आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?
२ | बदला घेऊ नका
बायबलची शिकवण:
“वाइटाबद्दल कोणाचं वाईट करू नका, तर सगळ्यांच्या दृष्टीने जे चांगलं ते करण्याकडे लक्ष द्या. . . . सूड [म्हणजे बदला] घेऊ नका, . . . कारण असं लिहिलं आहे: ‘“सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,” असं यहोवा म्हणतो.’”—रोमकर १२:१७-१९.
याचा काय अर्थ होतो:
आपल्यासोबत कोणी वाईट करतं तेव्हा राग येणं साहजिकच आहे. पण अशा वेळीही आपण बदला घेऊ नये. कारण बदला घेतलेलं देवाला आवडत नाही. त्याची इच्छा आहे, की आपण सगळ्या गोष्टी त्याच्यावर सोडाव्यात. कारण वेळ आल्यावर तो सगळं काही ठीक करेल आणि आपल्याला न्याय मिळवून देईल.—स्तोत्र ३७:७, १०.
तुम्ही काय करू शकता:
बदला घेतल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते, आणि द्वेषाचं चक्र चालूच राहतं. म्हणून, तुमचं कोणी वाईट केलं तरी बदला घेऊ नका. रागावर ताबा मिळवा आणि शांतीने परिस्थिती हाताळायचा प्रयत्न करा. जे झालं आहे ते कधीकधी मागे सोडून देण्यातच आपलं भलं असतं. (नीतिवचन १९:११) पण काही वेळा तुम्हाला समस्या सोडवायला पावलं उचलावी लागतील. उदाहरणार्थ, जेव्हा चोरी होते किंवा दुसरा एखादा गुन्हा घडतो, तेव्हा तुम्हाला कदाचित पोलिस स्टेशनमध्ये किंवा अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी लागेल.
बदला घेतल्यामुळे स्वतःचंच नुकसान होतं
पण समजा, तुम्ही शांतीने परिस्थिती हाताळायचा खूप प्रयत्न करूनसुद्धा समस्या सुटली नाही तर काय? किंवा तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नसेल तर काय? तरीसुद्धा बदला घेऊ नका. कारण बदला घेतल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. म्हणून द्वेषाचं चक्र तिथेच थांबवा. देव सगळ्या समस्या चांगल्या प्रकारे सोडवेल यावर भरवसा ठेवा. बायबल म्हणतं: ‘यहोवावर विसंबून राहा, म्हणजे तो तुझ्या वतीने कार्य करेल.’—स्तोत्र ३७:३-५.