अभ्यास लेख ३९
गीत १२५ जे दयाळू ते सुखी
इतरांना दिल्यामुळे मिळणारा आनंद अनुभवा!
“घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”—प्रे. कार्यं २०:३५.
या लेखात:
इतरांना दिल्याने मिळणारा आनंद आपण कसा टिकवून ठेवू शकतो आणि इतकंच काय तर तो कसा वाढवू शकतो ते पाहा.
१-२. घेण्यापेक्षा देण्यातून जास्त आनंद मिळावा अशा प्रकारे आपल्याला बनवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
घेण्यापेक्षा देण्यातून जास्त आनंद मिळावा अशा प्रकारे यहोवाने माणसांना बनवलंय. (प्रे. कार्यं २०:३५) मग याचा अर्थ असा होतो का, की आपल्याला काही मिळालं तर आपल्याला आनंद होत नाही? नाही. याचा असा अर्थ होत नाही. कारण जेव्हा आपल्याला एखादी भेटवस्तू मिळते तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि आपण हे अनुभवलंयसुद्धा. पण आपण एखाद्याला काही देतो तेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो. पण यहोवाने आपल्याला अशा प्रकारे का बनवलंय?
२ कारण आपल्याला अशा प्रकारे बनवल्यामुळेच आपण आपला आनंद वाढवू शकतो. आणि इतरांना वेगवेगळ्या गोष्टी द्यायची संधी शोधून आपण हे करू शकतो. यहोवाने आपल्याला अशा प्रकारे बनवलंय ही खरंच एक अद्भुत गोष्ट आहे!—स्तो. १३९:१४.
३. यहोवाला ‘आनंदी देव’ असं का म्हटलंय?
३ बायबल म्हणतं की दिल्यामुळे आनंद होतो. म्हणूनच यहोवा ‘आनंदी देव’ आहे असं जे बायबल म्हणतं त्यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही. (१ तीम. १:११) कारण त्यानेच सगळ्यात आधी इतरांना बऱ्याच गोष्टी दिल्या आणि त्याच्याइतकं दुसरं कोणीच देऊ शकत नाही. प्रेषित पौलने सांगितल्याप्रमाणे “त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि चालतो-फिरतो; त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे.” (प्रे. कार्यं १७:२८) खरंच, “प्रत्येक चांगली देणगी आणि परिपूर्ण दान” यहोवाकडूनच येतं.—याको. १:१७.
४. आणखी आनंद अनुभवायला आपल्याला कशामुळे मदत होईल?
४ आपल्या सगळ्यांनाच देण्यातून मिळणारा आनंद अनुभवायला आणि आपला आनंद आणखी वाढवायला नक्कीच आवडेल. यासाठी आपण यहोवाच्या उदारतेचं अनुकरण करू शकतो. (इफिस. ५:१) यावर चर्चा करत असताना आपण हेही बघू, की उदारता दाखवल्यामुळे आपली कदर होत नाही असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपण काय करू शकतो. यामुळे आपल्याला दिल्यामुळे मिळणारा आनंद टिकवून ठेवता येईल आणि इतकंच काय तर आणखी वाढवता येईल.
यहोवाच्या उदारतेचं अनुकरण करा
५. यहोवा आपल्याला कोणत्या गोष्टी पुरवतो?
५ यहोवा कोणत्या मार्गांनी उदारता दाखवतो? तो आपल्याला गरजेच्या गोष्टी पुरवतो. आपल्याला कदाचित प्रत्येक वेळी चैनीच्या गोष्टी मिळणार नाहीत. पण आपल्यापैकी बहुतेकांकडे गरजेच्या गोष्टी असतात. त्यासाठी आपण यहोवाचे आभार मानले पाहिजेत! उदाहरणार्थ, यहोवा आपल्याला अन्न, वस्र आणि निवारा पुरवतो. (स्तो. ४:८; मत्त. ६:३१-३३; १ तीम. ६:६-८) आणि यहोवा या गोष्टी आपल्याला फक्त कर्तव्य म्हणून पुरवत नाही. तर मग तो या गोष्टी आपल्याला का देतो?
६. मत्तय ६:२५, २६ मधून आपण काय शिकतो?
६ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, यहोवा आपल्या शारीरिक गरजा पुरवतो, कारण त्याचं आपल्यावर प्रेम आहे. मत्तय ६:२५, २६ (वाचा.) मध्ये दिलेल्या येशूच्या शब्दांकडे लक्ष द्या. येशूने सृष्टीतल्या उदाहरणांचा वापर केला. पक्ष्यांबद्दल बोलताना तो म्हणाला: “ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा कोठारांत धान्य साठवत नाहीत.” लक्ष द्या तो पुढे काय म्हणतो: “तरीही स्वर्गातला तुमचा पिता त्यांना खाऊ घालतो.” मग येशू विचारतो: “तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मौल्यवान नाही का?” तर मुद्दा हा आहे, की यहोवाच्या नजरेत त्याचे उपासक, प्राण्यांपेक्षा जास्त मौल्यवान आहेत. मग जर यहोवा प्राण्यांच्या गरजा पुरवतो, तर तो आपल्याही गरजा पुरवणार नाही का? नक्कीच पुरवेल. काळजी करणाऱ्या एका मानवी पित्याप्रमाणे यहोवा प्रेमापोटी आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवतो.—स्तो. १४५:१६; मत्त. ६:३२.
७. यहोवाच्या उदारतेचं अनुकरण करायचा एक मार्ग कोणता? (चित्रसुद्धा पाहा.)
७ यहोवाप्रमाणे इतरांवर असलेल्या प्रेमामुळे आपणही त्यांच्या गरजेच्या गोष्टी त्यांना देतो. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादा भाऊ किंवा बहीण माहीत आहे का, ज्यांना खाण्यापिण्याच्या गोष्टींची किंवा कपड्यांची गरज आहे? त्यांची ही गरज भागवण्यासाठी यहोवा तुमचा वापर करू शकतो. यहोवाच्या लोकांना खासकरून विपत्तीच्या काळात उदारता दाखवण्यासाठी ओळखलं जातं. उदाहरणार्थ, कोव्हिड-१९ महामारीच्या काळात भाऊबहिणींनी गरजू लोकांना खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे आणि इतर गोष्टी पुरवल्या. बऱ्याच जणांनी जगभरात चाललेल्या कामासाठी उदारतेने दानही दिलं. यामुळे जगभरातल्या मदतकार्याला हातभार लागला. या भाऊबहिणींनी इब्री लोकांना १३:१६ मधल्या शब्दांप्रमाणे केलं. त्यात म्हटलंय: “चांगल्या गोष्टी करायला आणि तुमच्याजवळ जे आहे, त्यातून इतरांनाही द्यायला विसरू नका कारण अशा बलिदानांमुळे देवाला खूप आनंद होतो.”
८. यहोवाच्या ताकदीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? (फिलिप्पैकर २:१३)
८ यहोवा आपल्याला शक्ती देतो. यहोवाला त्याची अमर्याद शक्ती त्याच्या विश्वासू उपासकांना द्यायला खूप आनंद होतो. (फिलिप्पैकर २:१३ वाचा.) तुम्ही कधी मोहाचा सामना करण्यासाठी किंवा मग एखाद्या कठीण परीक्षेत टिकून राहण्यासाठी यहोवाकडे ताकद मागितली आहे का? किंवा कदाचित फक्त दररोजच्या गोष्टी करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून तुम्ही प्रार्थना केली आहे का? तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं उत्तर मिळाल्यावर तुम्हाला प्रेषित पौलने जे म्हटलं त्यासारखंच वाटेल. त्याने म्हटलं: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्ती मिळते.”—फिलिप्पै. ४:१३.
९. यहोवा ज्याप्रमाणे आपल्या ताकदीचा उदारतेने वापर करतो त्याचं अनुकरण आपण कसं करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
९ आपण अपरिपूर्ण माणसं असलो तरी यहोवा ज्याप्रमाणे आपल्या ताकदीचा उदारतेने वापर करतो त्याचं आपण अनुकरण करू शकतो. आपण खरोखर दुसऱ्यांना आपली शक्ती किंवा ताकद देऊ शकत नाही, पण आपण त्यांच्यासाठी आपल्या ताकदीचा वापर करू शकतो. जसं की आपण वयस्कर किंवा आजारी भाऊबहिणींच्या घरची कामं करू शकतो किंवा त्यांना लागणारं सामान आणून देऊ शकतो. तसंच आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला जमत असेल तसं आपण राज्य सभागृहाच्या साफसफाईसाठी किंवा देखरेखीसाठी स्वतःहून पुढे येऊ शकतो. अशा प्रकारे आपल्या ताकदीचा वापर केल्यामुळे यहोवाच्या उपासकांना फायदा होतो.
१०. इतरांच्या फायद्यासाठी आपण आपल्या शब्दांच्या ताकदीचा कसा वापर करू शकतो?
१० शब्दांत ताकद असते हेसुद्धा विसरू नका. तुम्हाला असं कोणी माहीत आहे का, ज्याला प्रोत्साहनाची गरज आहे? किंवा असं कोणी माहीत आहे का, ज्याला सांत्वनाची गरज आहे? असं असलं तर त्याच्याशी बोलण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्या. तुम्ही त्याला प्रत्यक्ष भेटू शकता किंवा त्याच्याशी फोनवर बोलू शकता. किंवा एखादं कार्ड, इमेल किंवा मेसेज पाठवू शकता. त्यात तुम्ही जे काही म्हणाल ते खूप भारी असण्याची गरज नाही. मनापासून आलेल्या प्रेमळ आणि साध्या शब्दांनीसुद्धा त्या व्यक्तीला खूप बरं वाटू शकतं. यामुळे त्याला पुढेही विश्वासू राहायला किंवा आहे त्या परिस्थितीत सकारात्मक राहायला मदत होईल.—नीति. १२:२५; इफिस. ४:२९.
११. यहोवा त्याच्या बुद्धीचा वापर कसा करतो?
११ यहोवा बुद्धी देतो. याकोबने असं लिहिलं: “तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी म्हणजे त्याला ती दिली जाईल. कारण देव . . . दोष न लावता सगळ्यांना उदारपणे बुद्धी देतो.” (याको. १:५; तळटीप.) या शब्दांवरून कळतं की यहोवा त्याची बुद्धी फक्त स्वतःपुरती राखून ठेवत नाही, तर ती इतरांना उदारपणे देतो. हेही लक्षात घ्या, की यहोवा जेव्हा बुद्धी देतो तेव्हा तो “कोणालाही कमी न लेखता” किंवा “दोष न लावता” देतो. आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे हे मान्य केल्यामुळे वाटणारा कमीपणा तो आपल्याला कधीच भासू देत नाही. उलट आपण ती बुद्धी त्याच्याकडे मागावी अशी त्याची इच्छा आहे.—नीति. २:१-६.
१२. आपल्याजवळ असलेलं ज्ञान इतरांना देण्याच्या कोणत्या संधी आपल्याकडे आहेत?
१२ आपल्याबद्दल काय? आपल्याजवळ असलेलं ज्ञान इतरांना देऊन आपण यहोवाचं अनुकरण करू शकतो का? (स्तो. ३२:८) नक्कीच! यासाठी यहोवाच्या लोकांकडे बऱ्याच संधी आहेत. उदाहरणार्थ, आपण सेवाकार्यात नवीन प्रचारकांना प्रशिक्षण देतो. मंडळीतले वडीलसुद्धा सहायक सेवकांना आणि बाप्तिस्मा घेतलेल्या भावांना मंडळीत त्यांच्या नेमणुका हाताळण्यासाठी धीराने मदत करतात. तसंच ज्यांना बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामाचा अनुभव आहे ते कमी अनुभव असलेल्यांना संघटनेच्या बांधकाम प्रकल्पामध्ये काम करायला प्रशिक्षण देण्यासाठी मदत करतात.
१३. यहोवा ज्या प्रकारे बुद्धी देतो त्याचं अनुकरण आपण कसं करू शकतो?
१३ ज्यांच्याजवळ प्रशिक्षण देण्याची जबाबदारी आहे, त्यांनी यहोवा ज्या पद्धतीने बुद्धी देतो त्याचं अनुकरण केलं पाहिजे. लक्षात घ्या, की यहोवा उदारतेने त्याची बुद्धी देतो त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा इतरांना उदारपणे फायदा करून दिला पाहिजे. शिकणारी व्यक्ती कालांतराने आपली जागा घेईल या भीतीने आपण आपलं ज्ञान स्वतःजवळ राखून ठेवत नाही. तसंच आपण असासुद्धा विचार करत नाही, की ‘मला तर कोणी शिकवलं नव्हतं! तर मग शिकू दे त्यांनाही स्वतःहूनच!’ अशा मनोवृत्तीला यहोवाच्या संघटनेत अजिबात थारा नाही. उलट वचनात सांगितल्याप्रमाणे आपण जर आपल्या भाऊबहिणींसाठी आपला ‘जीवही द्यायला तयार होत’ असू, तर आपल्याकडे असलेलं सगळं ज्ञान द्यायलाही आपल्याला आनंदच वाटला पाहिजे! (१ थेस्सलनी. २:८) आपल्याला ही आशा असते, की काही काळाने “इतरांना शिकवण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेशी पात्रता असेल.” (२ तीम. २:१, २) असं केल्यामुळे उदारतेचं चक्र चालू राहतं आणि त्यामुळे आनंदाचं चक्रसुद्धा चालू ठेवण्यात आपला सहभाग असतो.
आपल्या उदारतेची दुसऱ्यांना कदर नाही असं वाटतं तेव्हा . . .
१४. आपल्या उदारतेबद्दल बहुतेक जण कसा प्रतिसाद देतात?
१४ आपण जेव्हा खासकरून आपल्या भाऊबहिणींना उदारता दाखवतो, तेव्हा सहसा ते कदर असल्याचं दाखवतात. त्यासाठी कदाचित ते बोलून, लिहून किंवा दुसऱ्या एका मार्गाने आपले आभार मानतील. (कलस्सै. ३:१५) असं जेव्हा कोणी करतं तेव्हा आपल्याला आनंदच होतो.
१५. काही जण कदर असल्याचं दाखवत नसले तरी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?
१५ पण आपण केलेल्या गोष्टींसाठी इतर जण कदर दाखवतील असं नेहमीच होत नाही. त्यामुळे कधीकधी असं होऊ शकतं, की आपण इतरांसाठी आपला वेळ, शक्ती किंवा इतर गोष्टी देत असलो, तरी त्यांना याची खरंच कदर आहे का, अशी शंका आपल्या मनात येऊ शकते. तसं जर झालं तर आपण आपला आनंद गमावून बसू किंवा नाराज होऊ. मग आपण हे कसं टाळू शकतो? त्यासाठी आपण या लेखाच्या आधार वचनातले म्हणजे प्रेषितांची कार्यं २०:३५ मधले शब्द लक्षात घेऊ शकतो. देण्यातून मिळणारा आनंद हा समोरच्या व्यक्तीच्या प्रतिसादावर अवलंबून नसतो. त्यामुळे इतर जण आपण करत असलेल्या गोष्टींची कदर करत नाहीत असं वाटत असलं, तरी देण्यातला आनंद आपण अनुभवत राहिला पाहिजे. तो कसा? त्यासाठी काही मार्गांचा विचार करा.
१६. इतरांना मदत करताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?
१६ यहोवाचं अनुकरण करण्याकडे लक्ष द्या. यहोवा पुरवत असलेल्या चांगल्या गोष्टींची लोकांना कदर असली किंवा नसली तरी तो त्यांना पुरवत राहतो. (मत्त. ५:४३-४८) त्याने वचन दिलंय, की आपणही जर कोणतीही गोष्ट “परत मिळण्याची अपेक्षा न करता” इतरांना देत राहिलो, तर आपल्याला “मोठं प्रतिफळ मिळेल.” (लूक ६:३५) मग यात इतर जण दाखवत असलेली कदरसुद्धा येते. त्यामुळे लोक जर कदर दाखवत नसतील तर निराश होऊ नका. कारण इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात त्यासाठी यहोवा तुम्हाला नेहमीच प्रतिफळ देईल. कारण तुम्ही ‘आनंदाने देणारे’ आहात.—नीति. १९:१७; २ करिंथ. ९:७.
१७. आपण योग्य दृष्टिकोन कसा टिकवून ठेवू शकतो? (लूक १४:१२-१४)
१७ इतरांना उदारतेने देताना योग्य दृष्टिकोन टिकवून ठेवण्यासाठी लूक १४:१२-१४ (वाचा.) या वचनात दिलेलं तत्त्व आपल्याला मदत करू शकतं. जे आपली परतफेड करू शकतात अशांचा पाहुणचार करणं किंवा त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी उदारता दाखवणं चुकीचं नाही. पण जर आपल्या लक्षात आलं, की आपण काहीतरी अपेक्षा ठेवून, मग ते छोटसंच का असेना, इतरांना द्यायचा प्रयत्न करतोय, तर काय? तर मग आपण येशूने सांगितल्याप्रमाणे करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण अशा लोकांना पाहुणचार दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे, जे त्याची परतफेड करू शकत नाहीत. असं केल्यामुळे आपल्याला आनंद मिळेल कारण त्यामुळे आपण यहोवाचं अनुकरण करत आहोत हे आपल्याला माहीत असतं. हाच दृष्टिकोन इतर जण जेव्हा कदर दाखवत नाहीत तेव्हासुद्धा आनंदी राहायला आपल्याला मदत करू शकतो.
१८. आपण कोणती गोष्ट करणार नाही आणि का?
१८ इतरांच्या हेतूंवर शंका घेऊ नका. (१ करिंथ. १३:७) जर इतर जण कदर दाखवत नसतील, तर तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘त्यांना खरंच आपण केलेल्या गोष्टीची कदर नाही, की ते कदर दाखवायचं विसरून गेलेत?’ ते जर आपल्या अपेक्षेप्रमाणे कदर दाखवत नसतील तर त्याची कदाचित इतर कारणंही असू शकतात. किंवा असंही होऊ शकतं, की त्यांच्या मनात आपल्याबद्दल खरंच खूप कदर असेल पण ती व्यक्त करायला त्यांना कठीण जात असेल. किंवा इतरांची मदत घ्यायला त्यांना अवघडल्यासारखं वाटत असेल; खासकरून जर ते आधी इतरांना मदत करत असतील तेव्हा. कारण काहीही असलं तरी त्यांच्यावरच्या प्रेमामुळे आपण त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करणार नाही. उलट आपण देण्यात असलेला आनंद अनुभवत राहायचा प्रयत्न करत राहू.—इफिस. ४:२.
१९-२०. आपण इतरांसाठी काहीतरी करतो तेव्हा धीर धरणं का गरजेचं आहे? (चित्रसुद्धा पाहा.)
१९ धीर धरा. उदार असण्याच्या बाबतीत बुद्धिमान राजा शलमोनने लिहिलं: “आपलं अन्न पाण्यावर सोड. बऱ्याच दिवसांनी तुला ते परत मिळेल.” (उप. ११:१) या शब्दांवरून कळतं, की आपण दाखवलेल्या उदारतेला कदाचित काही जण ‘बऱ्याच काळानंतर’ प्रतिसाद देतील. हे दाखवून देणारा एक अनुभवच पाहा.
२० बऱ्याच वर्षांआधी एका विभागीय पर्यवेक्षकांच्या पत्नीने नवीनच बाप्तिस्मा झालेल्या एका बहिणीला पत्र लिहिलं. तिने त्या पत्रात तिला विश्वासू राहायचं प्रोत्साहन दिलं होतं. जवळपास आठ वर्षांनंतर त्या बहिणीने तिला एका पत्रातून त्याचं उत्तर दिलं. तिने म्हटलं: “तुमच्या पत्रामुळे एवढ्या वर्षांमध्ये मला किती मदत झाली आहे, याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. म्हणून तुम्हाला हे पत्र लिहायचं ठरवलं. तुमचं पत्रच खूप प्रोत्साहनदायक होतं. पण त्यातल्या एक वचनामुळे मला जास्त प्रोत्साहन मिळालं. ते वचन माझ्या चांगलं लक्षात राहिलं.” a तिला ज्या समस्यांचा सामना करावा लागला होता त्याबद्दल सांगितल्यानंतर ती म्हणाली: “कधीकधी तर मला सगळ्यातूनच बाहेर पडावंसं वाटायचं. सत्यातून, जबाबदारीतून मुक्त व्हावंसं वाटायचं. पण तुम्ही सांगितलेलं ते वचन माझ्या मनात घर करून गेलं. त्यामुळेच . . . मला टिकून राहता आलं. एवढ्या आठ वर्षांच्या काळात दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा माझ्यावर इतका प्रभाव झाला नाही जितका त्या वचनाचा झाला.” कल्पना करा, “बऱ्याच दिवसांनी” जेव्हा त्या बहिणीचं पत्र त्या विभागीय पर्यवेक्षकांच्या पत्नीला मिळालं असेल तेव्हा तिला किती आनंद झाला असेल! आपल्या बाबतीतही असं होऊ शकतं. आपण केलेल्या गोष्टींसाठी कदाचित बऱ्याच दिवसांनी कोणीतरी कदर दाखवेल!
२१. तुम्ही यहोवाच्या उदारतेचं अनुकरण करायचा निश्चय का केलाय?
२१ सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यहोवाने आपल्याला एका खास क्षमतेने बनवलंय. जर कोणी आपल्याला एखादी भेटवस्तू दिली तर आपल्याला आनंद होतोच. पण जेव्हा आपण इतरांना देतो, तेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो. आपल्या भाऊबहिणींना मदत केल्यामुळे आपल्याला खूप बरं वाटतं. आणि जेव्हा ते त्याबद्दल कदर व्यक्त करतात, तेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो. पण समजा कोणी कदर केली नाही, तरी आपण योग्य ते करतोय याचं समाधान आपल्याला असेल. हे कधीच विसरू नका, की तुम्ही दुसऱ्यांना जे काही देता त्या बदल्यात ‘यहोवा तुम्हाला त्याहून जास्त देऊ शकतो.’ (२ इति. २५:९) कारण यहोवा आपल्याला जितकं देऊ शकतो तितकं आपण इतरांना कधीच देऊ शकत नाही! आणि स्वतः यहोवा त्याची परतफेड करतोय यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताच नाही. म्हणूनच आपण उदार असणाऱ्या आपल्या स्वर्गातल्या पित्याचं अनुकरण करत राहायचा पक्का निर्धार करू या!
गीत १७ निःस्वार्थ प्रेम दाखवू या
b चित्राचं वर्णन: या नाट्यरूपांतरात एका विभागीय पर्यवेक्षकांची पत्नी उदारतेने प्रोत्साहन देत आहे. आणि बऱ्याच वर्षांनी तिला कदर व्यक्त करणारं पत्र मिळाल्याचं दिसतंय.