अभ्यास लेख ४०
‘अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर आणणं’
“जे अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर आणतात, ते सदासर्वकाळ ताऱ्यांसारखे चमकतील.”—दानी. १२:३.
गीत १२ सार्वकालिक जीवनाची प्रतिज्ञा
सारांश *
१. हजार वर्षांच्या राज्यात कोणत्या अद्भुत गोष्टी होतील?
ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यात पृथ्वीवर मेलेल्यांचं पुनरुत्थान व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो दिवस किती आनंदाचा आणि रोमांचक असेल! ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय ते त्यांना पुन्हा पाहण्यासाठी आतुर आहेत. आणि यहोवासुद्धा त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी आतुर आहे. (ईयो. १४:१५) सबंध पृथ्वीवर जेव्हा लोक त्यांच्या पुनरुत्थान केलेल्या प्रियजनांना भेटतील तेव्हा तो किती आनंदाचा काळ असेल याची कल्पना करा. याआधीच्या लेखात आपण पाहिलं की “नीतिमान” लोक, म्हणजे ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली असतील त्याचं पुनरुत्थान हे “जीवनाचं पुनरुत्थान” असेल. (प्रे. कार्यं २४:१५; योहा. ५:२९) हर्मगिदोनानंतर ज्यांचं लवकरच पुनरुत्थान होईल त्यांच्यामध्ये कदाचित आपले बरेच प्रियजन असतील. * यासोबतच “अनीतिमान” लोक ज्यांना त्यांच्या मृत्यूच्या आधी यहोवाला जाणून घेण्याची आणि त्याची विश्वासूपणे सेवा करायची संधी मिळाली नाही, त्यांनासुद्धा उठवलं जाईल. हे लोक ‘न्यायाच्या पुनरुत्थानासाठी’ उठतील.
२-३. (क) यशया ११:९, १० मध्ये सांगितल्याप्रमाणे मानवी इतिहासातला सगळ्यात मोठा शैक्षणिक कार्यक्रम कोणता असेल? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?
२ पृथ्वीवर पुनरुत्थान होणाऱ्या सगळ्यांनाच शिकवण्याची गरज असेल. (यश. २६:९; ६१:११) म्हणूनच संपूर्ण मानवी इतिहासातला सगळ्यात मोठा शैक्षणिक कार्यक्रम राबवण्याची तेव्हा गरज पडेल. (यशया ११:९, १० वाचा.) का बरं? कारण जे अनीतिमान लोक तेव्हा उठतील त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल, देवाच्या राज्याबद्दल, खंडणी बलिदानाबद्दल आणि यहोवाचं नाव आणि त्याच्या सर्वोच्च अधिकाराबद्दल जो वादविषय निर्माण झाला होता त्याबद्दल शिकून घेण्याची गरज असेल. यासोबतच जे नीतिमान लोक त्या वेळेस उठतील त्यांनासुद्धा यहोवाचा पृथ्वीबद्दल जो उद्देश होता, त्याबद्दल त्याने काळाच्या ओघात टप्प्या-टप्प्याने ज्या गोष्टी उघड केल्या त्याबद्दल त्यांना शिकून घ्यावं लागेल. या विश्वासू लोकांपैकी काही जणांचा मृत्यू बायबलचं लिखाण पूर्ण होण्याआधीच झाला होता. थोडक्यात, नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्यांनाच त्या वेळी बरंच काही शिकून घ्यावं लागेल.
३ या लेखात आपण पुढे दिलेल्या काही प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. हा मोठा शैक्षणिक कार्यक्रम कशा प्रकारे राबवला जाईल? या शैक्षणिक कार्यक्रमाला जे प्रतिसाद देतील त्यांचं काय होईल? आणि जे देणार नाहीत त्यांचं काय होईल? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं आज आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. दानीएल आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात पृथ्वीवर होणाऱ्या पुनरुत्थानाबद्दल काही लक्षवेधक भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. पुनरुत्थान झाल्यानंतर काय घडेल हे आणखी स्पष्टपणे समजून घ्यायला या भविष्यवाण्या आपल्याला कशी मदत करतात, ते आता आपण पाहू या. सर्वात आधी आपण दानीएल १२:१, २ मधल्या भविष्यवाणीत दिलेल्या काही रोमांचक घटनांबद्दल जाणून घेऊ या.
“पृथ्वीच्या मातीत झोपलेले . . . उठतील”
४-५. दानीएल १२:१ मध्ये शेवटच्या काळाबद्दल कोणती माहिती सांगण्यात आली आहे?
४ दानीएल १२:१ वाचा. शेवटच्या काळात काही रोमांचक घटना कोणत्या क्रमाने घडतील याबद्दल दानीएलच्या पुस्तकात सांगण्यात आलंय. उदाहरणार्थ, दानीएल १२:१ मध्ये असं सांगण्यात आलंय, की मीखाएल म्हणजेच येशू ख्रिस्त “[देवाच्या] लोकांच्या वतीने उभा” राहतो. भविष्यवाणीतले हे शब्द १९१४ मध्ये पूर्ण व्हायला सुरुवात झाली. त्या वर्षी येशूला देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून नियुक्त करण्यात आलं.
५ दानीएलला असंही सांगण्यात आलं होतं की, ‘राष्ट्र निर्माण झालं तेव्हापासून कधीही आला नाही असा संकटाचा काळ येईल तेव्हा येशू उभा राहील.’ हा “संकटाचा काळ” मत्तय २४:२१ मध्ये सांगितलेलं “मोठं संकट” आहे. मोठ्या संकटाच्या शेवटी म्हणजे हर्मगिदोनमध्ये येशू उभा राहतो, म्हणजे देवाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी कार्य करतो. देवाच्या या लोकांना प्रकटीकरणाच्या पुस्तकात, ‘मोठ्या संकटातून बाहेर येणारा मोठा लोकसमुदाय’ असं म्हटलंय.—प्रकटी. ७:९, १४.
६. मोठा लोकसमुदाय मोठ्या संकटातून बचावल्यानंतर काय होईल? स्पष्ट करा. (या अंकात, पृथ्वीवर होणाऱ्या पुनरुत्थानाबद्दल असणारा “वाचकांचे प्रश्न” हा लेखसुद्धा पाहा.)
६ दानीएल १२:२ वाचा. या संकटाच्या काळातून मोठा लोकसमुदाय वाचल्यानंतर काय होईल? पूर्वी आपण असं मानायचो की दानीएल १२:२ मधले शब्द स्वर्गीय पुनरुत्थानाला सूचित करत असावेत. किंवा १९१८ मध्ये विरोधकांनी आपलं प्रचाराचं काम जवळजवळ ठप्प पाडल्यानंतर ते पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलं, त्याला ते सूचित करत असावेत. * पण आता आपल्याला हे स्पष्ट झालंय, की येणाऱ्या नवीन जगात मेलेल्यांचं जे पुनरुत्थान होईल त्याला हे शब्द सूचित करतात. आपण असं का म्हणू शकतो? दानीएल १२:२ मध्ये ज्या मूळ भाषेतल्या शब्दाचं ‘माती’ असं भाषांतर करण्यात आलंय, त्याच शब्दासाठी ईयोब १७:१६ मध्ये ‘धूळ’ असा शब्द वापरण्यात आलाय. आणि ईयोब १७:१६ या वचनाचा संदर्भ लक्षात घेतला तर आपल्याला कळतं, की हा शब्द ‘कबरेला’ सूचित करतो. यावरून आपण म्हणू शकतो की दानीएल १२:२ मध्ये खरोखरच्या पुनरुत्थानाबद्दल सांगण्यात आलंय. हे पुनरुत्थान शेवटचा काळ संपल्यानंतर आणि हर्मगिदोनच्या लढाईनंतर पृथ्वीवर होईल.
७. (क) काही जणांचं “सर्वकाळाच्या जीवनासाठी” पुनरुत्थान होईल याचा काय अर्थ होतो? (ख) हे “जास्त चांगलं पुनरुत्थान” का असेल?
७ दानीएल १२:२ मध्ये म्हटलंय की काही जण “सर्वकाळाच्या जीवनासाठी” उठतील. याचा काय अर्थ होतो? याचा असा अर्थ होतो की जे लोक १,००० वर्षांच्या काळादरम्यान अचूक ज्ञान घेत राहतील आणि यहोवाच्या आणि येशूच्या आज्ञांप्रमाणे वागत राहतील त्यांना शेवटी सर्वकाळाचं जीवन मिळेल. (योहा. १७:३) हे पुनरुत्थान पूर्वी ज्यांना पुन्हा जिवंत करण्यात आलं होतं त्यांच्यापेक्षा “जास्त चांगलं पुनरुत्थान” असेल. (इब्री ११:३५) असं का म्हणता येईल? कारण पुन्हा जिवंत झाल्यानंतर काही काळाने त्यांचा परत मृत्यू झाला होता.
८. काही जण “बदनामी आणि सर्वकाळाचा अपमान सहन करण्यासाठी उठतील” याचा काय अर्थ होतो?
८ पण पुनरुत्थान झालेले सर्व जण यहोवाकडून मिळालेलं शिक्षण स्वीकारतीलच असं नाही. दानीएलच्या भविष्यवाणीत सांगितलंय की काही जण “बदनामी आणि कायमचा अपमान सहन करण्यासाठी उठतील.” ते बंडखोर वृत्ती दाखवतील त्यामुळे त्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जाणार नाही आणि त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळणार नाही. उलट त्यांना “सर्वकाळाचा अपमान” सहन करावा लागेल म्हणजेच त्यांचा कायमचा नाश होईल. तर यावरून कळतं की दानीएल १२:२ हे वचन पुनरुत्थान झालेल्या सगळ्यांचं शेवटी काय होईल याबद्दल सांगतं. त्यांचं पुनरुत्थान झाल्यानंतर ते काय करतील याच्या आधारावर ते ठरवलं जाईल. * (प्रकटी. २०:१२) काहींना सर्वकाळाचं जीवन मिळेल तर काहींना मिळणार नाही.
‘अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर आणणं’
९-१०. मोठ्या संकटानंतर आणखी काय होईल आणि कोण “आकाशाच्या प्रकाशासारखे झळकतील?”
९ दानीएल १२:३ वाचा. लवकरच येणाऱ्या ‘संकटाच्या काळानंतर’ आणखी काय घडेल? दानीएल १२:२ प्रमाणेच तिसऱ्या वचनातही मोठ्या संकटाच्या नंतर काय होईल ते सांगण्यात आलंय.
१० जे “आकाशाच्या प्रकाशासारखे झळकतील” ते कोण आहेत बरं? मत्तय १३:४३ मध्ये येशूने जे म्हटलं त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत होते. येशूने म्हटलं: “त्या वेळी नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तेजस्वीपणे चमकतील.” येशूच्या या शब्दांचा संदर्भ लक्षात घेतला, तर आपल्याला कळतं की येशू इथे ‘राज्याच्या मुलांबद्दल’ बोलत होता. (मत्त. १३:३८) ही राज्याची मुलं त्याचे अभिषिक्त भाऊ आहेत जे त्याच्यासोबत स्वर्गात राज्य करतील. यावरून आपण म्हणू शकतो, की दानीएल १२:३ मधले शब्दसुद्धा अभिषिक्त जनांना आणि १,००० वर्षांच्या राज्यादरम्यान ते जे करतील, त्याला सूचित करत असावेत.
११-१२. १,००० वर्षांदरम्यान १,४४,००० अभिषिक्त जन कोणतं कार्य करतील?
११ अभिषिक्त जन “अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर” कसं आणतील? १,००० वर्षांदरम्यान अभिषिक्त जन येशूसोबत मिळून काम करतील आणि पृथ्वीवर राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक कार्याचं मार्गदर्शन करतील. १,४४,००० अभिषिक्त जन फक्त राजे म्हणूनच कार्य करणार नाहीत, तर याजक म्हणूनसुद्धा सेवा करतील. (प्रकटी. १:६; ५:१०; २०:६) याजक या नात्याने, ते “राष्ट्रांच्या आरोग्यासाठी” काम करतील आणि मानवजातीला हळूहळू परिपूर्ण व्हायला मदत करतील. (प्रकटी. २२:१, २; यहे. ४७:१२) अभिषिक्त जनांना हे काम करताना किती आनंद होईल!
१२ दानीएल १२:३ मध्ये आपण वाचलं की “अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर” आणलं जाईल. मग यांत कोणकोण असतील? यांत पुनरुत्थान झालेले, हर्मगिदोनमधून बचावलेले आणि नवीन जगात झालेली मुलंसुद्धा असतील. १,००० वर्षं संपेपर्यंत पृथ्वीवर असलेले सगळे जण परिपूर्ण झालेले असतील. तर मग त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात पेन्सिलने नाही, तर पेनाने म्हणजेच कायमसाठी कधी लिहिली जातील?
शेवटची परीक्षा
१३-१४. पृथ्वीवरच्या सगळ्या परिपूर्ण लोकांना सर्वकाळाचं जीवन मिळण्यासाठी कोणती गोष्ट दाखवून द्यावी लागेल?
१३ आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की एखादी व्यक्ती परिपूर्ण आहे म्हणून तिला आपोआपच सदासर्वकाळाचं जीवन मिळेल असं नाही. आदाम आणि हव्वा यांचा विचार करा. ते परिपूर्ण होते, पण त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या तरच त्यांना सदासर्वकाळाचं जीवन मिळणार होतं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, त्यांनी देवाची आज्ञा मोडली.—रोम. ५:१२.
१४ १,००० वर्षांच्या शेवटी पृथ्वीवरच्या लोकांची परिस्थिती कशी असेल? ते सर्व जण तोपर्यंत परिपूर्ण झालेले असतील. मग हे सगळे परिपूर्ण लोक यहोवाच्या राज्याला कायमसाठी आपला पूर्ण पाठिंबा देतील का? की त्यांच्यापैकी काही जण आदाम आणि हव्वाप्रमाणे परिपूर्ण असूनही यहोवाच्या विरोधात जातील? या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं असेल. पण ती कशी मिळतील?
१५-१६. (क) सगळ्या मानवांना आपण यहोवाला एकनिष्ठ आहोत, हे दाखवून द्यायची संधी केव्हा मिळेल? (ख) या परीक्षेच्या शेवटी काय होईल?
१५ १,००० वर्षांच्या काळादरम्यान सैतान कैदेत असेल. त्यादरम्यान तो कोणालाही बहकवू शकणार नाही. पण मग १,००० वर्षांच्या शेवटी सैतानाला कैदेतून सोडलं जाईल. आणि त्या वेळी तो परिपूर्ण मानवांना बहकवण्याचा प्रयत्न करेल. या परीक्षेच्या काळात पृथ्वीवर असलेल्या सगळ्या परिपूर्ण मानवांना ते कोणाच्या बाजूने आहेत, हे दाखवण्याची संधी मिळेल. म्हणजेच देवाच्या नावाचा आणि त्याच्या सर्वोच्च अधिकाराचा ते खरोखरच आदर करतात का, हे दाखवण्याची संधी त्यांना मिळेल. (प्रकटी. २०:७-१०) सैतान त्यांना बहकवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येक जण काय करेल यावर जीवनाच्या पुस्तकात त्यांची नावं कायमची लिहिली जातील की नाही हे ठरेल.
१६ त्यांच्यापैकी काही जण आदाम आणि हव्वाप्रमाणे यहोवाच्या अधिकाराला नाकारतील. त्यांची संख्या सांगितलेली नाही. पण मग त्यांच्यासोबत काय होईल? प्रकटीकरण २०:१५ मध्ये म्हटलंय: “ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आढळलं नाही, त्यालाही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलं.” याचा अर्थ या बंडखोर लोकांचा पूर्णपणे आणि कायमचा नाश केला जाईल. पण परिपूर्ण मानवांपैकी बहुतेक जण यशस्वीपणे या शेवटच्या परीक्षेला पार करतील. आणि त्या वेळी त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात कायमची लिहिली जातील.
‘अंताच्या समयादरम्यान’
१७. आपल्या काळात काय घडेल असं दानीएलला सांगण्यात आलं होतं? (दानीएल १२:४, ८-१०)
१७ भविष्यात होणाऱ्या या घटनांचा विचार करणं खरंच किती रोमांचक आहे! पण दानीएलला एका स्वर्गदूताने आपल्या काळाबद्दल, म्हणजे ‘अंताच्या समयाबद्दल’ काही महत्त्वाची माहिती सांगितली. (दानीएल १२:४, ८-१० वाचा; २ तीम. ३:१-५) स्वर्गदूताने दानीएलला सांगितलं: “खरं ज्ञान खूप वाढेल.” याचा अर्थ, या पुस्तकातल्या भविष्यवाण्यांचा अर्थ देवाच्या लोकांना आणखी स्पष्टपणे समजेल. स्वर्गदूताने पुढे सांगितलं, की “दुष्ट लोक दुष्टपणे वागत राहतील, आणि त्यांच्यापैकी एकालाही या गोष्टी समजणार नाहीत.”
१८. दुष्ट लोकांचं लवकरच काय होईल?
१८ आज दुष्ट लोक जास्तच दुष्टपणे वागत आहेत. आणि असं वाटतंय की त्यांना कोणतीच शिक्षा होत नाही. (मला. ३:१४, १५) पण लवकरच येशू या बकऱ्यांसारख्या लोकांना मेंढरांसारख्या लोकांपासून वेगळं करेल. (मत्त. २५:३१-३३) या दुष्ट लोकांचा मोठ्या संकटातून बचाव होणार नाही आणि नवीन जगात जगण्यासाठी त्यांचं पुनरुत्थानही होणार नाही. मलाखी ३:१६ मध्ये सांगितलेल्या ‘स्मरणाच्या पुस्तकात’ त्यांची नावं लिहिली जाणार नाहीत.
१९. आज काय करण्याची वेळ आहे आणि का? (मलाखी ३:१६-१८)
१९ आपण या दुष्ट लोकांपैकी नाही, हे दाखवून देण्याची आत्ताच वेळ आहे. (मलाखी ३:१६-१८ वाचा.) यहोवा त्याची “खास प्रजा” आणि मौल्यवान संपत्ती असणाऱ्या त्याच्या उपासकांना आज एकत्र करत आहे. आपणही या लोकांपैकी असावं असं आपल्याला वाटतं.
२०. दानीएलला शेवटी कोणतं वचन देण्यात आलं आणि तुम्ही हे शब्द पूर्ण व्हायची का वाट पाहत आहात?
२० खरंच, आज आपण एका रोमांचक काळात जगत आहोत. पण लवकरच यापेक्षाही अद्भुत घटना घडणार आहेत. थोड्याच काळात आपण सगळ्या दुष्ट लोकांचा नाश होताना पाहू. त्यानंतर यहोवाने दानीएलला दिलेलं हे वचनही पूर्ण होताना आपण पाहू: “तू तुझं प्रतिफळ मिळवण्यासाठी पुन्हा उठशील.” (दानी. १२:१३, तळटीप) जेव्हा दानीएल आणि त्याच्यासोबत आपले प्रियजन ‘पुन्हा उठतील,’ तो दिवस पाहण्यासाठी तुम्ही आतुर आहात का? तर मग आत्ताच यहोवाला विश्वासू राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव कायम राहील.
गीत १ यहोवाचे गुण
^ दानीएल १२:२, ३ मध्ये सांगितलेल्या मोठ्या शैक्षणिक कार्यक्रमाबद्दल आपल्या समजुतीत कोणता फेरबदल झालाय हे या लेखात आपण पाहणार आहोत. हा शैक्षणिक कार्यक्रम कधी राबवण्यात येईल आणि त्यामध्ये कोण सामील असतील याबद्दल आपण पाहू. तसंच, हा शैक्षणिक कार्यक्रम पृथ्वीवरच्या लोकांना येशूच्या हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी कशा प्रकारे तयार करेल, हेसुद्धा आपण या लेखात पाहणार आहोत.
^ शेवटच्या दिवसात ज्या विश्वासू लोकांचा मृत्यू झालाय त्यांचं कदाचित सर्वात आधी पुनरुत्थान होईल. आणि मग टप्प्या-टप्प्याने त्यांच्या आधीच्या पिढ्यांचं उलट्या क्रमाने पुनरुत्थान होत जाईल. अशा प्रकारे, यहोवाच्या स्मरणात असलेल्या सगळ्याचं पुनरुत्थान होईल. जर असं झालं तर प्रत्येक पिढीला ते ओळखत असलेल्या लोकांचं स्वागत करायची संधी मिळेल. काहीही असो, स्वर्गीय जीवनासाठी होणारं पुनरुत्थान “योग्य क्रमाप्रमाणे” होईल असं जर शास्त्रवचनांत लिहिलंय तर पृथ्वीवरच्या जीवनासाठी होणारं पुनरुत्थानसुद्धा व्यवस्थित रीतीने होईल असं आपण म्हणू शकतो.—१ करिंथ. १४:३३; १५:२३.
^ ही माहिती आधीच्या समजुतीत झालेला फेरबदल आहे. आपली आधीची समजूत काय होती याबद्दल दानिय्येल की भविष्यवाणी पर ध्यान दें! अध्याय १७ आणि १ जुलै १९८७ च्या टेहळणी बुरूज इंग्रजी अंकातल्या पान २१-२५ वर पाहा.
^ याउलट, प्रेषितांची कार्यं २४:१५ मध्ये “नीतिमान” आणि “अनीतिमान” असं जे म्हटलंय, तसंच योहान ५:२९ मध्ये ‘चांगली कामं करणारे’ आणि ‘वाईट कामं करणारे’ असं जे म्हटलंय ते पुनरुत्थान झालेल्या लोकांनी मृत्यूच्या आधी जे केलं त्याला सूचित करतं.