व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३८

शांतीच्या काळाचा विचारपूर्वक उपयोग करा

शांतीच्या काळाचा विचारपूर्वक उपयोग करा

“त्याने यहूदात तटबंदीची नगरे बांधली. देशात स्वास्थ्य होते आणि त्या काळी काही लढाई झाली नाही, कारण परमेश्‍वराने त्याला आराम दिला होता.”—२ इति. १४:६.

गीत १० “हा मी आहे, मला पाठीव!”

सारांश *

१. यहोवाची सेवा करणं जास्त अवघड कधी जाऊ शकतं?

तुम्हाला काय वाटतं, यहोवाची सेवा करणं जास्त अवघड कधी जाऊ शकतं? तुमच्या जीवनात अनेक समस्या असतात तेव्हा, की समस्या नसतात तेव्हा? सहसा जीवनात समस्या येतात तेव्हा आपण यहोवाच्या सेवेत होता होईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर विसंबून राहतो. पण सगळंकाही अगदी सुरळीत असतं, काही समस्या नसतात तेव्हा काय? तेव्हासुद्धा या गोष्टी करण्याचा तुम्ही तितकाच प्रयत्न करता का? त्यांना तितकंच महत्त्व देता का? वचन दिलेल्या देशात गेल्यानंतर इस्राएली लोकांचं यहोवाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता होती. आणि म्हणून यहोवाने त्यांना अशी ताकीद दिली, की त्यांनी त्याला विसरू नये.—अनु. ६:१०-१२.

आसा राजाने देशातून खोटी उपासना काढून टाकण्यासाठी ठोस पावलं उचलली (परिच्छेद २ पाहा) *

२. आसा राजाने कसं एक चांगलं उदाहरण मांडलं?

आसा राजाचं खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. कारण त्याने वेळेचा विचारपूर्वक उपयोग केला आणि तो पूर्णपणे यहोवावर विसंबून राहिला. त्याने फक्‍त कठीण काळातच नाही, तर शांतीच्या काळातही यहोवाची सेवा केली. लहानपणापासूनच “आसाचे मन . . . परमेश्‍वराकडे पूर्णपणे लागलेले होते.” (१ राजे १५:१४) यहूदातल्या खोट्या उपासनेला पूर्णपणे थांबवून त्याने दाखवून दिलं, की तो यहोवाची अगदी मनापासून सेवा करत आहे. त्याच्याबद्दल बायबल म्हणतं, की “त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ मोडले व अशेरा मूर्ती” नष्ट केल्या. (२ इति. १४:३, ५) तसंच, त्याने आपल्या आजीला, माका हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकलं. कारण, ती लोकांना एका विशिष्ट मूर्तीची उपासना करायचं प्रोत्साहन देत होती.—१ राजे १५:११-१३.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आसाने मूर्ती तर नष्ट केल्याच, पण त्यासोबतच त्याने यहूदाच्या लोकांना पुन्हा यहोवाची उपासना करायला मदत केली. म्हणून यहोवाने आसाला आणि यहूदाच्या लोकांना भरपूर आशीर्वाद दिले. बायबल म्हणतं, की आसा राज्य करत होता त्या वेळी दहा वर्षं “देशात स्वास्थ्य होते,” म्हणजे देशात शांतीचा काळ * होता. (२ इति. १४:१, ४, ६) आसाने या शांतीच्या काळाचा कसा उपयोग केला त्याची या लेखात आपण चर्चा करू. तसंच, आसासारखंच पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी शांतीच्या काळाचा कसा उपयोग केला त्याचीही आपण चर्चा करू. आणि शेवटी, आपण या प्रश्‍नाचं उत्तर पाहू, की तुम्ही राहत असलेल्या देशात जर सरकार तुम्हाला उपासना करायची मोकळीक देत असेल, तर तुम्ही त्या शांतीच्या काळाचा विचारपूर्वक उपयोग कसा करू शकता?

आसाने शांतीच्या काळाचा उपयोग कसा केला?

४. दुसरे इतिहास १४:२, ६, ७ या वचनांप्रमाणे आसाने शांतीच्या काळाचा कसा उपयोग केला?

दुसरे इतिहास १४:२, ६, ७ वाचा. आसा लोकांना म्हणाला, की यहोवाने “आपल्याला चोहोकडून स्वास्थ्य दिले आहे.” पण, शांतीचा हा काळ मौजमजा करण्याचा किंवा निवांत राहण्याचा काळ आहे असा त्याने विचार केला नाही. याउलट, त्याने देशात शहरं, शहराच्या भिंती, बुरूज आणि शहराचे दरवाजे बांधायला सुरुवात केली. तो यहूदाच्या लोकांना म्हणाला: “देश आपल्या हाती आहे.” आसाला काय म्हणायचं होतं? हेच, की देवाने दिलेल्या या देशात शत्रूंची भीती नसल्यामुळे त्यांना कुठेही येण्या-जाण्याची आणि बांधकाम करण्याची मोकळीक आहे. त्याने लोकांना या शांतीच्या काळाचा चांगला वापर करण्याचं प्रोत्साहन दिलं.

५. आसाने आपलं सैन्य मजबूत का केलं?

आसाने या शांतीच्या काळाचा उपयोग आपलं सैन्य मजबूत करण्यासाठीही केला. (२ इति. १४:८) याचा अर्थ असा होतो का, की त्याचा यहोवावर भरवसा नव्हता? नाही. भविष्यात शत्रूंचा हल्ला होऊ शकतो याची त्याला जाणीव होती. म्हणून राजा या नात्याने त्याने आपल्या राज्यातल्या लोकांना स्वतःचं संरक्षण करायचं प्रशिक्षण दिलं. तसंच, देशातला हा शांतीचा काळ कदाचित नेहमीच टिकून राहणार नाही, हेही त्याला माहीत होतं. आणि पुढे तसंच झालं.

पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी शांतीच्या काळाचा उपयोग कसा केला?

६. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी शांतीच्या काळाचा उपयोग कसा केला?

पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना अनेकदा छळाचा सामना करावा लागला. पण अधूनमधून त्यांनी शांतीचा काळही अनुभवला. त्या काळाचा ख्रिश्‍चनांनी कसा वापर केला? ते विश्‍वासू ख्रिस्ती आवेशाने आनंदाचा संदेश सांगत राहिले. प्रेषितांची कार्ये या पुस्तकात त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे, की “ते यहोवाचं भय मानून चालत होते.” म्हणजेच, ते प्रचाराचं काम करत राहिले आणि त्यामुळे “त्यांची संख्या वाढत गेली.” यावरून दिसून येतं, की शांतीच्या काळात त्यांनी जो आवेश दाखवला त्यासाठी यहोवाने त्यांना आशीर्वाद दिले.—प्रे. कार्ये ९:२६-३१.

७-८. प्रेषित पौलने आणि इतरांनी त्यांना मिळालेल्या संधीचा कसा वापर केला?

पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी आनंदाचा संदेश सांगण्यासाठी मिळेल त्या संधीचा वापर केला. उदाहरणार्थ, इफिसमध्ये असताना प्रेषित पौलला या गोष्टीची जाणीव झाली, की त्याच्यासाठी “संधीचे एक मोठे दार” उघडण्यात आले आहे. त्यामुळे इफिसमध्येच थांबून त्याने प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम केलं.—१ करिंथ. १६:८, ९.

इ.स. ४९ मध्येही पौलला आणि इतर ख्रिश्‍चनांना बऱ्‍याच लोकांना प्रचार करायची संधी मिळाली. त्या वर्षी सुंतेविषयीचा वाद मिटला, आणि त्या बाबतीत जो काही निर्णय घेतला गेला तो सगळ्या मंडळ्यांना कळवण्यात आला. (प्रे. कार्ये १५:२३-२९) त्यानंतर पौल आणि इतर ख्रिश्‍चनांनी “यहोवाच्या वचनाविषयीचा आनंदाचा संदेश घोषित” करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. (प्रे. कार्ये १५:३०-३५) याचा काय परिणाम झाला? बायबल म्हणतं, की “मंडळ्या विश्‍वासात मजबूत होत गेल्या आणि दिवसेंदिवस त्यांची संख्याही वाढू लागली.”—प्रे.कार्ये १६:४, ५.

आज आपण शांतीच्या काळाचा उपयोग कसा करू शकतो?

९. आज अनेक देशांत भाऊबहिणींजवळ कोणती संधी आहे, आणि आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारला पाहिजे?

आज अनेक देशांमध्ये आपल्या कामावर कोणतीही बंदी नाही. तुम्हीही अशाच एखाद्या देशात राहत आहात का? असाल, तर स्वतःला विचारा: ‘मला मिळालेल्या या संधीचा मी कसा वापर करत आहे?’ हे शेवटले दिवस यहोवाच्या लोकांसाठी खूप रोमांचक आहेत. कारण कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर ते संपूर्ण जगात प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करत आहेत. (मार्क १३:१०) आणि या कामात करण्यासारख्या बऱ्‍याच गोष्टी आहेत!

भाऊबहीण गरज असलेल्या देशात जाऊन सेवा करतात किंवा नवीन भाषा शिकून लोकांना प्रचार करतात, त्यामुळे ते खूप आनंदी असतात (परिच्छेद १०-१२ पाहा) *

१०. २ तीमथ्य ४:२ या वचनातून आपल्याला काय करायचं प्रोत्साहन मिळतं?

१० तुम्ही शांतीच्या काळाचा चांगला वापर कसा करू शकता? (२ तीमथ्य ४:२ वाचा.) आपल्या परिस्थितीचं परीक्षण करा. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातली एखादी व्यक्‍ती जास्त प्रचारकार्य करण्यासाठी किंवा पायनियरिंग करण्यासाठी काही फेरबदल करू शकते का? ही वेळ, भरपूर पैसा किंवा धनसंपत्ती मिळवायची नाही. कारण मोठ्या संकटाच्या वेळी या गोष्टींचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही.—नीति. ११:४; मत्त. ६:३१-३३; १ योहा. २:१५-१७.

११. जास्तीत जास्त लोकांना प्रचार करता यावं म्हणून बऱ्‍याच जणांनी काय केलं आहे?

११ लोकांना आनंदाचा संदेश सांगता यावा आणि यहोवाबद्दल शिकवता यावं म्हणून बऱ्‍याच प्रचारकांनी एक नवीन भाषा शिकून घेतली आहे. आणि त्यांना हे काम करता यावं म्हणून यहोवाच्या संघटनेने आज अनेक भाषांमध्ये प्रकाशनं पुरवली आहेत. उदाहरणार्थ, २०१० मध्ये जवळजवळ ५०० भाषांमध्ये आपली प्रकाशनं उपलब्ध होती. पण आज, ही प्रकाशनं १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत!

१२. लोकांना स्वतःच्या भाषेत यहोवाबद्दल शिकायला मिळतं तेव्हा त्यांना कसा फायदा होतो? एक अनुभव सांगा.

१२ लोकांना जेव्हा स्वतःच्या भाषेत यहोवाबद्दल शिकायला मिळतं तेव्हा त्यांना कसं वाटतं? एका बहिणीचा अनुभव विचारात घ्या. ती अमेरिकेच्या टेनिसी राज्यातल्या मेंफिस शहरात झालेल्या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित होती. ते अधिवेशन किन्यारवान्डा भाषेत होतं. ही भाषा रवान्डा, काँगो (किन्शासा) आणि युगान्डा या देशांमध्ये बोलली जाते. अधिवेशन झाल्यानंतर किन्यारवान्डा भाषा बोलणारी ती बहीण म्हणाली: “मी १७ वर्षांपासून अमेरिकत राहते. इथे आल्यानंतर, हे पहिलंच अधिवेशन आहे जे मला पूर्णपणे समजलंय.” यावरून हे स्पष्ट होतं, की बहिणीने तिच्या स्वतःच्या भाषेत अधिवेशन ऐकल्यामुळे ते तिच्या मनापर्यंत पोचलं होतं. तुमच्या क्षेत्रात दुसरी एखादी भाषा बोलली जाते का? असेल, तर ती भाषा बोलणाऱ्‍या लोकांना प्रचार करता यावा म्हणून तुम्ही ती भाषा शिकू शकता का? त्यांनी जर स्वतःच्या भाषेत संदेश ऐकला तर त्यांना आवडणार नाही का? म्हणून दुसरी भाषा शिकण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घ्याल ती कधीच व्यर्थ जाणार नाही, याची खातरी बाळगा.

१३. रशियातल्या आपल्या भाऊबहिणींनी शांतीच्या काळाचा कसा उपयोग केला?

१३ आपल्यापैकी सगळ्याच बांधवांना प्रचार करायची मोकळीक नाही. कारण काही देशांमध्ये सरकारने आपल्या प्रचाराच्या कामावर बंदी घातली आहे. उदाहरणार्थ, रशियातल्या आपल्या भाऊबहिणींचा विचार करा. त्यांना आपल्या विश्‍वासासाठी बरीच वर्षं छळाचा सामना करावा लागला. शेवटी, मार्च १९९१ मध्ये सरकारने त्यांना उपासना करायचं स्वातंत्र्य दिलं. त्या वेळी रशियामध्ये प्रचारकांची संख्य १६,००० होती. पण वीस वर्षांनंतर ही संख्या १,६०,००० पेक्षा जास्त झाली! यावरून हे स्पष्ट होतं, की आपल्या भाऊबहिणींनी प्रचार करण्याच्या स्वातंत्र्याचा विचारपूर्वक वापर केला. मात्र शांतीचा हा काळ तसाच राहिला नाही. आज जरी रशियातली परिस्थिती बदलली असली, तरी तिथल्या भाऊबहिणींचा यहोवाच्या सेवेतला आवेश कमी झालेला नाही. यहोवाची सेवा करण्यासाठी ते मिळेल त्या संधीचा फायदा घेत आहेत.

सध्याचा शांतीचा काळ कायम राहणार नाही

आसा राजाने यहोवाला कळकळून प्रार्थना केली तेव्हा यहोवाने त्याला शत्रूच्या एका भल्या मोठ्या सैन्यावर विजय मिळवून दिला (परिच्छेद १४-१५ पाहा)

१४-१५. यहोवाने आसा राजाला कशी मदत केली?

१४ आसा राजाच्या दिवसांत जो शांतीचा काळ होता तो शेवटी संपला. कारण कूशमधून, म्हणजे इथियोपिया इथून जेरह नावाचा एक अधिकारी दहा लाख सैनिकांचं भलं मोठं सैन्य घेऊन यहूदावर हल्ला करायला आला. त्याला आणि त्याच्या सैन्याला असं वाटत होतं, की ते यहूदाला सहज हरवून टाकतील. हे खरं आहे, की आसा राजानेसुद्धा आपलं सैन्य मजबूत केलं होतं. पण त्याचा भरवसा आपल्या सैन्यावर नाही, तर यहोवावर होता. त्याने देवाला अशी प्रार्थना केली: “हे आमच्या देवा, परमेश्‍वरा, आमचं साहाय्य कर; आमची भिस्त तुझ्यावर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत.”—२ इति. १४:११.

१५ आसाच्या सैन्याच्या तुलनेत इथियोपियाचं सैन्य दुप्पट होतं. पण आसाला पूर्ण भरवसा होता, की यहोवा शक्‍तिशाली आहे आणि तो आपल्या लोकांचा बचाव करेल. आणि तसंच झालं. यहोवाच्या मदतीमुळे इथियोपियाचं सैन्य हरलं.—२ इति. १४:८-१३.

१६. शांतीचा काळ कायम राहणार नाही असं आपण का म्हणू शकतो?

१६ भविष्यात आपल्या प्रत्येकासोबत नेमकं काय होईल हे आपल्याला माहीत नाही; पण यहोवाचे लोक जो शांतीचा काळ अनुभवत आहेत तो कायम राहणार नाही हे मात्र आपल्याला नक्की माहीत आहे. कारण येशूने आधीच सांगितलं होतं, की शेवटल्या दिवसांत सर्व राष्ट्रं त्याच्या शिष्यांचा “द्वेष करतील.” (मत्त. २४:९) तसंच, प्रेषित पौलनेसुद्धा म्हटलं होतं, की “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सर्वांचा छळ केला जाईल.” (२ तीम. ३:१२) शिवाय, सैतान आज “अतिशय क्रोधित” झाला आहे. त्यामुळे आपण जर असा विचार केला, की ‘सैतानाच्या या क्रोधाचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही,’ तर आपण स्वतःचीच फसवणूक करत असू.—प्रकटी. १२:१२.

१७. आपल्या विश्‍वासाची परीक्षा कशी होऊ शकते?

१७ लवकरच, आपल्या सगळ्यांच्या विश्‍वासाची परीक्षा होणार आहे. कारण, “जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही आणि पुन्हा कधीही येणार नाही असं मोठं संकट” येणार आहे. (मत्त. २४:२१) त्या वेळी कदाचित आपल्या घरचेच लोक आपला विरोध करतील. तसंच, आपल्या प्रचाराच्या कामावर बंदीही येऊ शकते. (मत्त. १०:३५, ३६) अशा वेळी तुम्ही काय कराल? आसासारखंच तुम्हीसुद्धा मदतीसाठी आणि संरक्षणासाठी यहोवावर भरवसा ठेवाल का?

१८. इब्री लोकांना १०:३८, ३९ या वचनांनुसार पुढे येणाऱ्‍या परीक्षांचा सामना करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१८ पुढे येणाऱ्‍या परीक्षांचा सामना करण्यासाठी यहोवा आज आपल्याला तयार करत आहे. तो आपला विश्‍वास मजबूत करत आहे. त्यासाठी तो विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाचा उपयोग करून आपल्याला “योग्य वेळी” आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे. (मत्त. २४:४५) पण यहोवावरचा आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतः मेहनत घेतली पाहिजे.—इब्री लोकांना १०:३८, ३९ वाचा.

१९-२०. पहिले इतिहास २८:९ हे वचन लक्षात घेऊन आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत, आणि का?

१९ आसा राजाप्रमाणेच आपणसुद्धा यहोवाच्या “चरणी” लागलं पाहिजे, म्हणजेच यहोवाचा शोध घेतला पाहिजे. (२ इति. १४:४; १५:१, २) आपल्याला हे कसं करता येईल? यहोवाबद्दल शिकून आणि बाप्तिस्मा घेऊन. यहोवावरचं आपलं प्रेम वाढवण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. आपण हे करत आहोत की नाही, याचं परीक्षण करण्यासाठी स्वतःला विचारा: ‘मी सभांना नियमित उपस्थित राहतो का?’ आपण सभांना जातो तेव्हा आपल्याला यहोवाची सेवा करत राहण्याचं प्रोत्साहन मिळतं आणि भाऊबहिणींकडून उत्तेजन मिळतं. (मत्त. ११:२८) तसंच, आपण स्वतःला असंही विचारू शकतो: ‘मी प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात पुरेपूर भाग घेण्याचा प्रयत्न करतो का? मी नियमितपणे बायबलचा अभ्यास करतो का? मी दर आठवडी माझ्या कुटुंबासोबत न चुकता कौटुंबिक उपासना करतो का?’ तुम्ही जर एकटे राहत असाल, तर स्वतःला विचारा: ‘कुटुंबासोबत मिळून उपासना करण्यासाठी जशी विशिष्ट वेळ ठरवली जाते, तशी मीसुद्धा उपासना करण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवली आहे का?’

२० आपण स्वतःला हे प्रश्‍न का विचारले पाहिजेत? कारण बायबल म्हणतं, की माणूस कसा विचार करतो आणि त्याच्या मनात काय चाललं आहे याचं यहोवा परीक्षण करतो. आणि तेच आपण स्वतःही केलं पाहिजे. (१ इतिहास २८:९ वाचा.) आपल्याला जर असं जाणवलं, की आपली ध्येयं, मनोवृत्ती किंवा विचारसरणी यांत काही बदल करण्याची गरज आहे, तर ते बदल करण्यासाठी आपण यहोवाकडे मदत मागितली पाहिजे. पुढे येणाऱ्‍या परीक्षांसाठी स्वतःला तयार करण्याची हीच वेळ आहे. म्हणून शांतीच्या या काळाचा विचारपूर्वक वापर करण्यापासून कोणत्याही गोष्टीला आड येऊ देऊ नका!

गीत २८ नवे गीत

^ परि. 5 तुम्ही अशा देशात राहत आहात का, जिथे यहोवाची उपासना करण्यावर कोणतीही बंदी नाही? असाल, तर तुम्ही शांतीच्या या काळाचा कसा उपयोग करत आहात? यहूदाचा राजा आसा आणि पहिल्या शतकातले ख्रिस्ती यांनी शांतीच्या काळाचा, म्हणजे उपासना करायची मोकळीक होती त्या काळाचा विचारपूर्वक उपयोग केला. त्यांच्या या उदाहरणाचं आपण अनुकरण कसं करू शकतो ते या लेखात आपण पाहणार आहोत.

^ परि. 3 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: ‘शांतीचा काळ’ यासाठी असलेला हिब्रू शब्द फक्‍त अशा काळाला सूचित करत नाही जेव्हा युद्ध नसतात; तर, एका व्यक्‍तीच्या चांगल्या आरोग्याला, सुरक्षिततेला आणि जीवनातल्या इतर चांगल्या गोष्टींनाही तो सूचित करतो.

^ परि. 57 चित्रांचं वर्णन पृष्ठ: आसा राजाने आपल्या आजीला राजमातेच्या पदावरून काढून टाकलं. कारण ती लोकांना खोटी उपासना करायचं प्रोत्साहन देत होती. आसाला पाठींबा देणाऱ्‍या एकनिष्ठ लोकांनी त्याचं अनुकरण करून देशातल्या मूर्ती नष्ट केल्या.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन पृष्ठ: प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करता यावी म्हणून एक आवेशी जोडपं आपली जीवनशैली साधी करत आहे.