व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३९

सौम्यता​—तुमची खरी ताकद!

सौम्यता​—तुमची खरी ताकद!

‘प्रभूच्या दासाला भांडण करायची गरज नाही, तर तो सगळ्यांशी सौम्यतेने वागणारा असावा.’—२ तीम. २:२४.

गीत ११३ शांतीचा ठेवा

सारांश a

१. शाळा-कॉलेजमध्ये किंवा कामावर आपल्याला कशाबद्दल विचारलं जाऊ शकतं?

 शाळा-कॉलेजमधले किंवा तुमच्या कामावरचे लोक जेव्हा तुम्हाला तुमच्या विश्‍वासाबद्दल विचारतात, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला अवघडल्यासारखं वाटतं का? आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना असं वाटतं. पण लोक जेव्हा अशा प्रकारचे प्रश्‍न विचारतात, तेव्हा ते कसा विचार करतात याबद्दल किंवा त्यांच्या विश्‍वासाबद्दल आपल्याला बऱ्‍याच गोष्टी समजू शकतात. आणि त्यामुळे त्यांना साक्ष द्यायची चांगली संधी आपल्याला मिळू शकते. पण नेहमीच असं होत नाही. कधीकधी काही जण फक्‍त आपल्याशी वाद घालण्याच्या हेतूने आपल्याला प्रश्‍न विचारतात. पण आपल्याला त्याचं आश्‍चर्य वाटत नाही. कारण काही जणांना आपल्या विश्‍वासाबद्दल चुकीची माहिती देण्यात आली आहे. (प्रे. कार्यं २८:२२) शिवाय, आपण “शेवटच्या दिवसांत” म्हणजे अशा एका काळात जगत आहोत, जिथे लोक “कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे” आणि “क्रूर” आहेत.—२ तीम. ३:१, ३.

२. सौम्यता हा गुण वाढवणं का गरजेचं आहे?

पण जेव्हा कोणी तुमच्या विश्‍वासाबद्दल प्रश्‍न विचारून तुमच्याशी वाद घालायचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्ही त्याला शांतपणे आणि समंजसपणे कसं उत्तर देऊ शकता? अशा वेळी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल? एका शब्दात सांगायचं झालं तर, सौम्यता! सौम्यतेने वागणाऱ्‍या व्यक्‍तीला जेव्हा कोणी राग येईल असं काहीतरी बोलतं किंवा एखाद्याला कसं उत्तर द्यायचं हे तिला समजत नसतं, तेव्हा ती लगेच अस्वस्थ होत नाही. तर तिचं स्वतःवर नियंत्रण असतं. (नीति. १६:३२) पण तुम्ही कदाचित म्हणाल, की हे बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. मग सौम्यतेचा गुण तुम्ही स्वतःमध्ये कसा वाढवू शकता? जेव्हा तुम्हाला कोणी तुमच्या विश्‍वासाबद्दल प्रश्‍न विचारून वाद घालायचा प्रयत्न करतं, तेव्हा तुम्ही त्याला सौम्यतेने कसं उत्तर देऊ शकता? तुम्हाला जर मुलं असतील तर आपल्या विश्‍वासाबद्दल सौम्यतेने बोलण्यासाठी तुम्ही त्यांना कसं शिकवू शकता? चला याबद्दल आता आपण पाहू या.

तुम्ही सौम्यता हा गुण कशा प्रकारे वाढवू शकता?

३. सौम्यतेने वागणारी व्यक्‍ती कमजोर नसते असं का म्हणता येईल? (२ तीमथ्य २:२४, २५)

सौम्यता ही एखाद्या व्यक्‍तीची कमजोरी नसून खरंतर तिची ताकद आहे! एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करत असताना शांत राहण्यासाठी मनोबल भक्कम असावं लागतं. शिवाय, सौम्यता हा गुण ‘पवित्र शक्‍तीच्या फळाचाच’ एक पैलू आहे. (गलती. ५:२२, २३) ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर “सौम्यता” असं करण्यात आलंय, तो शब्द काही वेळा अशा जंगली घोड्यासाठी वापरण्यात आलाय, ज्याला पाळीव प्राणी बनवण्यात येतं. म्हणजे त्याच्यावर ताबा मिळवून त्याला शांत केलं जातं. पण तो शांत जरी दिसत असला तरी तो खूप शक्‍तिशाली असतो. सौम्यतेने वागणारी व्यक्‍तीसुद्धा अशीच असते. मग सौम्यता हा गुण आपण कसा वाढवू शकतो आणि त्याच वेळी स्थिर आणि खंबीर कसं राहू शकतो? ही गोष्ट आपण फक्‍त आपल्या इच्छाशक्‍तीच्या बळावर करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला देवाच्या पवित्र शक्‍तीसाठी प्रार्थना करावी लागेल आणि हा सुंदर गुण वाढवण्यासाठी त्याच्याकडे मदत मागावी लागेल. आपल्या बऱ्‍याच भाऊबहिणींनी हा गुण स्वतःमध्ये वाढवलाय. जेव्हा-जेव्हा विरोधकांनी त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा-तेव्हा त्यांनी अतिशय सौम्यतेने उत्तर दिलं. त्यामुळे इतरांवर त्यांचा खूप चांगला प्रभाव पडला. (२ तीमथ्य २:२४, २५ वाचा.) मग सौम्यता हा गुण स्वतःमध्ये वाढवण्यासाठी आणि त्याच वेळी खंबीर राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

४. सौम्यतेने वागण्याच्या बाबतीत आपण इसहाकच्या उदाहरणातून काय शिकू शकतो?

सौम्य वृत्ती असणं का महत्त्वाचं आहे, हे आपल्याला बायबलच्या बऱ्‍याच अहवालांमधून कळतं. इसहाकचं उदाहरण घ्या. तो जेव्हा गरार नावाच्या पलिष्टी शहरात राहत होता, तेव्हा त्याच्या आसपास राहणाऱ्‍या पलिष्टी लोकांना त्याचा हेवा वाटू लागला. म्हणून त्यांनी त्याच्या वडिलांनी म्हणजे अब्राहामने बांधलेल्या विहिरी बुजवून टाकल्या. पण त्या विहिरी परत मिळवण्यासाठी इसहाक त्यांच्याशी वाद घालत बसला नाही. त्याऐवजी तो आपल्या कुटुंबाला घेऊन दुसऱ्‍या ठिकाणी राहायला गेला. आणि तिथे त्याने आणखी विहिरी खोदल्या. (उत्प. २६:१२-१८) पण तिथेसुद्धा पलिष्टी लोकांनी या विहिरी आपल्या असल्याचा दावा करून त्याच्याशी भांडण केलं. पण तरीसुद्धा इसहाक त्यांच्याशी शांतीने वागला. (उत्प. २६:१९-२५) मग पलिष्टी लोक त्याला भडकवायचा प्रयत्न करत असतानासुद्धा तो शांत कसा काय राहू शकला? ही गोष्ट तो नक्कीच आपल्या आईवडिलांकडून शिकला असेल. कारण अब्राहाम नेहमी इतरांशी शांतीने वागायचा आणि सारानेसुद्धा ती नेहमी ‘शांत आणि सौम्य’ असल्याचं दाखवून दिलं होतं.—१ पेत्र ३:४-६; उत्प. २१:२२-३४.

५. ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना सौम्यतेने वागण्याचं महत्त्व कसं शिकवू शकतात? उदाहरण द्या.

ख्रिस्ती पालकांनो, सौम्यतेने वागणं का महत्त्वाचं आहे हे तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना शिकवू शकता. १७ वर्षांच्या मॅक्सनचंच उदाहरण घ्या. त्याला शाळेत आणि प्रचारकार्यात अशा लोकांना तोंड द्यावं लागायचं, जे त्याच्यावर चिडायचे. पण अशा वेळी सौम्यतेने वागायला त्याच्या पालकांनी त्याला धीराने मदत केली. ते म्हणतात: “मॅक्सनला हे चांगलं समजलंय, की जेव्हा आपल्याला राग येईल असं कोणीतरी वागतं तेव्हा रागाने जशास तसं उत्तर देण्याऐवजी किंवा हिंसेने वागण्याऐवजी शांत राहण्यातच खरी ताकद आहे.” किती आनंदाची गोष्ट आहे की मॅक्सनला आता हे समजलंय, की सौम्यतेने वागणं ही कमजोरी नसून खरी ताकद आहे.

६. सौम्यतेने वागण्यासाठी आपल्याला प्रार्थनेमुळे कशी मदत होऊ शकते?

इतर जण जेव्हा आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करतात, जसं की कोणीतरी आपल्या देवाबद्दल वाईट बोलू लागतो किंवा बायबलची टीका करू लागतो, तेव्हा आपण काय करू शकतो? अशा वेळी सौम्यतेने उत्तर देता यावं म्हणून आपण यहोवाकडे पवित्र शक्‍तीसाठी आणि त्याच्या बुद्धीसाठी प्रार्थना केली पाहिजे. पण जसं उत्तर द्यायला हवं होतं तसं आपल्याला देता आलं नाही तर काय? तेव्हासुद्धा आपण यहोवाला पुन्हा प्रार्थना करू शकतो, आणि पुढच्या वेळी आणखी चांगल्या प्रकारे कसं उत्तर देता येईल यावर विचार करू शकतो. असं केल्यामुळे यहोवा आपल्याला त्याची पवित्र शक्‍ती देईल. त्यामुळे आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येईल आणि सौम्यतेने उत्तर देता येईल.

७. बायबलची काही वचनं लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला आपल्या वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवायला कशी मदत होऊ शकते? (नीतिवचनं १५:१, १८)

कठीण परिस्थितीत आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बायबलची काही वचनं आपल्याला मदत करू शकतात. अशा वेळी देवाची पवित्र शक्‍ती आपल्याला त्या वचनांची आठवण करून देईल. (योहा. १४:२६) उदाहरणार्थ, बायबलमधल्या नीतिवचनं या पुस्तकात अशी काही तत्त्वं देण्यात आली आहेत, ज्यांमुळे आपल्याला सौम्यतेने वागायला मदत होऊ शकते. (नीतिवचनं १५:१, १८ वाचा.) या पुस्तकात तणावपूर्ण परिस्थितीत शांत राहिल्यामुळे कसा फायदा होऊ शकतो, याबद्दलसुद्धा सांगण्यात आलंय.—नीति. १०:१९; १७:२७; २१:२३; २५:१५.

सखोल समज सौम्यतेने वागायला कशी मदत करू शकते?

८. सखोल समज असणं का गरजेचं आहे?

सखोल समज आपल्याला सौम्यतेने वागायला मदत करू शकते. (नीति. १९:११) सखोल समज असणाऱ्‍या व्यक्‍तीला जेव्हा तिच्या विश्‍वासाबद्दल प्रश्‍न विचारला जातो किंवा तिची टीका केली जाते, तेव्हा ती शांत राहते. काही प्रश्‍न हे समुद्रात असणाऱ्‍या हिमनगासारखे (बर्फाच्या पर्वतांसारखे) असतात. त्यांचा अतिशय थोडा भाग पाण्यावर दिसत असला, तरी बराचसा भाग हा पाण्याखाली असतो. त्याचप्रमाणे एखादी व्यक्‍ती जेव्हा प्रश्‍न विचारते, तेव्हा त्यामागचा खरा हेतू कदाचित आपल्याला लगेच समजणार नाही. म्हणून अशा प्रश्‍नांची उत्तरं देण्याआधी आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, त्या व्यक्‍तीचा प्रश्‍न विचारण्यामागचा नेमका हेतू काय आहे, हे कदाचित आपल्याला लगेच समजणार नाही.—नीति. १६:२३.

९. एफ्राईमच्या माणसांसोबत बोलताना गिदोनने सखोल समज असल्याचं कसं दाखवलं आणि सौम्यतेने कसं उत्तर दिलं?

एफ्राईमच्या माणसांसोबत बोलत असताना गिदोनने त्यांना कसं उत्तर दिलं त्याचा विचार करा. इस्राएलच्या शत्रूंसोबत लढण्यासाठी त्यांना आधीच का बोलवण्यात आलं नाही, याचा त्यांना खूप राग आला होता. पण त्यांना राग येण्यामागचं नेमकं कारण काय होतं? त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असेल का? कदाचित. पण गिदोनने त्यांच्या भावनांचा आदर केला आणि त्यांना सौम्यतेने उत्तर दिलं. याचा काय परिणाम झाला? बायबलमध्ये म्हटलंय, की “त्यांचा राग शांत झाला.”—शास्ते ८:१-३.

१०. एखाद्याने विचारलेल्या प्रश्‍नाचं उत्तर कसं द्यायचं हे समजून घ्यायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (१ पेत्र ३:१५)

१० शाळा-कॉलेजमधली किंवा कामावरची एखादी व्यक्‍ती आपण बायबलच्या स्तरांप्रमाणे का चालतो, याबद्दल कदाचित आपल्याला प्रश्‍न विचारेल. अशा वेळी आपण आपल्या विश्‍वासाबद्दल जितकं चांगल्या प्रकारे सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न तर करूच, पण त्यासोबतच तिच्या मतांचासुद्धा आदर करू. (१ पेत्र ३:१५ वाचा.) एखाद्याने आपल्याला फक्‍त आपली टीका करण्यासाठी किंवा आपला विरोध करण्यासाठी प्रश्‍न विचारलाय, असं समजू नका. उलट, त्याच्या प्रश्‍नामुळे त्याला कोणती गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते, हे समजून घ्यायला आपल्याला मदत होते. एखाद्याने आपल्याला कोणत्याही हेतूने प्रश्‍न विचारलेला असला, तरी आपण त्याचं उत्तर सौम्यतेने आणि प्रेमळपणे दिलं पाहिजे. असं केल्यामुळे त्या व्यक्‍तीला स्वतःच्या मतावर पुन्हा विचार करण्याची प्रेरणा मिळू शकते. एखाद्याने विचारलेला प्रश्‍न, खोचकपणे किंवा टीका करण्याच्या उद्देशाने विचारलाय असं जरी वाटत असलं, तरी त्या प्रश्‍नाचं उत्तर प्रेमळपणे देण्याचा आपला उद्देश असला पाहिजे.—रोम. १२:१७.

एखादी व्यक्‍ती आपल्याला वाढदिवसाच्या पार्टीला का बोलवत आहे याचा जर आपण विचार केला, तर आपल्याला समंजसपणे उत्तर द्यायला मदत होईल (परिच्छेद ११-१२ पाहा)

११-१२. (क) एखादा कठीण प्रश्‍न विचारला जातो तेव्हा आपण कोणत्या गोष्टीवर विचार केला पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.) (ख) एखाद्याने विचारलेल्या प्रश्‍नामुळे कशा प्रकारे चांगली चर्चा सुरू होऊ शकते याचं एक उदाहरण द्या.

११ कामावरची एखादी व्यक्‍ती कदाचित आपल्याला विचारेल की आपण वाढदिवस साजरा का करत नाही? अशा वेळी तिला लगेच उत्तर देण्याऐवजी ती असा प्रश्‍न का विचारत आहे याचा आपण विचार करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला मौजमजाच करू दिली जात नाही असं तिला वाटत असेल का? किंवा आपण वाढदिवस साजरा करण्यामध्ये भाग घेत नसल्यामुळे कामावरचं मैत्रीपूर्ण वातावरण बिघडेल अशी काळजी तिला वाटत असेल का? कामावरच्या लोकांबद्दल त्या व्यक्‍तीला किती काळजी आहे याबद्दल आपण तिची प्रशंसा करू शकतो. तसंच आपल्यालासुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात काम करायला आवडतं हेही तिला आपण सांगू शकतो. असं केल्यामुळे त्या व्यक्‍तीला वाटणारी काळजी कदाचित आपल्याला थोडी कमी करता येईल. आणि यामुळे ती आपलं ऐकून घ्यायला तयार होईल आणि वाढदिवसाबद्दल बायबलमधून काय कळतं हे त्या व्यक्‍तीला निवांतपणे सांगायची संधीसुद्धा आपल्याला मिळेल.

१२ आपल्याला इतरही असे काही प्रश्‍न विचारले जाऊ शकतात, ज्यांमुळे वाद निर्माण होऊ शकतो. अशा वेळी आपण अशाच प्रकारे विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, एखादा शाळासोबती असा दबाव टाकेल, की यहोवाच्या साक्षीदारांनी समलिंगी लोकांबद्दलचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. अशा वेळी आपण विचार केला पाहिजे की यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काही गैरसमज असल्यामुळे तो असं बोलतोय का? की त्याचा एखादा मित्र किंवा नातेवाईक समलिंगी आहे? समलिंगी लोकांबद्दल आपल्या मनात काहीच प्रेम नाही असं त्याला वाटतंय का? आपल्याला त्याला या गोष्टीची खातरी करून द्यावी लागेल, की आपल्याला सगळ्या लोकांबद्दल काळजी वाटते. आणि प्रत्येक व्यक्‍तीला स्वतःचे निर्णय घ्यायचा अधिकार आहे हे आपण मान्य करतो. b (१ पेत्र २:१७) आणि मग आपण बायबलच्या स्तरांप्रमाणे जीवन जगल्यामुळे कसा फायदा होतो हे कदाचित त्यांना सांगू शकतो.

१३. देवाला न मानणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीला तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता?

१३ एखादा आपल्या विश्‍वासाशी बिलकूल सहमत नसेल, तेव्हा आपण असा लगेच विचार करू नये, की ‘तो काय मानतो हे मला चांगलं माहिती आहे.’ (तीत ३:२) उदाहरणार्थ, शाळेतला एखादा वर्गमित्र तुम्हाला असं म्हणाला, की ‘देवाला मानणं हे मूर्खपणाचं आहे’ तर काय? अशा वेळी तुम्ही असं मानावं का, की त्याला उत्क्रांतीवर विश्‍वास आहे आणि त्याबद्दल त्याला सगळं काही माहीत आहे? कदाचित असं होऊ शकतं की त्याला याबद्दल काहीच माहीत नसेल आणि फक्‍त ऐकलेल्या गोष्टीच तो बोलत असेल. त्यामुळे उत्क्रांती बरोबर आहे की चूक, या गोष्टीवर त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा तुम्ही त्याला असं काहीतरी देऊ शकता ज्यावर तो विचार करू शकेल. उदाहरणार्थ, jw.org वर निर्मितीबद्दल किंवा सृष्टीबद्दल असलेला एखादा लेख किंवा व्हिडिओ तुम्ही त्याला दाखवू शकता. तो कदाचित ते पाहील आणि मग तुमच्यासोबत चर्चा करायला तयार होईल. अशा प्रकारे आपण इतरांसोबत जेव्हा आदराने बोलतो तेव्हा बायबलबद्दल जास्त जाणून घ्यायला ते तयार होतात.

१४. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आपल्या वर्गसोबत्याचा गैरसमज दूर करायला नीलने jw.org वेबसाईटचा कशा प्रकारे चांगला वापर केला?

१४ यहोवाच्या साक्षीदारांबद्दल असलेले गैरसमज दूर करायला नील नावाच्या एका साक्षीदार मुलाने आपल्या वेबसाईटचा उपयोग कसा केला याकडे लक्ष द्या. तो म्हणतो, “माझ्या वर्गातला एक मुलगा मला नेहमी म्हणायचा, की मी कथा-कहाण्यांच्या पुस्तकावर [म्हणजे बायबलवर] भरवसा ठेवत असल्यामुळे विज्ञानाला मानत नाही.” आणि नील जेव्हा त्याला काही सांगायचा प्रयत्न करायचा तेव्हा तो ऐकून घ्यायला तयार नसायचा. म्हणून मग नीलने jw.org वर असलेल्या “विज्ञान आणि बायबल” या भागात दिलेल्या माहितीकडे त्याचं लक्ष वळवलं. नंतर नीलला जाणवलं की त्या मुलाने ती माहिती पूर्ण वाचली आहे. आणि त्यामुळेच जीवनाची सुरुवात कशी झाली याबद्दल तो नीलसोबत चर्चा करायला तयार झाला. तुम्हालाही कदाचित अशा प्रकारचे चांगले अनुभव येतील.

संपूर्ण कुटुंब मिळून सराव करा

१५. पालक आपल्या मुलांना सौम्यतेने उत्तर द्यायला कशा प्रकारे शिकवू शकतात?

१५ आपल्या विश्‍वासाबद्दल जेव्हा प्रश्‍न विचारले जातात तेव्हा त्या प्रश्‍नांचं सौम्यतेने कसं उत्तर देता येईल, हे पालक शाळेत जाणाऱ्‍या आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतात. (याको. ३:१३) त्यासाठी काही पालक आपल्या कौटुंबिक उपासनेच्या वेळी आपल्या मुलांसोबत चर्चासुद्धा करतात. आपल्या मुलांना कोणत्या विषयांवर प्रश्‍न विचारले जातील या गोष्टीचा ते विचार करतात. आणि या प्रश्‍नांची उत्तरं सौम्यतेने आणि इतर जण ऐकून घ्यायला तयार होतील, अशा प्रकारे कशी देता येतील याबद्दल ते मुलांसोबत मिळून चर्चा करतात. तसंच, ते त्यांच्यासोबत चांगला सराव करतात.—“ सराव केल्यामुळे फायदा होऊ शकतो” ही चौकट पाहा.

१६-१७. सराव केल्यामुळे तरुणांना कशा प्रकारे मदत होऊ शकते?

१६ पालक जेव्हा अशा प्रकारे मुलांसोबत सराव करतात, तेव्हा मुलांना आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांसोबत पूर्ण खातरीने बोलता येतं. शिवाय आपण जे मानतो, ते का मानतो याबद्दल स्वतःला  खातरी करून द्यायलाही त्यांना मदत होऊ शकते. jw.org वर “तरुण लोक विचारतात” या लेखमालिकेत तरुणांसाठी काही वर्कशिटसुद्धा देण्यात आल्या आहेत. या वर्कशिट अशा प्रकारे बनवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तरुणांना आपला विश्‍वास आणखी मजबूत करायला आणि आपल्या विश्‍वासाबद्दल विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्यायला मदत होईल. याशिवाय, या लेखमालिकेचा घरच्यांसोबत मिळून अभ्यास केल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच सौम्यतेने आणि लोक आपलं ऐकून घेतील अशा प्रकारे उत्तरं द्यायला मदत होईल.

१७ सराव केल्यामुळे मॅथ्यू नावाच्या एका तरुण भावाला कशा प्रकारे मदत झाली ते तो सांगतो. कौटुंबिक उपासनेचा भाग म्हणून तो आणि त्याचे आईवडील अशा विषयांवर संशोधन करायचे जे त्याच्या शाळेत विचारले जाऊ शकतात. तो म्हणतो: “शाळेत कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होईल याबद्दल आम्ही विचार करतो. आणि आम्ही जे संशोधन केलंय त्याच्या आधारावर या परिस्थितीला कसं हाताळता येईल याचा सराव करतो. एखादी गोष्ट मी का मानतो हे जेव्हा मला चांगल्या प्रकारे माहीत असतं तेव्हा माझा आत्मविश्‍वास वाढतो. आणि मग मला बोलायला भीती वाटत नाही आणि सौम्यतेने बोलायला मला मदत होते.”

१८. कलस्सैकर ४:६ या वचनातून आपल्याला कोणत्या गोष्टीचं महत्त्व कळतं?

१८ आपण जरी एखाद्याला कितीही चांगल्या प्रकारे किंवा स्पष्टपणे आपल्या विश्‍वासाबद्दल सांगायचा प्रयत्न केला तरी ते तो मान्य करेलच असं नाही. पण तरीही सौम्यतेने आणि समंजसपणे बोलणं नेहमी चांगलंच. (कलस्सैकर ४:६ वाचा.) एखाद्यासोबत आपल्या विश्‍वासाबद्दल बोलणं हे खेळताना त्याच्याकडे बॉल फेकण्यासारखं आहे. आपण तो बॉल त्याच्याकडे अगदी अलगदपणे फेकू शकतो किंवा जोरात फेकू शकतो. आपण जर बॉल अलगदपणे फेकला तर त्याला तो झेलता येईल आणि आपल्यासोबत खेळता येईल. त्याचप्रमाणे आपण जर दुसऱ्‍यांसोबत बोलताना समंजसपणे आणि सौम्यतेने बोललो, तर इतर जण आपलं ऐकून घ्यायला तयार असतील आणि चर्चा पुढे सुरू राहील. पण एखाद्याला आपल्या विश्‍वासाबद्दल वादच घालायचा असेल किंवा टीकाच करायची असेल, तर आपल्याला त्याच्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर देण्याची गरज नाही. (नीति. २६:४) पण अशी व्यक्‍ती क्वचितच भेटते. सहसा लोक ऐकून घ्यायला तयार असतात.

१९. कोणती गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला सौम्यतेने उत्तर द्यायला मदत होईल?

१९ तर मग, सौम्यतेने बोलल्यामुळे आपल्याला बरेच फायदे होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा आपल्याला आपल्या विश्‍वासाबद्दल प्रश्‍न विचारले जातात किंवा खोचकपणे आपली टीका केली जाते, तेव्हा शांत राहण्यासाठी आणि सौम्यतेने उत्तर देण्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करा. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर सौम्यतेने उत्तर दिलं तर वाद होणार नाहीत. मग तुमची मतं वेगवेगळी असली तरीही. शिवाय तुमच्या सौम्य आणि आदरपूर्वक उत्तरामुळे एखादी व्यक्‍ती आपला दृष्टिकोन बदलायला किंवा बायबलचं सत्य समजून घ्यायला तयार होऊ शकते. त्यामुळे आपल्या विश्‍वासाबद्दल विचारलं जातं, तेव्हा “उत्तर देण्यासाठी नेहमी तयार राहा, पण सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून असं करा.” (१ पेत्र ३:१५) नेहमी लक्षात ठेवा, सौम्यता ही तुमची कमजोरी नाही, तर तुमची ताकद आहे!

गीत ८८ तुझे मार्ग मला शिकव

a आपल्या विश्‍वासाबद्दल प्रश्‍न विचारले जातात किंवा आक्षेप घेतला जातो, तेव्हा आपण त्यांना सौम्यतेने उत्तर कसं देऊ शकतो, याबद्दल या लेखामध्ये काही पर्याय सुचवण्यात आले आहेत.

b आणखी माहितीसाठी २०१६ सालचा सावध राहा!  क्र. ३ या अंकातला, “बायबलमध्ये समलैंगिकतेबद्दल काय सांगितलं आहे?” हा लेख पाहा.

c फायदेकारक ठरेल अशी माहिती तुम्हाला jw.org या वेबसाईटवर असलेल्या, “तरुण लोक विचारतात” आणि “यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न” या लेखमालिकांमध्ये मिळेल.