एका चांगल्या भविष्यासाठी भरवशालायक मार्गदर्शन कुठे मिळेल?
आधीच्या लेखांत आपण पाहिलं, की पुढे आपलं भविष्य चांगलं असावं म्हणून लोक नशिबावर, शिक्षणावर, पैशावर आणि सत्कर्मांवर भरवसा ठेवतात. पण हे सगळे पर्याय, एखाद्या ठिकाणी पोचण्यासाठी अशा लोकांना रस्ता विचारण्यासारखं आहे ज्यांना स्वतःलाच ते ठिकाण माहीत नाही. मग चांगल्या भविष्यासाठी कोणतंही भरवशालायक मार्गदर्शन नाही, असा याचा अर्थ होतो का? नाही!
सगळ्यात चांगलं मार्गदर्शन कोण देऊ शकतं
महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा आपण सहसा मोठ्यांचा आणि ज्यांना चांगली समज आहे अशांचा सल्ला घेतो. अगदी तसंच, चांगल्या भविष्यासाठी आपल्याला अशा एका व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज आहे जिला आपल्यापेक्षा जास्त अनुभव आणि आपल्यापेक्षा कितीतरी जास्त समज आहे. त्या व्यक्तीकडून मिळणारं मार्गदर्शन आपल्याला एका पवित्र ग्रंथात वाचायला मिळतं. त्या ग्रंथाचं लिखाण जवळजवळ ३,५०० वर्षांपूर्वी सुरू झालं होतं. तो पवित्र ग्रंथ म्हणजे बायबल.
बायबलवर तुम्ही भरवसा का ठेवू शकता? कारण या ग्रंथाचा लेखक अख्ख्या विश्वात सगळ्यात बुद्धिमान आहे. त्याचं वर्णन, “अति प्राचीन” आणि “अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत” असणारा असं केलं आहे. (दानीएल ७:९; स्तोत्र ९०:२) तोच ‘आकाश निर्माण करणारा आणि पृथ्वी घडवणारा’ खरा देव आहे. (यशया ४५:१८) आणि बायबलमध्ये त्याने आपलं नाव यहोवा असल्याचं सांगितलं आहे.—स्तोत्र ८३:१८.
बायबल हे सर्व मानवांच्या निर्माणकर्त्याकडून आलेलं पुस्तक असल्यामुळे ते ठराविक एका संस्कृतीला किंवा वंशाला श्रेष्ठ समजत नाही. बायबलचा सल्ला कोणत्याही काळासाठी लागू होण्यासारखा आहे. आणि तो सगळ्यांनाच फायदेकारक आहे, मग ते कोणत्याही देशातले असोत. बायबल हे एकच असं पुस्तक आहे जे सगळ्यात जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि ज्याचं सगळ्यात जास्त प्रमाणात वितरण करण्यात आलं आहे. * याचा अर्थ, जगातले सगळेच लोक ते समजू शकतात आणि त्यापासून त्यांना फायदा होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींवरून कळतं, की बायबलमध्ये जे म्हटलं आहे ते अगदी खरं आहे:
“देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही. तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.”—प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५.
आईवडील जसं आपल्या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात, अगदी तसंच यहोवा देवसुद्धा एका प्रेमळ पित्याप्रमाणे आपल्याला त्याच्या वचनाद्वारे, म्हणजेच बायबलद्वारे मार्गदर्शन पुरवतो. (२ तीमथ्य ३:१६) देवानेच आपल्याला बनवलं आहे आणि आपल्यासाठी सगळ्यात चांगलं काय हे आपल्यापेक्षा जास्त त्याला माहीत आहे. त्यामुळे त्याच्या वचनावर आपण नक्कीच भरवसा ठेवू शकतो.
अशा प्रकारचं भविष्य मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? ते जाणून घेण्यासाठी पुढचा लेख वाचा.
^ परि. 6 बायबलच्या भाषांतराबद्दल आणि वितरणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.pr418.com/mr या वेबसाईटला भेट द्या आणि बायबलच्या शिकवणी > इतिहास आणि बायबल, या टॅबखाली पाहा.
^ परि. 16 अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या, १ जानेवारी २००८ च्या टेहळणी बुरूज अंकातला पृष्ठ २२-२४ वर दिलेला, “यहोवा जे भाकीत करतो ते खरे ठरते,” हा लेख वाचा. हे नियतकालिक jw.org/mr या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यासाठी लायब्ररी > नियतकालिके या टॅबखाली पाहा.