अभ्यास लेख ३६
गीत ८९ ऐका, पालन करा आणि आशीर्वाद मिळवा!
वचनाप्रमाणे चालणारे बना!
“फक्त वचन ऐकणारेच बनू नका, तर त्याप्रमाणे चालणारेही बना.”—याको. १:२२.
या लेखात:
देवाचं वचन दररोज वाचण्याद्वारेच नाही तर त्यावर विचार करून ते आपल्या जीवनात आणखी चांगल्या प्रकारे लागू करण्याची आपली इच्छा कशी वाढवता येईल ते पाहू या.
१-२. देवाचे सेवक कोणत्या गोष्टीमुळे आनंदी असतात? (याकोब १:२२-२५)
आपण आनंदी असावं असं यहोवाची आणि त्याच्या प्रिय मुलाची इच्छा आहे. स्तोत्र ११९:२ मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो: “जे त्याच्या स्मरण-सूचना पाळतात; जे पूर्ण मनाने त्याचा शोध घेतात, ते सुखी आहेत!” शिवाय, येशूनेसुद्धा म्हटलं: “जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!”—लूक ११:२८.
२ जे यहोवाची उपासना करतात ते आनंदी असतात. का बरं? याची बरीच कारणं आपल्याकडे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, आपण देवाचं वचन दररोज वाचतो आणि जे काही शिकायला मिळालं ते लागू करायचा प्रयत्न करतो.—याकोब १:२२-२५ वाचा.
३. देवाचं वचनात वाचलेल्या गोष्टी लागू केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
३ आपण जेव्हा ‘वचनाप्रमाणे चालणारे बनतो,’ तेव्हा आपल्याला बऱ्याच मार्गांनी फायदा होतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण बायबलमध्ये शिकायला मिळालेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करतो, तेव्हा आपण यहोवाचं मन आनंदित करत असतो आणि हे माहीत असल्यामुळे आपल्या स्वतःलासुद्धा आनंद होतो. (उप. १२:१३) देवाच्या प्रेरित वचनात आपल्याला जे काही वाचायला मिळतं ते जेव्हा आपण आपल्या जीवनात लागू करतो, तेव्हा आपलं कौटुंबिक जीवन सुधारतं आणि भाऊबहिणींसोबतचं आपलं नातंही आणखी मजबूत होतं. हे तुमच्याही बाबतीत कदाचित खरं ठरलं असेल. यासोबतच, आपण यहोवाच्या मार्गांचं पालन न केल्यामुळे येणाऱ्या बऱ्याच समस्याही टाळू शकतो. दावीद राजाने जे म्हटलं, तसं आपल्यालाही वाटतं. त्याने आपल्या गीतात यहोवाच्या नियमांचा, त्याच्या आदेशांचा आणि त्याच्या निर्णयांचा उल्लेख केल्यानंतर असं म्हटलं: “त्यांचं पालन केल्यामुळे मोठं प्रतिफळ मिळतं.”—स्तो. १९:७-११.
४. देवाच्या वचनाप्रमाणे चालणं नेहमीच सोपं का नसतं?
४ खरं पाहायला गेलं, तर देवाच्या वचनाप्रमाणे चालणं नेहमीच सोपं नसतं. यहोवाची आपल्याबद्दल काय इच्छा आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या दररोजच्या व्यापातून बायबलचं वाचन आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. त्यामुळे बायबलचं दररोज वाचन करायला कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला मदत होऊ शकते, याबद्दल आता आपण थोडी चर्चा करू या. तसंच, आपण जे काही वाचतो त्याचा आणि वाचलेल्या गोष्टी कशा लागू करता येतील त्याचाही आपण विचार करू या.
देवाचं वचन वाचायला वेळ काढा
५. कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपला जास्त वेळ जातो?
५ यहोवाच्या सेवकांपैकी बरेच जण आपल्या दररोजच्या जीवनात खूप व्यस्त असतात. बायबलमध्ये आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपला बराचसा वेळ जात असतो. उदाहरणार्थ, बऱ्याच जणांना आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी काम करावं लागतं. (१ तीम. ५:८) तसंच, आपल्यापैकी बरेच जण आजारी किंवा वयस्कर नातेवाइकांची काळजी घेत असतात. शिवाय, आपल्या सगळ्यांनाच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी वेळ लागतो. या जबाबदाऱ्यांसोबतच आपल्याला मंडळ्यांमधल्या काही जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. प्रचारकार्यात नियमित सहभाग घेणं, ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. मग तुमच्यावर असलेल्या या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना नियमितपणे बायबल वाचायला, त्यावर मनन करायला, तसंच त्यातल्या गोष्टी लागू करायला तुम्ही वेळ कसा काढू शकता?
६. तुम्ही बायबल वाचायला सगळ्यात जास्त महत्त्व कसं देऊ शकता? (चित्रसुद्धा पाहा.)
६ बायबल वाचणं हे ख्रिस्ती या नात्याने आपल्यासाठी “जास्त महत्त्वाच्या” गोष्टींपैकी एक आहे. म्हणून बायबल वाचायला आपण नेहमी जास्त महत्त्व दिलं पाहिजे. (फिलिप्पै. १:१०) आनंदी माणसाबद्दल पहिल्या स्तोत्रात असं म्हटलंय: “तो यहोवाच्या नियमशास्त्रावर मनापासून प्रेम करतो, आणि रात्रंदिवस ते हळू आवाजात वाचतो.” (स्तो. १:१, २, तळटीप.) त्यामुळे हे स्पष्टच आहे, की बायबलचं वाचन करण्यासाठी आपल्याला वेळ काढणं गरजेचं आहे. मग बायबल वाचायची सगळ्यात योग्य वेळ कोणती? आपल्यापैकी प्रत्येकाचं उत्तर कदाचित वेगवेगळं असेल. पण सोप्या शब्दांत सांगायचं तर, बायबल वाचण्यासाठी एक अशी वेळ असली पाहिजे जेव्हा तुम्ही ते नियमितपणे करू शकाल. व्हिक्टर नावाचा एक भाऊ म्हणतो: “मला सकाळी बायबल वाचायला आवडतं. सकाळी लवकर उठायला जरी मला आवडत नसलं, तरी त्या वेळी मी जास्त लक्ष देऊन वाचू शकतो. कारण लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी कमी असल्यामुळे मला जास्त लक्ष देऊन वाचता येतं.” कदाचित तुम्हालाही सकाळी बायबल वाचायला आवडत असेल. आणि जर नसेल, तर मग स्वतःला विचारा: ‘माझ्यासाठी बायबल वाचायची सगळ्यात चांगली वेळ कोणती असू शकते?’
वाचलेल्या गोष्टींवर मनन करा
७-८. आपण जे वाचतो त्याचा पुरेपूर फायदा घेणं कोणत्या गोष्टीमुळे कठीण जाऊ शकतं? उदाहरण द्या.
७ अनेकदा असं होतं, की आपण बरंच काही वाचतो पण त्याच्यावर विचार करत नाही. तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का, की तुम्ही वाचलंय पण थोड्याच वेळात त्यातल्या खूप कमी गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्या आहेत? आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं. दुःखाची गोष्ट म्हणजे, बायबल वाचनाच्या बाबतीतसुद्धा असं होऊ शकतं. कदाचित आपण बायबलमधले काही ठरावीक अध्याय दररोज वाचायचं ध्येय ठेवलं असेल. आणि ही एक चांगली गोष्ट आहे! आपण प्रत्येकाने अशी ध्येयं ठेवली पाहिजेत आणि त्याप्रमाणे करत राहायचा प्रयत्न केला पाहिजे. (१ करिंथ. ९:२६) बायबल वाचणं एक चांगली सुरुवात आहे. पण ती फक्त एक सुरुवात आहे. जर आपल्याला बायबलच्या वाचनातून पुरेपूर फायदा मिळवायचा असेल, तर आणखी काहीतरी करणं गरजेचं आहे.
८ एका उदाहरणाचा विचार करा. जमिनीवर पडणारं पावसाचं पाणी हे जीवनासाठी खूप आवश्यक आहे. पण जर कमी वेळात खूप जास्त पाऊस पडला तर ते पाणी वाहून जाईल आणि जमिनीला ते शोषून घेता येणार नाही. तसं झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचा म्हणावा तसा फायदा होणार नाही. पावसाचं पाणी जमिनीत शोषलं जाऊन जर त्याचा वनस्पतीसाठी उपयोग व्हायचा असेल, तर त्यासाठी वेळ लागेल. त्याचप्रमाणे आपण जर घाईघाईत बायबल वाचलं तर आपण जे काही वाचतोय ते आपल्याला समजून घ्यायला आणि लक्षात ठेवायला जमणार नाही.—याको. १:२४.
९. भरभर बायबल वाचायची सवय लागली असेल तर आपण काय केलं पाहिजे?
९ तुम्हाला कधी असं जाणवलंय का, की तुम्ही खूप भरभर बायबल वाचता? अशा वेळी काय केलं पाहिजे? ते सावकाश वाचायचा प्रयत्न करा. तुम्ही जे काही वाचताय किंवा वाचलंय त्यावर मनन करायचा प्रयत्न करा. हे काही अवघड काम नाही. कारण मनन करणं म्हणजे तुम्ही जे वाचलंय त्यावर खोल विचार करणं. त्यामुळे मनन करता यावं म्हणून कदाचित तुम्ही तुमच्या बायबल अभ्यासाचा वेळ वाढवू शकता. किंवा तुम्ही थोडीशीच वचनं वाचून उरलेला वेळ वाचलेल्या गोष्टींवर विचार करण्यासाठी घालवू शकता. आधी उल्लेख केलेला व्हिक्टर म्हणतो: “मी थोडासाच भाग वाचायचा प्रयत्न करतो, म्हणजे एक अध्याय वगैरे. पण सकाळी-सकाळी बायबल वाचत असल्यामुळे, जे काही वाचलंय त्यावर दिवसभर विचार करायला मला संधी मिळते.” तुम्ही कोणतीही पद्धत वापरत असला, तरी तुम्ही जे काही वाचता त्यातून जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून तुम्ही हळूहळू बायबलचं वाचन करू शकता.—स्तो. ११९:९७; “ विचार करण्यासाठी प्रश्न” ही चौकट पाहा.
१०. तुम्ही जे वाचता ते कसं लागू करता येईल ते समजावून सांगा. (१ थेस्सलनीकाकर ५:१७, १८)
१० तुम्ही बायबल केव्हा वाचता आणि त्यासाठी किती वेळ घालवता, त्यापेक्षा वाचलेल्या गोष्टी कशा लागू करता येतील यावर विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही बायबलचा एखादा भाग वाचल्यानंतर स्वतःला विचारू शकता: ‘मी ही माहिती आत्ता किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये कशी लागू करू शकतो?’ हे समजून घ्यायला अशी कल्पना करा, की तुम्ही १ थेस्सलनीकाकर ५:१७, १८ (वाचा.) वाचत आहात. वाचल्यानंतर थोडं थांबून तुम्ही किती वेळा आणि किती मनापासून प्रार्थना करता यावर विचार करू शकता. तसंच ज्या गोष्टींसाठी तुम्हाला देवाचे आभार मानावेसे वाटतात त्या गोष्टींचासुद्धा तुम्ही विचार करू शकता. मग कदाचित तुम्ही तीन विशिष्ट गोष्टींसाठी यहोवाचे आभार मानायचं ठरवाल. अशा प्रकारे काही मिनिटं लक्ष देऊन वाचल्यामुळे तुम्ही काही प्रमाणात देवाचं वचन फक्त ऐकणारेच नाही, तर त्याप्रमाणे चालणारेही बनाल. तुम्ही बायबलच्या इतर भागांचा अशाच प्रकारे विचार केला, तर तुम्हाला किती फायदा होईल याचा विचार करा! खरंच, असं केल्यामुळे तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे म्हणून प्रगती करू शकाल. पण तुम्हाला बऱ्याच गोष्टींवर काम करायची गरज आहे असं लक्षात आलं, तर काय?
पूर्ण करता येतील अशी ध्येयं ठेवा
११. कधीकधी तुम्हाला खूप निराश झाल्यासारखं का वाटू शकतं? उदाहरण द्या.
११ जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा त्यातल्या गोष्टी कशा लागू करायच्या हे शोधत असताना तुम्हाला जाणवेल की आपल्याला बऱ्याच गोष्टींवर काम करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. कल्पना करा, की आजच्या बायबल वाचनात तुम्हाला भेदभाव न करण्याबद्दल सल्ला वाचायला मिळतो. (याको. २:१-८) त्यावर विचार करत असताना तुम्हाला असं जाणवतं की इतरांशी वागताना तुम्हाला आणखी सुधारणा करायची गरज आहे. म्हणून तुम्ही हा बदल करायचं ठरवता. छान! मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या वाचनात आपल्या बोलण्यावर ताबा ठेवण्याबद्दल वाचायला मिळतं. (याको. ३:१-१२) तुम्हाला जाणवतं की काही वेळा तुमचं बोलणं इतरांना खटकेल असं होतं. म्हणून तुम्ही ठरवता की इथून पुढे तुम्ही इतरांशी नेहमी प्रोत्साहनदायक आणि चांगलं बोलाल. मग तिसऱ्या दिवशी तुमच्या बायबल वाचनात तुम्हाला जगाची मैत्री टाळण्याबद्दल वाचायला मिळतं. (याको. ४:४-१२) तुमच्या लक्षात येतं, की मनोरंजनाची निवड करताना तुम्हाला थोडं लक्ष द्यायची गरज आहे. पण आत्ता चौथ्या दिवशी मात्र इतक्या साऱ्या गोष्टींवर आपल्याला काम करावं लागणार आहे, हे जाणवल्यामुळे तुम्ही खूप निराश होऊ शकता.
१२. बायबल वाचताना स्वतःमध्ये बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत सुधारणा करायची गरज आहे हे जाणवल्यावर निराश व्हायची गरज का नाही? (तळटीपसुद्धा पाहा.)
१२ बायबल वाचत असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा करायची गरज आहे असं जर जाणवलं, तर निराश होऊ नका. कारण याचा अर्थ असा होतो, की तुम्ही नम्र आहात आणि तुमचा हेतू चांगलाय. नम्र आणि स्वतःशी प्रामाणिक असणारी व्यक्ती जेव्हा बायबल वाचते, तेव्हा आपल्याला सुधारणा करायची गरज आहे हे लक्षात ठेवून बायबल वाचत असते. a नेहमी लक्षात ठेवा की “नवीन व्यक्तिमत्त्व” धारण करणं ही एक सतत चालत राहणारी क्रिया आहे. (कलस्सै. ३:१०) मग देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे होण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होईल?
१३. शिकलेल्या गोष्टी लागू करायचा एक मार्ग कोणता? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ वाचलेल्या सगळ्याच गोष्टी एकाच वेळी लागू करण्याऐवजी सुरुवातीला तुम्ही एक-दोन गोष्टी लागू करायचा प्रयत्न करू शकता. (नीति. ११:२) ही पद्धत वापरून पाहा: तुम्हाला ज्या गोष्टींवर काम करायचंय त्याची एक यादी तुम्ही बनवू शकता आणि त्यातल्या एक-दोन गोष्टी निवडून सगळ्यात आधी त्यांवर काम करू शकता. बाकीच्या गोष्टी तुम्हाला नंतर हळूहळू पूर्ण करता येतील. मग सगळ्यात आधी कोणत्या गोष्टीवर काम करायचं हे तुम्हाला कसं ठरवता येईल?
१४. तुम्ही कोणत्या ध्येयांपासून सुरुवात करू शकता?
१४ तुम्हाला पूर्ण करायला सोपं जाईल अशा एखाद्या ध्येयापासून तुम्ही सुरुवात करू शकता. किंवा तुम्हाला कोणत्या बाबतीत जास्त सुधारणा करायची गरज आहे त्यानुसार तुम्ही तुमचं ध्येय ठरवू शकता. एकदा का तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं, की वेगवेगळ्या प्रकाशनांमध्ये तुम्ही त्याबद्दल संशोधन करू शकता. उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक किंवा वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्सचा वापर करून तुम्ही त्यावर संशोधन करू शकता. तुमच्या ध्येयांबद्दल यहोवाला प्रार्थना करा. त्याने तुम्हाला ही ध्येयं पूर्ण करायला तुमच्यामध्ये ‘इच्छा निर्माण करावी आणि कार्य करायची ताकदही द्यावी,’ म्हणून तुम्ही त्याला विनंती करू शकता. (फिलिप्पै. २:१३) मग शिकलेल्या गोष्टी लागू करायचा प्रयत्न करा. तुमचं पहिलं ध्येय गाठल्यावर, कदाचित तुम्हाला दुसऱ्या ध्येयांवर काम करायची जास्त प्रेरणा मिळेल. खरंतर तुम्ही तुमच्या जीवनाच्या एखाद्या पैलूवर किंवा एखाद्या गुणाच्या बाबतीत प्रगती करता, तेव्हा कदाचित तुम्हाला इतर गोष्टींमध्येही असं करणं सोपं जाईल.
देवाच्या वचनाला ‘तुमच्यामध्ये कार्य’ करू द्या
१५. बायबल वाचण्याच्या बाबतीत यहोवाचे लोक इतरांपेक्षा कसे वेगळे आहेत? (१ थेस्सलनीकाकर २:१३)
१५ काही लोक दावा करतात की त्यांनी शंभर वेळा बायबल वाचलंय. पण ते खरोखर बायबलवर विश्वास ठेवतात का? त्यांनी ते लागू केलंय का किंवा त्याप्रमाणे आपल्या जीवनात बदल केले आहेत का? दुःखाची गोष्ट म्हणजे, त्यांनी तसं केलेलं नसतं. पण यहोवाचे लोक या नात्याने आपण मात्र वेगळे आहोत! पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांप्रमाणे आपण बायबल “खरोखर देवाचंच वचन आहे” असं त्याकडे पाहतो. शिवाय, आपण ते आपल्या जीवनात लागू करायचा पुरेपूर प्रयत्न करतो.—१ थेस्सलनीकाकर २:१३ वाचा.
१६. देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे बनण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?
१६ देवाचं वचन वाचून ते लागू करणं नेहमीच सोपं नसतं. ते वाचण्यासाठी वेळ काढायला आपल्याला बरीच खटपट करावी लागू शकते. किंवा आपल्याला भरभर बायबल वाचायची सवय असल्यामुळे आपल्याला ते नीट समजून घेऊन वाचता येत नसेल. किंवा बऱ्याच सुधारणा कराव्या लागणार आहेत हे जाणवल्यामुळे आपल्याला निराश झाल्यासारखं वाटत असेल. या समस्या आपल्याला डोंगराएवढ्या वाटत असल्या, तरी यहोवाच्या मदतीने आपण त्यांवर मात करू शकतो. म्हणून आपण त्याची मदत स्वीकारायचा निश्चय करू या आणि देवाचं वचन ऐकून विसरणारे नाही, तर त्याप्रमाणे चालणारे बनू या. यात काहीच शंका नाही की आपण जितकं जास्त देवाचं वचन वाचू आणि ते आपल्या जीवनात लागू करू तितकं जास्त आपण आनंदी असू.—याको. १:२५.
गीत ९४ देवाच्या वचनासाठी आभारी
a jw.org वर तुमचे मित्र काय म्हणतात?—बायबल वाचण्याबद्दल हा व्हिडिओ पाहा.