व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वयस्क बांधवांनो​—यहोवा तुमच्या एकनिष्ठतेला मौल्यवान लेखतो

वयस्क बांधवांनो​—यहोवा तुमच्या एकनिष्ठतेला मौल्यवान लेखतो

देवाच्या लोकांसाठी सेवा करणं ही जगभरातल्या वडिलांसाठी एक मौल्यवान गोष्ट आहे. त्यांच्या सेवेमुळे आपल्याला अनेक फायदे होतात. पण अलीकडेच एक फेरबदल करण्यात आला होता. वयस्क वडिलांना सांगण्यात आलं होतं की त्यांच्याकडे असलेल्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या त्यांनी तरुण वडिलांवर सोपवावी. कोणत्या मार्गाने?

हा फेरबदल म्हणजे, विभागीय पर्यवेक्षक आणि ईश्‍वरशासित प्रशालेचे प्रशिक्षक या नात्याने सेवा करणारे बांधव ७० वय झाल्यावर पर्यवेक्षक आणि प्रशिक्षक म्हणून सेवा करणार नाहीत. तसंच, ८० वय झाल्यावर वडिलांनी त्यांच्याकडे असलेल्या इतर अनेक जबाबदाऱ्‍या तरुण वडिलांवर सोपवाव्यात. जसं की, शाखा समितीच्या किंवा मंडळीच्या वडील वर्गाच्या संयोजकाची जबाबदारी. या वयस्क वडिलांनी कसा प्रतिसाद दिला? त्यांनी यहोवाला आणि त्याच्या संघटनेला एकनिष्ठा दाखवली.

बंधू केन ४९ वर्षांपासून शाखा समितीचे संयोजक या नात्याने सेवा करत होते. ते म्हणतात: “या निर्णयाबद्दल मी पूर्णपणे सहमत होतो. खरंतर, संयोजकाची जबाबदारी पार पाडण्यासाठी एका तरुण बांधवाच्या गरजेबद्दल मी त्याच सकाळी यहोवाला प्रार्थना केली होती.” बंधू केनने दाखवलेली प्रतिक्रिया जगभरातल्या इतर वयस्क वडिलांच्या प्रतिक्रियेसारखीच आहे. हे खरं आहे की सुरुवातीला त्यांना थोडं दुःख झालं, कारण त्यांना बांधवांची सेवा करायला आवडायचं.

बंधू एसपरॅन्डीयो वडील वर्गाचे संयोजक या नात्याने मंडळीत बऱ्‍याच वर्षांपासून सेवा करत होते. ते म्हणतात: “मला थोडं वाईट वाटलं खरं, पण माझ्या खालावत चाललेल्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी मला जास्त वेळ हवा होता.” बंधू एसपरॅन्डीयो आजही विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मंडळीला फायदा होत आहे.

अनेक वर्षांपासून प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करणाऱ्‍या अशा बांधवांबद्दल काय ज्यांना नंतर दुसऱ्‍या प्रकारची नेमणूक मिळाली? अॅलन यांनी ३८ वर्षं प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा केली आहे. ते म्हणतात: “मला जेव्हा याबद्दल कळलं तेव्हा मला धक्काच बसला.” असं असलं तरी त्यांनी तरुण बांधवांना प्रशिक्षण देण्याचे फायदे ओळखले. ते आजही विश्‍वासूपणे सेवा करत आहेत.

बंधू रस्सल यांनी प्रवासी पर्यवेक्षक आणि ईश्‍वरशासित प्रशालेचे प्रशिक्षक म्हणून एकूण ४० वर्षं सेवा केली. ते म्हणतात की सुरुवातीला त्यांना आणि त्यांच्या पत्नीला थोडं वाईट वाटलं. याबद्दल ते सांगतात: “आम्ही करत असलेली सेवा आम्हाला खूप आवडायची. आणि आम्हाला वाटायचं की ती करत राहण्याची ताकद अजूनही आमच्यात आहे.” बंधू रस्सल आणि त्यांची पत्नी आज त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा आणि अनुभवाचा वापर स्थानिक मंडळीला मदत करण्यासाठी करत आहेत आणि त्यामुळे मंडळीच्या प्रचारकांना खूप फायदा होत आहे.

वर व्यक्‍त केलेल्या भावना तुम्ही जरी वैयक्‍तिक रीत्या अनुभवल्या नसल्या तरी, २ शमुवेलच्या पुस्तकात दिलेला अहवाल तुम्हाला या भावना समजून घ्यायला मदत करू शकतो.

नम्र आणि आपली कमतरता ओळखणारी व्यक्‍ती

प्राचीन काळी अबशालोमने आपल्या वडिलांविरुद्ध, दावीदविरुद्ध बंड केला तेव्हा काय झालं याचा विचार करा. या बंडामुळे दावीदला यरुशलेम सोडून यार्देन नदीच्या पूर्वेकडे असलेल्या महनाईम या ठिकाणी जावं लागलं. तिथे दावीद आणि त्याच्याबरोबर असलेल्या माणसांना काही मूलभूत गोष्टींची गरज होती. तुम्हाला आठवतं का पुढे काय झालं?

तिथल्या तीन पुरुषांनी उदारतेने त्यांच्यासाठी बिछाने, भांडीकुंडी आणि इतर खाद्यपदार्थ आणले. बर्जिल्ल्य हा त्या तीन पुरुषांपैकी एक होता. (२ शमु. १७:२७-२९) अबशालोमने केलेला बंड संपल्यानंतर दावीद यरुशलेमला जाऊ शकत होता. म्हणून दावीदला यार्देनपार पोचवण्यासाठी बर्जिल्ल्य त्याच्यासोबत आला. दावीदने त्याला त्याच्यासोबत यरुशलेमला येण्यासाठी आर्जवलं. तसंच राजाने त्याला म्हटलं की तिथे त्याच्या खाण्यापिण्याची सोय केली जाईल. खरंतर, बर्जिल्ल्यला या गोष्टींची गरज नव्हती कारण तो खूप श्रीमंत होता. (२ शमु. १९:३१-३३) पण, दावीदला बर्जिल्ल्यचा स्वभाव आवडला असावा. त्याच्याकडे बऱ्‍याच वर्षांचा अनुभव असल्यामुळे त्याने दिलेले सल्ले फायदेकारक ठरतील म्हणून दावीदने त्याला यरुशलेमला येण्याचा आग्रह केला असावा. राजदरबारात राहणं आणि काम करणं हा बर्जिल्ल्यसाठी खरंच एक मोठा बहुमान असणार होता!

नम्र आणि आपली कमतरता ओळखून असणाऱ्‍या बर्जिल्ल्यने सांगितलं की तो ८० वर्षांचा आहे. त्याने पुढे म्हटलं: “मला बऱ्‍यावाइटाचा भेद काय समजणार?” (२ शमु. १९:३५) त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? बर्जिल्ल्य अनेक वर्षं जगल्यामुळे त्याच्याकडे बराच अनुभव होता. ज्या प्रकारे रहबाम राजाला “वृद्ध मनुष्य” यांनी सल्ले दिले त्याच प्रकारे बर्जिल्ल्यही सुज्ञ सल्ले देऊ शकत होता. (१ राजे १२:६, ७; स्तो. ९२:१२-१४; नीति. १६:३१) वृद्ध झाल्यामुळे तो शारीरिक रीतीने दुर्बळ झाला होता. म्हणून त्याने कदाचित म्हटलं असावं की त्याला बऱ्‍यावाइटाचा भेद समजणार नाही. त्याने मान्य केलं की वयामुळे त्याला कमी ऐकू येतं आणि अन्‍नाची चव त्याला कळत नाही. (उप. १२:४, ५) म्हणून बर्जिल्ल्यने स्वतःहून राजाला सांगितलं की त्याच्याऐवजी दावीदने किम्हाम नावाच्या तरुण पुरुषाला न्यावं. किम्हाम हा कदाचित बर्जिल्ल्यचा मुलगा असावा.—२ शमु. १९:३६-४०.

भविष्यासाठी योजना करणं

सुरुवातीला उल्लेख केलेल्या बांधवांबाबतीत वयासंबंधित केलेला फेरबदल हा बर्जिल्ल्यने दाखवलेल्या दृष्टिकोनाशी मेळ खातो. बर्जिल्ल्यच्या बाबतीत त्याची परिस्थिती आणि क्षमता लक्षात घेतली गेली. पण आपल्या काळात फेरबदल करताना फक्‍त एका व्यक्‍तीची परिस्थिती आणि तिच्या क्षमता नाही, तर यापेक्षा आणखी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं होतं. जगभरात असलेल्या विश्‍वासू वडिलांसाठी काय योग्य ठरेल याबाबतीत व्यावहारिकपणे विचार करण्याची गरज होती.

नम्रता दाखवणारे हे वयस्क बांधव पाहू शकतात, की त्यांनी इतकी वर्षं पार पाडलेल्या संघटनेच्या जबाबदाऱ्‍या जर तरुणांनी सांभाळल्या तर यहोवाचं संघटन भविष्यात होणाऱ्‍या वाढीसाठी आणखी मजबूत होईल. ज्या प्रकारे बर्जिल्ल्यने कदाचित त्याच्या मुलाला आणि प्रेषित पौलने तीमथ्यला प्रशिक्षित केलं, त्याच प्रकारे बऱ्‍याचदा वयस्क बांधव तरुण बांधवांना प्रशिक्षण देतात. (१ करिंथ. ४:१७; फिलिप्पै. २:२०-२२) या प्रशिक्षणानंतर या तरुण बांधवांनी दाखवून दिलं आहे, की ते “माणसांच्या रूपात देणग्या” आहेत. तसंच, ते “ख्रिस्ताच्या शरीराची उन्‍नती” करण्याच्या योग्यतेचे आहेत.—इफिस. ४:८-१२; गणना ११:१६, १७, २९ पडताळून पाहा.

यहोवाची सेवा करण्याच्या इतर संधी

जगभरात असलेल्या मंडळीतल्या अनेकांनी त्यांच्यावर असलेल्या काही जबाबदाऱ्‍या इतरांवर सोपवल्या आहेत. यामुळे ते यहोवाच्या सेवेतल्या इतर नवीन किंवा जास्त संधींचा फायदा घेऊ शकत आहेत.

१९ वर्षं प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा केलेले बंधू मारको म्हणतात: “या बदलावामुळे मला माझ्या मंडळीतल्या अशा बहिणींच्या पतींना मदत करण्याची संधी मिळाली आहे जे सत्यात नाहीत.”

२८ वर्षं प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा केलेले बंधू जेराल्डो म्हणतात: “आमच्या नवीन ध्येयांपैकी एक ध्येय म्हणजे अक्रियाशील झालेल्यांना मदत करणं आणि जास्त बायबल अभ्यास चालवणं.” ते म्हणतात की ते आणि त्यांची पत्नी आतापर्यंत सोबत मिळून १५ बायबल अभ्यास चालवतात. तसंच, अक्रियाशील झालेले बरेच जण आता सभांनाही येतात.

आधी उल्लेख केलेले अॅलन म्हणतात: “आता आम्हाला प्रचाराच्या आणखी पैलूंमध्ये जास्त वेळ देणं शक्य होतं. आम्ही सार्वजनिक साक्षकार्य करतो. तसंच, व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य करतो आणि आमच्या शेजाऱ्‍यांनाही प्रचार करतो. त्यांपैकी दोघं सभांनाही आलेत.”

तुम्ही जर एकनिष्ठ बांधव आहात व तुमच्यात क्षमता आहे आणि तुम्हाला नवीन नेमणूक मिळाली असेल, तर आणखी एका खास मार्गाने तुम्ही यहोवाची सेवा करू शकता. तुम्ही मंडळीतल्या तरुण बांधवांना तुमचा अनुभव सांगून यहोवाच्या सेवेत हातभार लावू शकता. आधी उल्लेख केलेले रस्सल म्हणतात: “यहोवा चांगल्या, कुशल तरुणांना प्रशिक्षण देतो आणि त्यांचा वापर करतो. ते आवेशाने शिकवतात आणि मंडळीची काळजी घेतात. यामुळे जगभरातल्या बांधवांना फायदा होतो.”—“ तरुण बांधवांना त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी मदत करा” ही चौकट पाहा.

यहोवा तुमच्या एकनिष्ठतेला मौल्यवान लेखतो

जर तुम्हाला यहोवाच्या सेवेत नुकतीच एक नवीन नेमणूक मिळाली असेल तर सकारात्मक वृत्ती ठेवा. तुम्ही याआधी तुमच्या मनापासून केलेल्या सेवेद्वारे अनेकांना आध्यात्मिक रीतीने मदत केली आहे आणि आताही तुम्ही असंच करत राहू शकता. यहोवाचं संघटन तुमची कदर करतं आणि पुढेही करत राहील.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यहोवाचं मन आनंदित केलं आहे. “तुम्ही पवित्र जनांची सेवा केली, आणि अजूनही करत आहात. आणि तुमचे काम व देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेले प्रेम” तो कधीही विसरणार नाही. (इब्री ६:१०) या वचनातून आपल्या सर्वांना ही खातरी मिळते की आपण यहोवाच्या सेवेत आधी केलेल्या मेहनतीपर्यंतच त्याचं अभिवचन सीमित नाही. तुम्ही यहोवासाठी खूप मौल्यवान आहात. यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी तुम्ही आधी केलेली सेवा आणि आता करत असलेले प्रयत्न तो कधीच विसरणार नाही.

वर आपण अशा बांधवांचे अनुभव पाहिले ज्यांना नवीन नेमणूक मिळाली आहे. तुम्हाला जर वैयक्‍तिक रीत्या त्यांच्यासारखा अनुभव आला नसेल तर काय? असं असलं तरी याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. तो कसा?

जर तुम्ही आता अशा विश्‍वासू वृद्ध बांधवाच्या संपर्कात असाल ज्यांना नवीन नेमणूक मिळाली आहे, तर तुम्हाला त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो. त्यांना सल्ला विचारा. तसंच ते आता किती एकनिष्ठपणे आपल्या अनुभवाचा वापर करून आपली नेमणूक पार पाडत आहे ते पाहा.

जर तुम्ही नवीन मार्गाने सेवा करणारे वृद्ध बांधव असाल किंवा अशांकडून शिकणारे बंधुभगिनी असाल, तर हे लक्षात ठेवा की अनेक वर्षं आणि आताही सेवा करत असणाऱ्‍या बांधवांच्या एकनिष्ठतेची यहोवा कदर करतो.