अभ्यास लेख ४
आपण स्मारकविधीला उपस्थित का राहतो?
“माझी आठवण म्हणून हे करत राहा.”—लूक २२:१९.
गीत २ यहोवा, तुझे आभार मानतो
सारांश *
१-२. (क) आपल्या मृत प्रियजनांची आठवण आपल्याला खासकरून केव्हा येते? (ख) आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने आपल्या शिष्यांना काय करायला सांगितलं?
आपल्या जवळच्या लोकांना जाऊन कितीही वर्षं झाली असली, तरी आपण त्यांची आठवण काढत असतो. आणि खासकरून दरवर्षी त्यांच्या मृत्यूचा दिवस येतो तेव्हा त्यांच्या काही खास आठवणी आपल्या मनात दाटून येतात.
२ दरवर्षी जगभरातले लाखो लोक येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी एकत्र येतात. त्यांच्यामध्ये आपणही सामील होतो, कारण आपल्या सर्वांचं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. (१ पेत्र १:८) येशूने पाप आणि मृत्यूपासून आपली सुटका करण्यासाठी स्वतःचं जीवन खंडणी म्हणून दिलं. त्याच गोष्टीची आठवण म्हणून आपण दरवर्षी एकत्र येतो. (मत्त. २०:२८) आणि आपण तेच करावं अशी येशूची इच्छा होती. त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने एका खास भोजनाची योजना केली आणि आपल्या शिष्यांना अशी आज्ञा दिली: “माझी आठवण म्हणून हे करत राहा.” *—लूक २२:१९.
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्यांपैकी खूप कमी लोक असे आहेत, ज्यांना स्वर्गातल्या जीवनाची आशा आहे. पण त्यांच्यासोबत असे लाखो लोकसुद्धा या कार्यक्रमाला हजर असतात ज्यांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे. या लेखात आपण पाहू या, की हे दोन्ही गट दरवर्षी स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी का आतुर असतात आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे त्यांना कसा फायदा होतो. चला, सर्वात आधी आपण हे पाहू या की ज्यांना देवाच्या पवित्र शक्तिने अभिषिक्त करण्यात आलं आहे, ते या स्मारकविधीला उपस्थित का राहातात.
अभिषिक्त जन स्मारकविधीला का उपस्थित राहतात
४. अभिषिक्त जन स्मारकविधीच्या दिवशी भाकर आणि द्राक्षारसाचं सेवन का करतात?
४ स्मारकविधीचा द्राक्षारस आणि भाकर सेवन करणारे लोक म्हणून अभिषिक्त जन दरवर्षी स्मारकविधीला उपस्थित राहतात. स्मारकविधीच्या भाकरीचं आणि द्राक्षारसाचं फक्त त्यांनीच सेवन करणं योग्य आहे, असं का म्हणता येईल? त्यासाठी येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री काय झालं त्याचा विचार करा. वल्हाडणाचं भोजन झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांसोबत एका नवीन विधीची सुरुवात केली. त्यालाच आपण प्रभूचं सांज भोजन म्हणतो. त्याने आपल्या ११ विश्वासू प्रेषितांना भाकर आणि द्राक्षारस दिला, आणि त्या भाकरीतून खायला आणि द्राक्षारसातून प्यायला सांगितलं. मग त्यांच्यासोबत बोलताना येशूने दोन करारांचा उल्लेख केला. एक नवा करार आणि दुसरा राज्याचा करार. * (लूक २२:१९, २०, २८-३०) या दोन करारांमुळे प्रेषितांना आणि ठरावीक लोकांना स्वर्गात राजे आणि याजक म्हणून काम करणं शक्य होणार होतं. (प्रकटी. ५:१०; १४:१) त्यामुळे या कराराचा भाग असलेले फक्त अभिषिक्त जन स्मारकविधीच्या दिवशी भाकर आणि द्राक्षारसाचं सेवन करू शकतात.
५. अभिषिक्त जनांना आपल्या आशेबद्दल काय माहीत आहे?
५ अभिषिक्त जन स्मारकविधीला उपस्थित राहतात याचं आणखी एक कारण म्हणजे, त्यांना आपल्या आशेवर मनन करायची संधी मिळते. यहोवाने त्यांना एक अद्भूत आशा दिली आहे. ती म्हणजे, ते स्वर्गात अमर आणि अविनाशी जीवन जगतील. त्यासोबतच, ते येशूसोबत आणि १,४४,००० जनांपैकी असलेल्या इतरांसोबत सेवा करतील. पण याहून विशेष गोष्ट म्हणजे ते यहोवा देवाला प्रत्यक्ष पाहतील. (१ करिंथ. १५:५१-५३; १ योहा. ३:२) अभिषिक्त जनांना माहीत आहे, की अशा प्रकारचे विशेषाधिकार अनुभवण्यासाठी त्यांना स्वर्गात बोलवलं आहे. पण त्यासाठी त्यांना आपल्या मृत्यूपर्यंत विश्वासू राहावं लागेल. (२ तीम. ४:७, ८) आपल्या या सुंदर आशेचा विचार करायला त्यांना खूप आनंद होतो. (तीत २:१३) पण मग ‘दुसऱ्या मेंढरांबद्दल’ काय? (योहा. १०:१६) ते स्मारकविधीला का बरं उपस्थित राहतात?
दुसरी मेंढरं स्मारकविधीला उपस्थित का राहतात
६. दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले लोक दरवर्षी स्मारकविधीला उपस्थित का राहतात?
६ दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले लोक स्मारकविधीची भाकर आणि द्राक्षारस सेवन करत नाहीत, तर ते स्मारकविधीला फक्त उपस्थित राहतात. आणि यात त्यांना आनंद वाटतो. १९३८ मध्ये, खासकरून पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असलेल्या लोकांना पहिल्यांदाच स्मारकविधीला बोलवण्यात आलं होतं. १ मार्च १९३८ च्या टेहळणी बुरूज अंकात असं म्हटलं होतं: “दुसऱ्या मेंढरांपैकी असलेल्यांनी स्मारकविधीला उपस्थित राहणं आणि त्याबद्दल आपली कदर दाखवणं योग्यच आहे. कारण हा त्यांच्यासाठीसुद्धा एक आनंदाचा क्षण आहे आणि तो नक्कीच असला पाहिजे.” जसं एका लग्नाच्या कार्यक्रमात आमंत्रित पाहुणे उपस्थित राहतात आणि आपला आनंद व्यक्त करतात, तसंच दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले लोक स्मारकविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली कदर आणि आपला आनंद व्यक्त करतात.
७. दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले लोक स्मारकविधीचं भाषण ऐकायला उत्सुक का असतात?
७ स्मारकविधीच्या वेळी दुसऱ्या मेंढरांपैकी असलेल्या लोकांनासुद्धा आपल्या आशेवर मनन करायची संधी मिळते. स्मारकविधीचं भाषण ऐकण्यासाठी ते खूप उत्सुक असतात. कारण हजार वर्षांच्या काळादरम्यान येशू ख्रिस्त आणि त्याच्यासोबत राज्य करणारे १,४४,००० जण विश्वासू मानवांसाठी काय करतील, हे स्मारकविधीच्या भाषणात सांगितलं जातं. आपला राजा येशू ख्रिस्त याच्या नेतृत्वाखाली १,४४,००० जन पृथ्वीचं रूपांतर एका सुंदर बागेत करायला मदत करतील. त्यासोबतच, देवाची आज्ञा मानणाऱ्या लोकांना ते परिपूर्ण व्हायला मदत करतील. त्यामुळे स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्या लाखो लोकांना बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होतील याची कल्पना करायची संधी मिळते. जसं की, यशया ३५:५, ६; ६५:२१-२३ आणि प्रकटीकरण २१:३, ४ मध्ये दिलेल्या भविष्यवाण्या. आपल्या जवळच्या लोकांसोबत नवीन जगात असल्याची कल्पना केल्यामुळे भविष्याबद्दलची त्यांची आशा आणखी पक्की होते. आणि काहीही झालं तरी यहोवाची सेवा करत राहण्याचा त्यांचा निर्धार आणखी पक्का होतो.—मत्त. २४:१३; गलती. ६:९.
८. दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले लोक स्मारकविधीला उपस्थित राहतात याचं आणखी एक कारण कोणतं आहे?
८ दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले लोक स्मारकविधीला उपस्थित राहतात याचं आणखी एक कारण म्हणजे, अभिषिक्त जनांवर त्यांचं प्रेम आहे आणि त्यांना मदत करायची त्यांची मनापासून इच्छा आहे. बायबलमध्ये हे आधीच सांगितलं होतं, की अभिषिक्त जन आणि ज्यांना पृथ्वीवर जीवन जगायची आशा आहे यांच्यात एक जवळचं नातं असेल आणि ते एकत्र मिळून काम करतील. ते कसं? चला याची काही उदाहरणं आता आपण पाहू या.
९. जखऱ्या ८:२३ मध्ये सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या मेंढरांपैकी असलेल्या लोकांना अभिषिक्त जनांबद्दल कसं वाटतं?
९ जखऱ्या ८:२३ वाचा. दुसऱ्या मेंढरांपैकी असलेल्या लोकांना आपल्या अभिषिक्त भाऊबहिणींबद्दल कसं वाटतं याचं खूप सुंदर वर्णन या भविष्यवाणीत आपल्याला वाचायला मिळतं. या वचनातले काही शब्द, जसं की, ‘यहुदी माणूस,’ “तुमच्याबरोबर” आणि “तुमच्यासोबत” हे एकाच गटाला सूचित करतात. तो गट म्हणजे, पृथ्वीवर जिवंत असलेले अभिषिक्त जन. (रोम. २:२८, २९) आणि याच वचनात, सर्व राष्ट्रांमधून असणाऱ्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या ज्या दहा माणसांबद्दल म्हटलं आहे, ते दुसऱ्या मेंढरांपैकी असलेल्या लोकांना सूचित करतात. पुढे या वचनात असं म्हटलं आहे, की ते “यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील.” याचा अर्थ, दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले लोक अभिषिक्त जनांना कायम साथ देतील आणि त्यांच्यासोबत मिळून शुद्ध उपासना करतील. त्यामुळे दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले लोक स्मारकविधीला उपस्थित राहतात, तेव्हा अभिषिक्त जनांसोबत त्यांचं किती जवळचं नातं आहे हे दिसून येतं.
१०. यहोवाने यहेज्केल ३७:१५-१९, २४, २५ मध्ये दिलेली भविष्यवाणी कशी पूर्ण केली?
१० यहेज्केल ३७:१५-१९, २४, २५ वाचा. या वचनांत दिलेली भविष्यवाणी यहोवाने अभिषिक्त जनांना आणि दुसऱ्या मेंढरांना एकत्र करून पूर्ण केली आहे. त्यांच्यातलं एकीचं हे बंधन अतूट आहे. या भविष्यवाणीत दोन काठ्यांबद्दल सांगितलं आहे. त्यात स्वर्गातल्या जीवनाची आशा असलेल्यांना ‘यहूदाची काठी’ असं म्हटलं आहे (या वंशातून इस्राएलचे राजे निवडले जायचे). आणि पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असलेल्यांना ‘एफ्राईमची काठी’ असं म्हटलं आहे. * भविष्यवाणीनुसार यहोवा या दोन्ही काठ्या जोडून त्यांची एकच काठी करणार होता. दुसऱ्या शब्दांत, तो या दोन्ही गटांना एकत्र करणार होता. याचा अर्थ, ते एकाच राज्याच्या म्हणजे ख्रिस्त येशूच्या नेतृत्वाखाली एकत्र मिळून यहोवाची सेवा करणार होते. दरवर्षी अभिषिक्त जन आणि दुसरी मेंढरं, दोन वेगवेगळे गट म्हणून नाही, तर ‘एकाच मेंढपाळाच्या’ देखरेखीखाली असलेला ‘एक कळप’ म्हणून स्मारकविधीला उपस्थित राहतात.—योहा. १०:१६.
११. मत्तय २५:३१-३६, ४० मध्ये सांगितलेली ‘मेंढरं’ खासकरून कोणत्या कामात ख्रिस्ताच्या बांधवांना मदत करतात?
११ मत्तय २५:३१-३६, ४० वाचा. इथे ‘मेंढरं’ असं जे म्हटलं आहे, ते अंताच्या काळात जगणाऱ्या नीतिमान लोकांना सूचित करतं, ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे. ते ख्रिस्ताच्या अभिषिक्त बांधवांना खासकरून प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात मदत करतात. आणि अशा प्रकारे एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडायला ते विश्वासूपणे त्यांना साथ देतात.—मत्त. २४:१४; २८:१९, २०.
१२-१३. दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले लोक आणखी कोणत्या मार्गाने ख्रिस्ताच्या बांधवांना साथ देतात?
१२ दरवर्षी स्मारकविधीच्या काही आठवड्यांआधी दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले लोक जगभरात चालवल्या जाणाऱ्या एका खास मोहिमेत सहभाग घेतात. या मोहीमेत ते स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी लोकांना आमंत्रण देतात आणि अशा प्रकारे ते ख्रिस्ताच्या बांधवाना साथ देतात. (“ तुम्ही स्मारकविधीसाठी कशी तयारी कराल,” ही चौकट पाहा.) याशिवाय, जगभरातल्या प्रत्येक मंडळीत स्मारकविधी व्यवस्थित पार पाडला जावा म्हणून ते आवश्यक ती तयारी करतात, मग त्यांच्या मंडळीत कुणीही अभिषिक्त नसलं तरी. अशा प्रकारे ख्रिस्ताच्या बांधवांना मदत करण्यात त्यांना खूप आनंद मिळतो. कारण त्यांना हे माहीत आहे, की अभिषिक्त बांधवांसाठी आपण जे काही करतो, ते एका अर्थाने येशू ख्रिस्तासाठीच केल्यासारखं आहे.—मत्त. २५:३७-४०.
१३ आपण सर्वच स्मारकविधीला उपस्थित का राहतो याची आणखीही काही कारणं आहेत. त्यांबद्दल आपण पुढे पाहू या.
आपण सगळेच स्मारकविधीला उपस्थित का राहतो
१४. यहोवा आणि येशूने आपल्याला कशा प्रकारे प्रेम दाखवलं आहे?
१४ यहोवा आणि येशूने दाखवलेल्या प्रेमाची आपल्याला कदर आहे म्हणून. यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे त्याने वेगवेगळ्या मार्गांनी दाखवलं आहे. पण त्याच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे, त्याने आपल्या प्रिय मुलाला वेदना आणि मृत्यू सहन करायला आपल्यासाठी दिलं. (योहा. ३:१६) शिवाय, येशूसुद्धा आपल्यासाठी स्वतःचं जीवन बलिदान म्हणून द्यायला तयार झाला. त्यावरून त्याचंही आपल्यावर किती प्रेम आहे, हे दिसून येतं. (योहा. १५:१३) यहोवा आणि येशूने प्रेमापोटी आपल्यासाठी जे काही केलं त्याची आपण कधीच परतफेड करू शकणार नाही. पण ज्या प्रकारे आपण जीवन जगतो त्यातून आपल्याला त्याबद्दल किती कदर आहे हे आपण नक्कीच दाखवून देऊ शकतो. (कलस्सै. ३:१५) म्हणून, यहोवा आणि येशूने जे प्रेम आपल्याला दाखवलं त्याची आठवण करण्यासाठी आणि आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आपण स्मारकविधीला उपस्थित राहतो.
१५. अभिषिक्त जनांना आणि दुसऱ्या मेंढरांपैकी असलेल्यांना खंडणी बलिदानाबद्दल कदर का वाटते?
१५ खंडणी बलिदानाबद्दल आपल्याला खूप कदर आहे म्हणून. (मत्त. २०:२८) अभिषिक्त जन खंडणी बलिदानाची मनापासून कदर करतात, कारण त्यामुळेच त्यांना एक अद्भूत आशा मिळाली आहे. येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळेच यहोवाने त्यांना नीतिमान ठरवलं आहे आणि आपली मुलं म्हणून दत्तक घेतलं आहे. (रोम. ५:१; ८:१५-१७, २३) दुसऱ्या मेंढरांपैकी असलेल्या लोकांनादेखील खंडणी बलिदानाबद्दल तितकीच कदर आहे. येशूच्या बलिदानावर विश्वास असल्यामुळेच ते यहोवासमोर शुद्ध ठरतात आणि त्याची पवित्र सेवा करू शकतात. तसंच, येणाऱ्या “मोठ्या संकटातून” वाचण्याची त्यांना आशा आहे. (प्रकटी. ७:१३-१५) त्यामुळे खंडणी बलिदानाबद्दल त्यांना किती कदर आहे, हे दाखवण्यासाठी अभिषिक्त जन आणि दुसऱ्या मेंढरांपैकी असणारे लोक दरवर्षी स्मारकविधीला उपस्थित राहतात.
१६. आपण स्मारकविधीला उपस्थित राहतो याचं आणखी एक कारण काय आहे?
१६ आपण स्मारकविधीला उपस्थित राहतो याचं आणखी एक कारण म्हणजे आपल्याला येशूची आज्ञा पाळायची आहे. येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री स्मारकविधीची स्थापना करताना अशी आज्ञा दिली: “माझी आठवण म्हणून हे करत राहा.” (१ करिंथ. ११:२३, २४) म्हणून आपण सगळेच स्मारविधीला उपस्थित राहतो; मग आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची.
स्मारकविधीला उपस्थित राहिल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कसा फायदा होतो?
१७. यहोवासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट करण्यासाठी स्मारकविधीमुळे आपल्याला कशी मदत होते?
१७ यहोवासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होतं. (याको. ४:८) आपण हे पाहिलं, की यहोवाचं आपल्यावर किती अपार प्रेम आहे आणि त्याने आपल्याला किती सुंदर आशा दिली आहे. या गोष्टीची आठवण करण्याची संधी आपल्याला स्मारकविधीच्या वेळी मिळते. (यिर्म. २९:११; १ योहा. ४:८-१०) या आशेवर आणि देवाच्या प्रेमावर आपण मनन करतो तेव्हा यहोवावरचं आपलं प्रेम आणखी वाढतं आणि त्याच्यासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होतं.—रोम. ८:३८, ३९.
१८. येशूबद्दलचे वृत्तान्त वाचल्यामुळे आणि त्यांवर मनन केल्यामुळे आपल्याला काय करायची प्रेरणा मिळते?
१८ आपल्याला येशूचं अनुकरण करायची प्रेरणा मिळते. (१ पेत्र २:२१) स्मारकविधीच्या काही दिवसांआधी आपण येशूबद्दलचे काही वृत्तान्त बायबलमधून वाचायला सुरुवात करतो. त्यांत, शेवटच्या आठवड्यादरम्यान येशूसोबत काय-काय घडलं, त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान कसं झालं याबद्दल सांगितलं आहे. मग स्मारकविधीच्या दिवशी संध्याकाळी जे भाषण दिलं जातं त्यातून येशूचं आपल्यावर किती प्रेम आहे, याची आठवण आपल्याला होते. (इफिस. ५:२; १ योहा. ३:१६) येशूने आपल्यासाठी किती त्याग केले याबद्दल जेव्हा आपण वाचतो आणि मनन करतो, तेव्हा आपल्यालाही ‘जसा येशू जगला तसंच जगायची’ प्रेरणा मिळते.—१ योहा. २:६.
१९. देवाच्या प्रेमात टिकून राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
१९ देवाच्या प्रेमात टिकून राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो. (यहू. २०, २१) देवाच्या प्रेमात टिकून राहण्यासाठी आपण त्याच्या आज्ञा पाळायचा, त्याचं नाव पवित्र करायचा आणि त्याचं मन आनंदित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. २७:११; मत्त. ६:९; १ योहा. ५:३) स्मारकविधीला उपस्थित राहिल्यामुळे कायम देवाच्या प्रेमात टिकून राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो.
२०. आपण स्मारकविधीला का उपस्थित राहिलं पाहिजे?
२० आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची, आपण सगळ्यांनीच दरवर्षी स्मारकविधीला उपस्थित राहिलं पाहिजे. आपण स्मारकविधीच्या दिवशी एकत्र येतो, तेव्हा येशूने आपल्यासाठी त्याच्या जीवनाचं बलिदान का दिलं याची आठवण आपल्याला होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाने स्वतःचा मुलगा आपल्यासाठी देऊन आपल्यावर किती प्रेम केलं याचीही आपल्याला आठवण होते. या वर्षी स्मारकविधी शुक्रवार, १५ एप्रिल २०२२ ला होईल. यहोवावर आणि त्याच्या मुलावर आपलं प्रेम असल्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत स्मारकविधीला उपस्थित राहण्याचा निश्चय करू या.
गीत १४ सर्व काही नवे झाले!
^ आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या, आपण दरवर्षी स्मारकविधीला उपस्थित राहण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. या लेखात, आपण स्मारकविधीला उपस्थित का राहतो याची काही कारणं शास्त्रवचनांतून पाहू या. आणि स्मारकविधीला उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो यावर चर्चा करू या.
^ बायबलच्या एका भाषांतरात हेच शब्द अशा प्रकारे लिहिले आहेत: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (बी.एस.आय. मराठी बायबल)
^ नवा करार आणि राज्याचा करार याबद्दल जास्त माहिती जाणून घेण्यासाठी १५ ऑक्टोबर २०१४ च्या टेहळणी बुरूज अंकात पृष्ठ १३-१७ वर दिलेला, “तुम्ही ‘याजकराज्य’ व्हाल” हा लेख पाहा.
^ यहेज्केल ३७ अध्यायात दोन काठ्यांबद्दलची भविष्यवाणी सांगितली आहे. त्याबद्दल जास्त माहितीसाठी सारी धरती पर यहोवा की शुद्ध उपासना बहाल! या पुस्तकातली पृष्ठ १३०-१३५ वर परि. ३-१७ पाहा. यासोबतच, जुलै २०१६ च्या टेहळणी बुरूज अंकात पृष्ठ ३१-३२ वरील “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहा.