व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला वेळ माहीत आहे का?

तुम्हाला वेळ माहीत आहे का?

तुम्हाला वेळ माहीत करून घ्यायची असते तेव्हा तुम्ही काय करता? सहसा तुम्ही आपलं घड्याळ पाहता. तुमच्या घड्याळात एक वाजून तीस मिनिटं झाल्याचं तुम्हाला कळतं. मग तुमच्या मित्राने जर तुम्हाला विचारलं “किती वाजले?” तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल?

खरंतर ते तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून आहे. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेळ सांगण्याची पद्धत वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कदाचित म्हणाल की १:३० वाजले आहेत. तसंच, २४ तासाच्या घड्याळाप्रमाणे वेळ सांगायची असेल तर तुम्ही १३:३० म्हणाल. जर तुम्ही इतर कुठल्या ठिकाणी असाल, तर “दोन वाजायला अजून ३० मिनिटं बाकी आहेत” असंही कदाचित म्हणाल.

मग बायबल काळात लोक वेळ कशी सांगायचे? त्यांच्याकडेही वेळ सांगण्याच्या एकापेक्षा जास्त पद्धती होत्या. हिब्रू शास्त्रवचनांत आपल्याला ‘पहाटे,’ ‘दुपारी,’ आणि ‘संध्याकाळी’ असे शब्द वाचायला मिळतात. (उत्प. ८:११; १९:२७; ४३:१६; १ राजे १८:२६) पण कधीकधी वेळ सांगण्यासाठी बायबलमध्ये आणखी ठरावीक शब्द वापरण्यात आले आहेत.

प्राचीन इस्राएलमध्ये, खासकरून रात्रीच्या वेळी पहारेकरी नेमण्याची पद्धत होती. इस्राएली लोक रात्र तीन भागात विभागायचे. त्यांना ते प्रहर म्हणायचे. (स्तो. ६३:६) शास्ते ७:१९ मध्ये आपल्याला “रात्रीच्या मधल्या प्रहराच्या” असा वाक्यांश वाचायला मिळतो. मग येशूच्या जन्मानंतर यहुद्यांनी, ग्रीक आणि रोमी लोकांसारखंच रात्र चार प्रहरांत विभागली.

शुभवर्तमानाच्या पुस्तकांत बऱ्‍याच वेळा या रात्रीच्या प्रहरांबद्दल सांगण्यात आलं आहे. जसं की, “रात्रीच्या चौथ्या प्रहरी” येशू पाण्यावरून चालत बोटीच्या दिशेने आपल्या शिष्यांकडे जातो. (मत्त. १४:२५) तसंच, येशूने एका दाखल्यात म्हटलं: “चोर कोणत्या प्रहरी येणार आहे हे जर घराच्या मालकाला माहीत असतं, तर तो जागाच राहिला असता आणि त्याने त्याला आपलं घर फोडू दिलं नसतं.”—मत्त. २४:४३.

येशूने आपल्या शिष्यांना सावध राहायला सांगितलं, “कारण घराचा मालक नेमका केव्हा परत येईल—संध्याकाळी, मध्यरात्री, पहाट होण्याआधी की सकाळी हे तुम्हाला माहीत नाही.” (मार्क १३:३५; तळटीप) तेव्हा त्याने चार प्रहरांविषयी उल्लेख केला. त्यांपैकी पहिला प्रहर हा ‘संध्याकाळ’ चा होता. तो प्रहर सूर्यास्त ते जवळपास रात्री ९ पर्यंतचा होता. दुसरा प्रहर हा ‘मध्यरात्रीचा’. तो जवळपास रात्री ९ पासून सुरू व्हायचा आणि मध्यरात्रीपर्यंत चालायचा. तिसरा प्रहर ‘पहाट होण्याआधीचा’ किंवा ‘कोंबडा आरवण्याच्या वेळीचा’ म्हणजे मध्यरात्री ते सकाळचे तीन वाजेच्या आसपासचा होता. येशूला पकडण्यात आलं त्या रात्री कोंबडा कदाचित या प्रहरी आरवला असावा. (मार्क १४:७२) चौथा प्रहर हा ‘सकाळचा’ म्हणजे, जवळपास पहाटे ३ वाजेपासून सूर्योदयपर्यंतचा होता.

याचाच अर्थ त्या काळात लोकांकडे जरी आपल्यासारखी घड्याळं नसली, तरी त्या वेळी असलेल्या पद्धतीमुळे ते वेळ सांगू शकत होते.