वाचकांचे प्रश्न
प्रेषित पौलने स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” म्हटलं तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? (१ करिंथकर १५:८)
१ करिंथकर १५:८ या वचनात पौलने म्हटलं: “सर्वात शेवटी, अकाली जन्मलेल्यासारखा जो मी, त्या मलासुद्धा तो दिसला.” पौलला एका दृष्टान्तात येशू त्याच्या स्वर्गीय गौरवात दिसला होता, त्या अनुभवाबद्दल या ठिकाणी पौल सांगत होता. पण त्याने स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” असं का म्हटलं? आधी आपला असा समज होता, की जेव्हा पौलने येशूला स्वर्गीय गौरवात पाहिलं तेव्हा एका अर्थाने स्वर्गीय जीवनासाठी पौलचा जन्म किंवा पुनरुत्थान वेळेआधीच झालं. स्वर्गीय पुनरुत्थान होण्यासाठी अजून बरीच शतकं बाकी असूनही त्याला हा बहुमान मिळाला होता. आणि या अर्थाने त्याने स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” म्हटलं असावं. या वचनाचा आणखी खोलवर अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलंय, की या वचनाबद्दलच्या आपल्या समजुतीत फेरबदल करायची गरज आहे.
तर मग स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” असं पौलने म्हटलं तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? याची वेगवेगळी स्पष्टीकरणं असू शकतात.
पौलच्या परिवर्तनाची घटना अचानक घडलेली आणि धक्कादायक होती. जेव्हा बाळाचा अकाली जन्म होतो तेव्हा ती घटना अनपेक्षित असते. त्याच प्रकारे जेव्हा शौल (ज्याला नंतर पौल म्हणण्यात आलं) दिमिष्क इथल्या ख्रिश्चनांचा छळ करण्यासाठी तिथे जात होता, तेव्हा वाटेत आपल्याला पुनरुत्थान झालेल्या येशूचा एक दृष्टान्त दिसेल अशी त्याने अपेक्षा केली नव्हती. पौलचं परिवर्तन झालं तेव्हा ही गोष्ट फक्त त्याच्या स्वतःसाठीच नाही, तर ज्या ख्रिश्चनांचा तो दिमिष्कमध्ये जाऊन छळ करणार होता त्यांच्यासाठीसुद्धा अनपेक्षित होती. शिवाय, हा अनुभव त्याच्यासाठी इतका धक्कादायक होता की काही काळासाठी त्याची दृष्टीसुद्धा गेली.—प्रे. कार्यं ९:१-९, १७-१९.
त्याचं परिवर्तन चुकीच्या वेळी झालं. ‘अकाली जन्मलेला’ यासाठी असलेल्या मूळ ग्रीक शब्दाचं भाषांतर ‘चुकीच्या वेळी जन्मलेला’ असंसुद्धा केलं जाऊ शकतं. द जेरूसलेम बायबल यात या वचनाचं असं भाषांतर केलंय: “जणू कोणी अपेक्षा केली नव्हती अशा वेळी माझा जन्म झाला.” पौलचं परिवर्तन झालं, त्या वेळेपर्यंत येशू आधीच स्वर्गात परत गेला होता. आधीच्या वचनांमध्ये पौलने अशा काही लोकांचा उल्लेख केला होता ज्यांनी पुनरुत्थान झालेल्या येशूला स्वर्गात परत जाण्याआधी पाहिलं होतं. पण पौलने स्वतः त्याला पाहिलं नव्हतं. (१ करिंथ. १५:४-८) पण जेव्हा येशूने अनपेक्षितपणे पौलला दर्शन दिलं, त्या वेळी त्याला पुनरुत्थान झालेल्या येशूला संधी मिळाली. पण जणू काही त्याला ती ‘चुकीच्या वेळी’ मिळाली होती. आणि म्हणून त्याने स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” असं म्हटलं असावं.
तो स्वतःकडे कमीपणा घेत बोलत होता. काही तज्ञांचं असं मत आहे, की पौल या ठिकाणी स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” असं म्हणत होता, तेव्हा तो स्वतःचीच टीका करत, स्वतःला खूप कमी असल्याचं दाखवत होता. पौलला जर खरंच असं म्हणायचं असेल, तर प्रेषित म्हणून सेवा करायचा जो बहुमान त्याला मिळाला होता, त्याच्या लायकीचे आपण नाही असं तो या ठिकाणी मान्य करत होता. कारण तो म्हणतो: “प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे. इतकंच काय, तर प्रेषित म्हणवून घ्यायचीसुद्धा माझी लायकी नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. पण आज मी जो काही आहे, तो देवाच्या अपार कृपेमुळेच आहे.”—१ करिंथ. १५:९, १०.
पौलच्या या शब्दांवरून दिसून येतं, की कदाचित तो अचानक आणि अनपेक्षित रीतीने येशूने त्याला जे दर्शन दिलं होतं त्याबद्दल; अपेक्षा केली नव्हती अशा वेळी त्याचं जे परिवर्तन झालं होतं त्याबद्दल; किंवा तो लायक नसतानाही येशूने त्याला जे दर्शन दिलं होतं त्याबद्दल बोलत असावा. काहीही असो, पण एक गोष्ट मात्र खरी आहे, की पौलसाठी हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय होता. या अनुभवामुळेच पौलला या गोष्टीची पक्की खातरी झाली होती, की येशूचं पुनरुत्थान झालं आहे. त्यामुळे येशूच्या पुनरुत्थानाबद्दल इतरांना सांगत असताना तो आपल्याला आलेल्या या अनपेक्षित अनुभवाबद्दल बऱ्याच वेळा का बोलला असेल हे समजण्यासारखं आहे.—प्रे. कार्यं २२:६-११; २६:१३-१८.