व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४०

जे तुमच्या स्वाधीन करण्यात आलं आहे ते जपून ठेवा

जे तुमच्या स्वाधीन करण्यात आलं आहे ते जपून ठेवा

“तीमथ्य, जो ठेवा तुझ्या स्वाधीन करण्यात आला आहे तो जपून ठेव.”—१ तीम. ६:२०.

गीत ३४ आपल्या नावाला जागू या!

सारांश *

१-२. पहिले तीमथ्य ६:२० या वचनानुसार, तीमथ्यला काय मिळालं होतं?

आपल्याला एखादी मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवायची असते, तेव्हा आपण सहसा ती एखाद्या व्यक्‍तीकडे देतो किंवा बँकेत ठेवतो. आपल्याला माहीत असतं, की आपली वस्तू हरवणार नाही किंवा चोरीला जाणार नाही, तर ती सुरक्षित राहील. यावरून हेच दिसून येतं, की आपण आपली मौल्यवान वस्तू अशाच व्यक्‍तीकडे जपून ठेवायला देतो, जिच्यावर आपला भरवसा आहे.

पहिले तीमथ्य ६:२० वाचा. प्रेषित पौलने तीमथ्यला आठवण करून दिली, की त्याला मौल्यवान असं काहीतरी मिळालं आहे. ते म्हणजे, मानवांसाठी देवाचा जो उद्देश आहे त्याबद्दलचं अचूक ज्ञान. याशिवाय, तीमथ्यला प्रचाराचं काम करण्याचाही बहुमान मिळाला होता. (२ तीम. ४:२, ५) म्हणून पौलने तीमथ्यला असं प्रोत्साहन दिलं, की त्याला जे काही देण्यात आलं आहे ते त्याने जपून ठेवावं. तीमथ्यप्रमाणेच, आपल्यालाही काही मौल्यवान गोष्टी देण्यात आल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? आणि यहोवाकडून मिळालेला हा ठेवा आपण सांभाळून का ठेवला पाहिजे?

आपल्याला मौल्यवान सत्यं देण्यात आली आहेत

३-४. बायबलमधली सत्यं मौल्यवान का आहेत?

यहोवाने आपल्याला बायबलमधल्या सत्यांचं अचूक ज्ञान दिलं आहे. ही सत्यं मौल्यवान आहेत, कारण या सत्यांमुळे आपल्याला यहोवासोबत चांगलं नातं जोडता येतं आणि जीवनात खरा आनंद मिळवता येतो. तसंच, जेव्हा आपण ही सत्यं स्वीकारतो आणि त्यांनुसार जीवन जगतो, तेव्हा खोट्या शिकवणींतून आणि अनैतिक जीवनशैलीतून आपण मुक्‍त होतो.—१ करिंथ. ६:९-११.

बायबलमधली सत्यं आणखी एका कारणामुळे मौल्यवान आहेत. ते कारण म्हणजे, या सत्यांचं ज्ञान यहोवा फक्‍त “योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” नम्र लोकांनाच देतो. (प्रे. कार्ये १३:४८) हे नम्र लोक मान्य करतात, की बायबलमधल्या सत्यांची समज मौल्यवान खजिन्यासारखी आहे. (नीति. ३:१३, १५) तसंच, ते हेही मान्य करतात, की ही सत्यं आपण स्वतःहून समजू शकत नाही. म्हणून आज यहोवा ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ आपल्याला ही सत्यं शिकवतो.—मत्त. ११:२५; २४:४५.

५. यहोवाने आपल्याला आणखी कोणती गोष्ट दिली आहे?

यहोवाने आपल्याला आणखी एक गोष्ट दिली आहे. ती म्हणजे, त्याच्याबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दलचं सत्य इतरांना शिकवण्याचा बहुमान. (मत्त. २४:१४) आपण लोकांना जो संदेश सांगतो तो खूप मौल्यवान आहे. कारण त्या संदेशामुळे लोकांना यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनता येतं आणि त्यांना सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते. (१ तीम. ४:१६) आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे कमी किंवा जास्त सेवाकार्य करत असू, एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे; ती म्हणजे, आज आपल्या काळात केल्या जाणाऱ्‍या सगळ्यात महत्त्वाच्या कामाला आपण हातभार लावत आहोत. (१ तीम. २:३, ४) यहोवासोबत मिळून काम करणं हा खरंच किती मोठा बहुमान आहे!—१ करिंथ. ३:९.

तुम्हाला जे देण्यात आलं आहे ते गमावू नका!

इतर जण सत्य सोडून जात होते, तेव्हा तीमथ्यला सत्यात टिकून राहण्यासाठी पक्का निर्धार करावा लागला (परिच्छेद ६ पाहा)

६. काही ख्रिश्‍चनांच्या बाबतीत काय झालं?

तीमथ्यच्या काळातल्या काही ख्रिश्‍चनांना देवासोबत मिळून काम करण्याचा जो मोठा बहुमान मिळाला होता, त्याची त्यांनी कदर केली नाही. उदाहरणार्थ, देमासला पौलसोबत मिळून सेवा करण्याचा बहुमान मिळाला होता. पण त्याला सध्याच्या जगाची ओढ असल्यामुळे तो पौलला सोडून गेला. (२ तीम. ४:१०) तसंच, फुगल आणि हर्मगनेस यांना अशी भीती होती, की पौलप्रमाणे आपलाही छळ केला जाईल. त्यामुळे कदाचित त्यांनी आपलं सेवाकार्य सोडून दिलं. (२ तीम. १:१५) हुमनाय, आलेक्सांद्र आणि फिलेत यांनीसुद्धा यहोवाला सोडून दिलं आणि ते धर्मत्यागी बनले. (१ तीम. १:१९, २०; २ तीम. २:१६-१८) हे सगळे एकेकाळी आध्यात्मिक रित्या मजबूत होते. पण देवाने त्यांना ज्या मौल्यवान गोष्टी दिल्या होत्या त्यांबद्दल त्यांना कदर राहिली नाही.

७. आपण सत्य सोडून द्यावं म्हणून सैतान कोणत्या युक्त्या वापरतो?

यहोवाकडून मिळालेल्या मौल्यवान गोष्टी आपण सोडून द्याव्यात यासाठी सैतान काय करतो? तो काही युक्त्या वापरतो. जसं की टीव्ही, चित्रपट, इंटरनेट, पुस्तकं, वृत्तपत्रं आणि मासिकं यांसारख्या गोष्टींचा तो वापर करतो. यांचा वापर करून तो आपल्याला असा विचार करायला किंवा वागायला लावतो ज्यामुळे आपण यहोवाच्या आज्ञा मोडू आणि हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ. तसंच, आपण प्रचार करायचं सोडून द्यावं म्हणून तो लोकांकडून येणाऱ्‍या दबावाची आणि छळाची भीती आपल्या मनात घालतो. याशिवाय, आपण सत्य सोडून द्यावं, म्हणून धर्मत्यागी लोकांच्या शिकवणी ऐकायची भुरळही तो आपल्याला घालतो.—१ तीम. ६:२०, २१.

८. डॅनियलच्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात?

आपण जर सावध राहिलो नाही, तर आपण हळूहळू सत्यापासून दूर जाऊ. डॅनियल * नावाच्या बांधवाचा विचार करा. त्याला व्हिडिओ गेम्स खेळायला खूप आवडायचं. तो म्हणतो: “मी दहाएक वर्षांचा होतो तेव्हापासून व्हिडिओ गेम्स खेळायला लागलो. सुरुवातीला मी चांगले गेम्स खेळायचो, पण हळूहळू मी मारधाडीचे आणि जादूटोण्याचे गेम्स खेळू लागलो.” शेवटी अशी एक वेळ आली, की डॅनियल दिवसाचे जवळजवळ १५ तास व्हिडिओ गेम्स खेळू लागला. तो पुढे म्हणतो: “मनात कुठंतरी मला हे माहीत होतं, की मी जे गेम्स खेळतोय आणि त्यावर जितका वेळ घालवतोय त्यामुळे मी यहोवापासून दूर जातोय. पण मी स्वतःची अशी समजूत घातली होती, की बायबलची तत्त्वं मला लागू होत नाहीत.” डॅनियलच्या उदाहरणातून काय लक्षात येतं? हेच की आपण जर सावध राहिलो नाही, तर मनोरंजनाचा नकळतपणे आपल्यावर प्रभाव पडेल आणि आपण सहज सत्यापासून दूर जाऊ. असं जर झालं, तर यहोवाने आपल्याला ज्या मौल्यवान गोष्टी दिल्या आहेत त्या आपण गमावून बसू.

आपण सत्यात कसं टिकून राहू शकतो?

९. पहिले तीमथ्य १:१८, १९ या वचनांनुसार पौलने तीमथ्यची तुलना कोणाशी केली?

पहिले तीमथ्य १:१८, १९ वाचा. पौलने तीमथ्यची तुलना एका सैनिकाशी केली. आणि त्याने त्याला “चांगल्या उद्देशासाठी असलेली . . . लढाई लढत” राहण्याचं प्रोत्साहन दिलं. ही खरोखरची लढाई नव्हती, तर एक आध्यात्मिक लढाई होती. आज आपण कोणत्या अर्थाने युद्धात लढणाऱ्‍या सैनिकांसारखे आहोत? ख्रिस्ताचे सैनिक असल्यामुळे आपण स्वतःमध्ये कोणते गुण विकसित केले पाहिजेत? पौलने दिलेल्या सैनिकाच्या उदाहरणातून आपण कोणते पाच धडे शिकू शकतो, हे आता आपण पाहू या. हे धडे आपल्याला सत्यात टिकून राहायला मदत करतील.

१०. सुभक्‍ती म्हणजे काय, आणि आपण ती विकसित का केली पाहिजे?

१० सुभक्‍ती विकसित करा.  सुभक्‍ती विकसित करणं म्हणजे देवाबद्दल मनात प्रेमाची आणि निष्ठेची भावना वाढवणं. एक चांगला सैनिक एकनिष्ठ असतो. ज्यांच्यावर त्याचं प्रेम असतं आणि ज्या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या असतात, त्यांचं संरक्षण करण्यासाठी तो आपल्या जिवाची परवा न करता लढतो. म्हणून, पौलने तीमथ्यला सुभक्‍ती विकसित करायचं प्रोत्साहन दिलं. (१ तीम. ४:७) देवाबद्दल आपल्या मनात जितकी जास्त प्रेमाची आणि निष्ठेची भावना वाढत जाईल, तितकंच आपण सत्यात मजबूत होत जाऊ.—१ तीम. ४:८-१०; ६:६.

दिवसाच्या शेवटी आपण थकलेलो असतानाही सभेला जातो, तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात! (परिच्छेद ११ पाहा)

११. आपण स्वतःला शिस्त का लावली पाहिजे?

११ स्वतःला शिस्त लावा.  युद्धासाठी नेहमी तयार असण्याकरता एका सैनिकाला स्वतःला शिस्त लावावी लागते. पौलने तीमथ्यला चुकीच्या इच्छांवर मात करण्याचा, स्वतःमध्ये चांगले गुण विकसित करण्याचा आणि ख्रिस्ती भाऊबहिणींसोबत एकत्र येण्याचा सल्ला दिला होता. (२ तीम. २:२२) या गोष्टी करण्यासाठी त्याला नक्कीच स्वतःला शिस्त लावावी लागली असेल. पण त्यामुळे तीमथ्य सैतानाच्या हल्ल्यांचा विरोध करू शकला. आपल्यालासुद्धा आपल्या चुकीच्या इच्छांवर मात करण्यासाठी स्वतःला शिस्त लावावी लागेल. (रोम. ७:२१-२५) तसंच, आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करत राहण्यासाठी आणि चांगले गुण विकसित करत राहण्यासाठीही आपल्याला स्वतःला शिस्त लावावी लागेल. (इफिस. ४:२२, २४) याशिवाय, दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण थकून गेलेलो असतो, तेव्हा सभेला जाण्यासाठी आपल्याला कदाचित खूप प्रयत्न करावे लागतील.—इब्री १०:२४, २५.

१२. बायबलचा उपयोग करण्यात आपण कुशल कसे होऊ शकतो?

१२ सैनिकाला आपल्या शस्त्रांचा वापर करण्याचा सराव करावा लागतो. पण, त्यात कुशल होण्यासाठी त्याला हे नियमितपणे करावं लागतं. त्याचप्रमाणे, आपल्यालासुद्धा देवाच्या वचनाचा उपयोग करण्यात कुशल होण्याची गरज आहे. (२ तीम. २:१५) कुशल होण्याचे काही मार्ग आपण सभांमध्ये शिकू शकतो. पण बायबलमधली सत्यं किती मौल्यवान आहेत, हे जर आपल्याला इतरांना पटवून द्यायचं असेल, तर आपण स्वतःसुद्धा बायबलचा नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. बायबलचा अभ्यास करून आपण आपला विश्‍वास मजबूत केला पाहिजे. त्यासाठी बायबलचं फक्‍त वरवर वाचन करणं पुरेसं नाही, तर बायबलची वचनं चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आणि ती लागू करण्यासाठी आपण वाचलेल्या गोष्टींवर मनन आणि संशोधनही केलं पाहिजे. (१ तीम. ४:१३-१५) मग इतरांना शिकवण्यासाठी आपल्याला बायबलचा उपयोग करता येईल. पण शिकवताना, वचनं नुसतीच वाचणं पुरेसं नाही. तर आपल्याला ती त्यांना समजावून सांगता आली पाहिजेत आणि ती कशी लागू करता येतील हेसुद्धा सांगता आलं पाहिजे. म्हणून, इतरांना शिकवताना बायबलचा कुशलपणे उपयोग करायचा असेल, तर आपण त्याचा नियमितपणे अभ्यास केला पाहिजे.—२ तीम. ३:१६, १७.

१३. इब्री लोकांना ५:१४ या वचनानुसार आपण समजबुद्धी का दाखवली पाहिजे?

१३ समजबुद्धी दाखवा.  एक चांगला सैनिक धोका ओळखतो आणि तो टाळण्यासाठी पाऊल उचलतो. त्याचप्रमाणे, आपल्यालासुद्धा धोकादायक परिस्थिती ओळखता आली पाहिजे आणि ती टाळण्यासाठी पाऊल उचलता आलं पाहिजे. (नीति. २२:३; इब्री लोकांना ५:१४ वाचा.) उदाहरणार्थ, करमणूक किंवा मनोरंजन निवडताना आपण समजबुद्धीचा वापर केला पाहिजे. कारण टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये आणि चित्रपटांमध्ये सहसा अनैतिक गोष्टी दाखवल्या जातात. आपल्याला माहीत आहे, की अशा गोष्टी देवाला आवडत नाहीत. आणि या गोष्टींमुळे आपल्यावर आणि इतरांवरसुद्धा वाईट परिणाम होतो. तसंच, यहोवावरचं आपलं प्रेमही हळूहळू कमी होऊ शकतं. म्हणून, आपण अशा प्रकारचं मनोरंजन टाळलं पाहिजे.—इफिस. ५:५, ६.

१४. समजबुद्धीचा वापर केल्यामुळे डॅनियलला कशी मदत झाली?

१४ आधी उल्लेख केलेल्या डॅनियलला हे जाणवू लागलं, की मारधाडीचे आणि जादूटोण्याचे गेम्स खेळणं चुकीचं आहे. या समस्येवर मात करण्यासाठी त्याने आपल्या वॉचटॉवर लायब्ररी मध्ये संशोधन केलं. त्यामुळे त्याला कशी मदत झाली? त्याने चुकीचे व्हिडिओ गेम्स खेळणं सोडून दिलं. त्याने ऑनलाईन गेम्सचं सबस्क्रिपशन बंद केलं आणि ज्यांच्यासोबत तो हे गेम्स ऑनलाईन खेळायचा त्यांच्यासोबत खेळणंही बंद केलं. डॅनियल म्हणतो: “घरात बसून व्हिडिओ गेम्स खेळण्याऐवजी, मी घराबाहेर पडून अनेक चांगल्या गोष्टी करू लागलो, आणि मंडळीतल्या मित्रांसोबत वेळ घालवू लागलो.” डॅनियल आता मंडळीत एक पायनियर आणि वडील म्हणून सेवा करत आहे.

१५. खोट्या गोष्टींवर विश्‍वास ठेवणं आपल्यासाठी धोकादायक का आहे?

१५ तीमथ्यप्रमाणे आपण आणखी एक धोका ओळखला पाहिजे. तो म्हणजे, धर्मत्यागी लोक पसरवत असलेल्या खोट्या गोष्टींचा धोका. (१ तीम. ४:१, ७; २ तीम. २:१६) धर्मत्यागी लोक आपल्या बांधवांबद्दल खोट्या गोष्टी पसरवण्याचा किंवा यहोवाच्या संघटनेबद्दल आपल्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा चुकीच्या माहितीमुळे आपला विश्‍वास कमजोर होऊ शकतो. आपण त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये. कारण बायबल म्हणतं, की या धर्मत्यागी लोकांची “मने दूषित झाल्यामुळे आणि ते सत्यापासून दुरावल्यामुळे” चुकीची माहिती पसरवतात. आणि त्यांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे वाद घालणं आणि शब्दांवरून भांडणं करणं. (१ तीम. ६:४, ५) आपण त्यांच्या खोट्या माहितीवर विश्‍वास ठेवावा आणि आपल्या बांधवांवर शंका घ्यावी अशी त्यांची इच्छा असते.

१६. आपण कोणत्या गोष्टींमुळे आपलं लक्ष भरकटू देऊ नये?

१६ आपलं लक्ष भरकटू देऊ नका.  “ख्रिस्त येशूचा एकनिष्ठ सैनिक या नात्याने” तीमथ्यला आपलं पूर्ण लक्ष सेवाकार्यावर लावायचं होतं. धनसंपत्तीमुळे आणि जीवनातल्या इतर गोष्टींमुळे त्याने आपलं लक्ष भरकटू द्यायचं नव्हतं. (२ तीम. २:३, ४) तीमथ्यप्रमाणेच आपणसुद्धा धनसंपत्तीमुळे किंवा जगातल्या इतर गोष्टींमुळे आपलं लक्ष भरकटू देऊ नये. पैशाच्या फसव्या ताकदीमुळे यहोवावरचं आपलं प्रेम, देवाच्या वचनाबद्दल असलेली आपली कदर आणि बायबलबद्दल लोकांना सांगायची आपली इच्छा नाहीशी होऊ शकते. (मत्त. १३:२२) त्यामुळे आपण आपलं जीवन साधं ठेवलं पाहिजे. आणि देवाच्या राज्याला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देण्यासाठी आपला वेळ आणि आपली ताकद खर्च केली पाहिजे.—मत्त. ६:२२-२५, ३३.

१७-१८. यहोवासोबतची आपली मैत्री टिकवून ठेवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे?

१७ लगेच पाऊल उचलायला तयार असा.  पुढे येणाऱ्‍या धोक्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करता येईल, हे एक सैनिक आधीच ठरवतो. अगदी तसंच, यहोवाने आपल्याला ज्या मौल्यवान गोष्टी दिल्या आहेत त्या जर आपल्याला जपून ठेवायच्या असतील, तर धोका दिसताच आपण लगेच पाऊल उचललं पाहिजे. असं करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? त्यासाठी आपण कोणतं पाऊल उचलणार हे आपण आधीच ठरवलं पाहिजे.

१८ हे समजण्यासाठी, एखाद्या मोठ्या सभागृहात कार्यक्रम सुरू होण्याआधी श्रोत्यांना काय सांगितलं जातं ते लक्षात घ्या. त्यांना असं सांगितलं जातं, की एखादा तातडीचा प्रसंग उद्‌भवला तर कोणत्या दरवाजातून लगेच बाहेर पडता येईल, हे त्यांनी आधीच पाहून ठेवावं. त्याचप्रमाणे, इंटरनेट वापरताना, चित्रपट किंवा टीव्हीवर कार्यक्रम पाहताना अचानाक एखादं अश्‍लील किंवा हिंसक दृश्‍य, किंवा धर्मत्यागाबद्दलची माहिती समोर आली, तर आपण लगेच कोणतं पाऊल उचलणार हे आपण आधीच ठरवलं पाहिजे. आपण जर आधीच तयारी केली असेल, तर धोका समोर आल्यावर आपल्याला लगेच पाऊल उचलता येईल. यामुळे यहोवाच्या नजरेत आपण शुद्ध राहू आणि त्याच्यासोबतची आपली मैत्री टिकून ठेवू.—स्तो. १०१:३; १ तीम. ४:१२.

१९. यहोवाकडून मिळालेल्या मौल्यवान गोष्टी आपण जपून ठेवल्या तर आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?

१९ यहोवाने आपल्याला बायबलमधली जी मौल्यवान सत्यं दिली आहेत आणि ही सत्यं इतरांना शिकवण्याचा जो बहुमान दिला आहे, या दोन्ही गोष्टी आपण जपून ठेवल्या पाहिजेत. आपण जर असं केलं तर आपला विवेक शुद्ध राहील, आपण अर्थपूर्ण जीवन जगू आणि इतरांना यहोवाबद्दल शिकवण्याचा आनंद आपल्याला मिळेल. यहोवाकडून मिळालेल्या मौल्यवान गोष्टी आपल्याला त्याच्या मदतीने जपून ठेवता येतील.—१ तीम. ६:१२, १९.

गीत २९ खरेपणाने चालणे

^ परि. 5 आपल्याला सत्य शिकायची आणि ते इतरांना शिकवायची मौल्यवान देणगी यहोवाकडून मिळाली आहे. ही देणगी आपल्याला कशी जपून ठेवता येईल, याबद्दल आपण या लेखात शिकणार आहोत.

^ परि. 8 नाव बदलण्यात आलं आहे.