व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

काही प्रार्थनांची उत्तरं का मिळत नाहीत?

काही प्रार्थनांची उत्तरं का मिळत नाहीत?

स्वर्गात राहणारा आपला पिता, यहोवा देव, याला खऱ्‍या मनाने केलेल्या प्रार्थना ऐकायला फार आवडतं. खरंतर, अशा प्रार्थना ऐकायला तो खूप उत्सुक असतो. पण तो सगळ्याच प्रार्थना ऐकत नाही. असं का बरं? तसंच, प्रार्थना करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? या प्रश्‍नांची उत्तरं बायबल काय देतं ते आपण पुढे पाहू या.

“प्रार्थना करताना . . . त्याच गोष्टी पुन्हापुन्हा बोलू नका.”—मत्तय ६:७.

यहोवाला तोंडपाठ केलेली प्रार्थना किंवा एखाद्या पुस्तकातून वाचलेली प्रार्थना आवडत नाही; तर मनापासून केलेली प्रार्थना आवडते. तुमचा एखादा मित्र जर वारंवार तेच ते शब्द, तीच ती वाक्यं बोलत राहिला, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही वैतागणार नाही का? कारण त्याने तुमच्याशी एका मित्रासारखं मनमोकळेपणाने बोलावं असं तुम्हाला वाटतं. त्याचप्रमाणे, आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याशी एका मित्राप्रमाणे मनमोकळेपणाने बोलावं असं त्यालाही वाटतं.

‘तुम्ही मागता तेव्हा तुम्हाला ते मिळत नाही, कारण तुम्ही चुकीच्या उद्देशाने मागता.’—याकोब ४:३.

देवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी जर आपण त्याच्याकडे मागितल्या, तर तो आपलं ऐकेल अशी अपेक्षा आपण करणार का? कधीच नाही. समजा जुगार खेळणारी एखादी व्यक्‍ती यहोवाला अशी प्रार्थना करते की ‘माझं नशीब उजळू दे, मला हा डाव जिंकू दे,’ तर तो तिची प्रार्थना ऐकेल असं तुम्हाला वाटतं का? मुळीच नाही! कारण देवाने अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगितलं आहे, की आपण लोभ धरू नये आणि नशीबासारख्या चुकीच्या गोष्टींवर विश्‍वास ठेवू नये. (यशया ६५:११; लूक १२:१५) म्हणून, देवाने आपली प्रार्थना ऐकावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण मागितलेल्या गोष्टीबद्दल त्याला काय वाटतं याचा आपण विचार केला पाहिजे. देवाला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे आपल्याला बायबलमधून कळतं.

“जो कायद्याकडे दुर्लक्ष करतो, त्याची प्रार्थनासुद्धा घृणास्पद असते.”—नीतिवचनं २८:९.

प्राचीन काळात जे लोक जाणूनबुजून वाईट कामं करत होते, त्यांची प्रार्थना देवाने ऐकली नाही. (यशया १:१५, १६) आजसुद्धा देव वाईट कामं करणाऱ्‍यांच्या प्रार्थना ऐकत नाही. (मलाखी ३:६) त्यामुळे, देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण त्याचे नियम पाळले पाहिजे. पण पूर्वी जर आपण देवाचे नियम मोडले असतील आणि चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर काय? तर यहोवा देव आपल्या प्रार्थना ऐकेल का? नक्कीच ऐकेल. पण त्यासाठी आपण केलेल्या चुकांबद्दल मनापासून पश्‍चात्ताप केला पाहिजे आणि देवाला आवडणाऱ्‍या गोष्टी करायचा शक्य तितका प्रयत्न केला पाहिजे. मग तो मोठ्या मनाने आपल्याला माफही करेल.—प्रेषितांची कार्यं ३:१९.