व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३७

आपल्या भाऊबहिणींवर भरवसा ठेवा!

आपल्या भाऊबहिणींवर भरवसा ठेवा!

“प्रेम . . . सगळ्या गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असतं, सगळ्या गोष्टींची आशा धरतं.”​—१ करिंथ. १३:७.

गीत १८ देवाचे खरे प्रेम

सारांश *

१. आज लोकांना भरवसा ठेवायला कठीण जातं याचं आपल्याला नवल का वाटत नाही?

 आज सैतानाच्या या जगात लोकांना कोणावर भरवसा ठेवावा हे कळत नाही. कारण व्यापारी, धर्मपुढारी आणि राजकीय नेते यांच्याकडून सतत त्यांची फसवणूक होत असते. आणि यामुळे लोकांना आपल्या मित्रांवर, शेजाऱ्‍यांवर इतकंच काय तर आपल्या घरच्या लोकांवरही भरवसा ठेवणं कठीण जातं. पण याचं आपल्याला काही नवल वाटत नाही. कारण बायबलमध्ये आधीच असं सांगितलं होतं, की ‘शेवटच्या दिवसात लोक बेइमान, इतरांची बदनामी करणारे आणि विश्‍वासघात करणारे असतील.’ आणि आज अगदी असंच घडत आहे. आज लोक या ‘जगाच्या देवासारखं’ म्हणजे सैतानासारखं वागतात आणि तो मुळीच भरवशालायक नाही.​—२ तीम. ३:१-४; २ करिंथ. ४:४.

२. (क) आपण कोणावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो? (ख) कदाचित काहींच्या मनात कोणती शंका येईल?

पण ख्रिस्ती या नात्याने आपण मात्र यहोवा देवावर पूर्ण भरवसा ठेवतो. (यिर्म. १७:७, ८) आपल्याला याची खातरी आहे की तो आपल्यावर प्रेम करतो आणि तो आपल्याला ‘कधीच त्यागणार नाही.’ (स्तो. ९:१०) आपला ख्रिस्त येशूवरसुद्धा पूर्ण भरवसा आहे कारण त्याने आपल्यासाठी त्याचं जीवन दिलं. (१ पेत्र ३:१८) शिवाय आपण स्वतःच्या अनुभवातून हे शिकलो आहोत, की बायबलमध्ये भरवशालायक मार्गदर्शन आहे. (२ तीम. ३:१६, १७) आपण यहोवा देवावर, येशूवर आणि बायबलवर नक्कीच भरवसा ठेवू शकतो. पण आपल्या मनात कदाचित अशी शंका येईल, की मंडळीतल्या आपल्या भाऊबहिणींवर आपल्याला नेहमीच भरवसा ठेवता येईल का? आपण त्यांच्यावर भरवसा का ठेवू शकतो याची काही कारणं आता आपण पाहू या.

आपल्याला आपल्या भाऊबहिणींची गरज आहे

जगभरात आपल्यासारखंच यहोवावर प्रेम करणारे भाऊबहीण आहेत आणि आपण त्यांच्यावर भरवसा ठेवू शकतो (परिच्छेद ३ पाहा)

३. आपल्याला कोणता खास बहुमान मिळालाय? (मार्क १०:२९, ३०)

यहोवाने आपल्याला जगभरातल्या त्याच्या उपासकांच्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग बनण्यासाठी निवडलंय. हा खरंच एक मोठा बहुमान आहे. आणि त्याच्या कुटुंबाचा भाग असल्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतात. (मार्क १०:२९, ३० वाचा.) जगभरातले आपले भाऊबहीण आपल्यासारखंच यहोवावर प्रेम करतात आणि त्याच्या स्तरांप्रमाणे जगायचा पूर्ण प्रयत्न करतात. आपली भाषा, संस्कृती आणि पेहराव वेगवेगळे आहेत. पण आपण आपल्या भाऊबहिणींना पहिल्यांदा जरी भेटलो तरी आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा वाटतो. शिवाय त्यांच्यासोबत मिळून आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याची स्तुती आणि उपासना करायलाही आपल्याला खूप आवडतं.​—स्तो. १३३:१.

४. आपल्याला आपल्या भाऊबहिणींची गरज का आहे?

आज आपल्या भाऊबहिणींसोबत ऐक्याने राहण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. कधीकधी आपण चिंतांच्या ओझ्याखाली दबून जातो तेव्हा ते आपल्याला मदत करतात. (रोम. १५:१; गलती. ६:२) तसंच यहोवाच्या सेवेत व्यस्त राहण्यासाठी आणि आध्यात्मिक रित्या मजबूत राहण्यासाठी ते आपल्याला नेहमी प्रोत्साहन देतात. (१ थेस्सलनी. ५:११; इब्री १०:२३-२५) विचार करा, आपल्या भाऊबहिणींची साथ नसती तर सैतानाविरुद्ध आणि या दुष्ट जगाविरुद्ध लढणं आपल्याला किती कठीण झालं असतं. लवकरच सैतान आणि त्याला साथ देणारे लोक देवाच्या सेवकांवर हल्ला करतील. पण त्या वेळी आपले भाऊबहीण आपल्यासोबत असतील ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे!

५. आपल्या भाऊबहिणींवर विश्‍वास ठेवायला काही जणांना कठीण का जातं?

काही जणांना आपल्या भाऊबहिणींवर भरवसा ठेवणं कठीण जातं. कधीकधी आपल्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला विश्‍वासात घेऊन आपली एखादी खासगी गोष्ट सांगतो, पण ते ती गोष्ट दुसऱ्‍यांना सांगून टाकतात. किंवा ते दिलेला शब्द पाळत नाहीत. किंवा मग मंडळीतलं कोणीतरी आपल्याशी चुकीचं वागतं किंवा असं काहीतरी बोलून जातं ज्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटतं. अशा गोष्टींमुळे त्यांच्यावर भरवसा ठेवायला आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण तरीसुद्धा आपल्या भाऊबहिणींवर भरवसा ठेवायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

प्रेम आपल्याला भाऊबहिणींवर भरवसा ठेवायला मदत करतं

६. भाऊबहिणींवर भरवसा ठेवण्यासाठी प्रेम आपल्याला कशी मदत करू शकतं? (१ करिंथकर १३:४-८)

एखाद्यावर प्रेम असल्याशिवाय आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकत नाही. पहिले करिंथकर १३ व्या अध्यायात प्रेमाच्या बऱ्‍याच पैलूंबद्दल सांगितलंय. त्यात सांगितलेल्या गोष्टींमुळे आपल्याला इतरांवर भरवसा ठेवायला मदत होऊ शकते. आणि जर त्यांच्यावरचा भरवसा उडाला असेल तर तो पुन्हा मजबूत करायलाही मदत होऊ शकते. (१ करिंथकर १३:४-८ वाचा.) उदाहरणार्थ, चौथ्या वचनात म्हटलंय, की “प्रेम सहनशील आणि दयाळू असतं.” आपण यहोवाविरुद्ध पाप केलं तरी तो आपल्याशी सहनशीलतेने वागतो. म्हणून जेव्हा आपल्या भाऊबहिणींच्या वागण्यामुळे आपल्याला वाईट वाटतं किंवा राग येतो, तेव्हा आपणसुद्धा त्यांच्याशी सहनशीलतेने वागलं पाहिजे. पाचव्या वचनात म्हटलंय, “[प्रेम] लगेच चिडत नाही, आपल्याविरुद्ध केलेल्या चुकांचा हिशोब ठेवत नाही.” म्हणून आपणही आपल्या भाऊबहिणींच्या “चुकांचा हिशोब” ठेवू नये. म्हणजेच आपल्या भाऊबहिणींच्या चुका पुढे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण त्या आठवणीत ठेवू नयेत. उपदेशक ७:९ मध्ये म्हटलंय की आपण “लगेच रागावू” नये. खरंच, इफिसकर ४:२६ मध्ये दिलेला सल्ला पाळणं किती महत्त्वाचंय. तिथे म्हटलंय, “सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग राहू नये.”

७. मत्तय ७:१-५ यांत दिलेल्या तत्त्वांमुळे आपल्याला भरवसा वाढवायला कशी मदत होईल?

आपल्या भाऊबहिणींबद्दल यहोवासारखाच विचार केल्यामुळेसुद्धा आपल्याला त्यांच्यावरचा भरवसा वाढवायला मदत होऊ शकते. यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि तो त्यांच्या चुकांचा हिशोब ठेवत नाही. म्हणून आपणही तेच केलं पाहिजे. (स्तो. १३०:३) आपण त्यांच्या चुकांकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांचे चांगले गुण पाहिले पाहिजेत आणि ते कोणत्या चांगल्या गोष्टी करू शकतात याकडे लक्ष दिलं पाहिजे. (मत्तय ७:१-५ वाचा.) त्यांना नेहमी चांगलं करायची इच्छा आहे आणि ते कधीच मुद्दामहून आपल्याला दुखावणार नाहीत असा विश्‍वास आपण ठेवला पाहिजे, कारण “[प्रेम] सगळ्या गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असतं.” (१ करिंथ. १३:७) पण आपण डोळे झाकून कोणावरही विश्‍वास ठेवावा अशी यहोवा अपेक्षा करत नाही. उलट त्यांनी भरवशालायक असल्याचं दाखवून दिल्यामुळे आपण त्यांच्यावर भरवसा ठेवावा असं त्याला वाटतं. *

८. आपण आपल्या भाऊबहिणींवरचा भरवसा कसा वाढवू शकतो?

सहसा कोणावरही भरवसा ठेवायला वेळ लागतो. मग आपण आपल्या भाऊबहिणींवर आपला भरवसा कसा वाढवू शकतो? त्यांना चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही सभांना जाता तेव्हा त्यांच्याशी बोला. त्यांच्यासोबत प्रचार करा. त्यांच्यासोबत सहनशीलतेने वागा आणि ते भरवशालायक आहेत हे दाखवायची त्यांना संधी द्या. सुरवातीला कदाचित आपण त्यांना आपल्या वैयक्‍तिक गोष्टी सांगणार नाही. पण जसजशी त्यांच्यासोबतची आपली मैत्री वाढत जाते तसतसं आपण त्यांच्याशी आणखी मनमोकळेपणाने बोलू शकतो. (लूक १६:१०) पण एखाद्या भावाने किंवा बहिणीने तुमचा भरवसा तोडला तर काय? लगेच त्याच्यासोबत मैत्री तोडू नका तर त्याला वेळ द्या. आणि फक्‍त काही जणांच्या चुकांमुळे निराश होऊन सगळया भाऊबहिणींवर भरवसा ठेवायचं सोडू नका. याबाबतीत यहोवाच्या काही विश्‍वासू सेवकांनी खूप चांगलं उदाहरण मांडलं. काही जणांच्या वागण्यामुळे ते निराश झाले तरीसुद्धा त्यांनी इतरांवर भरवसा ठेवायचं सोडलं नाही. त्यांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो हे आता आपण पाहू या.

ज्यांनी इतरांवर भरवसा ठेवायचं सोडलं नाही त्यांच्याकडून शिका

एली हन्‍नाशी चुकीचं वागला तरी तिने यहोवाच्या व्यवस्थेवर असलेला आपला भरवसा टिकवून ठेवला (परिच्छेद ९ पाहा)

९. (क) एली आणि त्याची मुलं चुकीचं वागत होती तरीसुद्धा हन्‍नाने यहोवाच्या व्यवस्थेवर भरवसा असल्याचं कसं दाखवलं? (ख) यहोवाच्या व्यवस्थेवर भरवसा ठेवण्याच्या बाबतीत हन्‍नाच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? (चित्र पाहा.)

एखाद्या जबाबदार बांधवाच्या वागण्यामुळे तुम्हाला कधी वाईट वाटलं आहे का? जर असेल तर हन्‍नाच्या  उदाहरणावर विचार केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तिच्या काळात महायाजक एली इस्राएलमध्ये उपासनेच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होता. पण त्याच्या मुलांचं लोकांसमोर चांगलं उदाहरण नव्हतं. त्याची मुलं याजक होती आणि तरीसुद्धा ती घाणेरड्या आणि अनैतिक गोष्टी करायची. एलीने त्यांची चूक सुधारली नाही. तरीसुद्धा यहोवाने लगेच एलीला त्याच्या जबाबदारीवरून काढलं नाही. एली अजूनही महायाजक म्हणून उपासना मंडपात सेवा करत होता. असं असतानाही हन्‍नाने उपासना करण्यासाठी तिथे यायचं सोडलं नाही. हन्‍ना अगदी दुःखात असताना कळकळून प्रार्थना करत होती, तेव्हा एली तिच्यावर रागावला आणि ‘नशा उतरल्यावर ये,’ असं तिला म्हणाला. तिची परिस्थिती काय आहे हे त्याने आधी जाणून घ्यायला पाहिजे होतं. पण त्याने तसं केलं नाही. (१ शमु. १:१२-१६) एली तिच्याशी असं वागला तरीसुद्धा तिने यहोवाला वचन दिलं, की तिला मुलगा झाला तर ती त्याला उपासना मंडपात सेवा करायला घेऊन येईल. उपासना मंडपात आपल्या मुलाला एलीच्या हाताखालीच काम करावं लागेल हे माहीत असूनही हन्‍नाने असं वचन दिलं. (१ शमु. १:११) पण मग एलीच्या मुलांबद्दल काय? त्यांना शिक्षा देण्यात आली का? हो, यहोवाने त्यांना योग्य वेळी शिक्षा दिली. (१ शमु. ४:१७) पण तोपर्यंत हन्‍नाने यहोवावर भरवसा ठेवला आणि यहोवाच्या आशीर्वादाने तिला एक मुलगा झाला.​—१ शमु. १:१७-२०.

१०. दावीदसोबत विश्‍वासघात झाला तरी त्याने इतरांवर भरवसा ठेवायचं का सोडलं नाही?

१० तुमच्या जवळच्या मित्राने तुम्हाला धोका दिला असं कधी तुमच्यासोबत झालंय का? जर झालं असेल तर दावीद राजासोबत  काय घडलं याचा विचार करा. अहिथोफेल हा त्याच्या जवळच्या मित्रांपैकी एक होता. जेव्हा दावीदचा मुलगा अबशालोम त्याच्या वडिलांचं राजपद बळकावण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा दावीद राजाच्या विरुद्ध जाऊन अहिथोफेलने त्याची साथ दिली. एकाच वेळी आपल्या स्वतःच्या मुलाने आणि आपल्या जवळच्या मित्राने असं केल्यामुळे दावीद राजाला किती मोठा धक्का बसला असेल याचा विचार करा. पण दावीदसोबत असा विश्‍वासघात झाला तरीसुद्धा त्याने इतरांवर भरवसा ठेवायचं सोडलं नाही. जसं की, हूशय हा दावीदचा एक विश्‍वासू मित्र होता आणि त्याने अबशालोमला साथ दिली नाही. दावीदने त्याच्यावर भरवसा ठेवायचं सोडलं नाही आणि तोही दावीदला विश्‍वासू राहिला. दावीदला मदत करण्यासाठी त्याने त्याचा जीवसुद्धा धोक्यात घातला.​—२ शमु. १७:१-१६.

११. नाबालच्या सेवकांपैकी एकाने कसा भरवसा दाखवला?

११ नाबालच्या एका सेवकाचासुद्धा  विचार करा. दावीदने आणि त्याच्या माणसांनी नाबाल नावाच्या एका इस्राएली माणसाच्या सेवकांचं संरक्षण केलं होतं. काही काळानंतर दावीदने आपल्या माणसांना अन्‍नपाणी पुरवण्यासाठी नाबालकडे मदत मागितली. नाबाल खूप श्रीमंत होता तरीसुद्धा तो दावीदला मदत करायला तयार झाला नाही. या गोष्टीचा दावीदला इतका राग आला, की त्याने नाबालच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाला ठार मारायचा निश्‍चय केला. नाबालच्या सेवकांपैकी एकाने ही सर्व परिस्थिती नाबालची बायको अबीगईल हिला जाऊन सांगितली. त्या घराण्याचा एक सेवक असल्यामुळे त्याला माहीत होतं, की आता आपला जीव अबीगईलच्या हातात आहे. म्हणून पळून जाण्याऐवजी त्याने अबीगईलवर भरवसा ठेवला. त्याला माहीत होतं की या परिस्थितीतून ती नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. तो असा भरवसा का ठेवू शकला? कारण ती एक समंजस स्त्री आहे हे सगळ्यांना माहीत होतं. त्याने ठेवलेला भरवसा व्यर्थ ठरला नाही. कारण अबीगईलने धैर्याने काम केलं आणि दावीदला कत्तल करण्यापासून रोखलं. (१ शमु. २५:२-३५) दावीद योग्यच निर्णय घेईल असा भरवसा तिला होता.

१२. शिष्यांकडून चुका झाल्या तरीसुद्धा येशूने त्यांच्यावर भरवसा असल्याचं कसं दाखवलं?

१२ येशूच्या  शिष्यांकडून चुका झाल्या तरी त्याने त्यांच्यावर भरवसा ठेवला. (योहा. १५:१५, १६) एकदा याकोब आणि योहानने येशूला विनंती केली की त्याने त्याच्या राज्यात आपल्याला एक खास पद द्यावं. पण तेव्हा येशूने असा विचार केला नाही की ते चुकीच्या हेतूने यहोवाची सेवा करत आहेत किंवा आता ते प्रेषित राहायच्या योग्य नाहीत. (मार्क १०:३५-४०) पुढे येशूला अटक करण्यात आली त्या रात्री त्याचे सगळे शिष्य त्याला सोडून पळून गेले. (मत्त. २६:५६) पण तरी येशूने त्यांच्यावर भरवसा ठेवायचं सोडलं नाही. त्यांच्यामध्ये बऱ्‍याच कमतरता आहेत हे त्याला माहीत होतं. तरीसुद्धा “त्यांच्यावर त्याने शेवटपर्यंत प्रेम केलं.” (योहा. १३:१) पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने त्याच्या ११ विश्‍वासू प्रेषितांवर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या सोपवल्या. त्याने त्यांना शिष्य बनवण्याच्या कामात पुढाकार घ्यायची आणि आपल्या मेंढरांची काळजी घ्यायची जबाबदारी सोपवली. (मत्त. २८:१९, २०; योहा. २१:१५-१७) येशूने या अपरिपूर्ण शिष्यांवर जो भरवसा ठेवला तो योग्य होता. कारण त्यांनी शेवटपर्यंत विश्‍वासूपणे सेवा केली. खरंच हन्‍ना, दावीद, नाबालचा सेवक, अबीगईल आणि येशू यांनी इतरांवर भरवसा ठेवायच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं.

भाऊबहिणींवर पुन्हा भरवसा ठेवायला शिका

१३. इतरांवर भरवसा ठेवायला कधी कठीण जाऊ शकतं?

१३ तुम्ही एखाद्याला काहीतरी सांगता आणि तुमची इच्छा असते की त्याने ती गोष्ट इतरांना सांगू नये. पण नंतर जर तुम्हाला कळलं, की त्याने ती गोष्ट दुसऱ्‍यांना सांगितली आहे आणि तुमचा भरवसा तोडला आहे तर तुम्हाला किती वाईट वाटेल. एकदा एका बहिणीने तिच्या वैयक्‍तिक गोष्टीबद्दल वडिलांना सांगितलं. दुसऱ्‍या दिवशी जेव्हा त्या वडिलाच्या पत्नीने बहिणीची विचारपूस करण्यासाठी फोन केला तेव्हा त्या बहिणीला माहीत झालं की आपण सांगितलेली गोष्ट तिला कळली आहे. या गोष्टीमुळे त्या बहिणीला धक्का बसला आणि त्या वडिलांवरचा तिचा भरवसा उडाला. पण एक चांगली गोष्ट म्हणजे तिने दुसऱ्‍या एका वडिलाची मदत घेतली. आणि त्यांनी मंडळीतल्या वडिलांवरचा भरवसा पुन्हा वाढवायला तिला मदत केली.

१४. एका भावाला आपल्या बांधवांवर पुन्हा भरवसा ठेवायला कशी मदत झाली?

१४ एका भावाचे बऱ्‍याच वर्षांपासून दोन वडिलांसोबत काही मतभेद होते. आणि त्यामुळे त्याचा त्यांच्यावर भरवसा नव्हता. पण मग त्याला दुसऱ्‍या एका भावाने बोललेलं एक वाक्य आठवलं. त्या भावाबद्दल त्याच्या मनात खूप आदर होता. ते साधंच पण जबरदस्त वाक्य असं होतं: “आपला खरा शत्रू सैतान आहे, आपले भाऊ नाहीत.” या वाक्यावर त्याने खूप विचार केला, त्याबद्दल प्रार्थना केली आणि त्यामुळे त्याला त्या दोन वडिलांसोबत आपले मतभेद मिटवता आले.

१५. इतरांवर पुन्हा भरवसा ठेवायला वेळ का लागू शकतो? उदाहरण द्या.

१५ मंडळीत एखादी जबाबदारी कधी तुमच्याकडून काढून घेण्यात आली आहे का? अशा वेळी आपल्याला खूप वाईट वाटू शकतं. १९३० च्या दशकात नात्झी जर्मनीमध्ये आपल्या कामावर बंदी होती. त्या काळात ग्रेटा नावाची एक बहीण आणि तिची आई विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत होते. ग्रेटाला आपल्या भाऊबहिणींसाठी टेहळणी बुरूज मासिकाच्या प्रती टाईप करायची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण जेव्हा जबाबदार बांधवांना कळलं, की तिचे वडील सत्याचा विरोध करतात, तेव्हा त्यांना अशी भीती वाटली की ते मंडळीची माहिती विरोधकांना देतील. म्हणून त्यांनी ग्रेटाकडून ती जबाबदारी काढून घेतली. पण ग्रेटाला आणखीही बरंच काही सहन करावं लागलं. दुसरं महायुद्ध सुरू होतं त्या संपूर्ण काळात जबाबदार बांधवांनी ग्रेटाला आणि तिच्या आईला मासिकाच्या प्रती दिल्या नाहीत. इतकंच काय तर रस्त्यावरून जाताना भाऊबहीण त्यांना भेटले तरी ते त्यांच्याशी बोलायचेसुद्धा नाहीत. ग्रेटाला आणि तिच्या आईला किती वाईट वाटलं असेल याची कल्पना करा. या गोष्टीचा त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. ग्रेटा म्हणते, ‘त्या भावांना माफ करायला आणि त्यांच्यावर पुन्हा भरवसा ठेवायला मला खूप वेळ लागला.’ काही काळाने तिने ही गोष्ट ओळखली, की यहोवाने त्या बांधवांना नक्कीच क्षमा केली असेल आणि म्हणून तिनेही केली पाहिजे. *

“आपला खरा शत्रू सैतान आहे, आपले भाऊ नाहीत”

१६. आपण आपल्या भाऊबहिणींवर पुन्हा भरवसा ठेवायला मेहनत का घेतली पाहिजे?

१६ तुम्हालाही ग्रेटासारखा वाईट अनुभव आला असेल तर भाऊबहिणींवर पुन्हा भरवसा वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहा. त्यासाठी वेळ लागेल पण तसं केल्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, जर तुम्हाला फूड पॉयझनिंग (अन्‍नातून विषबाधा) झाली असेल, तर त्यापुढे तुम्ही खाण्यापिण्याच्या बाबतीत नक्कीच खूप काळजी घेऊ लागला असाल. पण एकदा फूड पॉयझनिंग झालं म्हणून आपण खायचं सोडत नाही. त्याच प्रकारे एकदा वाईट अनुभव आला म्हणून आपण आपल्या सगळ्या भाऊबहिणींवर भरवसा ठेवायचं सोडू नये. शेवटी आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत हे आपल्याला माहीत आहे. जेव्हा आपण इतरांवर भरवसा वाढवण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा मंडळीत सगळ्यांना एकमेकांवर भरवसा ठेवायला सोपं जातं आणि आपल्यालासुद्धा आनंद होतो.

१७. भाऊबहिणींवर भरवसा ठेवणं का महत्त्वाचं आहे आणि पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

१७ सैतानाच्या या जगात इतरांवर भरवसा ठेवणं खूप कठीण होतं चाललंय. पण जगभरातल्या आपल्या भाऊबहिणींवर आपण भरवसा ठेवतो. कारण आपलं एकमेकांवर प्रेम आहे. अशा प्रकारच्या भरवशामुळे आपल्यातलं प्रेम आणि एकता वाढेल. आणि पुढे येणाऱ्‍या कठीण काळात परीक्षांचा सामना करत असताना आपलं संरक्षण होईल. कोणीतरी आपला भरवसा तोडल्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटलं असेल. पण याकडे यहोवा जसं पाहतो तसं पाहण्याचा प्रयत्न करा. बायबलची तत्त्वं लागू करा. आपल्या भाऊबहिणींवरचं प्रेम वाढवा आणि बायबलमधल्या उदाहरणांतून शिका. आपलं मन दुखावलं असलं तरी आपण सावरू शकतो आणि भाऊबहिणींवरचा आपला भरवसा पुन्हा वाढवू शकतो. आपण जर असं केलं, तर ‘भावापेक्षा जास्त जीव लावणारे’ अनेक मित्र आपल्याला मिळतील. (नीति. १८:२४) आपण इतरांवर भरवसा तर ठेवला पाहिजे. पण इतरांनाही आपल्यावर भरवसा ठेवता आला पाहिजे. मग इतरांनी आपल्यावर भरवसा ठेवावा म्हणून आपण काय करू शकतो ते पुढच्या लेखात पाहू या.

गीत ३१ आम्ही यहोवाचे साक्षीदार!

^ आपण आपल्या भाऊबहिणींवर भरवसा ठेवणं खूप महत्त्वाचंय. पण बऱ्‍याचदा ते असं काहीतरी करतात ज्यामुळे त्यांच्यावरचा आपला भरवसा उडून जातो. पण बायबल तत्त्वांप्रमाणे वागल्यामुळे आणि बायबल काळातल्या उदाहरणांवर मनन केल्यामुळे आपल्या भाऊबहिणींवर असलेला आपला भरवसा वाढवायला आपल्याला कशी मदत होते याबद्दल आपण या लेखात पाहू या. आणि काही कारणांमुळे जर आपला भरवसा उडाला असेल तर आपण पुन्हा त्यांच्यावर भरवसा ठेवायला कसं शिकू शकतो हेसुद्धा आपल्याला या लेखातून शिकायला मिळेल.

^ बायबलमध्ये असा इशारा देण्यात आलाय की मंडळीतले काही जण भरवशालायक नसतील. (यहू. ४) क्वचित प्रसंगी असं होऊ शकतं, की मंडळीतले काही लोक इतरांना फसवण्यासाठी “चुकीच्या गोष्टी” बोलतील. (प्रे. कार्यं २०:३०) पण आपण अशा लोकांवर भरवसा ठेवत नाही आणि त्यांचं ऐकतसुद्धा नाही.

^ ग्रेटाच्या अनुभवाबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी १९७४ ईयरबूक ऑफ जेहोवाज विट्‌नेसेस, पान १२९-१३१ पाहा.