आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?
३ | मनातून द्वेष काढून टाका
बायबलची शिकवण:
“आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या; म्हणजे, देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.”—रोमकर १२:२.
याचा काय अर्थ होतो:
आपण काय विचार करतो याकडे देवाचं लक्ष असतं. (यिर्मया १७:१०) द्वेषाची सुरूवात आपल्या मनातून म्हणजे विचारांतून होते. जेव्हा आपण कोणाचा द्वेष करतो तेव्हा आपण त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी बोलतो आणि त्यांच्याशी वाईट वागतो. म्हणून आपण एखाद्याचा द्वेष करायचा विचारही मनात येऊ देऊ नये. आपण असं केलं तरच आपण “स्वतःचं रूपांतर होऊ” देऊ आणि द्वेषाचं चक्र मोडून टाकू.
तुम्ही काय करू शकता:
तुम्हाला दुसऱ्या वंशाच्या, जातीच्या आणि दुसऱ्या देशाच्या लोकांबद्दल कसं वाटतं याबद्दल प्रामाणिकपणे विचार करा. यासाठी स्वतःला असे प्रश्न विचारा: ‘मला त्यांच्याबद्दल काय वाटतं? माझं त्यांच्याबद्दल असलेलं मत, त्यांच्याबद्दल असलेल्या माहितीवर आधारीत आहे, की इतरांकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारीत आहे?’ तसंच, टिव्ही किंवा इंटरनेटवर हिंसेला किंवा द्वेषाला उत्तेजन देणारे कार्यक्रमही पाहू नका.
देवाचं वचन मनातून आणि हृदयातून द्वेष काढून टाकायला मदत करतं
एखाद्या देशाबद्दल किंवा जातीबद्दल आपण जो विचार करतो तो बरोबर आहे की नाही, हे आपण स्वतः सांगू शकत नाही. पण देवाचं वचन, म्हणजे बायबल आपल्याला आपल्या “हृदयातले विचार आणि हेतू यांची पारख” करायला मदत करू शकतं. (इब्री लोकांना ४:१२) म्हणून बायबल वाचत राहा. आणि त्यात जे लिहिलं आहे त्याप्रमाणे तुमचे विचार आहेत की नाही याचं परिक्षण करत राहा. कारण देवाचं वचन आपल्याला आपल्या मनातून आणि हृदयातून ‘भक्कम बुरुजांसारखा’ असलेला आणि खोलवर मुळावलेला द्वेष काढून टाकायला मदत करतं.—२ करिंथकर १०:४, ५.