व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | सर्वात चांगली भेट!

शोध सर्वात चांगल्या भेटवस्तूचा

शोध सर्वात चांगल्या भेटवस्तूचा

एखाद्याला आवडेल अशी ‘सर्वात चांगली’ भेटवस्तू शोधणं, हे काही सोपं काम नाही. कारण ज्याला तुम्ही भेटवस्तू देणार आहात, त्याच्यासाठी ती मौल्यवान आहे की नाही हे शेवटी तोच ठरवेल. तसंच एखाद्याला जी भेटवस्तू आवडते तीच दुसऱ्‍यालाही आवडेल, हेही गरजेचं नाही.

उदाहरणार्थ, एका तरुण व्यक्‍तीला एखादं आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण भेट म्हणून मिळालं, तर आपल्याला बेस्ट गिफ्ट मिळालं आहे असं कदाचित तिला वाटेल. तर दुसरीकडे पाहता, एका वयस्क व्यक्‍तीला आपल्या वाडवडिलांची एखादी वस्तू भेट म्हणून मिळाली, तर तिच्यासाठी ती खूप मौल्यवान ठरू शकते. कारण त्या वस्तूशी तिच्या भावना जुडलेल्या असतात. काही संस्कृतींत लहानांना आणि मोठ्यांनाही भेट म्हणून पैसे दिलेले आवडतात. कारण ते आपल्या इच्छेनुसार त्याचा वापर करू शकतात.

सर्वात चांगली भेटवस्तू शोधणं कठीण असलं, तरी बरेच लोक हार मानत नाहीत. ते आपल्या प्रियजनांसाठी विचारपूर्वक हा शोध चालूच ठेवतात. अशी भेटवस्तू नेहमी सापडेलच असं नाही. पण काही गोष्टी लक्षात घेतल्या, तर आपल्याला यात यश मिळू शकतं. समोरच्या व्यक्‍तीला आवडेल अशी भेटवस्तू घेण्यासाठी कोणत्या चार गोष्टींमुळे आपल्याला मदत होऊ शकते, ते आता आपण पाहू.

इच्छा लक्षात घ्या. उत्तर आयर्लंडमध्ये बेलफास्ट या ठिकाणी राहणारा एक पुरुष म्हणतो, की १०-११ वर्षांचा असताना त्याला एक रेसिंग सायकल भेट म्हणून मिळाली होती. त्याच्या मते ही त्याला मिळालेली सर्वात चांगली भेटवस्तू होती. त्याबद्दल तो म्हणतो, “मला खरंच ती सायकल हवी होती.” यावरून आपल्याला कळतं, की समोरच्याला एखादी भेटवस्तू आवडेल की नाही याचा संबंध काही प्रमाणात त्याच्या इच्छेशी असतो. त्यामुळे ज्याच्यासाठी भेटवस्तू घेणार आहात त्याच्याबद्दल विचार करा. त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण एखाद्याला जी गोष्ट महत्त्वाची वाटते ती त्याच्याजवळ असावी, अशी त्याची इच्छाही असू शकते. एक उदाहरण घ्यायचं झालं, तर आजी-आजोबांना सहसा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतं. त्यांच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असू शकते. आणि त्यामुळे त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी त्यांना सतत भेटावं, अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे आजी-आजोबांसाठी आपल्या कुटुंबासोबत ट्रिपला जाणं, हे इतर कोणत्याही भेटवस्तूपेक्षा सर्वात चांगली भेट ठरू शकते.

एखाद्याची इच्छा काय आहे, हे जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे लक्ष देऊन ऐकणं. बायबल आपल्याला “ऐकण्यास उत्सुक व बोलण्यात संयमी” असण्याचं प्रोत्साहन देतं. (याकोब १:१९) आपल्या मित्रांशी किंवा नातेवाइकांशी रोजचं संभाषण करताना लक्ष देऊन ऐका. असं केल्यामुळे आपल्याला त्यांच्या आवडीनिवडी समजू शकतील. यामुळे त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देण्यासाठी आपल्याला मदत होईल.

गरजा ओळखा. एखाद्याला तुम्ही त्याच्या गरजेची भेटवस्तू दिली तर त्याच्यासाठी ती खूप मौल्यवान ठरू शकते, मग ती भेटवस्तू साधी असली तरीही. पण समोरच्याला नेमक्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, हे आपल्याला कसं कळेल?

एखाद्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा त्याला कोणती गोष्ट हवी आहे, हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, त्या व्यक्‍तीलाच विचारणं. पण असं केल्यामुळे बऱ्‍याच जणांचा भेट देण्याचा आनंद थोड्या प्रमाणात हिरावला जातो. कारण त्यांनासुद्धा सर्वात चांगली भेटवस्तू देण्यात जे सरप्राईज दडलेलं असतं ते आवडतं. आणि अशीही शक्यता असते की काही लोक आपल्या आवडी-निवडींबद्दल मनमोकळेपणाने बोलतील, पण आपल्या गरजांबद्दल त्यांना तसं करायला आवडणार नाही.

त्यामुळे ज्यांना भेटवस्तू देणार आहात, त्यांची परिस्थिती लक्षात घ्या. ती व्यक्‍ती तरुण आहे की वयस्क? तिचं लग्न झालं आहे की नाही? तिचा घटस्फोट झाला आहे का? ती विधवा किंवा विधूर आहे का? ती नोकरी करते की निवृत्त आहे? एखाद्या व्यक्‍तीला कोणत्या भेटवस्तूची गरज असेल याचा विचार करा.

एखाद्याला कशाची गरज आहे, हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या समजशक्‍तीचा वापर करू शकतो. आपण अशा लोकांशी बोलू शकतो, जे सारख्याच परिस्थितींतून गेले आहेत. कारण त्या वेळी त्यांना कोणत्या गोष्टी खूप गरजेच्या होत्या, हे ते आपल्याला सांगू शकतात. आणि कदाचित त्या गोष्टींबद्दल सहसा इतर जण विचारही करत नसतील. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर ज्याचा कोणी विचारही केला नसेल अशी गरजेची वस्तू तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकाल.

वेळ महत्त्वाची आहे. बायबल म्हणतं: “समयोचित बोल किती उत्तम!” (नीतिसूत्रे १५:२३) बायबलच्या या वचनातून समजतं, की आपण कोणत्या वेळी काय बोलतो यामुळे खूप फरक पडू शकतो. हे आपल्या कार्यांच्या बाबतीतही तितकंच खरं आहे. योग्य वेळी योग्य शब्द बोलल्याने ऐकणाऱ्‍याला आनंद होतो. तसंच, एखाद्याला योग्य वेळी किंवा प्रसंगाला शोभेल अशी भेटवस्तू दिली तर त्याच्या आनंदात नक्कीच भर पडते.

समजा तुमच्या मित्राचं लग्न होणार असेल, एखाद्याचं लवकरच शिक्षण संपणार असेल किंवा एका जोडप्याला लवकरच बाळ होणार असेल, तर अशा प्रसंगी तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता. पण याव्यतिरिक्‍तही अनेक प्रसंग आहेत, जेव्हा तुम्ही भेटवस्तू देऊ शकता. काही जण येणाऱ्‍या वर्षी कोणते काही खास प्रसंग आहेत याची यादी बनवतात. असं केल्यामुळे प्रत्येक प्रसंगासाठी कोणती भेटवस्तू सर्वात चांगली असेल हे ठरवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो. *

पण तुम्ही फक्‍त सणासुदीच्या निमित्तानेच नव्हे, तर इतर प्रसंगीसुद्धा भेटवस्तू देऊ शकता. भेट देण्याचा आनंद तुम्ही कुठल्याही वेळी अनुभवू शकता. पण असं असलं, तरी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जर एका पुरुषाने एका स्त्रीला काही विशिष्ट कारण नसताना भेटवस्तू दिली, तर त्याला ती आवडते आणि म्हणून त्याने तिला ती भेटवस्तू दिली आहे, असा तिचा गैरसमज होऊ शकतो. म्हणूनच भेट देण्यामागचा हेतूसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण असं केलं नाही, तर गैरसमज किंवा समस्या निर्माण होऊ शकतात.

भेट देणाऱ्‍याचे हेतू. वर सांगितलेल्या उदाहरणावरून दिसून येतं, की आपण ज्याला भेट देणार आहोत तो आपल्या हेतूंविषयी गैरसमज तर करून घेणार नाही ना? याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरीकडे पाहता, भेट देणाऱ्‍यानेही स्वतःच्या हेतूंचं नीट परीक्षण करणं गरजेचं आहे. भेटवस्तू देणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांना वाटतं, की त्यांचे हेतू योग्य आहेत. पण असेही बरेच लोक आहेत ज्यांना भेट देणं दबाव असल्यासारखं वाटू शकतं. कारण, वर्षातून अमुक प्रसंगी भेटवस्तू देण्याची रीत असते आणि अशा वेळी भेटवस्तू द्यावीच लागेल असं त्यांना वाटतं. आणि असेही लोक आहेत, जे बदल्यात काही मिळेल या अपेक्षेने किंवा त्यांना विशेष वागणूक दिली जाईल या विचाराने इतरांना भेटवस्तू देतात.

भेटवस्तू देण्यामागचा आपला हेतू चांगला आहे याची आपण खात्री कशी करू शकतो? बायबल म्हणतं: “तुम्ही जे काही करता ते सर्व प्रेमाने करा.” (१ करिंथकर १६:१४) जर समोरच्या व्यक्‍तीसाठी खरं प्रेम आणि आपुलकी असल्यामुळे तुम्ही भेट द्याल, तर तिला खूप आनंद होईल. त्यासोबतच उदारता दाखवल्याबद्दल भेट देताना तुम्हालासुद्धा आनंद होईल. जेव्हा तुम्ही मनापासून भेट देता, तेव्हा तुम्ही स्वर्गात राहणाऱ्‍या पित्याला म्हणजेच देवाला खूश करत असता. बायबल पुस्तकाच्या एका लेखकाने, म्हणजे पौलने प्राचीन काळातल्या करिंथमध्ये राहणाऱ्‍या ख्रिस्ती लोकांची प्रशंसा केली. कारण यहूदीया इथल्या ख्रिस्ती लोकांना जेव्हा मदतीची गरज होती, तेव्हा करिंथच्या लोकांनी उदारता दाखवून मदत कार्य केलं. पौल त्यांच्याविषयी म्हणाला: “आनंदाने देणारा देवाला आवडतो.”—२ करिंथकर ९:७.

वर दिलेल्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, तर इतरांना आनंद होईल अशा भेटवस्तू त्यांना देणं आपल्याला शक्य होईल. या आणि इतर काही गोष्टी लक्षात ठेवून देवानेसुद्धा मानवजातीसाठी एक सर्वात चांगली भेट दिली आहे. ही भेट मानवांसाठी असलेल्या त्याच्या उद्देशाचा एक भाग आहे. त्याने मानवांसाठी सर्वात श्रेष्ठ अशी कोणती भेट दिली आहे? हे जाणून घेण्यासाठी पुढचा लेख वाचा.

^ परि. 13 काही जण वाढदिवस किंवा सणासुदीच्या वेळी भेटवस्तू देतात. पण या सणांच्या वेळी सहसा अशा गोष्टी करणं सामील असतं, ज्या बायबलच्या शिकवणींनुसार नाहीत. या नियतकालिकातला, “वाचक विचारतात—ख्रिश्‍चनांनी नाताळ सण साजरा करणं योग्य आहे का?” हा लेख पाहा.