अभ्यास लेख ४०
पेत्रप्रमाणे हार न मानता प्रयत्न करत राहा
“हे प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी माणूस आहे.”—लूक ५:८.
गीत ३८ तो तुला बळ देईल
सारांश a
१. येशूने केलेल्या चमत्काराबद्दल पेत्रला कसं वाटलं?
पेत्रने अख्खी रात्र मासे पकडण्यासाठी घालवली होती पण त्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं. पण तरीसुद्धा येशू त्याला म्हणाला: “पाणी जिथे खोल आहे तिथे नाव ने आणि मासे धरण्यासाठी आपली जाळी पाण्यात सोड.” (लूक ५:४) आता परत जाळी टाकल्यावर मासे मिळतील का अशी शंका पेत्रला होती पण तरी त्याने येशूने सांगितल्याप्रमाणे केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पेत्रला इतके मासे सापडले, की जाळी फाटू लागली. पेत्र आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना जेव्हा कळलं, की आत्ताच जे घडलं तो एक चमत्कार होता तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. भारावून जाऊन पेत्र येशूला असं म्हणाला: “हे प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी माणूस आहे.” (लूक ५:६-९) पेत्रच्या या शब्दांवरून असं दिसतं, की आपण येशूसमोर उभं राहायच्यासुद्धा लायकीचे नाही, असं त्याला वाटत होतं.
२. पेत्रच्या उदाहरणावर विचार करणं फायद्याचं का आहे?
२ पेत्रने जे म्हटलं ते बरोबर होतं. तो एक “पापी माणूस” होता. शास्त्रवचनांतून आपल्याला कळतं की त्याने बऱ्याचदा अशा गोष्टी केल्या ज्यांचा त्याला नंतर पस्तावा झाला. तुम्हालाही कधीकधी पेत्रसारखं वाटतं का? तुमच्याही स्वभावात अशा काही गोष्टी आहेत का ज्यांच्याशी तुम्हाला झगडावं लागतं? किंवा तुमचा कल नेहमी चुकीच्या गोष्टींकडे असतो असं तुम्हाला जाणवलंय का? जर असेल, तर पेत्रच्या उदाहरणाचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला सांत्वन मिळू शकतं. ते कसं? जरा विचार करा, यहोवाला हवं असतं तर त्याने पेत्रच्या चुकांबद्दल बायबलमध्ये लिहून ठेवलं नसतं. पण त्याच्या उदाहरणातून आपल्याला फायदा व्हावा म्हणून त्याने त्या गोष्टीसुद्धा लिहून ठेवल्या. (२ तीम. ३:१६, १७) बायबलमधून आपल्याला कळतं की पेत्रमध्ये आपल्यासारख्याच कमतरता होत्या आणि त्याला आपल्यासारख्याच भावना होत्या. यातून समजतं की यहोवा देव आपल्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. आपल्यामध्ये कमतरता असूनसुद्धा आपण विश्वासात टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत राहावं, अशी त्याची इच्छा आहे.
३. हार न मानता प्रयत्न करत राहणं का गरजेचं आहे?
३ पण टिकून राहणं किंवा प्रयत्न करत राहणं का गरजेचं आहे? अशी एक म्हण आहे की सरावाने माणूस निपूण बनतो. हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या. वाद्य वाजवणारी व्यक्ती ते शिकण्यात बरीच वर्षं घालवते. त्यादरम्यान ती बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने ते वाद्य वाजवते. पण सराव करत राहिल्यामुळे ते वाद्य वाजवण्यात तिला सुधारणा करता येते. ती व्यक्ती वाद्य वाजवण्यात जरी कुशल बनली तरी काही वेळा तिच्याकडून चुकासुद्धा होतात. तरी ती हार मानत नाही तर सराव करत राहते आणि आपली कला सुधारण्याचा प्रयत्न करते. त्याच प्रकारे, आपण जरी आपल्या एखाद्या कमतरतेवर मात केली असली, तरी त्या कमतरतेमुळे पुन्हा आपल्या हातून चूक होऊ शकते. पण तरीसुद्धा आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करत राहण्याची गरज आहे. आपण सगळेच बऱ्याच वेळा असं काहीतरी बोलतो किंवा करतो ज्याचा आपल्याला नंतर पस्तावा होतो. पण आपण जर हार न मानता प्रयत्न करत राहिलो तर यहोवा आपल्याला त्यात सुधारणा करण्यासाठी मदत करेल. (१ पेत्र ५:१०) हार न मानता सुधारणा करण्याच्या बाबतीत पेत्रने कसं उदाहरण मांडलं यावर आपण विचार करू या. त्याच्यामध्ये कमतरता असूनसुद्धा येशूने त्याच्यावर दया केली. हे समजून घेतल्यामुळे आपल्याला यहोवाची सेवा करत राहायचं प्रोत्साहन मिळेल.
पेत्रने केलेल्या चुका आणि त्याला मिळालेले आशीर्वाद
४. लूक ५:५-१० मध्ये पेत्रने स्वतःबद्दल काय म्हटलं पण येशूने त्याला कसा दिलासा दिला?
४ पेत्रने स्वतःला “पापी माणूस” असं का म्हटलं, किंवा असं म्हणत असताना त्याच्या मनात काय होतं याबद्दल बायबलमध्ये काहीही सांगितलेलं नाही. (लूक ५:५-१० वाचा.) पण त्याने नक्कीच काही गंभीर चुका केल्या असतील. पेत्रला त्याच्या कमतरतांमुळे भीती वाटत होती हे येशूला जाणवलं होतं. पण पेत्र त्याला विश्वासू राहील हेही येशूला माहीत होतं. त्यामुळे येशूने प्रेमळपणे पेत्रला म्हटलं, “घाबरू नकोस.” येशूचा आपल्यावर असलेला हा भरवसा पाहून पेत्रच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. पेत्र आणि त्याचा भाऊ अंद्रिया यांनी त्यांचा मासेमारीचा व्यवसाय सोडला आणि ते येशूसोबत पूर्णवेळ सेवा करू लागले. या गोष्टीमुळे यहोवाने त्यांना बऱ्याच मार्गांनी आशीर्वाद दिले.—मार्क १:१६-१८.
५. आपल्या भीतीवर मात केल्यामुळे आणि येशूचा शिष्य बनल्यामुळे पेत्रला कोणते आशीर्वाद मिळाले?
५ येशूचा शिष्य बनल्यामुळे पेत्रला बरेच चांगले अनुभव आले. येशूने जेव्हा आजाऱ्यांना बरं केलं, दुष्ट स्वर्गदूत काढले आणि मेलेल्यांना पुन्हा जिवंत केलं, तेव्हा या गोष्टी पेत्रला स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आल्या. b (मत्त. ८:१४-१७; मार्क ५:३७, ४१, ४२) पेत्रला एक दृष्टान्तसुद्धा पाहायला मिळाला. पुढे येशू राजा झाल्यानंतर त्याचं वैभव कसं असेल हे त्याने पाहिलं. आणि ही गोष्ट तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीच विसरला नसेल. (मार्क ९:१-८; २ पेत्र १:१६-१८) खरंच, येशूचा शिष्य बनल्यामुळे पेत्रला असे आशीर्वाद अनुभवायला मिळाले, ज्यांचा त्याने कधी विचारही केला नव्हता. त्याने त्याच्या कमीपणाच्या भावनेला स्वतःवर हावी होऊ दिलं नाही आणि त्यामुळे त्याला भरपूर आशीर्वाद अनुभवायला मिळाले. या गोष्टीवर विचार करून पेत्रला खरंच किती आनंद झाला असेल!
६. पेत्रला त्याच्या कमतरतांवर लगेच मात करता आली का? स्पष्ट करा.
६ पण इतक्या सगळ्या गोष्टी पाहून आणि ऐकूनसुद्धा पेत्र बऱ्याच वेळा चुकला. याची काही उदाहरणं पाहा. येशू जेव्हा शिष्यांना सांगत होता, की त्याला बायबल भविष्यवाणीनुसार कशा प्रकारे छळलं जाईल आणि मारलं जाईल, तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन गेला आणि रागवला. (मार्क ८:३१-३३) तसंच सगळ्यात श्रेष्ठ कोण, याबद्दल पेत्र आणि इतर शिष्यांमध्ये नेहमी वाद व्हायचा. (मार्क ९:३३, ३४) आणि येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्रीसुद्धा पेत्रने रागाच्या भरात एका माणसाचा कान कापला. (योहा. १८:१०) शिवाय त्याच रात्री पेत्रने येशूला ओळखत असल्याचं तीन वेळा नाकारलं. (मार्क १४:६६-७२) आणि त्यामुळे तो नंतर ढसाढसा रडला.—मत्त. २६:७५.
७. येशूच्या पुनरुत्थानानंतर पेत्रला कोणती संधी देण्यात आली?
७ पण निराश आणि दुःखी झालेल्या आपल्या या प्रेषिताला येशूने सोडलं नाही. येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने पेत्रला त्याचं येशूवर अजूनही प्रेम आहे हे सिद्ध करायची संधी दिली. शिवाय, मेंढपाळ या नात्याने आपल्या मेंढरांची काळजी घ्यायची जबाबदारीसुद्धा येशूने त्याच्यावर सोपवली. (योहा. २१:१५-१७) पेत्रनेसुद्धा आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. पेन्टेकॉस्टच्या दिवशी यरुशलेममध्ये असताना पवित्र शक्तीने ज्या लोकांचा अभिषेक करण्यात आला त्यात पेत्रसुद्धा होता.
८. अंत्युखियात असताना पेत्रने कोणती गंभीर चूक केली?
८ पवित्र शक्तीने अभिषिक्त झाल्यानंतरसुद्धा पेत्रला त्याच्या कमतरतांशी झगडावं लागलं. इ.स. ३६ मध्ये जेव्हा सुंता न झालेल्या कर्नेल्यला पवित्र शक्तीने अभिषिक्त करण्यात आलं तेव्हा पेत्र तिथे होता. यावरून स्पष्ट झालं, की देव लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा “भेदभाव करत नाही” आणि आता यहुदी नसलेले लोकसुद्धा ख्रिस्ती मंडळीचा भाग बनू शकत होते. (प्रे. कार्यं १०:३४, ४४, ४५) या घटनेनंतर पेत्र विदेशी लोकांसोबत वेळ घालवू लागला आणि त्यांच्यासोबत जेवू लागला. ही गोष्ट त्याने आधी कधीच केली नसती. (गलती. २:१२) पण ख्रिस्ती बनलेल्या काही यहुद्यांना वाटायचं की यहुद्यांनी आणि विदेश्यांनी सोबत जेवणं योग्य नाही. आणि असा विचार करणारे लोक जेव्हा अंत्युखियाला आले तेव्हा पेत्रने विदेशी लोकांसोबत जेवायचं थांबवलं. त्याला कदाचित अशी भीती वाटली, की त्याने विदेश्यांसोबत जेवणं हे यहुदी ख्रिश्चनांना आवडणार नाही. पेत्रचा हा ढोंगीपणा पौलच्या लक्षात आला आणि त्याने सगळ्यांसमोर पेत्रची चूक दाखवून दिली. (गलती. २:१३, १४) इतकी मोठी चूक होऊनसुद्धा पेत्र निराश न होता यहोवाची सेवा करत राहिला. मग कोणत्या गोष्टीमुळे त्याला मदत झाली?
पेत्रला हार न मानता प्रयत्न करत राहायला कशामुळे मदत झाली?
९. पेत्र येशूला एकनिष्ठ होता हे योहान ६:६८, ६९ मधून कसं दिसून येतं?
९ पेत्र येशूला एकनिष्ठ होता. आणि काहीही झालं तरी त्याने येशूला सोडलं नाही. एकदा येशूने शिष्यांना अशी एक गोष्ट सांगितली ज्याचा अर्थ त्यांना समजला नाही. (योहान ६:६८, ६९ वाचा.) अशा वेळी येशू आणखी काय स्पष्टीकरण देतो याची वाट पाहण्याऐवजी किंवा त्याला विचारण्याऐवजी बरेचसे शिष्य त्याला सोडून गेले. पण पेत्र येशूला एकनिष्ठ राहिला. कारण त्याने ओळखलं होतं, की “सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी” फक्त येशूजवळच आहेत.
१०. येशूने पेत्रवर भरवसा असल्याचं कसं दाखवलं? (चित्रसुद्धा पाहा.)
१० येशूनेही पेत्रला सोडलं नाही. येशूला हे माहीत होतं, की पृथ्वीवरच्या त्याच्या जीवनाच्या शेवटल्या रात्री पेत्र आणि इतर प्रेषित त्याला सोडून जातील. तरी त्याला खातरी होती, की पेत्र पश्चात्ताप करून पुन्हा त्याच्याकडे परत येईल आणि त्याला विश्वासू राहील. आणि ही गोष्ट त्याने त्याला बोलूनसुद्धा दाखवली होती. (लूक २२:३१, ३२) येशूला समजलं होतं, की त्याच्या शिष्यांचं “मन तर उत्सुक आहे, पण शरीर दुर्बळ आहे.” (मार्क १४:३८) यामुळे पेत्रने येशूला ओळखत असल्याचं नाकारलं, तेव्हासुद्धा येशूने त्याच्यावर भरवसा ठेवला. शिवाय, पुनरुत्थान झाल्यावर येशू पेत्रला अशा वेळी भेटला जेव्हा पेत्र एकटा होता. (मार्क १६:७; लूक २४:३४; १ करिंथ. १५:५) दुःखात बुडालेल्या या शिष्याला त्यामुळे खरंच किती दिलासा मिळाला असेल!
११. यहोवा आपल्या गरजा नेहमी पूर्ण करेल याची येशूने पेत्रला कशी खातरी करून दिली?
११ येशूने पेत्रला याचीही खातरी करून दिली, की यहोवा त्याच्या गरजा नेहमी पूर्ण करेल. पुनरुत्थान झाल्यावर येशूने पुन्हा एकदा पेत्र आणि इतर शिष्यांसाठी चमत्कार केला आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मासे पकडता आले. (योहा. २१:४-६) या चमत्कारानंतर पेत्रला नक्कीच याची खातरी पटली असेल, की यहोवा आपल्या गरजा अगदी सहजपणे पूर्ण करू शकतो. त्या वेळी त्याला कदाचित येशूचे शब्दही आठवले असतील. येशूने म्हटलं होतं, की जे ‘आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करतात’ त्यांच्या गरजा यहोवा नक्की पूर्ण करेल. (मत्त. ६:३३) आणि यामुळेच पेत्रने पुढे मासेमारीच्या व्यवसायाला नाही, तर सेवाकार्याला त्याच्या जीवनात पहिलं स्थान दिलं. इ.स. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या दिवशी त्याने धैर्याने साक्ष दिली आणि त्यामुळे हजारो लोकांनी आनंदाचा संदेश स्वीकारला. (प्रे. कार्यं २:१४, ३७-४१) त्यानंतर त्याने शोमरोनी आणि विदेशी लोकांनासुद्धा येशूबद्दल शिकायला आणि त्याचं अनुकरण करायला मदत केली. (प्रे. कार्यं ८:१४-१७; १०:४४-४८) खरंच, वेगवेगळ्या संस्कृतीच्या आणि पार्श्वभूमीच्या लोकांना मंडळीत आणण्यासाठी यहोवाने पेत्रचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला.
आपण काय शिकतो?
१२. बऱ्याच काळापासून आपण एखाद्या कमतरतेवर मात करायचा प्रयत्न करत असू तर पेत्रसारखं आपण कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकतो?
१२ हार न मानता टिकून राहायला यहोवा आपल्याला मदत करतो. पण हे नेहमीच सोपं नसतं, खासकरून जेव्हा आपण बऱ्याच काळापासून एखाद्या कमतरतेवर मात करायचा प्रयत्न करत असतो तेव्हा. आपल्याला असंही वाटू शकतं, की पेत्रने ज्या कमतरतांचा सामना केला, त्यापेक्षा आपल्या कमतरतांचा सामना करणं जास्त कठीण आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की अशा वेळी हार न मानता प्रयत्न करत राहायला यहोवा आपल्याला मदत करेल. (स्तो. ९४:१७-१९) उदाहरणार्थ, आपला एक भाऊ सत्य शिकण्याआधी बऱ्याच वर्षांपासून समलिंगी जीवन जगत होता. पण बायबलचं सत्य शिकल्यानंतर त्याने या अनैतिक सवयी सोडून दिल्या आणि जीवनात मोठे बदल केले. पण त्याला आजही काही वेळा चुकीच्या इच्छांशी झगडावं लागतं. पण हार न मानता प्रयत्न करत राहायला कोणत्या गोष्टीमुळे त्याला मदत होते? याबद्दल तो म्हणतो: “यासाठी यहोवा नेहमी आपल्याला बळ देतो. यहोवाच्या पवित्र शक्तीच्या मदतीने . . . आपण सत्याच्या मार्गावर चालत राहू शकतो. . . . यहोवा आजही त्याच्या सेवेसाठी माझा उपयोग करत आहे. आणि माझ्यात कमतरता असतानाही त्यांच्याशी झगडत राहायला तो मला ताकद देत आलाय.”
१३. प्रेषितांची कार्यं ४:१३, २९, ३१ यांत सांगितल्याप्रमाणे आपण पेत्रच्या उदाहरणाचं कसं अनुकरण करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ आत्तापर्यंत आपण पाहिलं, की पेत्र बऱ्याच वेळा माणसांच्या भीतीला बळी पडला. पण त्याने यहोवाकडे धैर्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणून त्याला धैर्य दाखवता आलं. (प्रेषितांची कार्यं ४:१३, २९, ३१ वाचा.) आपणसुद्धा आपल्या भीतीवर मात करू शकतो. हॉर्स्ट नावाच्या एका भावाच्या बाबतीत काय घडलं त्याचा विचार करा. ते तरुण होते तेव्हा ते जर्मनीत राहत होते. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. त्यांनी बऱ्याच वेळा शाळेतल्या शिक्षकांना आणि मुलांना घाबरून “हेल हिटलर,” म्हणजे ‘हिटलर आमचा बचाव करो’ असं म्हटलं होतं. हॉर्स्ट यांच्या आईवडिलांना जेव्हा हे कळलं, तेव्हा ते त्यांना रागवले नाहीत. उलट हॉर्स्ट यांना धैर्य दाखवता यावं म्हणून त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासोबत मिळून यहोवाकडे प्रार्थना केली. आईवडिलांच्या मदतीमुळे आणि यहोवावर विसंबून राहिल्यामुळे हॉर्स्ट यांना पुढे धैर्य दाखवता आलं आणि ते यहोवाला विश्वासू राहिले. ते नंतर म्हणाले, “यहोवाने मला कधीच सोडलं नाही.” c
१४. प्रेमळ मेंढपाळ निराश झालेल्या भाऊबहिणींना कशी हिंमत देऊ शकतात?
१४ यहोवा आणि येशू काहीही झालं तरी आपल्याला एकटं सोडणार नाहीत. पुन्हा पेत्रच्या उदाहरणावर विचार करा. पेत्रने येशूला नाकारल्यानंतर तो त्याच्या जीवनाच्या एका अतिशय कठीण वळणावर होता. त्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. तो येशूला सोडून देणार होता, की पुढेही त्याचा शिष्य बनून राहणार होता? पेत्रला विश्वासात टिकून राहता यावं म्हणून येशूने यहोवाकडे याचना केली होती. याबद्दल येशूने नंतर त्याला सांगितलं आणि याची खातरी करून दिली, की पुढे तो त्याच्या बांधवांचा विश्वास मजबूत करेल. (लूक २२:३१, ३२) पेत्रला जेव्हा येशूचे हे शब्द आठवले असतील, तेव्हा त्याला नक्कीच खूप हिंमत मिळाली असेल. असं होऊ शकतं, की आपणही आपल्या आयुष्याच्या एखाद्या कठीण वळणावर असू. अशा वेळी आपल्याला विश्वासू राहायला हिंमत देण्यासाठी यहोवा कदाचित प्रेमळ मेंढपाळांचा उपयोग करेल. (इफिस. ४:८, ११) बऱ्याच वर्षांपासून वडील म्हणून सेवा करणारे पॉल नावाचे भाऊ मंडळीतल्या भाऊबहिणींना सांत्वन द्यायचं काम करत आहेत. जे भाऊबहीण निराश झाले आहेत आणि यहोवाला सोडून द्यायच्या मार्गावर आहेत, त्यांना ते प्रोत्साहन देतात. ते या भाऊबहिणींना यहोवाने त्यांना सुरुवातीला सत्याकडे कसं आकर्षित केलं होतं यावर विचार करायला सांगतात. आणि मग ते त्यांना या गोष्टीची खातरी करून देतात, की यहोवा त्याच्या एकनिष्ठ प्रेमामुळे त्यांना कधीच सोडणार नाही. शेवटी ते म्हणतात: “मी निराश झालेल्या अशा बऱ्याच भाऊबहिणींना पाहिलंय जे यहोवाच्या मदतीने त्याची सेवा पुन्हा करू लागले आहेत.”
१५. मत्तय ६:३३ मधले शब्द खरे आहेत हे आपल्याला पेत्र आणि बंधू हॉर्स्ट यांच्या उदाहरणातून कसं कळतं?
१५ यहोवाने पेत्र आणि इतर प्रेषितांच्या गरजा पूर्ण केल्या. आपणसुद्धा आपल्या जीवनात देवाच्या राज्याला पहिलं स्थान दिलं, तर यहोवा आपल्याही गरजा पूर्ण करेल. (मत्त. ६:३३) आधी उल्लेख केलेल्या हॉर्स्ट यांनी दुसरं महायुद्ध संपल्यानंतर पायनियर सेवा करायचा विचार केला. त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती. आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करता येतील का आणि पूर्णवेळच्या सेवेत टिकून राहता येईल का, अशी शंका त्यांना होती. अशा वेळी त्यांनी काय केलं? त्यांनी यहोवाला पारखून पाहायचं ठरवलं. विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीदरम्यान संपूर्ण आठवडा त्यांनी सेवाकार्यात घालवला. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. विभागीय पर्यवेक्षकांनी त्यांना पैसे असलेला एका लिफाफा दिला. पण तो लिफाफा कोणी दिलाय हे त्यांनी सांगितलं नाही. त्यामध्ये इतके पैसे होते, की हॉर्स्ट यांना बरेच महिने पायनियर सेवा करता येणार होती. यहोवाकडून मिळालेल्या या भेटीमुळे त्यांना या गोष्टीची खातरी पटली, की यहोवा पुढेही त्यांची काळजी घेत राहील. नंतर त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात देवाच्या राज्याला पहिलं स्थान दिलं.—मला. ३:१०.
१६. पेत्रच्या उदाहरणाकडे आणि त्याने लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देणं का फायद्याचं आहे?
१६ पेत्रने ‘माझ्यापासून दूर जा’ असं म्हटल्यानंतरही येशू त्याला सोडून गेला नाही, या गोष्टीचा पेत्रला किती आनंद झाला असेल! येशू ख्रिस्त पुढेही पेत्रला एक विश्वासू प्रेषित म्हणून सेवा करण्यासाठी आणि ख्रिश्चनांसमोर एक चांगलं उदाहरण मांडण्यासाठी प्रशिक्षण देत राहिला. त्याने पेत्रला जे प्रशिक्षण दिलं त्यातून आपल्यालाही बरंच काही शिकायला मिळतं. पेत्रने त्याला शिकायला मिळालेल्या काही गोष्टींचा पहिल्या शतकातल्या मंडळ्यांना लिहिलेल्या दोन पत्रांमध्ये उल्लेख केलाय. पुढच्या लेखात आपण या पत्रांमध्ये लिहिलेल्या काही गोष्टींवर चर्चा करू या आणि आज त्या आपल्याला कशा लागू करता येतील ते पाहू या.
गीत १२६ जागे राहा, सावध व बलशाली व्हा!
a जे आपल्या कमतरतांशी झगडत आहेत त्यांच्यासाठी खासकरून हा लेख तयार करण्यात आलाय. असे भाऊबहीण आपल्या कमतरतांवर कशी मात करू शकतात आणि विश्वासूपणे यहोवाची सेवा कशी करत राहू शकतात हे या लेखात सांगण्यात आलंय.
b या लेखातली बरीचशी वचनं मार्कच्या शुभवर्तमानातून घेण्यात आली आहेत. मार्कने लिहिलेल्या गोष्टी बहुतेक त्याने पेत्रकडून ऐकल्या असाव्यात आणि पेत्र स्वतः या घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार होता.
c हॉर्स्ट हेन्शल यांच्याविषयी आणखी माहिती घेण्यासाठी jw.org वर “हॉर्स्ट हेन्शल—यहोवा माझ्यासाठी एक बळकट दुर्ग आहे” हा व्हिडिओ पाहा.
d चित्राचं वर्णन: नाट्यरूपांतरात दाखवल्याप्रमाणे हॉर्स्ट हेन्शल यांच्या आईवडिलांनी यहोवाला प्रार्थना केली आणि त्याला विश्वासू राहायचा हॉर्स्ट यांचा निर्धार पक्का केला.