व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं?

जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं?

जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं?

बायबलमध्ये उत्पत्ति नावाच्या पुस्तकात निर्मितीविषयी सांगण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे की यहोवा * देवाने पहिला मानव आदाम याला घडवलं आणि त्याला अशी आज्ञा दिली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २: १६, १७) या सोप्या आणि स्पष्ट आज्ञेवरून कळतं, की आदामने जर देवाचं ऐकलं असतं तर तो एदेन बागेत नेहमीसाठी जगला असता. त्याला कधीच मरण आलं नसतं.

पण दुःखाची गोष्ट म्हणजे, आदामने देवाची आज्ञा पाळण्याचं आणि कायमस्वरूपी जगण्याचं निवडलं नाही. याऐवजी त्याने देवाची आज्ञा मोडली. त्याच्या पत्नीने, हव्वाने जेव्हा त्याला मना केलेलं फळ खायला दिलं तेव्हा त्याने ते खाल्लं. (उत्पत्ति ३:१-६) जरी देवाची आज्ञा आदामने मोडली असली, तरी त्याचे परिणाम आज आपल्यालाही भोगावे लागत आहेत. बायबलचा एक लेखक पौल याबद्दल असं म्हणतो: “म्हणूनच, ज्या प्रकारे एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, त्याच प्रकारे मरण सर्व माणसांमध्ये पसरले, कारण त्या सर्वांनी पाप केले होते.” (रोमकर ५:१२) या ठिकाणी ज्या ‘एका माणसाचा’ उल्लेख केला आहे तो आदाम होता. मग ‘पाप’ काय होतं आणि त्यामुळे मृत्यू कसा आला?

आदामने जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडली होती; त्याने जे केलं ते पाप होतं. (१ योहान ३:४) देवाने आदामला सांगितलं होतं की पापाची शिक्षा मृत्यू आहे. आदाम आणि भविष्यात जन्माला येणारी त्याची मुलं जोपर्यंत देवाने दिलेल्या आज्ञेचं पालन करणार होती, तोपर्यंत त्यांच्यात पाप येणार नव्हतं आणि त्यांना कधीही मृत्यूचा सामना करावा लागणार नव्हता. मानवांना मरण यावं अशा उद्देशाने देवाने त्यांना निर्माण केलंच नव्हतं. याउलट, त्याची इच्छा होती की त्यांनी नेहमीसाठी जगावं.

पण बायबलमध्ये सांगितल्यानुसार “सर्व माणसांमध्ये . . . मरण पसरले,” आणि हीच आजची वस्तुस्थिती आहे. मग मृत्यूनंतर आपल्यातला काही भाग जिवंत राहतो का? अनेक लोक ‘हो’ असं उत्तर देतील. त्यांच्या म्हणण्यानुसार जिवंत राहणारा तो भाग म्हणजे आत्मा, जो अमर राहतो. पण जर ही गोष्ट खरी आहे, तर मग देव आदामला खोटं बोलला असा याचा अर्थ होतो. कारण मृत्यूनंतर जर आपल्यातला एखादा भाग दुसऱ्या कुठल्यातरी विश्वात जिवंत राहत असेल, तर मग पापाची शिक्षा मृत्यू आहे असं जे देवाने म्हटलं ते खोटं ठरणार नाही का? पण बायबल म्हणतं: “देव कधीही खोटे बोलू शकत नाही.” (इब्री लोकांना ६:१८) खरंतर हव्वाशी खोटं बोलणारा सैतान होता. तो म्हणाला: “तुम्ही खरोखर मरणार नाही.”—उत्पत्ति ३:४.

जर अमर आत्म्याची शिकवण खोटी आहे, तर मृत्यूनंतर आपलं नेमकं काय होतं?

बायबल या प्रश्‍नाचं उत्तर देतं

उत्पत्तिच्या अहवालात यहोवा देवाने जी निर्मिती केली त्याबद्दल सांगितलं आहे. त्यात म्हटलं आहे: “मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.” इथे “जीवधारी प्राणी” असा जो वाक्यांश वापरला आहे, तो निफेश * या हिब्रू शब्दातून भाषांतरित करण्यात आला आहे. याचा शाब्दिक अर्थ ‘श्वास घेणारा प्राणी’ असा होतो.—उत्पत्ति २:७.

निर्मिती करताना देवाने मानवांमध्ये अमर राहणारा आत्मा टाकला नाही, तर प्रत्येक व्यक्तीच एक “जीवधारी प्राणी” आहे असं बायबल सांगतं. म्हणूनच बायबल लिखाणांमध्ये कुठेही “अमर आत्मा” असा वाक्यांश शोधला तरी सापडणार नाही.

काहींचं म्हणणं आहे, की मानवांमध्ये अमर आत्मा असतो. पण बायबल या शिकवणीला दुजोरा देत नाही. मग बऱ्याच धर्मांमध्ये ही शिकवण का दिली जाते? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला प्राचीन इजिप्तचा इतिहास पाहावा लागेल.

खोटी शिकवण वाढत जाते

इ.स.पू. पाचव्या शतकातला ग्रीक इतिहासकार हेरोडिटस, याने इजिप्तच्या लोकांबद्दल असं म्हटलं: “त्यांनी सर्वात आधी अमर आत्म्याची शिकवण मानवांना दिली.” यासोबतच, आणखीन एका प्राचीन संस्कृतीने म्हणजेच, बाबेलच्या संस्कृतीनेही अमर आत्म्याची शिकवण स्वीकारली. थोर सिकंदरने इ.स.पू. ३३२ साली, मध्य-पूर्व देशांना काबीज केलं, तोपर्यंत ग्रीक तत्त्वज्ञान्यांनी ही शिकवण प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ही शिकवण लवकरच संपूर्ण ग्रीक साम्राज्यात पसरली.

तुम्हाला “अमर आत्मा” असा वाक्यांश कोणत्याही बायबल लिखाणांमध्ये सापडणार नाही

इ.स. पहिल्या शतकातल्या इसीन आणि परूशी या दोन प्रमुख यहुदी पंथांनी, मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो असं शिकवलं. द जूईश एन्सायक्लोपिडिया यात म्हटलं आहे: “यहुदी लोकांमध्ये अमर आत्म्याची शिकवण ग्रीक विचारधारांमधून आणि मुख्यतः प्लेटोच्या तत्त्वज्ञानांतून आली.” पहिल्या शतकातला यहुदी इतिहासकार जोसिफस याचंदेखील म्हणणं आहे, की ही शिकवण पवित्र शास्त्रावर आधारलेली नसून “ग्रीक लोकांच्या विश्वासावर आधारित आहे.” आणि या शिकवणी दंतकथा लिहिणाऱ्यांच्या कथांचा एक संग्रह आहे, असं त्याचं मत आहे.

ग्रीक संस्कृतीचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतसं स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणाऱ्यांनीदेखील ही खोटी शिकवण स्वीकारण्यास सुरुवात केली. योन लेंडरीन या इतिहासकाराने म्हटलं, “प्लेटोच्या सिद्धान्तानुसार, आपला आत्मा आधी एका चांगल्या स्थितीत होता आणि आता अशा एका जगात राहत आहे ज्याचं पतन झालं आहे. या शिकवणीमुळे प्लेटोच्या तत्त्वज्ञानाला, ख्रिस्ती धर्माच्या शिकवणींसोबत जोडणं शक्य झालं.” अशा प्रकारे अमर आत्म्याची ही खोटी शिकवण, ख्रिस्ती धर्मजगताच्या मूळ शिकवणींमध्ये सामील झाली.

“सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल”

पहिल्या शतकात पौलने सल्ला दिला: “प्रेरित वचन स्पष्टपणे सांगते की भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा काही जण दिशाभूल करणाऱ्या प्रेरित संदेशांकडे आणि दुरात्म्यांच्या शिकवणींकडे लक्ष देऊन विश्वास सोडून देतील.” (१ तीमथ्य ४:१) त्याचे हे शब्द आज किती खरे ठरले आहेत! पण अमर आत्म्याची शिकवण ही दुरात्म्यांच्या शिकवणींपैकी फक्त एक आहे. ही शिकवण बायबलमधून नसून हिचा उगम खोट्या धर्मांतून आणि तत्त्वज्ञानातून झाला आहे.

पण आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येशूने म्हटलं: “तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल.” (योहान ८:३२) जगातले अनेक धर्म अशा शिकवणींना आणि रितीरिवाजांना बढावा देत आहेत ज्यांमुळे देवाचा अनादर होतो. पण बायबलमधल्या सत्यांविषयी अचूक ज्ञान घेतल्यामुळे आपण अशा शिकवणींपासून आणि रितीरिवाजांपासून मुक्त होतो. इतकंच काय, तर देवाच्या वचनातलं सत्य आपल्याला मृत्यूशी संबंधित असलेल्या परंपरा आणि अंधविश्वासांच्या बेड्यांतूनही मुक्त करतं.—“ मृतजन कुठे आहेत?” ही चौकट पाहा.

मानवांनी फक्त ७० किंवा ८० वर्षंच या पृथ्वीवर जगावं आणि त्यानंतर दुसऱ्या एका विश्वात कायमस्वरूपी राहण्यासाठी जावं, यासाठी देवाने त्यांना निर्माण केलं नव्हतं. तर मानवांनी देवाच्या आज्ञेत राहून याच पृथ्वीवर कायमस्वरूपी जगावं, हा देवाचा मूळ संकल्प होता. हा महान संकल्प देवाचं मानवांवर असलेल्या प्रेमाचा पुरावा आहे आणि तो नक्की पूर्ण होणार. (मलाखी ३:६) बायबलच्या एका लेखकाने जे लिहिलं त्यामुळे या गोष्टीवर आपला भरवसा आणखी वाढतो. तो म्हणाला: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ३७:२९.

 

^ परि. 3 बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं आहे.

^ परि. 9 काही बायबल भाषांतरात जसं की, मराठी कॉमन लँग्वेज, ईझी-टू-रीड व्हर्शन आणि पं.र.भा. यांमध्ये निफेश या शब्दाला “जिवंत प्राणी” असं भाषांतरित करण्यात आलं आहे. तसंच, सुबोध भाषांतर यामध्ये याचं भाषांतर “जीवधारी प्राणी” असं करण्यात आलं आहे.