तुमचं भविष्य कशावर अवलंबून आहे?
आज अनेक जण असं मानतात, की एक अदृश्य शक्ती आपलं भविष्य ठरवत असते. म्हणून ते असे काही रीतीरिवाज पाळतात किंवा अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे त्यांचं येणारं आयुष्य सुधारेल असं त्यांना वाटतं.
अनेकांचा काय विश्वास आहे
राशीभविष्य: काही लोक असं मानतात, की त्यांच्या जन्माच्या वेळी ताऱ्यांची जी स्थिती होती त्यावरून त्यांचं भविष्य ठरतं. त्यामुळे ते पुढे येणारे धोके कसे टाळता येतील आणि जीवनात यश कसं मिळवता येईल, हे जाणून घेण्यासाठी राशीभविष्य सांगणाऱ्यांकडे जातात.
फेंग शुई: काहींचं असं म्हणणं आहे, की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी निसर्गातल्या अदृश्य शक्तींचा आजूबाजूच्या वातावरणात समतोल राखणं गरजेचं आहे. हाँगकाँगमध्ये राहणारी लो विंग * असं म्हणते: “एका फेंग शुई मास्टरने मला असं सांगितलं, की मी जर माझ्या दुकानात एका विशिष्ट जागी एक खास प्रकारची क्रिस्टलची वस्तू ठेवली तर मला भरपूर पैसे कमवता येतील.” फेंग शुईसारखंच, बरेच लोक वास्तुशास्त्रालाही खूप मानतात. त्यांना असं वाटतं, की या शास्त्राप्रमाणे जर घर बांधलं तर घरात सुखशांती आणि समृद्धी असेल.
पूर्वजांची उपासना: असे काही जण आहेत, जे असं मानतात की आपण जर आपल्या पूर्वजांना किंवा देवी-देवतांना प्रसन्न केलं, तर ते आपलं संरक्षण करतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. व्हिएतनाममध्ये राहणारी वॅन म्हणते: “मृत वाडवडिलांची पूजाअर्चा केली तर आता आणि भविष्यातही आपलं आणि आपल्या मुलाबाळांच जीवन सुखी होईल असं मला वाटायचं.”
पुनर्जन्म: अनेक जण असं मानतात, की आपल्या मृत्यूनंतर आपला पुनर्जन्म होतो आणि अशा प्रकारे जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्माचं हे चक्र सतत चालत राहतं. ते असं मानतात, की आपल्या जीवनात जे काही घडतं, ते आधीच्या जन्मात केलेल्या कर्मांची फळं असतात.
पण बऱ्याच लोकांना या गोष्टी पटत नाहीत. ही सगळी अंधश्रद्धा आहे असं ते म्हणतात. पण तरी हस्तरेषा, राशीभविष्य, औजा बोर्ड आणि जन्मपत्रिका अशा गोष्टींमधून भविष्य जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. पुढे आयुष्यात काय होणार हे जाणून घेण्याचा एक चान्स म्हणून या गोष्टीकडे बघायला काय हरकत आहे, असं त्यांना वाटतं.
यामुळे लोकांना फायदा झाला आहे का?
या गोष्टी मानणाऱ्यांना एक चांगलं जीवन आणि एक चांगलं भविष्य मिळालं आहे का?
व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या हाऊ नावाच्या एका माणसाचा विचार करा. जीवनात यश मिळावं म्हणून तो राशीभविष्य, फेंग शुई आणि पूर्वजांच्या उपासनेकडे वळाला. मग मिळालं का त्याला यश? हाऊ म्हणतो: “माझा व्यवसाय ठप्प पडला. मी कर्जबाजारी झालो. माझं कुटुंब विस्कटलं आणि मी खूप दुःखात बुडून गेलो.”
तायवानमध्ये राहणारा च्योमिंग राशीभविष्य, पुनर्जन्म, नशीब, फेंग शुई आणि पूर्वजांची उपासना या गोष्टींवर विश्वास ठेवायचा. या गोष्टींवर बराच विचार केल्यानंतर तो म्हणतो: “या शिकवणी आणि प्रथा गोंधळात टाकणाऱ्या आहेत आणि त्या एकमेकांच्या विरोधात आहेत. माझ्या लक्षात आलं, की राशीभविष्यात जे सांगितलेलं असायचं, ते सहसा चुकीचं असायचं. तसं मुळीच घडायचं नाही. आणि पुनर्जन्माबद्दल बोलायचं तर मागच्या जन्मातलं जर काहीच आठवत नसेल, तर पुढच्या जन्मी चांगलं जीवन मिळावं म्हणून सुधारणा कशी करता येईल?”
“माझ्या लक्षात आलं, की या शिकवणी आणि प्रथा गोंधळात टाकणाऱ्या आहेत आणि त्या एकमेकांच्या विरोधात आहेत.”—च्योमिंग, तायवान
हाऊ आणि च्योमिंग यांच्यासारख्या बऱ्याच जणांच्या लक्षात आलं आहे, की नशीब, तारे, आपले पूर्वज किंवा पुनर्जन्म या गोष्टी आपलं भविष्य ठरवू शकत नाहीत. तर मग एक चांगलं भविष्य मिळवणं शक्यच नाही, असा याचा अर्थ होतो का?
अनेकांना वाटतं, की जर आपल्याला एक चांगलं भविष्य हवं असेल तर आपण उच्च शिक्षण घेतलं पाहिजे आणि भरपूर पैसा कमवला पाहिजे. पण ज्यांनी असं करायचा निर्णय घेतला, त्यांच्यापैकी काहींनी काय अनुभवलं आहे?
^ परि. 5 या आणि यानंतरच्या लेखात काही नावं बदलण्यात आली आहेत.
^ परि. 16 हे शब्द बायबलमध्ये गलतीकर ६:७ मध्ये वाचायला मिळतात. अशाच अर्थाची एक प्रचलित म्हण आपल्याकडे आहे: “करावे तसे भरावे.”