला असं उत्तेजन देण्यात आलं आहे: “निराश झालेल्यांचे सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.” (१ थेस्सलनी. ५:१४) आपण आपल्या बांधवांची परिस्थिती, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्याशी बोलताना आपण धीर दाखवला पाहिजे. आपल्या शब्दांमुळे त्यांना निराशेतून बाहेर येण्यासाठी प्रोत्साहन मिळायला हवं. तुम्ही इतरांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करता का? इतरांना आणखी चांगल्या प्रकारे सांत्वन आणि प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१२. मंडळीच्या प्रेमामुळे प्रोत्साहन मिळालेल्या एका प्रचारकाचा अनुभव सांगा.

१२ युरोपमध्ये राहणारी एक बहीण म्हणते: “माझ्या मनात कधीकधी आत्महत्येचा विचार येतो, पण मला मदत करण्यासाठी बरेच जण आहेत. माझ्या मंडळीच्या बांधवांनी माझं जीवन वाचवलं आहे. बंधुभगिनी माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मला प्रोत्साहनही देतात. मी नैराश्‍यातून जात आहे हे फक्‍त काही बांधवांनाच माहीत आहे, पण तरीही मंडळीतील सगळे लोक माझ्या मदतीला हजर असतात. एक जोडपं तर माझे आध्यात्मिक आईवडीलच बनले आहेत. ते माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात आणि ते माझ्यासाठी जणू २४ तास उपलब्ध असतात.” हे खरं आहे की प्रत्येकाला सारखीच मदत करणं शक्य होणार नाही. पण प्रत्येक जण बांधवांना आधार देण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्न करू शकतो. *

प्रेमाने इतरांची मदत कशी करता येईल?

१३. इतरांना सांत्वन देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१३ इतरांचं चांगल्या प्रकारे ऐका. (याको. १:१९) धीराने ऐकणं हा प्रेम दाखवण्याचा एक मार्ग आहे. आपल्या बांधवाच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याला विचारपूर्वक प्रश्‍न विचारा. तुम्हाला त्याच्याबद्दल काळजी आहे, हे तुमच्या हावभावावरून जरी दिसलं तरी तो त्याचं मन मोकळं करेल. तो बोलत असताना धीराने ऐका आणि मधे न बोलता त्याला त्याच्या भावना व्यक्‍त करू द्या. त्याचं चांगल्या प्रकारे ऐकून घेतल्यामुळे तुम्ही त्याच्या भावना समजू शकाल आणि तुमच्यावर त्याचा भरवसा वाढेल. यामुळे तुम्ही जेव्हा त्याला काही सांगाल तेव्हा तो ते लक्षपूर्वक ऐकेल. तुम्हाला जेव्हा इतरांची मनापासून काळजी असते तेव्हा तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सांत्वन देऊ शकता.

१४. आपण टीका का करू नये?

१४ इतरांची टीका करू नका. निराशेत असलेल्या व्यक्‍तीला जाणवलं की आपण त्याची टीका करत आहोत तर यामुळे तो आणखी जास्त निराश होईल. मग त्याची मदत करणं आपल्याला आणखी कठीण जाईल. “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” (नीति. १२:१८) हे खरं आहे की आपण आपल्या शब्दांनी निराश झालेल्यांना मुद्दाम दुखावणार नाही. पण आपण अविचारीपणे बोलल्यामुळे त्यांना खूप दुःख होऊ शकतं. एखाद्या बांधवाला मदत करण्यासाठी आपल्याला त्याला याची जाणीव करून द्यावी लागेल की त्याची परिस्थिती समजून घेण्याची आपली मनापासून इच्छा आहे.—मत्त. ७:१२.

१५. इतरांचं सांत्वन करण्यासाठी आपल्याजवळ कोणती साधनं आहेत?

१५ देवाच्या वचनाद्वारे इतरांचं सांत्वन करा. (रोमकर १५:४, ५ वाचा.) बायबल “धीर आणि सांत्वन” देणाऱ्‍या देवाकडून आहे. त्यामुळे त्यातील शब्दांनी आपल्या सर्वांनाच सांत्वन मिळू शकतं यात शंका नाही. आपल्याजवळ वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स आणि यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक हे साहित्य आहे. या साधनांचा उपयोग करून आपण अशी शास्त्रवचनं आणि प्रकाशनं शोधू शकतो, ज्यामुळे बंधुभगिनींना सांत्वन आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला मदत होईल.

१६. निराशेत असलेल्यांना सांत्वन देण्यासाठी आपल्याला कोणत्या गुणांमुळे मदत मिळेल?

१६ दया आणि करुणा दाखवा. यहोवा “अतिशय करुणामय असा पिता आहे” आणि तो त्याच्या सेवकांना कोमल दया दाखवतो. (२ करिंथकर १:३-६ वाचा; लूक १:७८; रोम. १५:१३) पौलने यहोवाचं अनुकरण केलं आणि आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडलं. त्याने म्हटलं: “अंगावर पाजणारी आई जशी स्वतःच्या मुलांची कोमलतेने काळजी घेते, तसेच आम्हीही तुमच्याशी सौम्यतेने वागलो. तुमच्याबद्दल जिव्हाळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला देवाविषयीचा आनंदाचा संदेशच नाही, तर आमचा जीवही देण्यास तयार होतो, कारण तुम्ही आमच्यासाठी अतिशय प्रिय बनला होता.” (१ थेस्सलनी. २:७, ८) निराशेत असलेले आपले बांधव सांत्वन मिळण्यासाठी प्रार्थना करतात. म्हणून मग आपण जेव्हा यहोवासारखी करुणा दाखवतो, तेव्हा आपण त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देत असतो.

१७. बांधवांना मदत करण्यासाठी आपण त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करू नये?

१७ बांधवांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू नका. बांधवांकडून वाजवी अपेक्षा ठेवा. तुम्ही त्यांच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा केली तर तुमच्या हाती निराशा लागेल. (उप. ७:२१, २२) लक्षात असू द्या की यहोवा आपल्याकडून वाजवी अपेक्षा करतो. त्यामुळे आपण इतरांशी धीराने वागलं पाहिजे. (इफिस. ४:२, ३२) आपण कधीही बांधवांची तुलना इतरांशी करू नये, किंवा त्यांना अशी जाणीव करून देऊ नये की ते फार कमी प्रमाणात यहोवाची सेवा करत आहेत. याऐवजी आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते करत असलेल्या चांगल्या कामांबद्दल त्यांची प्रशंसा केली पाहिजे. यामुळे यहोवाच्या सेवेत त्यांना आनंद मिळेल.—गलती. ६:४.

१८. इतरांना प्रेमाने प्रोत्साहन देण्याची आपली इच्छा का आहे?

१८ यहोवाला आणि येशूला त्यांचा प्रत्येक सेवक खूप मौल्यवान आहे. (गलती. २:२०) आपण आपल्या बंधुभगिनींवर मनापासून प्रेम करतो, म्हणून त्यांच्याशी आपण कोमलतेने वागलं पाहिजे. “शांतीसाठी आणि एकमेकांच्या उन्‍नतीसाठी आपण होईल तितका प्रयत्न करू या.” (रोम. १४:१९) आपण सर्वच जण नंदनवनात जगण्याचं स्वप्न पाहत आहोत, कारण तिथे कोणीही निराश होणार नाही. तिथे कोणत्याही प्रकारचं आजारपण नसेल, कोणतंही युद्ध नसेल. पापी असल्यामुळे लोकांचा मृत्यू होणार नाही, आणि तिथे छळ, कौटुंबिक समस्या किंवा अपयशामुळे निराशा नसणार. हजार वर्षांच्या शेवटी सर्व लोक परिपूर्ण झालेले असतील. शेवटच्या परीक्षेत जे टिकून राहतील त्यांना या पृथ्वीवरच यहोवा मुलं म्हणून आपल्या कुटुंबात सामील करेल आणि त्या सर्वांना “देवाच्या मुलांचे गौरवी स्वातंत्र्य मिळेल.” (रोम. ८:२१) भविष्यात या सुंदर गोष्टी मिळणार असल्यामुळे आज आपण सर्व इतरांना प्रोत्साहन देणारं प्रेम दाखवत राहू या आणि देवाच्या नवीन जगात जाण्यासाठी एकमेकांना मदत करत राहू या.

^ परि. 6 यहोवा के करीब या पुस्तकातील अध्याय २४ पाहा.

^ परि. 12 आत्महत्येबद्दल विचार करणाऱ्‍या लोकांना मदत करण्यासाठी सजग होइए! मधील पुढील लेख पाहा: “आखिर किस लिए जीऊँ? जीने की तीन वजह” (जुलै-सप्टेंबर २०१४); “जब न हो जीने की आस” (एप्रिल-जून २०१२); आणि “लाईफ इज वर्थ लिव्हिंग” (अवेक! ऑक्टोबर २२, २००१)