व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वशक्‍तिमान तरी इतरांचा विचार करणारा

सर्वशक्‍तिमान तरी इतरांचा विचार करणारा

“[यहोवा, NW] आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो.”—स्तो. १०३:१४.

गीत क्रमांक: ५१, 

१, २. (क) शक्‍तिशाली लोकांच्या तुलनेत यहोवा मानवांशी कसा वागतो? (ख) आपण या लेखात काय शिकणार आहोत?

शक्‍तिशाली लोक दुसऱ्‍यांवर सहसा “सत्ता चालवतात” किंवा त्यांच्यावर जुलूम करतात. (मत्त. २०:२५; उप. ८:९) पण यहोवा कधीच असं करत नाही. या विश्‍वाचा सर्वात शक्‍तिशाली, सर्वसमर्थ व्यक्‍ती असूनही तो अपरिपूर्ण मनुष्यांचा विचार करतो. तसंच तो दयाळू असल्यामुळे आपल्या भावना आणि आपली गरज ओळखतो. त्याला आपल्या कमतरता, अपरिपूर्णता माहीत आहेत, म्हणूनच आपण जितकं करू शकतो त्याच्यापेक्षा जास्तीची अपेक्षा तो आपल्याकडून करत नाही.—स्तो. १०३:१३, १४.

यहोवा त्याच्या लोकांचा विचार करतो याबद्दल बायबलमध्ये बरीच उदाहरणं दिली आहेत. आपण त्यातल्या तीन उदाहरणांवर चर्चा करू या. पहिलं, महायाजक एलीला न्यायाचा संदेश सांगता यावा यासाठी लहान असलेल्या शमुवेलला यहोवाने प्रेमळपणे केलेली मदत. दुसरं, मोशे इस्राएल राष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी कचरत होता तेव्हा यहोवाने दाखवलेला धीर. आणि तिसरं, इस्राएली लोकांनी इजिप्त सोडलं तेव्हा यहोवाने दाखवलेला विचारशीलपणा. या उदाहरणांवरून आपण यहोवाबद्दल काय शिकू शकतो आणि त्याचं अनुकरण कसं करू शकतो?

एका पित्यासारखा विचार करणं

३. शमुवेलसोबत कोणती विलक्षण गोष्ट घडते आणि आपल्या मनात कोणता प्रश्‍न येऊ शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

शमुवेल अगदी लहानपणापासून निवासमंडपात सेवा करू लागला होता. (१ शमु. ३:१) एका रात्री जेव्हा तो झोपायला गेला तेव्हा एक विलक्षण गोष्ट घडली. * (१ शमुवेल ३:२-१० वाचा.) त्याला कोणीतरी हाक मारल्याचं जाणवलं. त्याला वाटलं की वयस्क महायाजक एली त्याला बोलवत आहे. त्यामुळे तो उठला आणि पळत एलीकडे जाऊन म्हणाला: “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली.” पण एली त्याला म्हणाला: “मी हाक मारली नाही.” नंतर दोनदा परत असंच घडलं. मग एलीला कळलं की देव शमुवेलला हाक मारत आहे. म्हणून परत हाक ऐकू आली तर पुढे काय बोलायचं याबद्दल एली शमुवेलला सांगतो आणि शमुवेल तसंच करतो. पण यहोवाने शमुवेलला सुरुवातीलाच का नाही सांगितलं की तोच त्याला हाक मारत आहे? बायबल याचं उत्तर देत नाही. पण असं असू शकतं की यहोवाला शमुवेलच्या भावनांची कदर होती म्हणून त्याने तसं केलं.

४, ५. (क) यहोवाने शमुवेलला संदेश द्यायला सांगितलं तेव्हा त्याने काय केलं? (ख) आपल्याला या अहवालावरून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

१ शमुवेल ३:११-१८ वाचा. मुलांनी मोठ्यांचा खासकरून अधिकारपदावर असलेल्यांचा आदर करावा अशी आज्ञा नियमशास्त्रात होती. (निर्ग. २२:२८; लेवी. १९:३२) त्यामुळे शमुवेलसारख्या लहान मुलाने एलीकडे जाऊन न घाबरता देवाकडून आलेला न्यायाचा संदेश सांगणं ही गोष्ट आपल्याला अशक्य वाटते. बायबलमध्ये सांगितलं आहे की हा दृष्टान्त एलीला सांगायला शमुवेलला भीती वाटत होती. पण देवाने एलीला स्पष्टपणे दाखवून दिलं की तो शमुवेलला बोलवत होता. यामुळे एलीने शमुवेलला सांगितलं, की देवाने सांगितलेली एकूण एक गोष्ट त्याने त्याला सांगावी. यावर शमुवेलने एलीची आज्ञा पाळली आणि त्याला “सर्व काही सांगितले.”

हा संदेश एलीसाठी पूर्णपणे अनपेक्षित नव्हता कारण याआधीही ‘देवाच्या एका मनुष्याने’ एलीला असाच एक संदेश दिला होता. (१ शमु. २:२७-३६) या अहवालावरून आपल्याला शिकायला मिळतं की यहोवा खूप बुद्धिमान आणि इतरांचा विचार करणारा आहे.

६. यहोवाने ज्या प्रकारे शमुवेलला मदत केली त्यावरून आपल्याला कोणकोणते धडे शिकायला मिळतात?

तुम्ही लहान किंवा तरुण आहात का? जर असाल तर शमुवेलचा हा अहवाल तुम्हाला समजायला मदत करेल की यहोवा तुमच्या समस्या आणि भावना चांगल्या प्रकारे जाणतो. कदाचित तुम्ही लाजाळू स्वभावाचे असाल आणि तुम्हाला मोठ्यांना प्रचार करायला किंवा तुमच्या वयाच्या मुलांपेक्षा वेगळं वागायला कठीण जात असेल. अशा वेळी तुम्ही ही खातरी बाळगू शकता की यहोवाला तुम्हाला मदत करण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्याला प्रार्थना करा आणि तुमचं मन त्याच्यासमोर मोकळं करा. (स्तो. ६२:८) तसंच शमुवेलसारख्या बायबलमधल्या इतर उदाहरणांवर मनन करा. त्यासोबतच, तुमच्या वयाच्या किंवा वयाने तुमच्यापेक्षा मोठ्या बंधुभगिनींशी बोला ज्यांना तुमच्यासारख्याच समस्यांचा सामना करावा लागला. काही प्रसंगी त्यांनी अपेक्षाही केली नसेल अशा प्रकारे यहोवाने त्यांना कशी मदत केली याबद्दल ते तुम्हाला सांगतील.

यहोवाने मोशेचा विचार केला

७, ८. यहोवाने कसं दाखवलं की त्याला मोशेच्या भावनांची खूप काळजी आहे?

मोशे ८० वर्षांचा होता तेव्हा यहोवाने त्याला एक कठीण नेमणूक दिली. त्याला इस्राएली लोकांना इजिप्तच्या गुलामीतून मुक्‍त करायचं होतं. (निर्ग. ३:१०) या नेमणुकीबद्दल कळल्यावर मोशेला कदाचित धक्का बसला असेल, कारण तो ४० वर्षं मिद्यानात एक मेंढपाळ म्हणून काम करत होता. मोशेने म्हटलं: “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांस मिसरातून काढून आणणारा असा मी कोण?” यावर यहोवाने त्याला आश्‍वासन दिलं: “खचित मी तुझ्याबरोबर असेन.” (निर्ग. ३:११, १२) यहोवाने त्याला असंही अभिवचन दिलं की इस्राएलचे वडीलजन त्याचं नक्की “ऐकतील.” तरी मोशेने म्हटलं की कदाचित ते “माझा विश्‍वास धरणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत.” (निर्ग. ३:१८; ४:१) मोशेच्या म्हणण्यावरून असं दिसून येतं की त्याला यहोवाचं म्हणणं पटत नव्हतं. पण तरी यहोवा मोशेसोबत धीराने वागला. तसंच त्याने त्याला चमत्कार करण्याची शक्‍तीही दिली. खरंतर बायबलमध्ये अशी शक्‍ती मिळणारा मोशे हा पहिला मनुष्य होता.—निर्ग. ४:२-९, २१.

इतकी मदत मिळूनही मोशे इजिप्तला जायला तयार नव्हता. तो म्हणाला की त्याला नीट बोलता येत नाही. त्यामुळे देवाने त्याला म्हटलं की ‘मी तुझ्या मुखासोबत असेन, आणि तू काय बोलावं ते मी तुला शिकवीन.’ मग शेवटी मोशे इजिप्तला जायला तयार झाला का? नाही, त्याने यहोवाला दुसऱ्‍या कोणालातरी पाठवायला सांगितलं. तेव्हा मात्र यहोवाला राग आला. पण तरी यहोवाने त्याच्या भावनांचा विचार केला आणि त्याने अहरोनला मोशेच्या वतीने बोलण्यासाठी पाठवलं.—निर्ग. ४:१०-१६.

९. चांगल्या प्रकारे नेतृत्व करण्यासाठी मोशेला यहोवाच्या धीरामुळे आणि दयेमुळे कशी मदत मिळाली?

हा अहवाल आपल्याला यहोवाबद्दल काय शिकवतो? यहोवा सर्वशक्‍तिमान देव आहे त्यामुळे तो त्याच्या शक्‍तीचा वापर करून मोशेच्या मनात भीती घालू शकला असता आणि त्याला आपल्या आज्ञा पाळायला लावू शकला असता. पण याउलट यहोवाने त्याच्या बाबतीत धीर धरला आणि त्याच्याशी दयाळूपणे वागला. तसंच यहोवाने त्याच्या नम्र सेवकाला आश्‍वासन दिलं की तो त्याच्यासोबत असेल. अशा प्रकारे वागल्यामुळे काही फरक पडला का? हो नक्कीच. पुढे जाऊन मोशेने देवाच्या लोकांचं चांगल्या प्रकारे नेतृत्व केलं. जसा यहोवाने त्याच्याबद्दल विचार केला तसंच मोशेनेही इतरांचा विचार केला आणि तो सौम्यतेने वागला.—गण. १२:३.

इतरांशी वागताना तुम्ही यहोवाचं अनुकरण करता का? (परिच्छेद १० पाहा)

१०. आपण यहोवाप्रमाणे इतरांचा विचार करतो तेव्हा आपल्याला कसा फायदा होतो?

१० या अहवालातून आज आपण काय शिकू शकतो? तुम्ही एक पती, पिता किंवा मंडळीत वडील आहात का? जर असाल तर तुम्हाला इतरांवर काही प्रमाणात अधिकार आहे. म्हणूनच तुम्ही यहोवाचं अनुकरण करून तुमच्या पत्नीचा, मुलांचा व मंडळीतल्या इतरांचा विचार करणं, त्यांच्याबद्दल दया दाखवणं आणि धीर धरणं महत्त्वाचं आहे. (कलस्सै. ३:१९-२१; १ पेत्र ५:१-३) जर तुम्ही यहोवा देवाचं आणि महान मोशे असलेल्या येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं तर इतर जण मनात कोणताही संकोच न बाळगता तुमच्याशी बोलतील. यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ शकाल. (मत्त. ११:२८, २९) असं करण्याद्वारे तुम्ही त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरणही मांडत असाल.—इब्री १३:७.

शक्‍तिशाली तरी इतरांचा विचार करणारा उद्धारकर्ता

११, १२. यहोवाने इस्राएल राष्ट्राला इजिप्तमधून बाहेर आणलं तेव्हा त्यांना कसं सुरक्षित ठेवलं?

११ इ.स.पू. १५१३ साली, तीस लाखापेक्षा जास्त इस्राएली लोकांनी इजिप्त सोडलं असावं. त्यात मुलं, वृद्ध आणि कदाचित आजारी किंवा अपंग सामील असावेत. या मोठ्या जमावाला एका प्रेमळ आणि त्यांना समजून घेणाऱ्‍या नेत्याची गरज होती. आणि यहोवाने मोशेद्वारे दाखवून दिलं की तो एक प्रेमळ नेता आहे. यामुळे इस्राएली लोकांनी आपलं घर सोडलं तेव्हा ते घाबरले नाहीत.—स्तो. ७८:५२, ५३.

१२ यहोवाने त्याच्या लोकांना सुरक्षित कसं ठेवलं? इस्राएल राष्ट्र इजिप्त सोडून निघाल्यावर यहोवाने त्यांना “लढाईला सज्ज” असलेल्या सैनिकांप्रमाणे संघटित केलं. (निर्ग. १३:१८) या प्रकारे संघटित असल्यामुळे ते स्पष्टपणे पाहू शकले की परिस्थिती यहोवाच्या नियंत्रणात आहे. तसंच यहोवाने त्यांना “दिवसा मेघ” आणि रात्री “अग्निप्रकाश” दिला. असं करण्याद्वारे त्याने दाखवून दिलं की तो त्यांच्यासोबत आहे, त्यांचं मार्गदर्शन आणि संरक्षण करत आहे. (स्तो. ७८:१४) नंतर जे घडणार होतं त्यासाठी अशा प्रकारच्या आश्‍वासनाची इस्राएल राष्ट्राला गरज होती.

तांबडा समुद्र पार करताना यहोवाने इस्राएली लोकांचा कसा विचार केला? (परिच्छेद १३ पाहा)

१३, १४. (क) तांबडा समुद्र पार करताना यहोवाने इस्राएली लोकांची कशी काळजी घेतली? (ख) यहोवाने कसं दाखवून दिलं की तो इजिप्तच्या लोकांपेक्षा कैकपटीने शक्‍तिशाली आहे?

१३ निर्गम १४:१९-२२ वाचा. कल्पना करा की तुम्ही इस्राएली लोकांसोबत आहात. इजिप्तची सेना तुमचा पाठलाग करत आहे आणि तुमच्यासमोर तांबडा समुद्र आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी तुमची परिस्थिती झाली आहे. तुम्ही पूर्णपणे अडकून गेला आहात. मग देव एक चमत्कार करतो. तुमच्या पुढे असणारा मेघस्तंभ आता तुमच्या मागे जातो. म्हणजे तो आता तुमच्या आणि इजिप्तच्या लोकांच्या मधे आहे. त्यांच्या इथे काळोख आहे पण तुम्ही मात्र लख्ख प्रकाशात आहात. मग तुम्ही मोशेला तांबड्या समुद्रावर त्याचा हात पुढे करताना पाहता. त्यानंतर पूर्वेकडचा वारा जोरात वाहू लागतो आणि पलीकडे जाण्यासाठी एक मोठा रस्ता तयार होतो. मग तुम्ही, तुमचं कुटुंब आणि तुमचे प्राणी सर्व इतरांसोबत अगदी संघटित रीतीने समुद्राच्या कोरड्या जमिनीवरून चालत जाता. तुम्ही आश्‍चर्याने खाली पाहता. खाली चिखल नाही किंवा जमीन बुळबुळीत नाही. ती अगदी कोरडी असून चालताना तुमचे पाय आत रुतत नाहीत. तुम्ही सहजच चालू शकता. यामुळे सर्वात हळूहळू चालणारी व्यक्‍तीही पलीकडे अगदी सुरक्षित जाऊ शकते.

१४ निर्गम १४:२३, २६-३० वाचा. हे सर्व घडत असताना गर्विष्ठ आणि मूर्ख फारो तुमचा व तुमच्यासोबत असणाऱ्‍या इतर इस्राएली लोकांचा पाठलाग करू लागतो. मग मोशे त्याचा हात पुन्हा समुद्राकडे करतो आणि पाण्याच्या दोन भिंती कोसळतात. फारो आणि त्याचं सर्व सैन्य त्यात बुडतं. कोणीच वाचत नाही!—निर्ग. १५:८-१०.

१५. या अहवालातून तुम्ही यहोवाबद्दल काय शिकता?

१५ या अहवालातून आपल्याला यहोवाबद्दल आणखी एक गोष्ट शिकायला मिळते. यहोवा व्यवस्थेचा देव आहे. त्याच्या या गुणामुळे आपल्याला सुरक्षित वाटतं. (१ करिंथ. १४:३३) एक मेंढपाळ जसं प्रेमळपणे आपल्या मेंढरांची काळजी घेतो तसंच यहोवाही व्यावहारिक मार्गांनी आपल्या लोकांची काळजी घेतो. तो त्यांना त्यांच्या शत्रूंपासून सुरक्षित ठेवतो. यामुळे या व्यवस्थेच्या अंताच्या अगदी जवळ असतानाही आपल्याला आश्‍वासन आणि सांत्वन मिळतं.—नीति. १:३३.

१६. यहोवाने इस्राएली लोकांना ज्या प्रकारे वाचवलं त्याचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो?

१६ आजही यहोवा त्याच्या लोकांची एक समूह म्हणून काळजी घेतो. तो त्यांना त्याच्यासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो आणि त्यांना त्यांच्या शत्रूंपासून सुरक्षित ठेवतो. आणि हे तो लवकरच येणाऱ्‍या मोठ्या संकटादरम्यानही करत राहणार आहे. (प्रकटी. ७:९, १०) म्हणून यहोवाचे सेवक मग ते तरुण असोत किंवा वृद्ध, निरोगी असोत किंवा अपंग, मोठ्या संकटाच्या वेळी त्यांच्यात गोंधळ उडणार नाही किंवा ते घाबरणार नाहीत. * खरंतर ते याच्या अगदी उलट वागतील. ते येशूचे शब्द लक्षात ठेवतील: “डोकं वर करून ताठ उभे राहा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.” (लूक २१:२८) त्यांच्यावर जरी फारोपेक्षा शक्‍तिशाली असलेल्या गोगचा, म्हणजे राष्ट्रांच्या समूहाचा हल्ला झाला तरी त्यांना ही खातरी असेल की यहोवा त्यांना सुरक्षित ठेवेल. (यहे. ३८:२, १४-१६) त्यांना असं का वाटेल? कारण त्यांना हा विश्‍वास आहे की यहोवा बदलणारा नाही. तो पुन्हा एकदा दाखवून देईल की तो आपल्या लोकांची काळजी करणारा एक प्रेमळ उद्धारकर्ता आहे.—यश. २६:३, २०.

१७. (क) यहोवा त्याच्या लोकांचा विचार करतो यासंदर्भात असलेले बायबलमधले अहवाल वाचून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? (ख) पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

१७ यहोवाने त्याच्या लोकांची काळजी घेताना, त्यांचं मार्गदर्शन आणि संरक्षण करताना त्यांचा कसा विचार केला हे आपण या लेखात पाहिलं. तसंच, त्याने त्यांना कशी दया दाखवली याबद्दल असलेली काही उदाहरणंही आपण पाहिली. अशा उदाहरणांवर मनन करताना यहोवाबद्दल काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. बारीकसारीक गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा ज्यांकडे कदाचित तुमचं आधी लक्ष गेलं नसेल. जसजसं तुम्ही यहोवाच्या सुंदर गुणांबद्दल शिकत जाल तसतसं त्याच्यासाठी असलेलं तुमचं प्रेम आणि विश्‍वास आणखी वाढत जाईल. पुढच्या लेखात आपण अशा काही मार्गांवर चर्चा करू ज्यांद्वारे तुम्ही यहोवाचं अनुकरण करून तुमच्या कुटुंबातल्या, मंडळीतल्या आणि सेवाकार्यातल्या लोकांचा विचार करू शकता.

^ परि. 3 यहुदी इतिहासकार जोसिफसने म्हटलं की त्या वेळी शमुवेल १२ वर्षांचा होता.

^ परि. 16 हर्मगिदोनमधून वाचणारे काही लोक अपंग असतील असा आपण अंदाज बांधू शकतो. जेव्हा येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने लोकांचे “सर्व प्रकारचे रोग व दुखणी बरी” केली. त्या वेळी त्याने जे केलं त्यावरून दिसून येतं की हर्मगिदोनमधून वाचणाऱ्‍या लोकांसोबतही तो असंच करेल. (मत्त. ९:३५) ज्यांचं पुनरुत्थान होईल त्यांचं शरीर निरोगी आणि सुदृढ असेल.