व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधुनिक जीवनासाठी प्राचीन सल्ला

चिंता करत बसू नका

चिंता करत बसू नका

बायबलमधील तत्त्व: “आपल्या जीवाविषयी . . . चिंता करत बसू नका.”—मत्तय ६:२५.

याचा काय अर्थ होतो? डोंगरावरील प्रवचनात येशूने हा सल्ला दिला. ‘चिंता करत बसणे’ असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे, ते ग्रीक क्रियापद “एखाद्या व्यक्तीला जेव्हा दररोजच्या जीवनात गरीबी, उपासमार आणि इतर संकटांना तोंड द्यावं लागतं तेव्हा तिची जी स्वाभाविक प्रतिक्रिया असेल” तिला सूचित करू शकतं असं, एका बायबल शब्दकोशात म्हटलं आहे. बऱ्याचदा आपण, भविष्यात असं होईल किंवा तसं होईल याविषयी चिंता करतो. आपल्या गरजांची आणि कुटुंबाच्या हिताची काळजी करणं हे स्वाभाविकच आहे, त्यात काही गैर नाही. (फिलिप्पैकर २:२०) पण जेव्हा येशू आपल्या शिष्यांना “चिंता करत बसू नका” असं म्हणाला तेव्हा तो हे सांगण्याचा प्रयत्न करत होता, की कोणत्याही गोष्टीबद्दल अवाजवी चिंता करू नका. दुसऱ्या शब्दात तो हे सांगत होता, उद्याच्या चिंतेनं आजच्या दिवसाचा आनंद गमावू नका.—मत्तय ६:३१, ३४.

आजच्या दिवसांत हा सल्ला व्यावहारिक आहे का? येशूने दिलेला सल्ला लागू करण्यात सुज्ञता आहे. असं आपण का म्हणू शकतो? कारण लोक जेव्हा खूप जास्त चिंता करतात तेव्हा त्यांच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो; “अल्सर, हृदयविकार आणि दमा यांसारख्या शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळतं,” असं काही संदर्भग्रंथात म्हटलं आहे.

अवाजवी चिंता का टाळावी याचं अगदी ठोस कारण येशूने दिलं. त्याच्या मते चिंता करणं निरर्थक आहे. त्याने म्हटलं, “चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?” (मत्तय ६:२७) म्हणजे, आपल्या समस्यांवरच आपण लक्ष केंद्रित केल्यानं, जीवनात सुधारणा होणं तर दूरच, पण आपण आपल्या जीवनाची दोरी इंचभरही वाढवू शकत नाही. तसंच, ज्या प्रकारे आपण गोष्टींचा विचार करतो त्या प्रकारे त्या घडतीलच असं नाही. याबाबतीत एका विद्वानानं असं म्हटलं, “भविष्याबद्दल चिंता करत बसणे व्यर्थ आहे, कारण आपण जेवढा विचार केलेला असतो, तेवढ्या गोष्टी वाईट घडत नाहीत.”

आपण चिंता करण्याचं कसं टाळू शकतो? यासाठी दोन गोष्टी आपल्याला मदत करू शकतात. पहिली गोष्ट, देवावर भरवसा ठेवा. जर देव पक्ष्यांना अन्न देऊ शकतो आणि फुलांना इतका सुंदर पोशाख घालू शकतो तर जे त्याच्या उपासनेला जीवनात प्रथम स्थानी ठेवतात, अशांना तो जीवनावश्यक गोष्टी पुरवणार नाही का? हो नक्कीच पुरवेल. (मत्तय ६:२५, २६, २८-३०) दुसरी गोष्ट, दुसऱ्या दिवसाची चिंता करू नका. येशूने म्हटलं: “ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” आपणदेखील ही गोष्ट मान्य करू, नाही का?—मत्तय ६:३४.

येशूने दिलेल्या या सुज्ञ सल्ल्याचं पालन केल्यामुळे आपल्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम आपण टाळू शकतो. एवढंच नव्हे तर, आपल्याला आंतरिक शांती मिळेल, ज्याला बायबल “देवाने दिलेली शांती” असं म्हणतं.—फिलिप्पैकर ४:६, ७. ▪ (w16-E No.1)