अभ्यास लेख १
“यहोवाचा शोध घेणाऱ्यांना काहीच कमी पडणार नाही”
२०२२ सालचं वार्षिक वचन: “यहोवाचा शोध घेणाऱ्यांना काहीच कमी पडणार नाही.”—स्तो. ३४:१०.
गीत २२ “यहोवा माझा मेंढपाळ”
सारांश *
१. दावीदला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला?
इस्राएलचा शक्तिशाली राजा शौल, दावीदचा जीव घ्यायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे दावीदला आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. नोब शहराजवळ आल्यानंतर त्याने अहीमलेख याजकाकडे पाच भाकरी मागितल्या. कारण त्याच्याकडे खायला काहीच उरलं नव्हतं. (१ शमु. २१:१, ३) नंतर, त्याला आणि त्याच्या माणसांना एका गुहेत आश्रय घ्यावा लागला. (१ शमु. २२:१) पण शौल दावीदच्या जिवावर का उठला होता?
२. शौल कोणती मोठी चूक करत होता? (१ शमुवेल २३:१६, १७)
२ दावीदला युद्धात मिळालेल्या विजयामुळे आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे शौलचा खूप जळफळाट व्हायचा. शौलला हेसुद्धा माहीत होतं, की यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे त्याने आपल्याला इस्राएलचा राजा म्हणून नाकारलं आहे आणि भावी राजा म्हणून दावीदला निवडलं आहे. (१ शमुवेल २३:१६, १७ वाचा.) पण शौल अजूनही इस्राएलचा राजा असल्यामुळे त्याच्याकडे मोठं सैन्य होतं आणि त्याला पाठिंबा देणारे बरेच लोक होते. म्हणून दावीदला आपला जीव वाचवण्यासाठी त्याच्यापासून पळ काढावा लागला. दावीदला राजा बनवण्यापासून आपण देवाला रोखू शकतो असा शौल विचार करत होता का? (यश. ५५:११) बायबल याबद्दल काहीच सांगत नाही, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे: देवाच्या विरोधात जाऊन शौल खूप मोठी चूक करत होता. तो स्वतःचाच जीव धोक्यात घालत होता. कारण आजपर्यंत देवाच्या विरुद्ध जाऊन कोणीच जिंकू शकलेलं नाही!
३. संकटात असतानाही दावीदची मनोवृत्ती कशी होती?
३ दावीदला सत्तेची हाव नव्हती. तो काही स्वतःहून राजा बनला नव्हता. यहोवाने त्याला राजा म्हणून निवडलं होतं. (१ शमु. १६:१, १२, १३) शौलच्या मनात दावीदबद्दल भयंकर तिरस्कार होता. पण आपल्यावर आलेल्या संकटासाठी दावीदने यहोवाला दोष दिला नाही. शिवाय, त्याच्याकडे जेव्हा खायला काहीच नव्हतं आणि त्याला एका गुहेत आश्रय घ्यावा लागला, तेव्हासुद्धा त्याने तक्रार केली नाही. उलट, त्या गुहेत राहत असतानाच त्याने कदाचित एक सुंदर स्तुतिगीत रचलं. त्या गीतातलेच काही शब्द या लेखाचं मुख्य वचन आहे: “यहोवाचा शोध घेणाऱ्यांना काहीच कमी पडणार नाही.”—स्तो. ३४:१०.
४. या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत, आणि ते महत्त्वाचं का आहे?
४ आजसुद्धा यहोवाच्या अनेक सेवकांना कुटुंबाचं पोट भरणं आणि त्यांच्या इतर गरजा पूर्ण करणं मुश्कील होत चाललं आहे. * आणि या महामारीच्या काळात तर हे आणखीनच कठीण झालं आहे. शिवाय, मोठं संकट जवळ येत आहे तसतशी आपली परिस्थिती आणखीनच बिकट होत जाईल. (मत्त. २४:२१) या गोष्टी लक्षात घेऊन आता आपण चार प्रश्नांवर चर्चा करू या: कोणत्या बाबतीत दावीदला ‘काहीच कमी पडलं नाही?’ आपण आहे त्यात समाधानी राहण्याचा का प्रयत्न केला पाहिजे? यहोवा नक्की आपल्याला सांभाळेल, असा भरवासा आपण का ठेवू शकतो? आणि येणाऱ्या दिवसांसाठी आपण आत्तापासूनच कसं तयार राहू शकतो?
“मला कशाचीच कमी नाही”
५-६. यहोवाच्या सेवकांना “काहीच कमी पडणार नाही” हे शब्द समजून घेण्यासाठी स्तोत्र २३:१-६ आपल्याला कशी मदत करतं?
५ यहोवाच्या सेवकांना “काहीच कमी पडणार नाही” असं जेव्हा दावीदने म्हटलं तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं? हे समजून घेण्यासाठी आपण २३ व्या स्तोत्रात त्याने काय म्हटलं, त्यावर विचार करू या. या स्तोत्रात त्याने अशाच प्रकारचे शब्द वापरले आहेत. (स्तोत्र २३:१-६ वाचा.) त्यात त्याने सुरुवातीला असं म्हटलं: “यहोवा माझा मेंढपाळ आहे. मला कशाचीच कमी नाही.” पुढे तो काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करतो. जसं की, यहोवाला मेंढपाळ मानल्यामुळे मिळणारे भरपूर आशीर्वाद. यहोवा त्याला “नीतीच्या मार्गांवर चालवतो.” आणि चांगल्या-वाईट अशा सगळ्या काळात तो कायम त्याच्यासोबत असतो. दावीद हे मान्य करतो, की यहोवाच्या “हिरव्यागार कुरणात” चालत असताना जीवन सोपं नसेल. आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. काही वेळा आपल्याला निराशेचाही सामना करावा लागेल. अशा वेळी आपण जणू ‘काळोख्या दरीतून चालत आहोत’ असं आपल्याला वाटेल. याशिवाय आपल्याला शत्रूंचाही सामना करावा लागेल. पण दावीद म्हणतो, की यहोवा माझा मेंढपाळ असल्यामुळे ‘मला कशाचीही भीती वाटणार नाही.’
६ तर इथे, पहिल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळतं. पहिला प्रश्न होता: कोणत्या बाबतीत दावीदला ‘काहीच कमी पडलं नाही?’ आणि याचं उत्तर आहे, की त्याला आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत काहीच कमी पडलं नाही. आनंदी राहण्यासाठी त्याला भौतिक गोष्टींची गरज नव्हती. यहोवाने त्याला जे काही पुरवलं होतं, त्यात तो समाधानी होता. त्याच्यासाठी देवाचा आशीर्वाद आणि त्याच्याकडून मिळणारं संरक्षण सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं.
७. लूक २१:२०-२४ मध्ये सांगितल्याप्रमाणे पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं?
७ दावीदच्या या शब्दांवरून भौतिक गोष्टींबद्दल योग्य दृष्टिकोन असणं किती महत्त्वाचं आहे, ते आपल्याला समजतं. आपल्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींचा आनंद घेण्यात काहीच चुकीचं नाही. पण या गोष्टींना आपण जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं नाही पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट यहूदामध्ये राहणाऱ्या पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना समजली होती. (लूक २१:२०-२४ वाचा.) येशूने आधीच त्यांना सांगितलं होतं, की अशी एक वेळ येईल जेव्हा ते ‘यरुशलेमला सैन्यांनी वेढलेलं पाहतील.’ आणि जेव्हा असं घडेल, तेव्हा त्यांना डोंगराकडे पळून जायचं होतं. त्यामुळे त्यांचा जीव वाचणार होता. पण त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार होती. काही वर्षांआधी टेहळणी बुरूज अंकात याबद्दल असं म्हटलं होतं: त्यांनी आपली शेतं आणि सामान-सुमानासह आपली घरं सोडून दिली. यहोवाचं संरक्षण व पाठिंबा याची खातरी बाळगून, त्यांनी महत्त्वपूर्ण वाटत असलेल्या सर्व गोष्टींऐवजी यहोवाच्या उपासनेला पहिलं स्थान दिलं.
८. पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांकडून आपण कोणता महत्त्वाचा धडा शिकतो?
८ मग पहिल्या शतकातल्या त्या ख्रिश्चनांकडून आपण कोणता महत्त्वाचा धडा शिकतो? आधी उल्लेख केलेल्या टेहळणी बुरूज अंकात असं म्हटलं आहे: येणाऱ्या काळात कदाचित आपल्याला अशा परीक्षांचा सामना करावा लागेल, ज्यांवरून हे दिसून येईल की आपल्यासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे? भौतिक गोष्टी, की यहोवाला विश्वासू राहिल्यामुळे मिळणारं तारण? अंत येईल तेव्हा आपल्याला कदाचित कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल आणि बरेच त्यागही करावे लागतील. पण पहिल्या शतकातल्या त्या ख्रिश्चनांप्रमाणे आपण काहीही करायला तयार असलं पाहिजे. *
९. पौलने इब्री ख्रिश्चनांना जो सल्ला दिला त्यातून तुम्हाला काय प्रोत्साहन मिळतं?
९ त्या ख्रिश्चनांना सगळं काही मागे सोडून पुन्हा नव्याने सुरुवात करणं किती अवघड गेलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? यहोवा आपल्या दररोजच्या गरजा पूर्ण करेल असा विश्वास त्यांना ठेवायची गरज होती. त्यासाठी प्रेषित पौलने दिलेला सल्ला त्यांच्यासाठी खूप मोलाचा ठरला. रोमी सैनिकांनी यरुशलेमला वेढा घालायच्या पाच वर्षांआधी प्रेषित पौलने इब्री ख्रिश्चनांना असं म्हटलं: “आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्त ठेवा आणि आहे त्यात समाधानी राहा. कारण त्याने म्हटलं आहे: ‘मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.’ म्हणूनच, आपण धैर्याने असं म्हणू शकतो: ‘यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही. माणूस माझं काय बिघडवू शकतो?’” (इब्री १३:५, ६) रोमी सैनिकांनी वेढा घालण्याआधी ज्या ख्रिश्चनांनी पौलच्या या सल्ल्याकडे लक्ष दिलं, त्यांना नवीन ठिकाणी साध्या जीवनशैलीशी जुळवून घेणं नक्कीच सोपं गेलं असेल. यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल याची त्यांना पक्की खातरी होती. पौलच्या या शब्दांवरून यहोवा आपल्याही गरजा पूर्ण करेल अशी खातरी आपण बाळगू शकतो.
‘आपण आहे त्यात समाधानी राहू या’
१०. फिलिप्पैकर ४:१२ मध्ये पौलने कोणत्या ‘रहस्याबद्दल’ सांगितलं?
१० पौलने असाच सल्ला तीमथ्यलाही दिला. त्याने म्हटलं: “आपल्याजवळ खायला अन्न आणि घालायला कपडे असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.” (१ तीम. ६:८) हा सल्ला आज आपल्यालाही लागू होतो. पण मग याचा अर्थ असा होतो का, की आपण चमचमीत जेवणाचा आस्वाद घेऊ शकत नाही, चांगल्या घरात राहू शकत नाही किंवा नवनवीन कपडे घेऊ शकत नाही? नाही. पौलला असं नक्कीच म्हणायचं नव्हतं. उलट, त्याला असं म्हणायचं होतं, की आपण आहे त्यात समाधानी असलं पाहिजे. (फिलिप्पै. ४:१२) पौल फिलिप्पैकरांना याच ‘रहस्याबद्दल’ सांगत होता. आज आपल्यासाठीसुद्धा कोणत्याही भौतिक गोष्टी नाहीत, तर यहोवासोबत असलेलं आपलं नातं जास्त मोलाचं आहे.—हब. ३:१७, १८.
११. समाधानी राहण्याबद्दल मोशेने इस्राएल लोकांना जे सांगितलं त्यातून आपण काय शिकतो?
११ आपल्या गरजांबद्दल आपल्याला जे वाटतं आणि यहोवाला जे वाटतं, त्यामध्ये फरक असू शकतो. इस्राएली लोकांनी ४० वर्षं ओसाड रानात काढल्यानंतर मोशे त्यांना काय म्हणाला त्याचा विचार करा. तो म्हणाला: “तुमच्या सगळ्या कामांमध्ये तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आशीर्वाद दिलाय. या मोठ्या ओसाड रानातून तुम्ही प्रवास करताय हे त्याला चांगलं माहीत आहे. या सबंध ४० वर्षांत तुमचा देव यहोवा तुमच्यासोबत होता आणि तुम्हाला काहीच कमी पडलं नाही.” (अनु. २:७) या ४० वर्षांदरम्यान यहोवाने त्यांना खाण्यासाठी मान्ना दिला होता. तसंच, इजिप्त सोडताना जे कपडे त्यांच्याजवळ होते, ते या ४० वर्षांत कधीच जुने झाले नाहीत. (अनु. ८:३, ४) काहींना मात्र असं वाटलं असेल, की या गोष्टी पुरेशा नाहीत. पण मोशेने त्यांना आठवण करून दिली, ही यहोवाने त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या आहेत. आपणही आहे त्यात समाधानी राहिलं पाहिजे. दुसऱ्या शब्दांत, यहोवा पुरवत असलेल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींचीही जर आपण मनापासून कदर केली, आणि त्यांना आशीर्वाद मानून त्यांबद्दल आभार मानले तर तो खूश होईल.
यहोवा नक्की आपल्याला सांभाळेल असा भरवसा बाळगा
१२. दावीदचा स्वतःवर नाही तर यहोवावर भरवसा होता, हे कशावरून दिसून येतं?
१२ दावीदला हे माहीत होतं, की जे यहोवावर प्रेम करतात त्यांची तो नेहमी काळजी घेतो आणि कायम त्यांच्यासोबत असतो. दावीदचा जीव धोक्यात होता त्याच काळात त्याने ३४ वं स्तोत्र रचलं. यहोवावर त्याचा इतका भरवसा होता, की त्याचा स्वर्गदूत जणू ‘आपल्याभोवती छावणी करत आहे,’ असं त्याला वाटलं. (स्तो. ३४:७) इथे कदाचित तो यहोवाच्या दूताची तुलना शत्रूंवर नजर ठेवून कायम सज्ज असणाऱ्या सैनिकाशी करत होता. दावीद स्वतः एक शूर योद्धा होता आणि यहोवाने त्याला राज्यपद द्यायचं वचन दिलं होतं. पण तरीसुद्धा दावीद गोफण किंवा तलवार चालवण्याच्या आपल्या क्षमतेवर अवलंबून राहिला नाही. (१ शमु. १६:१३; २४:१२) त्याचा यहोवावर पूर्ण भरवसा होता. आणि ‘त्याची भीती बाळगणाऱ्यांची तो सुटका करतो’ याची त्याला पक्की खातरी होती. आज यहोवाने चमत्कारिकपणे आपलं संरक्षण करावं अशी आपण अपेक्षा करत नाही. पण आपल्याला माहीत आहे, की जे यहोवावर भरवसा ठेवतात त्यांचा आता जरी मृत्यू झाला, तरी त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल.
१३. मागोगचा गोग आपल्यावर हल्ला करायला येईल, तेव्हा त्याला आपल्याबद्दल काय वाटेल, पण आपल्याला घाबरण्याची गरज का नसेल? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)
१३ लवकरच अशी वेळ येईल जेव्हा यहोवा आपलं संरक्षण करू शकतो या गोष्टीवर आपला किती भरवसा आहे याची परीक्षा होईल. त्या वेळी मागोगचा गोग, म्हणजेच राष्ट्रांचा समूह देवाच्या लोकांवर हल्ला करेल. आणि आपल्याला असं वाटेल, की आपला जीव धोक्यात आहे. पण यहोवा आपलं संरक्षण करू शकतो आणि तो ते करेल, अशी पक्की खातरी आपल्याला असण्याची गरज आहे. त्या वेळी राष्ट्रांना असं वाटेल, की आपण अशा मेंढरांसारखे आहोत ज्यांचं रक्षण करणारं कोणी नाही. (यहे. ३८:१०-१२) आपल्याकडे कोणतंही शस्त्र नसेल, युद्ध कसं लढायचं ते आपल्याला माहीत नसेल. त्यामुळे राष्ट्रांना असं वाटेल, की ते सहज आपला नाश करू शकतात. पण आपल्या विश्वासाच्या डोळ्यांनी आपल्याला जे दिसेल ते त्यांना दिसणार नाही. आपल्याला दिसेल, की यहोवाचे लाखो-करोडो स्वर्गदूत आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्याभोवती छावणी देत आहेत. पण राष्ट्रांचा देवावर विश्वास नसल्यामुळे त्यांना हे दिसणार नाही. यहोवाचं स्वर्गातलं सैन्य आपल्या मदतीसाठी येईल, तेव्हा राष्ट्रांना खरंच किती जबरदस्त धक्का बसेल!—प्रकटी. १९:११, १४, १५.
येणाऱ्या दिवसांसाठी आत्तापासूनच तयार राहा
१४. येणाऱ्या दिवसांसाठी आपण आत्तापासूनच कसं तयार राहू शकतो?
१४ येणाऱ्या दिवसांसाठी आपण आत्तापासूनच कसं तयार राहू शकतो? सगळ्यात आधी, भौतिक गोष्टींबद्दल आपण योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे. कारण एक दिवस या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतील. तसंच, सध्या आपण आहे त्यात समाधानी असलं पाहिजे. आणि यहोवासोबत आपलं जवळचं नातं आहे, या गोष्टीचा आपल्याला सगळ्यात जास्त आनंद असला पाहिजे. म्हणून आपण जितकं जास्त यहोवाला जाणून घेऊ, तितकी जास्त आपल्याला याची खातरी पटेल, की भविष्यात मागोगचा गोग आपल्यावर हल्ला करेल तेव्हा यहोवा नक्की आपलं संरक्षण करेल.
१५. यहोवा आपल्याला मदत करेल याची दावीदला इतकी खातरी का होती?
१५ पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी आपण आणखी कसं तयार राहू शकतो, हे समजून घेण्यासाठी आपण पुन्हा दावीदच्याच उदाहरणाचा विचार करू या. दावीदने म्हटलं: “यहोवा किती चांगला आहे, याची पारख करून पाहा; त्याचा आश्रय घेणारा सुखी असतो!” (स्तो. ३४:८) यहोवा आपल्याला मदत करेल याची दावीदला इतकी खातरी का होती, हे त्याच्या या शब्दांवरून समजतं. तो नेहमी यहोवावर विसंबून राहिला आणि यहोवानेही त्याला कधीच निराश केलं नाही. दावीद तरूण होता तेव्हा भयंकर दिसणाऱ्या, गल्याथ नावाच्या धिप्पाड पलिष्टी योद्ध्याला तो काय म्हणाला ते पाहा. तो म्हणाला: “आजच यहोवा तुला माझ्या हाती देईल.” (१ शमु. १७:४६) पुढे जेव्हा दावीद शौल राजाच्या सेवेत होता, तेव्हा शौलने त्याला कित्येक वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण यहोवा नेहमी त्याच्यासोबत होता. (१ शमु. १८:१२) अशा प्रकारे, दावीदने बऱ्याच वेळा यहोवाची मदत अनुभवली होती. त्यामुळे तो आत्ताही आपल्याला मदत करेल याची दावीदला पूर्ण खातरी होती.
१६. अशा कोणत्या परिस्थिती आहेत ज्यांमध्ये आपण यहोवाची मदत अनुभवू शकतो?
१६ दावीदसारखंच आपण मदतीसाठी नेहमी यहोवावर विसंबून राहिलं पाहिजे. आणि जितकं जास्त आपण हे करू, तितकी जास्त आपल्याला याची खातरी होईल, की भविष्यात तो आपलं संरक्षण करू शकतो. कधी कधी संमेलनाला आणि अधिवेशनाला जाण्यासाठी आपल्याला सुट्टी हवी असते. किंवा मग, सगळ्या सभांना हजर राहण्यासाठी किंवा सेवाकार्यात जास्त वेळ घालवण्यासाठी आपल्याला कामाच्या वेळेत बदल करून हवा असतो. अशा वेळी आपल्या बॉसशी बोलण्यासाठी यहोवावर विसंबून राहण्याची आणि त्याच्यावर भरवसा ठेवण्याची गरज असते. पण जर बॉसने तुमची विनंती मान्य केली नाही आणि तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागली, तर काय? अशा वेळी यहोवा आपल्याला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार आणि आपल्या सर्व गरजा तो पूर्ण करेल असा भरवसा आपण ठेवू का? (इब्री १३:५) पूर्णवेळेच्या सेवेत असलेल्या अनेकांनी हे अनुभवलं आहे, की मदतीची गरज होती तेव्हा यहोवाने त्यांना कशी मदत केली. खरंच, यहोवा त्याच्या सेवकांना कधीच सोडत नाही!
१७. २०२२ सालचं वार्षिक वचन काय आहे, आणि ते का निवडण्यात आलं आहे?
१७ भविष्यात काय होईल याचा विचार करून आपल्याला घाबरायची गरज नाही. कारण यहोवा आपल्यासोबत आहे. आपण आपल्या जीवनात देवाच्या राज्याला पहिल्या स्थानी ठेवलं, तर यहोवा आपल्याला कधीच सोडणार नाही. पुढे येणाऱ्या कठीण काळासाठी आपण आत्तापासूनच तयार राहावं आणि यहोवा आपल्याला कधीही सोडणार नाही असा भरवसा ठेवावा, म्हणून नियमन मंडळाने स्तोत्र ३४:१० हे वचन २०२२ सालचं वार्षिक वचन म्हणून निवडलं आहे. त्यात म्हटलं आहे: “यहोवाचा शोध घेणाऱ्यांना काहीच कमी पडणार नाही.”
गीत २३ यहोवा आमचे बळ!
^ २०२२ सालचं वार्षिक वचन स्तोत्र ३४:१० मधून घेण्यात आलं आहे: “यहोवाचा शोध घेणाऱ्यांना काहीच कमी पडणार नाही.” आज बऱ्याच यहोवाच्या विश्वासू सेवकांची परिस्थिती जेमतेम आहे. मग त्यांना ‘काहीच कमी पडत नाही,’ असं का म्हणता येईल? शिवाय, या वचनाचा अर्थ समजून घेतल्यामुळे येणाऱ्या कठीण काळाचा सामना करण्यासाठी आपण तयार कसं राहू शकतो?
^ १५ सप्टेंबर २०१४ च्या टेहळणी बुरूज अंकातला, “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहा.
^ १ मे १९९९ च्या टेहळणी बुरूज अंकात पृष्ठ १९ पाहा.
^ चित्रांचं वर्णन: शौल राजापासून पळ काढताना दावीदला एका गुहेत राहावं लागलं. पण या काळात यहोवाने पुरवलेल्या गोष्टींबद्दल त्याला कदर होती.
^ चित्रांचं वर्णन: इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्यानंतर यहोवाने त्यांना खाण्यासाठी मान्ना पुरवला आणि तो देश सोडताना जे कपडे त्यांच्याजवळ होते ते जुने झाले नाहीत.