व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३९

तुमचं नाव “जीवनाच्या पुस्तकात” आहे का?

तुमचं नाव “जीवनाच्या पुस्तकात” आहे का?

“जे यहोवाची भीती बाळगतात . . . त्या सर्वांसाठी एक स्मरणाचं पुस्तक त्याच्यापुढे लिहिण्यात आलं.”​—मला. ३:१६.

गीत १७ साक्षीदारांनो, पुढे चला!

सारांश *

हजारो वर्षांपासून यहोवा “जीवनाच्या पुस्तकात” नावं लिहीत आलाय (परिच्छेद १-२ पाहा)

१. मलाखी ३:१६ प्रमाणे यहोवा कोणतं पुस्तक लिहीत आला आहे आणि त्यात काय आहे?

 हजारो वर्षांपासून यहोवा एक खास पुस्तक लिहीत आहे. या पुस्तकात यहोवाच्या विश्‍वासू सेवकांची नावं आहेत. यातलं पहिलं नाव हे पहिला विश्‍वासू साक्षीदार हाबेल याचं होतं. * (लूक ११:५०, ५१) तेव्हापासून आजपर्यंत कित्येक शतकांदरम्यान यहोवा या पुस्तकात बरीच नावं लिहीत आला आहे आणि आज या पुस्तकात लाखो नावं आहेत. बायबलमध्ये या पुस्तकाला “स्मरणाचं पुस्तक,” ‘जीवनाचं पुस्तक’ आणि ‘जीवनाची गुंडाळी’ असं म्हणण्यात आलंय. पण या लेखात आपण त्याला ‘जीवनाचं पुस्तक’ असं म्हणू या.​—मलाखी ३:१६ वाचा; प्रकटी. ३:५; १७:८ तळटीप.

२. जीवनाच्या पुस्तकात कोणाची नावं लिहिली जातात आणि आपलं नाव त्या पुस्तकात लिहिलं जावं म्हणून आपण काय करू शकतो?

या खास पुस्तकात अशा सगळ्या लोकांची नावं आहेत जे यहोवाची उपासना करतात, त्याची भीती बाळगतात आणि त्याच्या नावावर प्रेम करतात. या सगळ्या लोकांना सर्वकाळाचं जीवन मिळण्याची संधी आहे. आज आपण येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवासोबत एक जवळचं नातं जोडलं तर आपलं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जाईल. (योहा. ३:१६, ३६) आणि आपली सर्वांचीच इच्छा आहे, की आपलं नाव त्या पुस्तकात लिहिलं जावं; मग आपली आशा स्वर्गातल्या जीवनाची असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची.

३-४. (क) आपलं नाव जीवनाच्या पुस्तकात असेल तर आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळेलच असं म्हणता येईल का? स्पष्ट करा. (ख) या आणि पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

पण ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेलच असा याचा अर्थ होतो का? या प्रश्‍नाचं उत्तर आपल्याला निर्गम ३२:३३ इथे मिळतं. तिथे यहोवा मोशेला म्हणाला: “ज्याने माझ्याविरुद्ध पाप केलं असेल, त्याचं नाव मी माझ्या पुस्तकातून पुसून टाकीन.”  यावरून कळतं की आज जी नावं या पुस्तकात लिहिली आहेत ती पुसलीही जाऊ शकतात किंवा खोडलीही जाऊ शकतात. जणू यहोवाने ही नावं सुरुवातीला पेन्सिलने लिहिलेली आहेत. (प्रकटी. ३:५, तळटीप.) पण जर आपली नावं कायमची किंवा पेनाने लिहिली जावीत असं आपल्याला वाटत असेल, तर आपण त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.

आपल्या मनात साहजिकच काही प्रश्‍न येतील. उदाहरणार्थ, ज्यांची नावं या पुस्तकात लिहिली आहेत आणि ज्यांची नावं या पुस्तकात लिहिलेली नाहीत, त्यांच्याबद्दल बायबल काय सांगतं? ज्यांची नावं या पुस्तकात आहेत त्या लोकांना सर्वकाळाचं जीवन कधी मिळेल? आणि ज्या लोकांना त्यांच्या मृत्यूच्या आधी यहोवाबद्दल शिकून घ्यायची संधी मिळाली नाही त्यांच्याबद्दल काय? त्यांचीही नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली जाणं शक्य आहे का? या आणि पुढच्या लेखात आपल्याला या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील.

जीवनाच्या पुस्तकात कोणाची नावं आहेत?

५-६. (क) फिलिप्पैकर ४:३ या वचनाप्रमाणे कोणाची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत? (ख) त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात कायमची कधी लिहिली जातील?

या लाक्षणिक पुस्तकात कोणाची नावं लिहिलेली आहेत? या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण लोकांच्या पाच वेगवेगळ्या गटांबद्दल चर्चा करू या. या लोकांपैकी जीवनाच्या पुस्तकात काहींची नावं लिहिलेली आहेत तर काहींची नाहीत.

पहिला गट अशा लोकांचा आहे ज्यांना येशूसोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी निवडण्यात आलंय.  त्यांची नावं आज जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत का? हो. प्रेषित पौलने फिलिप्पैमधल्या त्याच्या ‘सहकाऱ्‍यांना’ म्हणजे इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना जे म्हटलं त्यावरून कळतं, की ज्यांना येशूसोबत राज्य करण्यासाठी निवडण्यात आलंय त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहे. (फिलिप्पैकर ४:३ वाचा.) पण त्यांची नावं पुढेही या पुस्तकात राहावीत म्हणून त्यांनी शेवटपर्यंत विश्‍वासू राहणं गरजेचंय. मग त्यांचा मृत्यू होण्याआधी किंवा मोठं संकट सुरू होण्याआधी जेव्हा त्यांच्यावर शेवटचा शिक्का मारला जाईल, तेव्हा त्यांचं नाव कायमसाठी जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जाईल.​—प्रकटी. ७:३.

७. हर्मगिदोनमधून वाचलेल्या लोकांची नावं जीवनाच्या पुस्तकात कायमची कधी लिहिली जातील हे आपल्याला प्रकटीकरण ७:१६, १७ मधून कसं कळतं?

दुसऱ्‍या गटात दुसऱ्‍या मेंढरांचा मोठा लोकसमुदाय  आहे. त्यांची नावं आज जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत का? हो. हर्मगिदोनमधून वाचल्यानंतरसुद्धा त्यांची नावं या जीवनाच्या पुस्तकात राहतील का? हो. (प्रकटी. ७:१४) येशूने म्हटलं होतं, की मेंढरांसारख्या असलेल्या या लोकांना “सर्वकाळाचं जीवन मिळेल.” (मत्त. २५:४६) पण हर्मगिदोन पार केल्यानंतर लगेचच त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळणार नाही. त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात जणू पेन्सिलनेच लिहिलेली असतील. हजार वर्षांदरम्यान येशू “त्यांना मेंढपाळाप्रमाणे जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांकडे घेऊन जाईल.” जे ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालतील, आणि जे शेवटच्या न्यायाच्या वेळी यहोवाला विश्‍वासू आहेत असं दिसून येईल, त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात कायमसाठी लिहिली जातील.​—प्रकटीकरण ७:१६, १७ वाचा.

८. जीवनाच्या पुस्तकात कोणाची नावं लिहिलेली नाहीत आणि त्यांच्यासोबत काय होईल?

तिसऱ्‍या गटात बकऱ्‍यांसारखे लोक असतील ज्यांचा हर्मगिदोनमध्ये नाश होईल.  त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात नाहीत. येशूने म्हटलं, की “या लोकांचा सर्वकाळासाठी नाश होईल.” (मत्त. २५:४६) देवाच्या प्रेरणेने पौलने म्हटलं की “या लोकांना सर्वकाळाच्या नाशाची शिक्षा” मिळेल. (२ थेस्सलनी. १:९; २ पेत्र २:९) तसंच ज्यांनी पवित्र शक्‍तीच्या विरोधात जाणूनबुजून पाप केलं, त्यांच्या बाबतीतही हेच होईल. त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळणार नाही तर त्यांचा सर्वकाळाचा नाश होईल. साहजिकच त्यांचं पुनरुत्थान होणार नाही. (मत्त. १२:३२; मार्क ३:२८, २९; इब्री ६:४-६) चला आता आपण अशा दोन गटांबद्दल बोलू या ज्यांचं पृथ्वीवर पुनरुत्थान होईल.

कोणाचं पुनरुत्थान होईल?

९. प्रे. कार्यं २४:१५ मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या दोन गटांचं पृथ्वीवर पुनरुत्थान होणार आहे, आणि या दोन गटांमध्ये काय फरक आहे?

बायबल अशा दोन गटांबद्दल सांगतं ज्यांचं पुनरुत्थान होईल आणि त्यांना पृथ्वीवर कायमचं जीवन जगण्याची आशा असेल. ते दोन गट म्हणजे, ‘नीतिमान लोक’ आणि ‘अनीतिमान लोक.’ (प्रे. कार्यं २४:१५ वाचा.) ‘नीतिमान लोक’ असे लोक आहेत ज्यांनी मरेपर्यंत यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली. आणि ‘अनीतिमान लोक’ हे असे लोक आहेत जे यहोवाचे उपासक नव्हते. आणि त्यांच्यापैकी बहुतेक जणांचं जीवन यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे नव्हतं. पण या दोन्ही गटांचं पुनरुत्थान होणार आहे याचा अर्थ या दोन्ही गटांच्या लोकांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहेत, असं आपल्याला म्हणता येईल का? या प्रश्‍नाचं उत्तर मिळण्यासाठी आता आपण प्रत्येक गटाबद्दल जाणून घेऊ या.

१०. “नीतिमान” लोकांचं पुनरुत्थान होईल असं आपण का म्हणू शकतो आणि त्यांच्यापैकी काहींना कोणता बहुमान मिळेल? (पृथ्वीवर होणाऱ्‍या पुनरुत्थानाबद्दल याच अंकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेखसुद्धा पाहा.)

१० चौथा गट “नीतिमान”  लोकांचा आहे. त्यांचा मृत्यू होण्याआधी त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली होती. पण मग त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकातून काढण्यात आली का? नाही. कारण यहोवाच्या स्मरणात ते जणू काही “जिवंतच” आहेत. यहोवा “मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे कारण त्याच्या दृष्टीने ते सगळे जिवंतच आहेत.” (लूक २०:३८) याचा असा अर्थ होतो की जेव्हा नीतिमान लोकांचं या पृथ्वीवर पुनरुत्थान होईल, तेव्हा त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली असतील. पण सुरुवातीला ती जणू “पेन्सिलने” लिहिलेली असतील. (लूक १४:१४) आणि पुनरुत्थान झालेल्या या लोकांमधून काहींना “संपूर्ण पृथ्वीवर प्रधान म्हणून” सेवा करायचा बहुमान मिळेल.​— स्तो. ४५:१६.

११. “अनीतिमान” लोकांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जावं म्हणून त्यांना कोणत्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतील?

११ शेवटी आपण पाचव्या गटाबद्दल पाहू या, जो “अनीतिमान”  लोकांचा आहे. त्यांच्या मृत्यूच्या आधी ते यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे जगले नाहीत कारण त्यांना यहोवाबद्दल माहीत नव्हतं. आणि त्यामुळे त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिण्यात आली नाहीत. पण त्यांचं पुनरुत्थान करून देव त्यांना एक संधी देईल ज्यामुळे त्यांचंही नाव पुढे जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जाऊ शकेल. या “अनीतिमान” लोकांना भरपूर मदतीची गरज असेल. कारण त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांच्यापैकी काहींनी खूप वाईट आणि नीच कामं केली होती. त्यामुळे यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे कसं जगायचं हे त्यांना शिकवावं लागेल. आणि त्यासाठी देवाच्या राज्यात, आजपर्यंत कधीही झाला नव्हता इतका मोठा शैक्षणिक कार्यक्रम राबवला जाईल.

१२. (क) अनीतिमान लोकांना कोण शिकवेल? (ख) जे शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागणार नाहीत त्यांच्यासोबत काय होईल?

१२ अनीतिमान लोकांना कोण शिकवेल? मोठ्या लोकसमुदायातले आणि पुनरुत्थान झालेले नीतिमान लोक त्यांना शिकवतील. या अनीतिमान लोकांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली जावीत म्हणून त्यांना यहोवासोबत एक जवळचं नातं जोडून त्याला आपलं जीवन समर्पित करावं लागेल. अनीतिमान लोक या शिक्षणाला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी येशू ख्रिस्त आणि त्याच्यासोबत न्यायाधीश म्हणून काम करणारे अभिषिक्‍त जन खूप उत्सुक असतील. (प्रकटी. २०:४) इतकी सगळी मदत देऊनही जे प्रतिसाद देणार नाहीत त्यांना नवीन जगात राहू दिलं जाणार नाही. मग ते १०० वर्षांचे जरी असले तरी त्यांना नवीन जगातून काढून टाकलं जाईल. (यश. ६५:२०) यहोवा आणि येशू प्रत्येकाचं मन पाहू शकतात त्यामुळे ते नवीन जगात कोणालाही इतरांचं कोणत्याही प्रकारे नुकसान करू देणार नाहीत.​—यश. ११:९; ६०:१८; ६५:२५; योहा. २:२५.

जीवनाचं आणि न्यायाचं पुनरुत्थान

१३-१४. (क) पूर्वी आपण योहान ५:२९ मध्ये असलेल्या शब्दांबद्दल काय समजायचो? (ख) पण या शब्दांबद्दल कोणती गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे?

१३ पृथ्वीवर ज्यांचं पुनरुत्थान होणार आहे त्यांच्याबद्दल येशूनेसुद्धा सांगितलं होतं. त्याने म्हटलं: “अशी वेळ येत आहे जेव्हा स्मारक कबरींमध्ये असलेले सगळे त्याची हाक ऐकतील आणि बाहेर येतील. चांगली कामं करणाऱ्‍यांना  सर्वकाळाचं जीवन मिळेल, [म्हणजे जीवनाचं पुनरुत्थान] तर वाईट कामं करणाऱ्‍यांचा  न्याय केला जाईल [म्हणजे न्यायाचं पुनरुत्थान].” (योहा. ५:२८, २९, तळटीपा) येशूच्या या शब्दांचा काय अर्थ होता?

१४ पूर्वी आपण असं समजायचो, की पुनरुत्थान झालेले लोक पुनरुत्थानानंतर  जी कामं करतील त्यांबद्दल येशू इथे बोलत होता. म्हणजेच काही लोक पुन्हा जिवंत झाल्यानंतर चांगली कामं करतील  तर काही जण वाईट कामं करत राहतील  असं आपण समजायचो. पण इथे एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. येशू असं म्हणाला नाही, की स्मारक कबरेमधून बाहेर आलेले चांगली कामं करतील किंवा वाईट कामं करत राहतील. मूळ भाषेत येशू या वचनात भूतकाळात बोलत होता. दुसऱ्‍या शब्दांत येशू अशा लोकांबद्दल बोलत होता ज्यांनी चांगली कामं केली  किंवा जे वाईट कामं करत राहिले.  यावरून हे स्पष्ट होतं, की त्या लोकांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी  केलेल्या कामांबद्दल येशू इथे बोलत होता. आणि हे पटण्यासारखं आहे, नाही का? कारण कोणालाही नवीन जगात वाईट कामं करू दिली जाणार नाहीत. म्हणजे साहजिकच अनीतिमान लोकांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी ही वाईट कामं केली असतील. तर मग, येशूने ‘जीवनाचं पुनरुत्थान‘ आणि ‘न्यायाचं पुनरुत्थान’ असं जे म्हटलं, त्याचा काय अर्थ होतो?

१५. कोणाच्या पुनरुत्थानाला “जीवनाचं पुनरुत्थान” म्हटलं जाईल आणि का?

१५ नीतिमान लोक म्हणजे ज्यांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी चांगली कामं केली होती. त्यांचं पुनरुत्थान हे “जीवनाचं पुनरुत्थान” असेल कारण त्यांची नावं आधीच जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली असतील. याचा अर्थ योहान ५:२९ मध्ये ‘चांगली कामं करणाऱ्‍यांच्या’ पुनरुत्थानाबद्दल जे सांगितलं आहे आणि प्रेषितांची कार्यं २४:१५ मध्ये ‘नीतिमानांच्या पुनरुत्थानाबद्दल’ जे सांगितलं आहे, ते सारखंच आहे. रोमकर ६:७ मध्ये म्हटलंय: “जो मेला, त्याला त्याच्या पापापासून निर्दोष ठरवण्यात आलं आहे.” हे खरं आहे, की नीतिमान लोकांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या पापांपासून ते मुक्‍त होतात. पण त्यांनी विश्‍वासूपणे केलेली सेवा यहोवा विसरणार नाही. (इब्री ६:१०) असं असलं तरी पुनरुत्थान झालेल्या या नीतिमान लोकांची नावं पुढेही जीवनाच्या पुस्तकात राहावीत म्हणून त्यांनी नवीन जगात विश्‍वासू राहणं गरजेचं असेल.

१६. “न्यायाचं पुनरुत्थान” म्हणजे काय?

१६ मृत्यू होण्याआधी जे वाईट कामं करत राहिले त्यांच्याबद्दल काय? त्यांचा मृत्यू झाला तेव्हा तेसुद्धा त्यांच्या पापांपासून मुक्‍त झाले. पण त्यांनी आपल्या मृत्यूच्या आधी यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली नाही, म्हणून त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात नसतील. ‘वाईट कामं करणाऱ्‍यांचं’ पुनरुत्थान आणि प्रेषितांची कार्यं २४:१५ मध्ये सांगितलेलं अनीतिमान लोकांचं पुनरुत्थान सारखंच आहे. त्यांचं पुनरुत्थान हे “न्यायाचं पुनरुत्थान” असेल. * या अनीतिमान लोकांचा न्याय केला जाईल, म्हणजेच नवीन जगात त्यांना पारखलं जाईल. (लूक २२:३०) त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली जाऊ शकतात की नाहीत, हे ठरवण्यासाठी वेळ लागेल. जर या अनीतिमान लोकांनी पूर्वीची वाईट कामं सोडून दिली आणि यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं, तरच त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली जातील.

१७-१८. पृथ्वीवर ज्यांचं पुनरुत्थान होईल, त्या सगळ्यांना काय करायची गरज असेल? आणि प्रकटीकरण २०:१२, १३ यात सांगितलेली ‘कृत्यं’ काय आहेत?

१७ देवाच्या राज्यात हजार वर्षांदरम्यान नवीन गुंडाळ्या उघडल्या जातील. पुनरुत्थान झालेले लोक, मग ते पूर्वी नीतिमान असोत किंवा अनीतिमान, त्यांनी या नवीन गुंडाळ्यांमध्ये असलेल्या आज्ञांचं पालन करणं गरजेचं असेल. प्रेषित योहानने एका दृष्टान्तात हे पाहिलं. त्याबद्दल त्याने असं लिहिलं: “मरण पावलेले लहानमोठे राजासनासमोर उभे असलेले मला दिसले आणि गुंडाळ्या उघडण्यात आल्या. पण, आणखी एक गुंडाळी उघडण्यात आली; ती जीवनाची गुंडाळी आहे. गुंडाळ्यांमध्ये ज्या गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या त्यांवरून मेलेल्यांचा, त्यांच्या कृत्यांप्रमाणे न्याय करण्यात आला.”​—प्रकटी. २०:१२, १३.

१८ पुनरुत्थान झालेल्या लोकांचा न्याय कोणत्या ‘कृत्यांच्या’ आधारावर केला जाईल? त्यांनी मृत्यूच्या आधी  जी कामं केली होती, त्याच्या आधारावर त्यांचा न्याय केला जाईल का? नाही! कारण त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी आधी केलेल्या पापांपासून त्यांना निर्दोष ठरवण्यात आलं. त्यामुळे ही ‘कृत्यं’ त्यांच्या आधीच्या जीवनातली असू शकत नाहीत. त्याऐवजी, नवीन जगात त्यांना जे शिक्षण दिलं जाईल, ते शिक्षण घेतल्यानंतर ते जसं वागतील त्या आधारावर त्यांचा न्याय केला जाईल. नोहा, शमुवेल, दावीद आणि दानीएलसारख्या विश्‍वासू सेवकांनासुद्धा येशू ख्रिस्ताबद्दल शिकून घ्यावं लागेल आणि त्याच्या बलिदानावर विश्‍वास असल्याचं दाखवावं लागेल. जर या विश्‍वासू लोकांना शिकण्याची गरज असेल, तर मग अनीतिमान लोकांना शिकण्याची आणखी किती गरज असेल!

१९. जे या अद्‌भुत संधीचा फायदा करून घेणार नाहीत, त्यांच्यासोबत शेवटी काय होईल?

१९ जे या अद्‌भुत संधीचा फायदा करून घेणार नाहीत, त्यांच्यासोबत शेवटी काय होईल? प्रकटीकरण २०:१५ मध्ये सांगितलंय, की “ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आढळलं नाही, त्यालाही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलं.” याचाच अर्थ त्यांचा पूर्णपणे आणि कायमचा नाश केला जाईल. म्हणून जीवनाच्या पुस्तकात आपलं नावं लिहिलं जावं आणि त्यात ते कायम राहावं, म्हणून आपण किती प्रयत्न केले पाहिजेत!

हजार वर्षांदरम्यान होणाऱ्‍या मोठ्या शैक्षणिक कार्यक्रमात एक भाऊ सहभाग घेत आहे (परिच्छेद २० पाहा)

२०. हजार वर्षांदरम्यान कोणतं रोमांचक काम केलं जाईल? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

२० खरंच, येशूचं हजार वर्षांचं राज्य, हा किती रोमांचक काळ असेल! त्या वेळी पृथ्वीवर आजपर्यंत कधीही झाला नव्हता इतका मोठा शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात येईल. पण त्यासोबतच, त्या काळादरम्यान नीतिमान आणि अनीतिमान अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची वागणूक पारखण्यात येईल. (यश. २६:९; प्रे. कार्यं १७:३१) हा शैक्षणिक कार्यक्रम कशा प्रकारे चालवला जाईल, हे समजून घेण्यासाठी आणि या अद्‌भुत शैक्षणिक कार्यक्रमाबद्दल आपली कदर वाढवण्यासाठी पुढचा लेख आपल्याला मदत करेल.

गीत १२ सार्वकालिक जीवनाची प्रतिज्ञा

^ या लेखात आपल्या समजुतीत झालेला एक फेरबदल स्पष्ट करण्यात आलाय. योहान ५:२८, २९ या वचनांमध्ये “जीवनाचं पुनरुत्थान” आणि “न्यायाचं पुनरुत्थान” याबद्दल सांगितलंय. या दोन्ही पुनरुत्थानांचा काय अर्थ होतो आणि त्यांत कोणते लोक सामील आहेत हे आपण जाणून घेऊ या.

^ या पुस्तकात नावं लिहायची सुरुवात “जगाच्या स्थापनेपासून” झाली. इथे येशू कोणत्या जगाच्या स्थापनेबद्दल बोलत होता? तो पापापासून सुटका मिळण्यासाठी योग्य असलेल्या मानवांच्या जगाविषयी बोलत होता. (मत्त. २५:३४; प्रकटी. १७:८) म्हणूनच जीवनाच्या पुस्तकात सगळ्यात आधी नीतिमान माणूस हाबेल याचंच नाव लिहिलं असावं असं आपण म्हणू शकतो.

^ न्यायाचं पुनरुत्थान असं जे म्हटलं आहे त्यातल्या “न्याय” या शब्दाचा अर्थ एखाद्याला दंड किंवा शिक्षा ठोठावणं असं आपण आधी समजायचो. आणि न्याय या शब्दाचा तसाही अर्थ होऊ शकतो.  पण या ठिकाणी येशूने ‘न्याय’ हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला असं दिसतं. एका ग्रीक शब्दकोशात ‘न्याय’ या शब्दाचा अर्थ, “एखाद्याच्या वागणुकीची पारख करणं,” असा दिला आहे. त्यामुळे नवीन जगात अनीतिमान लोकांच्या वागणुकीची पारख केली जाईल आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं जाईल. या अर्थाने येशूने न्यायाचं पुनरुत्थान असं म्हटलं असावं.