व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

यहोवाच्या सेवेत मिळालेले भरपूर आशीर्वाद

यहोवाच्या सेवेत मिळालेले भरपूर आशीर्वाद

१९५१ ला मी क्विबेकमधल्या रोयुन या छोट्याशा शहरात आलो. मला मिळालेल्या पत्त्यावर मी पोचलो आणि दार वाजवलं. मार्सल फिलटो a या मिशनरी भावाने दार उघडलं. ते २३ वर्षांचे आणि उंच होते, तर मी १६ वर्षांचा आणि त्यांच्यापेक्षा बुटका होतो. त्यांना मी माझं पायनियर नेमणुकीचं पत्र दाखवलं. त्यांनी ते वाचलं, माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले: “आईला माहीत आहे का तू इथे आहेस?”

माझं कुटुंब

माझा जन्म १९३४ ला झाला. माझे आईवडील स्वित्झरलंडवरून कॅनडामधल्या टिमिन्स शहरात स्थायिक झाले होते. मग जवळपास १९३९ च्या दरम्यान माझी आई टेहळणी बुरूज मासिकं वाचू लागली आणि ती यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांनासुद्धा जाऊ लागली. ती मला आणि माझ्या सहा भावंडांना सभेला घेऊन जायची आणि मग काही दिवसांनी ती यहोवाची साक्षीदार बनली.

आईचा हा निर्णय माझ्या वडिलांना अजिबात आवडला नाही. पण आईला सत्य खूप आवडायचं आणि तिने यहोवाला एकनिष्ठ राहायचा निश्‍चय केला होता. १९४० च्या दरम्यान जेव्हा कॅनडामध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावर बंदी होती तेव्हासुद्धा ती तिच्या निर्णयावर ठाम होती. वडील आईला नेहमी वाईट-साईट बोलायचे, पण ती मात्र त्यांच्याशी आदराने आणि प्रेमानेच वागायची. तिच्या या चांगल्या उदाहरणामुळे मला आणि माझ्या भावंडांना सत्य स्वीकारायला खूप मदत झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे वडिलांचा स्वभाव हळूहळू बदलला आणि ते कुटुंबातल्या सगळ्यांशी प्रेमाने वागू लागले.

पूर्ण वेळेच्या सेवेची सुरुवात

१९५० ला न्यूयॉर्क शहरात झालेल्या ‘देवाच्या शासनाची उन्‍नती’ या संमेलनाला मी गेलो होतो. तिथे जगभरातून आलेल्या वेगवेगळ्या भाऊबहिणींना भेटल्यामुळे आणि गिलियड प्रशालेतून पदवीधर झालेल्या भाऊबहिणींच्या मुलाखती ऐकल्यामुळे, यहोवाची सेवा आणखीन करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. पूर्ण वेळेची सेवा करण्याचा मी ठाम निश्‍चय केला होता. मी जसं तिथून घरी आलो, तसं मी पायनियर सेवेचा फॉर्म भरला. कॅनडा शाखेने मला आधी बाप्तिस्मा घ्यायला सांगितलं. म्हणून मग मी १ ऑक्टोबर १९५० ला बाप्तिस्मा घेतला. त्याच्या एका महिन्यानंतर मी पायनियर बनलो आणि मला कापूसकासिंग इथे माझी पहिली नेमणूक मिळाली. ते ठिकाण त्या वेळी मी जिथे राहत होतो, तिथून बरेच किलोमीटर दूर होतं.

क्विबेकमध्ये सेवा करताना

१९५१ मध्ये शाखा कार्यालयाने विचारलं की क्विबेकच्या फ्रेंच भाषेच्या क्षेत्रात कोणी फ्रेंच बोलणारं सेवा करण्यासाठी जाऊ शकतं का? कारण तिथे खूप गरज होती आणि मी लहानपणापासूनच फ्रेंच आणि इंग्लिश चांगलं बोलत होतो. म्हणून मी हे आमंत्रण स्वीकारलं. मग त्यांनी मला रोयुनमध्ये नेमलं. तिथे मी कोणालाच ओळखत नव्हतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे फक्‍त एक पत्ता होता. पण सगळं काही ठीक झालं. मार्सल आणि मी चांगले मित्र बनलो आणि पुढची चार वर्षं मी खास पायनियर म्हणून क्विबेकमध्ये आनंदाने सेवा केली.

गिलियड आणि वेळेवर पूर्ण न झालेल्या अपेक्षा

क्विबेकमध्ये असताना मला गिलियडच्या २६ व्या वर्गाचं आमंत्रण मिळालं. ही प्रशाला न्यूयॉर्कच्या साउथ लँसिंगमध्ये होणार होती. हे आमंत्रण मिळाल्यावर मला खूप आनंद झाला. १२ फेब्रुवारी १९५६ ला मी पदवीधर झालो. त्यानंतर, आत्ता ज्याला पश्‍चिम आफ्रिकेतला घाना b देश म्हणतात तिथे मला नेमणूक मिळाली. पण तिथे जाण्याआधी मला प्रवासासाठी लागणारी काही कागदपत्रं तयार करायला “काही आठवडे” कॅनडाला परत जावं लागणार होतं.

या कागदपत्रांमुळे मला सात महिने टोरंटोमध्ये राहावं लागलं. त्या काळात मी क्रिप्स कुटुंबाकडे राहत होतो. तेव्हा त्यांच्या मुलीशी माझी ओळख झाली. तिचं नाव शिला होतं. आणि मग आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलो. पण झालं असं की मी तिला लग्नासाठी विचारणार तेवढ्यात माझा व्हिसा आला. मग शिला आणि मी प्रार्थना करून ठरवलं की मी माझ्या नेमणुकीवर परत जाईल. पण आम्ही असा विचार केला की तोपर्यंत एकमेकांना पत्रं लिहीत राहू आणि पुढे लग्नाचा विचार करू. हा निर्णय सोपा नव्हता. पण पुढे जाऊन आम्हाला कळलं की हा एक योग्य निर्णय होता.

ट्रेनने, माल वाहू जहाजाने आणि विमानाने महिनाभर प्रवास करून मी घानातल्या आक्रा शहरात पोचलो. तिथे मला प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. या नेमणुकीमुळे मला संपूर्ण घाना, त्यासोबतच आइवरी कोस्ट (ज्याला आत्ता कोट दि वार म्हणतात) आणि टोगोलॅंडमध्ये (ज्याला आत्ता टोगो म्हणतात) प्रवास करावा लागायचा. मी बऱ्‍याचदा शाखेने दिलेल्या गाडीने एकटाच प्रवास करायचो. तो काळ माझा खूप आनंदात गेला.

शनिवारी-रविवारी मला विभागीय संमेलनाच्या नेमणुका असायच्या. त्या वेळी आमच्याकडे संमेलनगृहं नव्हती. त्यामुळे भाऊ तिथे बांबू रोवायचे आणि ताडाच्या झाडाची पानं वापरून छत बनवायचे. यामुळे भाऊबहिणींना कडक उन्हापासून सावली मिळायची. खाण्यापिण्याचं सामान ठेवण्यासाठी फ्रिज नसल्यामुळे भाऊ जिवंत प्राणी स्वतःजवळ ठेवायचे. आणि जशी गरज असेल तसं ते खाण्यासाठी त्यांचा वापर करायचे.

या संमेलनाच्या वेळी काही मजेदार किस्से झालेत. एकदा एक मिशनरी भाऊ हर्ब जेर्न्‍निग्स c भाषण देत असताना एक जनावर सुटलं. ते स्टेज आणि श्रोत्यांच्या मधे फिरू लागलं. म्हणून ब्रदर हर्बने भाषण थांबवलं. ते जनावर खूप गोंधळलेलं होतं. मग चार तगड्या भावांनी त्याला पकडलं आणि त्याला बांधलं. हे सगळं बघून श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या.

आठवड्यादरम्यान मी आजूबाजूच्या गावात जाऊन द न्यू वर्ल्ड सोसायटी ईन ॲक्शन हा चित्रपट दाखवायचो. त्यासाठी मी दोन खांबांवर किंवा दोन झाडांवर एक पांढरी चादर टाकायचो आणि त्यावर तो चित्रपट दाखवायचो. गावकऱ्‍यांना तो चित्रपट पाहायला खूप मजा यायची. बऱ्‍याच जणांसाठी तर हा त्यांच्या आयुष्यातला पहिलाच चित्रपट होता. चित्रपटात लोक बाप्तिस्मा घेताना दिसायचे तेव्हा ते पाहून सगळे जण मोठमोठ्याने टाळ्या वाजवायचे. या चित्रपटामुळे लोकांना कळायचं की जगभरात पसरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेत किती एकी आहे.

१९५९ ला घानामध्ये आमचं लग्न झालं

आफ्रिकेत जवळपास दोन वर्षं घालवल्यानंतर १९५८ ला न्यूयॉर्क शहरात होणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. कारण मला तिथे शिला भेटणार होती. ती त्या वेळी क्विबेकमध्ये खास पायनियर म्हणून सेवा करत होती. इतके दिवस आम्ही पत्र लिहून एकमेकांच्या संपर्कात होतो. पण आता आम्ही प्रत्यक्ष भेटणार होतो. मी तिला लग्नासाठी विचारलं आणि ती ‘हो’ म्हणाली. मी ब्रदर नॉरना d पत्र लिहून विचारलं की शिलाला गिलियड प्रशालेला उपस्थित राहून माझ्यासोबत आफ्रिकेला येता येईल का. ते तयार झाले आणि शेवटी शिला घानाला आली. मग आम्ही दोघांनी आक्रा शहरात ३ ऑक्टोबर १९५९ ला लग्न केलं. आपल्या जीवनात यहोवाला पहिलं स्थान दिल्यामुळे तो आम्हाला आशीर्वाद देतोय हे आम्हाला जाणवत होतं.

कॅमरूनमध्ये एकत्र मिळून केलेली सेवा

कॅमरून शाखेत काम करताना

१९६१ मध्ये आम्हाला कॅमरूनमध्ये नेमण्यात आलं. तिथे मला भावांनी नवीन शाखा कार्यालय सुरू करायची जबाबदारी दिली. त्यामुळे मी खूप व्यस्त होतो. एक नवीन शाखा सेवक या नात्याने मला बरंच काही शिकायचं होतं. मग १९६५ मध्ये आम्हाला कळलं की शिला गरोदर आहे. आता इथून पुढे आम्ही आईवडिलांची जबाबदारी पार पाडायची हा विचार आम्हाला स्वीकारणं थोडं कठीण गेलं. पण ही नवीन जबाबदारी पार पाडायला आम्ही उत्सुकही होतो. त्यामुळे आम्ही कॅनडाला परत जायची तयारी सुरू केली. पण तेव्हाच आम्ही एक भयंकर घटना अनुभवली.

आमच्या बाळाचा जन्म होण्याआधी आम्ही त्याला गमावलं. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मुलगा होणार होता. या गोष्टीला आज ५० पेक्षा जास्त वर्षं झाली आहेत, पण तरी आम्ही ते कधीच विसरलो नाही. हे खरंय की या घटनेमुळे आम्ही खूप दुःखी होतो. पण आम्हाला आमची नेमणूक मनापासून आवडायची म्हणून आम्ही ती करत राहिलो.

१९६५ ला शिलासोबत कॅमरूनमध्ये

कॅमरूनमधल्या भावांना तटस्थ भूमिका घेतल्यामुळे बऱ्‍याचदा छळाचा सामना करावा लागला. निवडणुकांच्या काळात ही परिस्थिती आणखीनच खराब झाली. १३ मे १९७० ला ज्याची भीती होती नेमकं तेच घडलं. यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी लावण्यात आली. त्यामुळे नवीनच बांधलेलं शाखा कार्यालय सरकारने ताब्यात घेतलं. त्या सुंदर शाखा कार्यालयात जाऊन आम्हाला फक्‍त पाचच महिने झाले होते. एका आठवड्यातच सगळ्या मिशनरींना देश सोडून जायला सांगितलं. त्यात मी आणि शिलासुद्धा होतो. हे आमच्यासाठी सोपं नव्हतं, कारण भाऊबहिणींवर आमचं खूप प्रेम होतं. आणि या बंदीच्या काळात त्यांचं कसं होईल याची चिंता मला सतावत होती.

यानंतरचे सहा महिने आम्ही फ्रान्सच्या शाखा कार्यालयात घालवले. मी तिथून कॅमरूनमधल्या भाऊबहिणींच्या गरजा भागवण्यासाठी मला जमेल ते करत होतो. त्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात आम्हाला नाइजीरियाच्या शाखा कार्यालयात नेमण्यात आलं. या शाखा कार्यालयाने कॅमरूनमधलं काम पाहायला सुरुवात केली होती. नाइजीरियामधल्या भाउबहिणींनी आमचं खूप प्रेमाने स्वागत केलं. तिथे आम्ही बरीच वर्षं आनंदाने सेवा केली.

एक कठीण निर्णय

१९७३ मध्ये आम्हाला आमच्या जीवनातला एक खूप कठीण निर्णय घ्यावा लागला. शिलाला काही गंभीर आरोग्याच्या समस्या होत्या. न्यूयॉर्कमध्ये एका अधिवेशनाला आलो असताना शिला रडून मला म्हणाली: “बास आता! नाही होत मला. मी बराच वेळ आजारीच असते, थकले मी आता!” ती माझ्याबरोबर पश्‍चिम आफ्रिकेत १४ पेक्षा जास्त वर्षांपासून सेवा करत होती. मला खरंच तिचा खूप अभिमान आहे. पण आम्हाला काही बदल करावे लागणार होते. आमच्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर आणि खूप प्रार्थना केल्यानंतर आम्ही कॅनडाला परत जायचा निर्णय घेतला. तिथे तिला तिच्या तब्येतीची चांगली काळजी घेता येणार होती. आमची मिशनरी नेमणूक आणि पूर्ण वेळेची सेवा सोडणं हा आमच्यासाठी खूप कठीण निर्णय होता. हा निर्णय घेताना आम्हाला खूप त्रास झाला.

कॅनडाला आल्यावर मी माझ्या एका जुन्या मित्राबरोबर काम करू लागलो. त्याचा टोरंटोमधल्या एका गावात गाड्यांचा व्यवसाय होता. मग मी आणि शिलाने एक घर भाड्याने घेतलं आणि थोडंफार सामानसुद्धा घेतलं. अशा प्रकारे आम्हाला कोणतंही कर्ज न घेता आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करता आली. आम्हाला आमचं जीवन साधं ठेवायचं होतं. कारण एक-ना-एक दिवस पूर्ण वेळेची सेवा पुन्हा सुरू करायची आमची इच्छा होती. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही विचारही केला नव्हता एवढ्या लवकर आमची इच्छा पूर्ण झाली.

ऑन्टारियोच्या नॉरवल इथे एका संमेलनगृहाचं बांधकाम सुरू होतं. तिथे मी दर शनिवारी स्वयंसेवक म्हणून जायला सुरुवात केली. मग काही काळाने भावांनी मला विचारलं की मला संमेलनगृह पर्यवेक्षक म्हणून सेवा करायला जमेल का. शिलाची तब्येत आता सुधारत होती म्हणून आम्हाला वाटलं की आता तिला ही नेमणूक जमेल. म्हणून मग आम्ही जून १९७४ ला संमेलनगृहाच्या जवळ राहायला गेलो. आम्हाला पूर्ण वेळेची सेवा पुन्हा सुरू करता आली यामुळे आम्ही खूप खूश होतो.

पण चांगली गोष्ट म्हणजे शिलाची तब्येत आणखी सुधारत गेली. त्यामुळे दोन वर्षांनंतर आम्हाला विभागीय कामाची नेमणूक घेता आली. हा विभाग कॅनडामधल्या मॅनिटोबा इथे होता. तिथल्या कडाक्याच्या थंडीसाठी ते ठिकाण ओळखलं जातं. पण तिथल्या भाऊबहिणींच्या प्रेमाची ऊब मात्र आम्हाला जाणवत होती. यावरून आम्ही शिकलो की आपण कुठे सेवा करतो ते महत्त्वाचं नाही, तर जिथे कुठे आहोत तिथे सेवा करत राहणं महत्त्वाचंय.

एक महत्त्वाची गोष्ट शिकता आली

बरीच वर्षं विभागीय कामात घालवल्यानंतर १९७८ ला आम्हाला कॅनडा बेथेलमध्ये बोलवण्यात आलं. त्यानंतर लगेचच मला एक गोष्ट शिकायला मिळाली. ती स्वीकारायला कठीण पण तितकीच महत्त्वाची होती. मला माँट्रिऑलमध्ये फ्रेंच भाषेत दीड तासाचं खास भाषण देण्यासाठी सांगण्यात आलं होतं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे ते भाषण देताना मी श्रोत्यांचं लक्ष खिळवून ठेवू शकलो नाही. म्हणून सेवा विभागातल्या एका भावाने मला सल्ला दिला. खरं सांगायचं तर, मी एक चांगला वक्‍ता नाही ही गोष्ट मला तेव्हा लक्षात यायला पाहिजे होती, जशी आज येते. पण मी त्या वेळी मिळालेला सल्ला चांगल्या प्रकारे स्वीकारला नाही. त्यांनी दिलेला सल्ला मला अजिबात आवडला नाही. कारण मला असं वाटत होतं की ते माझ्या चुकाच काढत आहेत. माझ्या चांगल्या गोष्टी त्यांना दिसतच नाहीत. पण स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी मी सल्ला देणाऱ्‍या भावाच्याच चुका काढत होतो. त्यांची सल्ला द्यायची पद्धत चुकीची आहे असं म्हणत होतो.

फ्रेंचमध्ये भाषण दिल्यावर मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो

मग काही दिवसांनी शाखा समितीचे भाऊ याबद्दल माझ्याशी बोलले. मी कबूल केलं की मी तो सल्ला नीट घेतला नव्हता, म्हणून मग मी माफी मागितली. त्यानंतर मी सल्ला दिलेल्या भावाशी बोललो आणि त्याचीही माफी मागितली. त्याने मोठ्या मनाने मला माफ केलं. या अनुभवातून मी शिकलो की नम्र असणं किती महत्त्वाचंय आणि मी ठरवलं की ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. (नीति. १६:१८) मी याबद्दल यहोवाला बऱ्‍याचदा प्रार्थना केली आहे. आणि ठरवलंय की सल्ला मिळाल्यावर परत असं कधीच वागायचं नाही.

आता मी ४० पेक्षा जास्त वर्षांपासून कॅनडा बेथेलमध्ये आहे आणि १९८५ पासून शाखा समितीचा सदस्य म्हणून सेवा करतोय. फेब्रुवारी २०२१ ला माझ्या शिलाला मी गमावलं. तिला गमावल्याचं दुःख तर आहेच, पण त्यासोबत मला माझ्याही काही आरोग्याच्या समस्या आहेत. पण यहोवाच्या सेवेत मी इतका व्यस्त आणि आनंदी आहे की माझ्या ‘आयुष्याचे दिवस कसे निघून गेले हे मला कळलंसुद्धा नाही.’ (उप. ५:२०) मी माझ्या जीवनात काही समस्यांचा सामना केला असला, तरी मला मिळालेला आनंद त्यांपेक्षा खूप मोठा आहे. यहोवाच्या सेवेला जीवनात पहिलं स्थान देणं आणि ७० वर्षं पूर्ण वेळेच्या सेवेत घालवणं हे माझ्यासाठी एक आशीर्वादच आहे. माझी आशा आहे की तरुण भाऊबहिणींनीसुद्धा यहोवाच्या सेवेला जीवनात पहिलं स्थान देत राहावं. कारण मला खातरी आहे की त्यांना यहोवाची सेवा केल्यामुळे खरा आनंद आणि आशीर्वाद मिळेल.

a १ फेब्रुवारी २००० च्या टेहळणी बुरूज अंकात “यहोवा माझे आश्रयस्थान आणि बळ” असं शीर्षक असलेली मार्सल फिलटो यांची जीवन कथा पाहा.

b १९५७ पर्यंत आफ्रिकेच्या या भागावर इंग्रजांची सत्ता होती आणि त्याला गोल्ड कोस्ट या नावाने ओळखलं जायचं.

c १ डिसेंबर २००० च्या टेहळणी बुरूज अंकात “उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही” असं शीर्षक असलेली हबर्ट जेर्न्‍निग्स यांची जीवन कथा पाहा.

d त्या वेळी नेथन नॉर संघटनेच्या कामात पुढाकार घेत होते.