व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३८

तरुणांनो, तुम्हाला कशा प्रकारचं आयुष्य जगायला आवडेल?

तरुणांनो, तुम्हाला कशा प्रकारचं आयुष्य जगायला आवडेल?

“समंजसपणा तुझं रक्षण करेल.”—नीति. २:११.

गीत १३५ यहोवाची विनंती: “माझ्या मुला, सुज्ञपणे वाग”

सारांश a

१. यहोआश, उज्जीया आणि योशीया यांच्यावर कोणती कठीण जबाबदारी होती?

 विचार करा, अतिशय लहान वयात किंवा अगदी तरुण असताना तुम्हाला जर राजा म्हणून निवडलं असतं तर कसं वाटलं असतं? राजा म्हणून तुम्ही तुमच्या ताकदीचा आणि अधिकाराचा वापर कसा केला असता? बायबलमध्ये अशा बऱ्‍याच तरुणांचा उल्लेख करण्यात आलाय जे यहूदाचे राजे बनले. उदाहरणार्थ, यहोआश ७ वर्षांचा असताना, उज्जीया १६ वर्षांचा असताना आणि योशीया ८ वर्षांचा असताना राजा बनला. विचार करा, इतक्या लहान वयात राजा म्हणून जबाबदारी पार पाडणं त्यांना किती कठीण गेलं असेल! पण त्यांची जबाबदारी जरी कठीण असली, तरी यहोवाने आणि इतर लोकांनी त्यांना बऱ्‍याच चांगल्या गोष्टी करण्यासाठी मदत केली.

२. यहोआश, उज्जीया आणि योशीया यांच्या उदाहरणांवर आपण लक्ष का दिलं पाहिजे?

आज जरी आपण कुठल्या देशाचे राजे किंवा राणी नसलो तरी बायबलमध्ये दिलेल्या या तिघांच्या अहवालातून आपण बरेच महत्त्वाचे धडे शिकू शकतो. त्यांनी काही चांगले निर्णय घेतले, पण त्यासोबत काही चुकीचे निर्णयसुद्धा घेतले. पण त्यांच्या उदाहरणातून आपण चांगले मित्र का निवडले पाहिजेत, नम्र का असलं पाहिजे आणि नेहमी यहोवाचं मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न का केला पाहिजे ते आपल्याला शिकता येईल.

चांगले मित्र निवडा

चांगल्या मित्रांचा सल्ला ऐकून आपण आजसुद्धा यहोआशच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो (परिच्छेद ३, ७ पाहा) c

३. महायाजक यहोयादाने यहोआश राजाला सुज्ञ निर्णय घ्यायला कशी मदत केली?

यहोआशसारखं चांगले निर्णय घ्या.  लहान असताना यहोआश राजाने सुज्ञ निर्णय घेतले. त्याचं मार्गदर्शन करायला त्याचे वडील नव्हते. पण त्याने विश्‍वासू महायाजक यहोयादा याने दिलेलं मार्गदर्शन स्वीकारलं आणि त्याप्रमाणे तो चालला. यहोयादा महायाजकाने यहोआशला आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं. त्याचा परिणाम असा झाला, की यहोआशने जीवनात सुज्ञ निर्णय घेतले. त्याने यहोवाची सेवा केली आणि शुद्ध उपासनेत पुढाकार घेतला. इतकंच नाही तर यहोआशने यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्याची व्यवस्था केली.—२ इति. २४:१, २, ४, १३, १४.

४. यहोवावर प्रेम असल्यामुळे आणि त्याच्या आज्ञा पाळल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? (नीतिवचनं २:१, १०-१२)

जर तुम्हालाही यहोवावर प्रेम करायला आणि त्याच्या स्तरांनुसार जीवन जगायला शिकवण्यात आलं असेल, तर ती तुमच्यासाठी एक मौल्यवान भेटच आहे. (नीतिवचनं २:१, १०-१२ वाचा.) आईवडील आपल्या मुलांना चांगले निर्णय घ्यायला प्रशिक्षण देऊ शकतात. कात्या नावाच्या एका बहिणीला तिच्या वडिलांनी चांगले निर्णय घ्यायला कशी मदत केली त्याचंच एक उदाहरण घ्या. तिचे वडील जेव्हा दररोज तिला शाळेत सोडवायला जायचे तेव्हा ते तिच्यासोबत दैनिक वचनावर चर्चा करायचे. ती म्हणते: “या चर्चांमुळे मला खूप मदत झाली. त्या दिवशी येणाऱ्‍या समस्यांचा किंवा परिस्थितींचा सामना करायला त्यांमुळे मला मदत व्हायची.” पण पालक बायबलच्या आधारावर तुम्हाला जे मार्गदर्शन देतात त्यामुळे तुम्हाला जर बांधून ठेवल्यासारखं वाटत असेल तर काय? कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन स्वीकारायला मदत होईल? ॲनेस्टेशिया नावाची बहीण आठवून सांगते, की तिचे आईवडील जेव्हा तिच्यावर काही गोष्टी करायची मनाई करायचे तेव्हा ते वेळ काढून त्यामागची कारणंही तिला सांगायचे. ती म्हणते: “यामुळे मला हे समजायला मदत झाली, की त्यांना मला कोणत्याही गोष्टीत बांधून ठेवायचं नव्हतं, तर त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. आणि माझं संरक्षण करण्यासाठी ते मला काही गोष्टी करण्यापासून आडवायचे. किंवा ‘काही गोष्टी करू नको’ असं सांगायचे.”

५. तुम्ही जेव्हा मार्गदर्शन स्वीकारता तेव्हा तुमच्या पालकांना आणि यहोवाला कसं वाटतं? (नीतिवचनं २२:६; २३:१५, २४, २५)

तुमचे आईवडील जेव्हा तुम्हाला बायबलमधून काही सल्ला देतात आणि तुम्ही तो लागू करता किंवा पाळता, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. आणि फक्‍त त्यांनाच नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाला आनंद होतो. आणि तुमची त्याच्यासोबतची मैत्री आणखी मजबूत होते. (नीतिवचनं २२:६; २३:१५, २४, २५ वाचा.) या गोष्टींमुळे लहान वयात यहोआशने जे चांगलं उदाहरण मांडलं त्याचं अनुकरण करायचं प्रोत्साहन तुम्हाला मिळत नाही का?

६. यहोयादाच्या मृत्यूनंतर यहोआश कोणाचं ऐकायला लागला आणि त्याचा परिणाम काय झाला? (२ इतिहास २४:१७, १८)

यहोआशने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांतून धडा घ्या.  यहोयादाचा मृत्यू झाल्यानंतर यहोआशने काही चुकीच्या लोकांसोबत मैत्री केली. (२ इतिहास २४:१७, १८ वाचा.) त्याने यहोवावर प्रेम नसलेल्या यहूदाच्या प्रमुखांचं ऐकलं. त्याने अशा वाईट लोकांपासून दूर राहायला हवं होतं, असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. (नीति. १:१०) पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्याने या चुकीच्या लोकांचा सल्ला ऐकला. एवढंच काय तर जेव्हा त्याच्या जवळच्या नातेवाइकाने, जखऱ्‍याने त्याची चूक सुधारायचा प्रयत्न केला तेव्हा यहोआशने त्याला ठार मारलं. (२ इति. २४:२०, २१; मत्त. २३:३५) असं करणं किती चुकीचं आणि मूर्खपणाचं होतं! यहोआशने आपल्या आयुष्याची सुरुवात तर चांगली केली होती. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, नंतर तो धर्मत्यागी आणि एक खूनी बनला. शेवटी त्याच्या स्वतःच्याच सेवकांनी त्याला ठार मारलं. (२ इति. २४:२२-२५) खरंच, यहोआश जर यहोवाचं आणि ज्यांचं यहोवावर प्रेम आहे त्या लोकांचं ऐकत राहिला असता आणि त्यांच्यावर प्रेम करत राहिला असता, तर किती बरं झालं असतं! त्याच्या आयुष्याचा शेवट चांगला झाला असता. मग त्याच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळतं?

७. तुम्ही कसे मित्र निवडले पाहिजेत? (चित्रसुद्धा पाहा.)

यहोआशने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, आपण नेहमी चांगले मित्र निवडले पाहिजेत; असे मित्र ज्यांचं यहोवावर प्रेम आहे आणि ज्यांना यहोवाला आनंदित करायचं आहे. कारण त्यांचा आपल्यावर चांगला प्रभाव पडतो. पण चांगले मित्र निवडण्यासाठी मित्र तुमच्याच वयाचे असावेत असं काही नाही. लक्षात घ्या, यहोआश हासुद्धा यहोयादापेक्षा खूप लहान होता. मित्रांच्या बाबतीत तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता: ‘माझे मित्र यहोवावरचा माझा विश्‍वास मजबूत करायला मला मदत करतात का? ते मला देवाच्या स्तरांनुसार चालायचं प्रोत्साहन देतात का? ते नेहमी यहोवाबद्दल किंवा सत्याबद्दल बोलतात का? त्यांच्या मनातही देवाच्या स्तरांबद्दल आदर आहे का? मला ज्या गोष्टी ऐकाव्याश्‍या वाटतात अशाच गोष्टी ते माझ्याशी बोलतात का, की जेव्हा मी चुकतो तेव्हा मला सुधारण्याचाही प्रयत्न करतात?’ (नीति. २७:५, ६, १७) स्पष्ट सांगायचं झालं, जर तुमच्या मित्रांचं यहोवावर प्रेम नसेल तर असे मित्र नसलेलेच बरे. पण जर तुमच्या मित्रांचं यहोवावर प्रेम असेल तर त्यांना कधीही सोडू नका. कारण त्यांच्यामुळे तुमचं नक्कीच भलं होईल.—नीति. १३:२०.

८. जर आपण सोशल मिडीयाचा वापर करत असू तर आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?

सोशल मिडीया हे आपल्या नातेवाइकांच्या आणि मित्रांच्या संपर्कात राहण्याचं एक चांगलं माध्यम आहे. पण अनेक जण, आपण काय-काय खरेदी केलंय, आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या याच्याबदद्‌लचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून इतरांवर छाप पाडायचा प्रयत्न करतात. जर तुम्हीही सोशल मिडीयाचा वापर करत असाल, तर स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘सोशल मिडीयाचा वापर करून मी इतरांवर छाप पाडायचा प्रयत्न करतोय का? स्वतःची प्रशंसा करवून घ्यायचा आणि स्वतःचा मोठेपणा मिरवायचा माझा हेतू आहे का, की इतरांना प्रोत्साहन देण्याचा माझा हेतू आहे? सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्‍यांच्या विचारांचा, वागण्या-बोलण्याचा चुकीचा प्रभाव मी माझ्यावर होऊ देतोय का?’ नियमन मंडळाचे सदस्य म्हणून सेवा केलेल्या भाऊ नेथन नॉर यांनी एकदा असा सल्ला दिला होता: “माणसांना खूश करायचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला कोणालाही खूश करता येणार नाही. याउलट, यहोवाला खूश करायचा प्रयत्न करा. म्हणजे मग, ज्यांचं यहोवावर प्रेम आहे तेही खूश होतील.”

नम्र राहा

९. यहोवाच्या मदतीने उज्जीयाने काय-काय केलं? (२ इतिहास २६:१-५)

उज्जीयासारखे चांगले निर्णय घ्या.  उज्जीया राजा जेव्हा अगदी तरुण होता, तेव्हा तो नम्र होता. तो “खऱ्‍या देवाचं भय बाळगायला” शिकला. आणि ६८ वर्षांच्या त्याच्या आयुष्यात यहोवाने बरीच वर्षं त्याला आशीर्वादित केलं. (२ इतिहास २६:१-५ वाचा.) उज्जीयाने अनेक शत्रू राष्ट्रांचा पराभव केला आणि यरुशलेमचं संरक्षण करण्यासाठीही त्याने बऱ्‍याच गोष्टी केल्या. (२ इति. २६:६-१५) नक्कीच, या गोष्टी करण्यासाठी यहोवाने उज्जीयाला जी मदत केली त्यामुळे तो खूप आनंदी होता.—उप. ३:१२, १३.

१०. उज्जीया राजाच्या बाबतीत काय झालं?

१० उज्जीयाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून धडा घ्या.  उज्जीया राजा असल्यामुळे, तो सगळ्यांना काय करायचं आणि काय नाही ते सांगायचा आणि सूचना द्यायचा. आणि त्यामुळेच आपण हवं ते करू शकतो असं त्याला वाटलं असेल का? कदाचित. एक दिवस उज्जीयाने यहोवाच्या मंदिराच्या आत जायचं ठरवलं. आणि गर्वाने फुगून त्याने धूपवेदीवर धूप जाळायचा प्रयत्न केला. खरंतर मंदिरातलं हे काम राजांनी मुळीच करायचं नव्हतं. (२ इति. २६:१६-१८) त्यामुळे महायाजक अजऱ्‍याने त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला. पण उज्जीया त्याच्यावर खूप भडकला आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, आत्तापर्यंत उज्जीयाने विश्‍वासूपणे सेवा करून जे चांगलं नाव कमावलं होतं ते त्याने गमावलं. त्याने केलेल्या चुकीच्या गोष्टीसाठी यहोवाने त्याला शिक्षा केली आणि तो कुष्ठरोगी बनला. (२ इति. २६:१९-२१) उज्जीया जर शेवटपर्यंत नम्र राहिला असता तर त्याच्या आयुष्याचा शेवट नक्कीच वेगळा झाला असता.

आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या त्यांबद्दल बढाई मारण्यापेक्षा आपण त्यांचं श्रेय यहोवाला दिलं पाहिजे (परिच्छेद ११ पाहा) d

११. आपण नम्र आहोत हे कशावरून दिसून येईल? (चित्रसुद्धा पाहा.)

११ उज्जीया राजा जेव्हा शक्‍तिशाली बनला तेव्हा यहोवानेच आपल्याला समृद्ध केलंय आणि शक्‍तिशाली बनवलंय हे तो विसरून गेला. यावरून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्याला जे आशीर्वाद आणि बहुमान मिळाले आहेत ते यहोवाकडून आहेत. आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या त्यांबद्दल बढाई मारण्यापेक्षा आपण त्याचं श्रेय यहोवाला दिलं पाहिजे. b (१ करिंथ. ४:७) आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपण अपरिपूर्ण आहोत आणि आपल्यालाही कोणीतरी सुधारण्याची गरज पडते. साठीतला एक भाऊ म्हणतो: “मी हे शिकलो की जेव्हा कोणी मला माझ्या चुका दाखवतं, तेव्हा मी ते जास्त मनाला लावून नाही घेतलं पाहिजे. माझ्याकडून जेव्हा काही छोट्या-मोठ्या चुका होतात आणि त्यासाठी जेव्हा मला सुधारलं जातं, तेव्हा मी त्याचं वाईट वाटून घेत नाही. उलट मी त्यातून शिकतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.” खरंच, जेव्हा आपण यहोवाचं भय बाळगतो आणि स्वतःबद्दल नम्र दृष्टिकोन ठेवतो तेव्हा आपलं जीवन आनंदी होतं!—नीति. २२:४.

नेहमी यहोवाचं मार्गदर्शन घेत राहा

१२. तरुण वयातच योशीया यहोवाची सेवा कशी करू लागला? (२ इतिहास ३४:१-३)

१२ योशीयासारखे चांगले निर्णय घ्या.  योशीया किशोरवयात होता तेव्हापासूनच तो यहोवाचं मार्गदर्शन मिळवायचा प्रयत्न करू लागला. कारण त्याला यहोवाबद्दल शिकायचं होतं आणि यहोवाची इच्छा पूर्ण करायची होती. पण लहान वयातच राजा बनलेल्या योशीयाचं आयुष्य सोपं नव्हतं. कारण त्या काळात बहुतेक लोक मूर्तिपूजा करत होते. आणि खरी उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी योशीयाला मोठं धैर्य दाखवावं लागणार होतं. आणि त्याने तसंच केलं. तो २० वर्षांचाही झाली नव्हता तेव्हापासूनच त्याने संपूर्ण देशातून मूर्तिपूजा काढून टाकायला सुरुवात केली.—२ इतिहास ३४:१-३ वाचा.

१३. यहोवाला तुमचं जीवन समर्पित केल्यानंतर तुम्ही दररोज काय केलं पाहिजे?

१३ तुम्हीसुद्धा जरी वयाने लहान असला तरी योशीयासारखंच यहोवाची सेवा करायचा निर्णय घेऊ शकता. आणि यहोवाच्या अद्‌भुत गुणांबद्दल शिकू शकता. असं केल्यामुळे तुम्हालाही तुमचं जीवन यहोवाला समर्पित करायची प्रेरणा मिळेल. पण तुम्ही केलेल्या समर्पणाचा तुमच्या रोजच्या जीवनावर कसा प्रभाव पडला पाहिजे? लूक नावाच्या भावाने १४ व्या वर्षी बाप्तिस्मा घेतला. तो असं म्हणतो, “मी यहोवाच्या सेवेला माझ्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व देईन आणि त्याला खूश करण्याचा प्रयत्न करेन.” (मार्क १२:३०) तुम्हीही जर असंच करायचा निर्णय घेतला तर यहोवा तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल.

१४. योशीया राजाचं अनुकरण करत असलेल्या काही तरुण मुलांचं उदाहरण द्या.

१४ तरुणांनो, यहोवाची सेवा करत असताना तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो? जोहॅनचा बाप्तिस्मा १२ व्या वर्षी झाला. त्याच्या शाळेत असलेल्या मुलांकडून त्याला ई-सिगरेट ओढण्याचा, म्हणजे वेपिंग करण्याचा खूप दबाव येत होता. मग त्याने या गोष्टीचा सामना कसा केला? त्याने नेहमी स्वतःला या गोष्टीची आठवण करून दिली, की जर तो दबावाला बळी पडला आणि त्याने ई-सिगरेट ओढली तर त्याचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. आणि यहोवासोबतची त्याची मैत्रीही तुटेल. तसंच रेचल नावाची एक बहीण १४ वर्षांची होती तेव्हा तिचा बाप्तिस्मा झाला. शाळेत येणाऱ्‍या दबावांचा सामना करायला तिला कशामुळे मदत झाली याबद्दल ती म्हणते: “ज्या गोष्टी माझ्यासमोर येतात, त्यांना मी आध्यात्मिक गोष्टींशी जोडायचा नेहमी प्रयत्न करते. उदाहरणार्थ, इतिहासाच्या एखाद्या धड्यावरून मला बायबलमधली एखादी भविष्यवाणी किंवा अहवाल आठवेल. किंवा मग शाळेत मी एखाद्याशी बोलत असते तेव्हा मी असं एखादं वचन आठवायचा प्रयत्न करते जे मी समोरच्या व्यक्‍तीला दाखवू शकेन.” योशीया राजाने ज्या समस्यांचा सामना केला त्यापेक्षा तुमच्या समस्या कदाचित खूप वेगळ्या असतील. पण तरी तुम्ही त्याच्यासारखं सुज्ञ बनू शकता आणि त्याच्या इतकंच यहोवाला एकनिष्ठ राहू शकता. आज तरुण असताना तुम्हाला ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्या तुम्हाला आयुष्यात पुढे येणाऱ्‍या समस्यांचा सामना करायला तयार करतील.

१५. यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करायला योशीयाला कशामुळे मदत झाली? (२ इतिहास ३४:१४, १८-२१)

१५ योशीया राजा जेव्हा २६ वर्षांचा झाला तेव्हा त्याने यहोवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं. हे काम करत असताना त्याला “यहोवाने मोशेद्वारे दिलेलं नियमशास्त्राचं पुस्तक सापडलं.” या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर तो त्यांप्रमाणे बदल करायला लगेच तयार झाला. आणि त्याने ते करण्यासाठी पावलंही उचलली. (२ इतिहास ३४:१४, १८-२१ वाचा.) तुम्हीही कदाचित रोज बायबल वाचत असाल आणि ते वाचायला तुम्हाला नक्कीच आवडत असेल. तुम्हाला ज्या वचनांमुळे मदत होऊ शकते अशी वचनं तुम्ही कुठेतरी लिहून ठेवता का? आधी उल्लेख केलेला लूक म्हणतो, की त्याला जी वचनं किंवा मुद्दे आवडतात ते तो एका वहीमध्ये लिहून ठेवतो. तुम्हीही त्याच्यासारखंच केलं तर तुम्हालाही आवडलेली वचनं किंवा मुद्दे आठवायला नक्कीच मदत होईल. तुम्ही जितकं जास्त बायबल वाचाल आणि बायबलवर आपलं प्रेम वाढवाल, तितकंच जास्त तुम्हाला यहोवाची सेवा करावीशी वाटेल. आणि योशीया राजासारखं तुम्हीसुद्धा देवाच्या वचनात लिहिलेल्या गोष्टींप्रमाणे चालायला प्रवृत्त व्हाल.

१६. योशीयाच्या हातून कोणती मोठी चूक झाली आणि त्यातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो?

१६ योशीयाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून धडा घ्या.  योशीया जेव्हा जवळपास ३९ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या हातून खूप मोठी चूक झाली. आणि त्यामुळे त्याला त्याचा जीवही गमवावा लागला. यहोवाकडून मार्गदर्शन घेण्याऐवजी तो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला. (२ इति. ३५:२०-२५) यातून आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, आपलं वय कितीही झालं असलं किंवा आपण कितीही वर्षांपासून बायबलचा अभ्यास करत असलो, तरीही आपण यहोवाकडून मार्गदर्शन मिळवलं पाहिजे. यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण नियमितपणे त्याला प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या वचनांचा अभ्यास केला पाहिजे आणि इतर प्रौढ ख्रिश्‍चनांकडून जो सल्ला मिळतो तो ऐकला पाहिजे. असं केलं तर कदाचित आपण मोठमोठ्या चुका करण्यापासून दूर राहू आणि आपला आनंदही वाढेल.—याको. १:२५.

तरुणांनो—तुम्ही एक आनंदी आणि समाधानी आयुष्य जगू शकता!

१७. यहूदाच्या तीन राजांच्या उदाहरणावरून आपल्याला कोणते महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात?

१७ तरुण असताना आपल्याकडे नवनवीन गोष्टी करण्याच्या बऱ्‍याच संधी असतात. यहोआश, उज्जीया आणि योशीयाच्या उदाहरणावरून दिसून येतं, की तरुण आपल्या जीवनात सुज्ञ निर्णय घेऊ शकतात आणि यहोवाला आनंद होईल असं जीवन जगू शकतात. हे खरंय की या तीन राजांनी काही चुका केल्या आणि त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागले. पण त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचं जर आपण अनुकरण केलं आणि त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या त्या चुका करायचं जर आपण टाळलं, तर आपण एक चांगलं आणि आनंदी जीवन जगू शकतो.

तरुण असताना दावीदने यहोवाशी जवळचं नातं जोडलं, त्याची मरजी मिळवली आणि त्यामुळे तो एक चांगलं आणि आनंदी जीवन जगला (परिच्छेद १८ पाहा)

१८. तरुण एक चांगलं आणि समाधानी आयुष्य जगू शकतात याची आणखी कोणती उदाहरणं बायबलमध्ये आहेत? (चित्रसुद्धा पाहा.)

१८ बायबलमध्ये यहोवाला विश्‍वासू असलेल्या इतरही तरुणांचे अहवाल दिले आहेत. त्यांनी यहोवाशी एक चांगलं नातं जोडलं, त्याची मरजी मिळवली आणि त्यामुळे ते एक चांगलं आणि समाधानी आयुष्य जगले. दावीद हा अशाच तरुणांपैकी एक होता. फार लहान वयात त्याने देवाची सेवा करण्याची निवड केली. आणि नंतर तो यहोवाला एकनिष्ठ असलेला एक राजा बनला. हे खरंय की त्याच्या हातून काही चुका झाल्या. पण दावीदचं एकंदर आयुष्य जर बघितलं तर यहोवाने त्याच्याकडे एक विश्‍वासू सेवक म्हणून पाहिलं. (१ राजे ३:६; ९:४, ५; १४:८) तुम्ही बायबलमधून जर दावीदच्या उदाहरणाचा अभ्यास केला, तर त्याच्या चांगल्या उदाहरणामुळे तुम्हालाही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. किंवा तुम्ही बायबलमधल्या मार्क आणि तीमथ्य यांच्या उदाहरणांचा अभ्यास करू शकता किंवा याबद्दल एक स्टडी प्रोजेक्ट हातात घेऊ शकता. या अभ्यासातून तुम्हाला दिसून येईल, की फार कमी वयातच त्यांनी यहोवाची सेवा करायचं निवडलं आणि देवाच्या नजरेत एक चांगलं नाव कमवलं. त्यामुळे त्यांचं भलं झालं आणि ते एक आनंदी आयुष्य जगू शकले.

१९. तरुणांनो, तुम्हाला कशा प्रकारचं आयुष्य जगायला आवडेल?

१९ तरुणांनो, तुम्ही आज ज्या प्रकारचं आयुष्य जगता त्यावरून ठरेल की तुमचं पुढचं आयुष्य कसं असेल. तुम्ही जर स्वतःच्या बुद्धीवर भरवसा ठेवण्याऐवजी यहोवावर भरवसा ठेवलात आणि त्याच्यावर अवलंबून राहिलात, तर तो तुम्हाला सुज्ञ निर्णय घ्यायला मदत करेल. (नीति. २०:२४) त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही यहोवाच्या सेवेत जे करता त्याची यहोवा खूप कदर करतो. आणि खरंच, आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याच्या सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून घेणं यापेक्षा आणखी कोणती चांगली गोष्ट असू शकते?

गीत १४४ नवे जग डोळ्यांपुढे ठेवा!

a तरुणांनो, यहोवाला माहीत आहे की त्याच्यासोबतची तुमची मैत्री धोक्यात येईल अशा समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. मग तुमच्या स्वर्गातल्या पित्याचं मन आनंदित होईल असे सुज्ञ निर्णय तुम्ही कसे घेऊ शकता? यासाठी आपण अशा तीन तरुणांचं उदाहरण पाहू या जे यहूदाचे राजे बनले. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून तुम्हाला काय शिकायला मिळतं ते पाहा.

b jw.org वर असलेल्या, “क्या सोशल मीडिया पर ढेर सारे फॉलोअर और लाइक होना ही सबकुछ है?” या लेखातली “शिकायत भी और शेखी भी?” ही चौकट पाहा.

c चित्राचं वर्णन: एक प्रौढ बहीण एका तरुण बहिणीला सल्ला देत आहे.

d चित्राचं वर्णन: अधिवेशनात भाग असलेली एक बहीण यहोवावर भरवसा ठेवते आणि तिचा भाग व्यवस्थित झाला म्हणून ती सगळं श्रेय यहोवाला देते.