अभ्यास लेख ३५
आपले वयस्कर भाऊबहीण अनमोल रत्नांसारखे आहेत!
“पिकलेले केस मानाच्या मुकुटासारखे असतात.”—नीति. १६:३१.
गीत ४ देवाच्या लेखी चांगले नाव मिळवणे
सारांश *
१-२. (क) नीतिवचनं १६:३१ या वचनात सांगितल्याप्रमाणे आपल्या वयस्कर भाऊबहिणींबद्दल आपण कसा विचार केला पाहिजे? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत?
अमेरिकेत असं एक पार्क आहे जिथे पर्यटकांना सहज हिरे सापडू शकतात. पण जमिनीवर पडलेल्या त्या हिऱ्यांना पैलू पाडलेले नसतात आणि ते पॉलिश केलेले नसतात. त्यामुळे ते इतर दगडांसारखेच वाटतात. आणि म्हणून पर्यटकांचं सहज त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन जातं.
२ आपले वयस्कर भाऊबहिणसुद्धा या हिऱ्यांसारखेच आहेत. बायबल म्हणतं, की त्यांचे “पिकलेले केस मानाच्या मुकुटासारखे असतात.” (नीतिवचनं. १६:३१ वाचा; २०:२९) मात्र पार्कमधल्या त्या हिऱ्यांसारखंच आपल्या आजूबाजूला असलेल्या या मौल्यवान हिऱ्यांकडे आपलं सहज दुर्लक्ष होऊ शकतं. पण वयस्कर भाऊबहीण किती मौल्यवान आहेत हे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांनी जर ओळखलं, तर त्यांना खरंच खूप फायदा होईल. म्हणूनच या लेखात आपण तीन प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत: (१) यहोवा आपल्या वयस्कर सेवकांना मौल्यवान का समजतो? (२) ते यहोवाच्या संघटनेचा महत्त्वाचा भाग का आहेत? आणि (३) त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकता यावं म्हणून आपण काय करू शकतो?
यहोवा वयस्कर सेवकांना मौल्यवान का समजतो?
३. यहोवा आपल्या वयस्कर सेवकांना मौल्यवान का समजतो? (स्तोत्र ९२:१२-१५)
३ वयस्कर सेवक यहोवासाठी खूप मौल्यवान आहेत. कारण एक व्यक्ती म्हणून ते कसे आहेत आणि त्यांच्यात किती चांगले गुण आहेत हे त्याला माहीत आहे. आयुष्यभर विश्वासूपणे सेवा केल्यामुळे त्यांना खूप काही शिकायला मिळालं. आणि या गोष्टी जेव्हा ते इतरांना, म्हणजे आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांना सांगण्याचा ते प्रयत्न करतात तेव्हा यहोवाला त्यांचा खूप अभिमान वाटतो. (ईयो. १२:१२; नीति. १:१-४) तसंच, आतापर्यंत ते जो धीर दाखवत आले आहेत त्याचीही यहोवा खूप कदर करतो. (मला. ३:१६) आयुष्यात त्यांनी बरेच चढउतार पाहिले, पण विश्वासात ते कधीच डगमगले नाहीत. उलट, भविष्याबद्दल असलेली त्यांची आशा आणखी पक्की होत गेली. आणि या वयातसुद्धा यहोवाच्या सेवेतला त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. म्हणून यहोवाचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे.—स्तोत्र ९२:१२-१५ वाचा.
४. वयस्कर भाऊबहिणींना कोणत्या गोष्टींमुळे दिलासा मिळू शकतो?
४ अशा विश्वासू सेवकांपैकी तुम्ही असाल, तर तुम्ही आयुष्यभर केलेली सेवा यहोवा कधीच विसरणार नाही याची खातरी तुम्ही बाळगू शकता. (इब्री ६:१०) तुम्ही आतापर्यंत आवेशाने प्रचाराचं काम करत राहिलात, आणि हे पाहून यहोवाला खूप आनंद होतो. तुमच्यावर अनेक सकंटं आली, दुःखद प्रसंगही आले; पण हे सगळं तुम्ही धीराने सहन केलं. तुम्ही बायबलच्या स्तरांनुसार वागलात, जबाबदाऱ्यांचं ओझं वाहिलं आणि इतरांना प्रशिक्षण दिलं. इतकंच नाही, तर वेगाने पुढे जाणाऱ्या यहोवाच्या संघटनेसोबत चालत राहण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न केला. शिवाय, पूर्ण-वेळची सेवा करणाऱ्यांना तुम्ही प्रोत्साहनही दिलं. या सगळ्या गोष्टींतून तुम्ही यहोवाला विश्वासू असल्याचं दाखवलं आणि म्हणून तो तुमच्यावर जिवापाड प्रेम करतो. यहोवा वचन देतो, की “तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना सोडून देणार नाही.” (स्तो. ३७:२८) आणि “तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हाला सांभाळून नेईन,” असं तो म्हणतो. (यश. ४६:४) म्हणून असा कधीच विचार करू नका, की ‘आपलं वय झालंय, त्यामुळे आता संघटनेत आपलं काहीच महत्त्व नाही.’ उलट, यहोवासाठी तुम्ही अजूनही खूप मौल्यवान आहात.
यहोवाच्या संघटनेत वयस्कर भाऊबहिणींना इतकं महत्त्व का आहे?
५. वयस्कर भाऊबहीण कोणती गोष्ट लक्षात ठेवू शकतात?
५ वयस्कर भाऊबहिणींकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. वयामुळे म्हणावी तितकी ताकद जरी त्यांच्यामध्ये नसली, तरी त्यांच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. आणि त्यांच्या या अनुभवाचा यहोवा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून घेतो. तो हे कसं करतो हे आपण प्राचीन काळातल्या आणि अलीकडच्या काही उदाहरणांतून पाहू या.
६-७. उतारवयातही यहोवाची विश्वासूपणे सेवा केलेल्या लोकांची उदाहरणं द्या, आणि यहोवाने त्यांना कसा आशीर्वाद दिला ते सांगा.
६ बायबलमध्ये अशा कितीतरी सेवकांची उदाहरणं दिली आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत यहोवाची विश्वासूपणे सेवा केली. मोशेचंच उदाहरण घ्या. यहोवाचा संदेष्टा म्हणून सेवा करण्यासाठी आणि इस्राएल राष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी यहोवाने त्याला निवडलं तेव्हा
तो जवळजवळ ८० वर्षांचा होता. तसंच, दानिएलने आयुष्याची ९० पेक्षा जास्त वर्षं पार केल्यानंतर यहोवाने त्याला आपल्या वतीने बोलण्यासाठी निवडलं. आणि प्रेषित योहानलासुद्धा वयाची ९० वर्षं पार केल्यानंतर प्रकटीकरणाचं पुस्तक लिहायची प्रेरणा मिळाली.७ यहोवाचे असेही अनेक विश्वासू सेवक होते, ज्यांच्याबद्दल बायबलमध्ये फारसं काही सांगितलेलं नाही. पण यहोवाने त्यांचा विश्वासूपणा पाहिला आणि त्याचं प्रतिफळ त्यांना दिलं. उदाहरणार्थ, बायबलमध्ये ‘शिमोन नावाच्या एका नीतिमान आणि देवाची भीती बाळगणाऱ्या माणसाचा’ खूप थोडक्यात उल्लेख केला आहे. पण यहोवाचं त्याच्याकडे लक्ष होतं. आणि ‘ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय’ तो मरणार नाही असं यहोवाने त्याला सांगितलं होतं. तसंच, येशूबद्दल आणि त्याच्या आईबद्दल भविष्यवाणी करण्याचा बहुमानही त्याला मिळाला होता. (लूक २:२२; २५-३५) हन्ना नावाच्या संदेष्टीचाही विचार करा. ती विधवा होती आणि ८४ वर्षांची असतानाही तिने मंदिरात जायचं सोडलं नव्हतं. असं म्हणा, ती जणू न चुकता सभेला उपस्थित राहायची. आणि त्यामुळे यहोवाने तिला खूप मोठा आशीर्वाद दिला. तिलासुद्धा बाळ येशूला पाहायचा बहुमान मिळाला. खरंच, शिमोन आणि हन्ना हे दोघंही यहोवाच्या नजरेत खूप मौल्यवान होते.—लूक २:३६-३८.
८-९. पती वारल्यानंतर लोईसने काय केलं?
८ वयस्कर भाऊबहिणींची चांगली उदाहरणं आजच्या काळातही पाहायला मिळतात. आणि त्यांच्यामुळे, वयाने लहान असलेल्यांना खूप प्रोत्साहन मिळतं. लोईस डिडर नावाच्या बहिणीचाच अनुभव घ्या. फक्त २१ वर्षांची असताना या बहिणीने कॅनडामध्ये खास पायनियर सेवा सुरू केली. त्यानंतर तिने आणि तिच्या पतीने, जॉनने अनेक वर्षं प्रवासी कार्य केलं. पुढे वीसएक वर्षं त्या दोघांनी कॅनडा बेथेलमध्ये सेवा केली. त्यानंतर त्यांना युक्रेनमध्ये सेवा करायला नेमण्यात आलं. त्या वेळी लोईस ५८ वर्षांच्या होत्या. मग त्या दोघांनी असा विचार केला का, की ‘एका परक्या देशात जाऊन सेवा करण्याचं आता आपलं वय राहिलं नाही’? नाही! त्यांनी मुळीच असा विचार केला नाही. ते युक्रेनला गेले आणि तिथे जॉनला शाखा समितीवर सेवा करायला नेमण्यात आलं. दुःखाची गोष्ट म्हणजे, सात वर्षांनंतर जॉन वारले. पण लोईसने तिथेच राहून सेवा करायचं ठरवलं. आज त्या ८१ वर्षांच्या आहेत. पण अजूनही त्या युक्रेन बेथेलमध्ये विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. त्यांच्या या चांगल्या उदाहरणामुळे बेथेल कुंटुबातले सगळेच लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात.
९ लोईससारख्या कितीतरी बहिणी आहेत ज्यांना लोक पूर्वी खूप ओळखायचे, कारण त्यांचे पती अनेक जबाबदाऱ्या सांभाळायचे. पण पती वारल्यानंतर मात्र कदाचित इतरांचं त्यांच्याकडे इतकं लक्ष जात नसेल. पण यहोवासाठी अशा बहिणी अजूनही तितक्याच मौल्यवान आहेत. वर्षांमागून वर्षं आपल्या पतीला साथ देणाऱ्या आणि अजूनही विश्वासूपणे सेवा करणाऱ्या या बहिणींची यहोवा मनापासून कदर करतो. (१ तीम. ५:३) शिवाय, या बहिणींमुळे तरुणांनासुद्धा खूप प्रोत्साहन मिळतं.
१०. टोनी नावाच्या भावाने कोणतं चांगलं उदाहरण मांडलं?
१० आज असे अनेक वयस्कर भाऊबहीण आहेत जे घराबाहेर जाऊ शकत नाहीत किंवा अशा ठिकाणी राहतात जिथे वृद्धांची काळजी घेतली जाते. असे सगळे भाऊबहीण यहोवासाठी खूप मौल्यवान आहेत. टोनी नावाच्या भावाचंच उदाहरण घ्या. तेसुद्धा अशा ठिकाणी राहतात जिथे वृद्धांची काळजी घेतली जाते. ऑगस्ट १९४२ साली अमेरिकेत त्यांचा बाप्तिस्मा झाला. त्या वेळी
ते २० वर्षांचे होते. बाप्तिस्मा झाल्याझाल्या त्यांना सैन्यात भरती व्हायला सांगण्यात आलं. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे अडीज वर्षं त्यांना तुरुंगात जावं लागलं. टोनी आणि त्यांची पत्नी हिल्डा यांनी आपल्या दोन मुलांना सत्यात वाढवलं. टोनी यांनी तीन मंडळ्यांमध्ये अध्यक्ष पर्यवेक्षक, म्हणजे वडील वर्गाचे संयोजक म्हणून सेवा केली. आणि एका विभागीय संमेलनाचे पर्यवेक्षक म्हणूनही सेवा केली. तसंच, ते नियमितपणे एका तुरुंगाला भेट द्यायचे आणि तिथे अनेकांसोबत बायबल अभ्यास करायचे आणि सभा चालवायचे. आज टोनी ९८ वर्षांचे आहेत. पण त्यांचा आवेश जराही कमी झालेला नाही. ते अजूनही मंडळीच्या भाऊबहिणींसोबत मिळून विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत.११. जे एकटे राहतात अशांबद्दल आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो?
११ जे वयस्कर भाऊबहीण एकटे किंवा अशा ठिकाणी राहतात जिथे वृद्धांची काळजी घेतली जाते, त्यांच्याबद्दल आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो? मंडळीतले वडील त्यांना सभांना यायला किंवा इंटरनेटद्वारे कनेक्ट व्हायला मदत करू शकतात. तसंच, प्रचारकार्यात सहभाग घेण्यासाठीही ते त्यांना मदत करू शकतात. खरंतर, अशा वयस्कर भाऊबहिणींना मदत करण्यासाठी आपण सगळेच बरंच काही करू शकतो. आपण त्यांना जाऊन भेटू शकतो किंवा त्यांना व्हिडिओ-कॉल करू शकतो. शिवाय, जे वयस्कर भाऊबहीण मंडळीपासून फार लांब राहतात त्यांच्याकडे आपण खास लक्ष दिलं पाहिजे. काही वयस्कर भाऊबहिणींचा स्वभाव असा असतो, की त्यांना स्वतःबद्दल जास्त बोलायला आवडत नाही. पण यहोवाच्या संघटनेत त्यांना कोणकोणते चांगले अनुभव आले त्यांबद्दल आपण त्यांना विचारलं आणि ते सांगत असताना शांतपणे त्यांचं ऐकलं, तर आपल्याला नक्कीच त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल.
१२. आपल्या मंडळीतल्या वयस्कर भाऊबहिणींकडून आपल्याला काय शिकायला मिळू शकतं?
१२ आपल्या मंडळीत वयस्कर भाऊबहिणींची किती चांगली उदाहरणं आहेत हे पाहून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. हॅरिएट नावाच्या बहिणीचाच विचार करा. तिने अनेक वर्षं अमेरिकेतल्या एका मंडळीत सेवा केली. नंतर ती आपल्या मुलीकडे राहायला गेली. तिथे ज्या नवीन मंडळीत ती जात होती तिथल्या भाऊबहिणींनी तिच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या लक्षात आलं, की तिच्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ काही आहे. १९२० च्या काळात ती सत्य शिकत होती तेव्हा प्रचारकार्यात तिला कोणकोणते अनुभव आले ते तिने त्यांना सांगितले. त्या काळात, प्रचाराला गेल्यावर आपण परत घरी येऊ की नाही याची शाश्वती नसायची. कारण प्रचार करताना कधीही अटक होण्याची शक्यता असायची. त्यामुळे प्रचाराला जाताना ही बहीण नेहमी आपला टूथब्रश सोबत ठेवायची. आणि खरंच, १९३३ मध्ये तिला दोन वेळा अटक झाली. दोन्ही वेळा तिला एकेक आठवडा जेलमध्ये राहावं लागलं. त्या वेळी सत्यात नसलेल्या तिच्या पतीने तिला खूप साथ दिली. ती जेलमध्ये असताना त्यांनी एकट्यांनी त्यांच्या तीन लहान मुलांची काळजी घेतली. आज हॅरिएटसारखेच विश्वासूपणे यहोवाची सेवा करणारे कितीतरी भाऊबहीण आपल्यामध्ये आहेत. आणि अशा भाऊबहिणींची आपण मनापासून कदर केली पाहिजे.
१३. यहोवाच्या संघटनेसाठी आपले वयस्कर भाऊबहीण महत्त्वाचे का आहेत?
१३ खरंच, यहोवासाठी आणि त्याच्या संघटनेसाठी आपले वयस्कर भाऊबहीण खूप महत्त्वाचे आहेत. यहोवाने त्यांना आणि त्याच्या संघटनेला वेगवेगळ्या मार्गांनी कशा प्रकारे आशीर्वादित केलं आहे हे त्यांनी स्वतः पाहिलं आहे. ते आपल्या चुकांमधून शिकत गेले. आपले हे वयस्कर भाऊबहीण जणू ‘बुद्धीचा झराच’ आहेत. म्हणून त्यांच्याकडून होता होईल तितकं शिका. (नीति. १८:४) त्यामुळे तुमचा विश्वास आणखी मजबूत होईल आणि तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल.
वयस्कर भाऊबहिणींकडून जास्तीत जास्त कसं शिकता येईल?
१४. अनुवाद ३२:७ या वचनात आपल्याला काय सल्ला दिला आहे?
१४ वयस्कर भाऊबहिणींकडून शिकण्यासाठी स्वतःहून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा. (अनुवाद ३२:७ वाचा) त्यांना नीटसं दिसत नसलं, ते जास्त चालू-फिरू शकत नसले किंवा फारसं बोलू शकत नसले, तरी मनाने ते अजूनही तरुण आहेत. आणि यहोवाच्या नजरेत त्यांनी एक “चांगलं नाव” कमावलं आहे. (उप. ७:१) यहोवासाठी ते किती महत्त्वाचे आहेत हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्यांचा आदर करा. बायबल काळातल्या अलीशासारखी मनोवृत्ती दाखवा. अगदी शेवटपर्यंत त्याला एलीयासोबत राहायचं होतं. तीन वेळा तो एलीयाला म्हणाला, “मी तुमची साथ सोडणार नाही.”—२ राजे २:२, ४, ६.
१५. वयस्कर भाऊबहिणींना जाणून घेण्यासाठी आपण त्यांना काय विचारू शकतो?
१५ वयस्कर भाऊबहिणींशी ओळख वाढवण्यासाठी त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांना प्रश्न विचारा. (नीति. १:५; २०:५; १ तीम. ५:१, २) तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारू शकता: “तरुण असताना तुम्हाला कशी खातरी पटली, की हेच सत्य आहे?” “तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी घडल्या ज्यांमुळे तुम्ही यहोवाच्या आणखी जवळ आलात?” “आनंदाने यहोवाची सेवा करत राहायला कोणती गोष्ट तुम्हाला मदत करते?” (१ तीम. ६:६-८) आणि मग, ते सांगत असताना त्यांचं लक्ष देऊन ऐका.
१६. वयस्कर भाऊबहिणींशी बोलल्यामुळे आपल्याला आणि त्यांनाही कसा फायदा होऊ शकतो?
१६ आपण वयस्कर भाऊबहिणींशी बोलतो तेव्हा आपल्यालाही फायदा होतो आणि त्यांनाही फायदा होतो. (रोम. १:१२) वयस्कर भाऊबहिणींचे अनुभव ऐकल्यावर यहोवा आपल्या विश्वासू सेवकांची किती काळजी घेतो हे आपल्याला जाणवेल. शिवाय, वयस्कर भाऊबहिणींशी बोलण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा त्यांनाही खूप प्रेम आणि आपलेपणा जाणवतो. मग, यहोवाने त्यांना किती आशीर्वाद दिले याबद्दल ते आनंदाने तुम्हाला सांगतील.
१७. यहोवाच्या नजरेत वयस्कर भाऊबहिणींचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढत जातं असं का म्हणता येईल?
१७ माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याचं सौंदर्य कमी होत जातं. पण जे विश्वासूपणे सेवा करत राहतात, त्यांचं सौंदर्य यहोवाच्या नजरेत दिवसेंदिवस वाढत जातं. (१ थेस्सलनी. १:२, ३) असं आपण का म्हणू शकतो? कारण पवित्र शक्तीच्या मदतीने त्यांनी स्वतःमध्ये अनेक सुंदर गुण वाढवलेले असतात. त्यामुळे या भाऊबहिणींना आपण जितकं जास्त जाणून घेऊ, त्यांचा आदर करू आणि त्यांच्याकडून शिकून घेऊ तितकेच जास्त ते आपल्यासाठी मौल्यवान ठरतील.
१८. पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
१८ मंडळीला मजबूत बनवायचं असेल, तर वयाने जे लहान आहेत त्यांनीच वयस्कर भाऊबहिणींची कदर केली पाहिजे, त्यांना मौल्यवान समजलं पाहिजे असं नाही. तर वयस्कर भाऊबहिणींनीसुद्धा त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांची कदर केली पाहिजे. हे ते कसं करू शकतात ते आपण पुढच्या लेखात पाहू या.
गीत २४ ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!
^ परि. 5 आपले वयस्कर भाऊबहीण मौल्यवान खजिन्यासारखे आहेत. मग अशा भाऊबहिणींबद्दल आपली कदर आपण आणखी कशी वाढवू शकतो? तसंच, त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं या लेखात आपण पाहणार आहोत. याशिवाय, या लेखातून वयस्कर भाऊबहिणींना याची खातरी मिळेल, की ते यहोवाच्या संघटनेचा खूप महत्त्वपूर्ण भाग आहेत.