अभ्यास लेख ३
येशूचे अश्रूसुद्धा खूप काही शिकवून जातात!
“येशू रडू लागला.”—योहा. ११:३५.
गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह
सारांश *
१-३. कोणत्या गोष्टींमुळे आपण दुःखी होऊ शकतो?
आपल्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहतात असे प्रसंग फार कमी असतात. सहसा दुःखामुळेच आपल्या डोळ्यात पाणी येतं. जसं की, आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा. अमेरिकेत रहाणारी लीना नावाची बहीण म्हणते: “माझी मुलगी गेली तेव्हा मी दुःखात इतकी बुडून गेले होते, की माझं कशातच मन लागत नव्हतं. या दुःखातून मी कधीच सावरू शकणार नाही, असं मला वाटत होतं. *
२ इतरही काही कारणं आहेत, ज्यांमुळे आपल्याला खूप दुःख होतं. जपानमध्ये राहणारी हिरोमी नावाची पायनियर म्हणते: “प्रचारकार्यात जेव्हा मी पाहते, की लोकांना आपल्या संदेशाबद्दल काहीच इंटरेस्ट नाहीए, तेव्हा काही वेळा मी खूप निराश होऊन जाते. कधीकधी तर मी अक्षरशः रडून यहोवाला प्रार्थना करते, की मला असं कोणीतरी भेटू दे, ज्याला सत्याबद्दल आवडए.”
३ या दोन बहिणींना वाटलं तसं आपल्यापैकी अनेकांना वाटलं असेल. (१ पेत्र ५:९) आपल्या सगळ्यांनाच ‘आनंदाने यहोवाची सेवा करायची’ इच्छा असते. पण जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे, निराश झाल्यामुळे किंवा आपल्यावर येणाऱ्या विश्वासाच्या परीक्षांमुळे आपल्याला आनंदाने यहोवाची सेवा करणं कठीण जाऊ शकतं. (स्तो. ६:६; १००:२) मग अशा वेळीसुद्धा आपण आनंदाने यहोवाची सेवा कशी करू शकतो?
४. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
४ या बाबतीत आपण येशूच्या उदाहरणातून बरंच काही शिकू शकतो. त्यालासुद्धा खूप दाटून आलं आणि तो “रडू लागला,” असेही काही प्रसंग होते. (योहा. ११:३५; लूक १९:४१; २२:४४; इब्री ५:७) ते कोणते प्रसंग होते आणि त्यांतून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहू या. आणि आपल्यासमोर येणाऱ्या दुःखद परिस्थितींचा आपण कशा प्रकारे सामना करू शकतो, तेही आपण या लेखात पाहू या.
येशू आपल्या मित्रांसाठी रडला
५. योहान ११:३२-३६ मध्ये दिलेल्या अहवालातून आपल्याला येशूबद्दल काय समजतं?
५ इ.स. ३२ साली, येशूचा एक जवळचा मित्र लाजर खूप आजारी पडला आणि वारला. (योहा. ११:३, १४) लाजरला दोन बहिणी होत्या, मार्था आणि मरीया. या तिघांवर येशूचं खूप प्रेम होतं. आपल्या लाडक्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्या दोघी बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. लाजरची बातमी कळाल्यावर येशू बेथानीला आला. जेव्हा मार्थाला समजलं की येशू आला आहे, तेव्हा त्याला भेटण्यासाठी ती धावतच येशूकडे गेली आणि तिने येशूला म्हटलं: “प्रभू, तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता.” (योहा. ११:२१) हे बोलताना मार्थाला किती भरून आलं असेल या विचार करा. नंतर मरीयाला आणि इतरांना रडताना पाहून येशू दुःखाने व्याकूळ झाला आणि “रडू लागला.”—योहा. ११:३२-३६ वाचा.
६. येशू का रडला?
६ त्या वेळी येशू का रडला? याबद्दल इन्साईट ऑन द स्क्रिप्चर्समध्ये असं म्हटलं आहे: “येशूने आपल्या एका जवळच्या मित्राला, लाजरला गमावलं होतं. आणि त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या बहिणी किती दुःखी झाल्या आहेत, हे त्याने पाहिलं होतं. म्हणून येशू दुःखाने व्याकूळ झाला आणि ‘रडू लागला.’” * आपल्या जवळच्या मित्राला आजारी असताना किती त्रास झाला असेल, आणि शेवटच्या घटका मोजत असताना त्याला काय वाटत असेल, याचा विचार करून येशू रडला असेल. शिवाय, आपल्या भावाच्या मृत्यूमुळे मार्था आणि मरीया किती शोक करत होत्या हेसुद्धा येशूने पाहिलं होतं आणि त्यामुळेसुद्धा तो रडत होता. जर तुम्हीही आपल्या जवळच्या एका मित्राला किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला गमावलं असेल, तर तुम्हालाही कदाचित असंच वाटलं असेल. तेव्हा या घटनेतून आपल्याला कोणत्या तीन गोष्टी शिकायला मिळतात, ते आता आपण पाहू या.
७. येशूला दुःख झालं आणि तो रडला यावरून यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?
७ यहोवाला आपलं दुःख कळतं. येशू आपल्या पित्याच्या “स्वभावाचं हुबेहूब प्रतिरूप आहे.” (इब्री १:३) त्यामुळे येशू रडला तेव्हा त्याच्या पित्यालाही तितकंच दुःख झालं असेल हे आपल्याला समजतं. (योहा. १४:९) तुम्हीही जर आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला गमावलं असेल, तर तुम्हाला त्याचं किती दुःख होत आहे हे यहोवा फक्त बघत नाही, तर त्याला ते कळतंसुद्धा. आणि तुम्ही त्या दुःखातून सावरावं असं त्याला वाटतं.—स्तो. ३४:१८; १४७:३.
८. येशू आपल्या जवळच्या लोकांना पुन्हा उठवेल असं आपण खातरीने का म्हणू शकतो?
८ येशू तुमच्या जवळच्या लोकांना पुन्हा जिवंत करण्यासाठी आतुर आहे. येशू रडला त्याच्या थोड्याच वेळाआधी तो मार्थाला म्हणाला: “तुझा भाऊ उठेल.” आणि या गोष्टीवर मार्थाचाही विश्वास होता. (योहा. ११:२३-२७) मार्था ही यहोवाची विश्वासू सेवक असल्यामुळे, अनेक शतकांआधी एलीया आणि अलीशा या संदेष्ट्यांनी केलेल्या पुनरुत्थानांबद्दल तिला माहीत होतं. (१ राजे १७:१७-२४; २ राजे ४:३२-३७) शिवाय, येशूने केलेल्या पुनरुत्थानांबद्दलही तिने नक्कीच ऐकलं असेल. (लूक ७:११-१५; ८:४१, ४२, ४९-५६) त्यामुळे आपल्या जवळचे लोक आपल्याला लवकरच भेटतील अशी खातरी तुम्हीही बाळगू शकता. आपल्या मित्रांचं सांत्वन करताना येशू रडला यावरून हेच कळतं, की मृत्यूच्या झोपेत असलेल्या लोकांना उठवायला तो आतुर आहे!
९. येशूसारखंच आपण दु:खात असलेल्या आपल्या भाऊबहिणींना कशा प्रकारे मदत करू शकतो? उदाहरण द्या.
९ तुम्ही शोक करणाऱ्यांचं सांत्वन आणि त्यांची मदत करू शकता. मार्था आणि मरीयासोबत येशू फक्त रडला नाही, तर त्याने त्यांचं धीराने ऐकलं आणि त्यांना सांत्वनही दिलं. आपणही तेच करू शकतो. ऑस्ट्रेलियातल्या एका मंडळीत वडील म्हणून सेवा करणारा डॅन नावाचा एक भाऊ म्हणतो: “माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी खूप एकटा पडलो. मला आधाराची गरज होती. त्या काळात मंडळीतल्या भाऊबहिणींनी मला खूप धीर दिला. मी त्यांच्यासमोर माझं मन हलकं करायचो आणि रडायचो, तेव्हा त्यांनी मला समजून घेतलं. काही वेळा मला माझी रोजची कामं करायलासुद्धा जमत नव्हतं. तेव्हा भाऊबहिणींनी मला माझी कार धुवायला, दुकानातून गरजेच्या गोष्टी आणायला, जेवण बनवायला आणि यांसारख्या इतर गोष्टी करायला मदत केली. ते माझ्यासोबत प्रार्थनासुद्धा करायचे. ‘दुःखाच्या प्रसंगात’ ते माझ्यासाठी खऱ्या मित्रांसारखे आणि भावांसारखे होते.”—नीति. १७:१७.
येशू लोकांसाठी रडला
१०. लूक १९:३६-४० मध्ये सांगितलेल्या घटनेचं वर्णन करा.
१० इ.स. ३३ च्या निसान ९ तारखेला येशू यरुशलेमला आला होता. तो शहराजवळ आला तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी जमा झाले. आणि त्याला राजा म्हणून स्वीकारलं आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी आपली वस्त्रं रस्त्यावर पसरवली. तो नक्कीच त्यांच्यासाठी आनंदाचा प्रसंग होता. (लूक १९:३६-४० वाचा.) पण नंतर जे घडलं, त्याची शिष्यांनी मुळीच अपेक्षा केली नसेल. “शहराजवळ आल्यावर [येशूने] त्यावर नजर टाकली आणि तो रडू लागला.” पुढे यरुशलेमच्या लोकांवर किती मोठं संकट येणार आहे, हे सांगताना त्याच्या डोळ्यांत अश्रू आले.—लूक १९:४१-४४.
११. येशू यरुशलेममधल्या लोकांसाठी का रडला?
११ येशूला दुःख झालं, कारण लोकांनी जरी त्याचं स्वागत केलं, तरी त्याला हे माहीत होतं, की बहुतेक यहुदी राज्याचा संदेश स्वीकारणार नाहीत. त्यामुळे यरुशलेम शहराचा नाश होणार होता. आणि जे यहुदी वाचणार होते त्यांना बंदिवासात जावं लागणार होतं. (लूक २१:२०-२४) आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, येशूने जसं सांगितलं तसंच झालं. लोकांनी त्याला नाकारलं. तुमच्या क्षेत्रातले बहुतेक लोक राज्याच्या संदेशाला कसा प्रतिसाद देतात? ते तुमचं ऐकत नसतील, तर येशूच्या या घटनेतून तुम्ही काय शिकू शकता? चला यातून कोणत्या तीन गोष्टी शिकायला मिळतात ते पाहू या.
१२. येशूने लोकांसाठी जे अश्रू वाहिले, त्यातून आपल्याला यहोवाबद्दल काय समजतं?
१२ यहोवाला लोकांची काळजी आहे. यरुशलेमच्या लोकांसाठी येशूने अश्रू गाळले. त्यावरून कळतं, की यहोवाला लोकांची काळजी आहे. “कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९) आज आपणसुद्धा लोकांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी होता होईल तितका प्रयत्न करतो तेव्हा आपण हे दाखवून देतो, की यहोवासारखंच आपल्यालाही लोकांबद्दल प्रेम आणि काळजी आहे.—मत्त. २२:३९.
१३-१४. येशूला लोकांबद्दल दया वाटली हे कसं दिसून आलं, आणि आपणही कशा प्रकारे त्याचं अनुकरण करू शकतो?
१३ लोकांना प्रचार करण्यासाठी येशूने खूप मेहनत घेतली. लोकांना शिकवण्यासाठी येशूने मिळेल त्या संधीचा वापर केला. यावरून त्याला लोकांबद्दल किती प्रेम होतं हे दिसून आलं. (लूक १९:४७, ४८) प्रचार करण्यासाठी त्याने इतकी मेहनत का घेतली? कारण लोकांची परिस्थिती पाहून त्याला दया आली. त्याचं ऐकण्यासाठी लोक इतकी गर्दी करायचे, की काही वेळा “येशू आणि त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत.” (मार्क ३:२०) इतकंच नाही, तर तो रात्रीसुद्धा लोकांना शिकवायला तयार असायचा. उदाहरणार्थ, निकदेम नावाचा एक माणूस एकदा रात्रीच्या वेळी त्याच्याकडे आला, तेव्हासुद्धा येशू त्याच्याशी बोलायला तयार होता. (योहा. ३:१, २) ज्यांनी त्याचं ऐकलं ते सगळेच येशूचे शिष्य झाले असं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, त्या सगळ्यांना चांगली साक्ष मिळाली. आज आपणसुद्धा जास्तीत जास्त लोकांना भेटून त्यांना चांगली साक्ष दिली पाहिजे. (प्रे. कार्यं १०:४२) त्यासाठी आपल्याला कदाचित आपल्या प्रचारकार्याच्या पद्धतीत फेरबदल करावे लागतील.
१४ फेरबदल करायला तयार असा. आपण जर प्रचार करण्याच्या आपल्या वेळेत बदल करायला तयार नसलो, तर ज्यांना खरंच राज्याचा संदेश ऐकायची इच्छा आहे, त्यांना आपण भेटू शकणार नाही. मटिल्डा नावाची एक पायनियर म्हणते: “आम्ही वेगवेगळ्या वेळी लोकांना भेटायचा प्रयत्न करतो. सकाळी आम्ही व्यापारी क्षेत्रात कार्य करतो, दुपारी ट्रॉली लावून प्रचारकार्य करतो आणि संध्याकाळी घरोघरचं प्रचारकार्य करतो.” आपल्याला कोणती वेळ सोयीची आहे याचा विचार करण्यापेक्षा, जास्तीत जास्त लोक केव्हा भेटतील याचा विचार करून आपण आपल्या प्रचार करण्याच्या वेळेत फेरबदल करायला तयार असलं पाहिजे. अशा प्रकारे प्रचारकार्यात आपण मेहनत घेतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो.
येशू आपल्या पित्याच्या नावासाठी रडला
१५. लूक २२:३९-४४ यात सांगितल्याप्रमाणे येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडलं?
१५ इ.स. ३३ च्या निसान १४ तारखेला रात्रीच्या वेळी येशू गेथशेमाने बागेत गेला. तिथे त्याने यहोवासमोर आपलं मन मोकळं केलं. (लूक २२:३९-४४ वाचा.) त्या वेळी येशूने ‘देवाला, आक्रोश करून आणि अश्रू गाळून याचना केल्या.’ (इब्री ५:७) आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना केली? शेवटपर्यंत यहोवाला विश्वासू राहण्यासाठी आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी त्याने त्याच्याकडे बळ मागितलं. आपल्या मुलाने केलेल्या कळकळीच्या याचना यहोवाने ऐकल्या आणि एका स्वर्गदूताला पाठवून त्याला बळ दिलं.
१६. गेथशेमाने बागेत येशू दुःखी होऊन का रडला?
१६ येशूला माहीत होतं, की लवकरच त्याच्यावर देवाच्या नावाची निंदा करण्याचा आरोप लावला जाईल. आणि या गोष्टीचा विचार करूनच त्याला इतकं दुःख होत होतं, की तो रडला. याशिवाय, अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या पित्याला विश्वासू राहून त्याच्या नावावर लागलेला कलंक मिटवण्याची एक खूप मोठी जबाबदारी त्याच्यावर होती आणि त्या गोष्टीच्या चिंतेमुळेसुद्धा त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तुम्हीही जर अशा एखाद्या परिस्थितीतून जात असाल, ज्यामुळे तुमच्या विश्वासाची परीक्षा होत आहे तर या घटनेतून तुम्ही काय शिकू शकता? चला यातून कोणत्या तीन गोष्टी शिकायला मिळतात ते आता पाहू या.
१७. यहोवाने येशूच्या विनंत्या का ऐकल्या, आणि त्यावरून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
१७ यहोवा तुमच्या याचना ऐकतो. येशूने केलेल्या कळकळीच्या विनंत्या यहोवाने का ऐकल्या? कारण येशूसाठी आपल्या पित्याला एकनिष्ठ राहणं आणि त्याच्या नावावर लागलेला कलंक मिटवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. या गोष्टी आपल्यासाठीही तितक्याच महत्त्वाच्या असतील, तर मदतीसाठी आपण केलेल्या प्रार्थना यहोवा नक्की ऐकेल.—स्तो. १४५:१८, १९.
१८. येशू एका चांगल्या मित्रासारखा आहे, असं आपण का म्हणू शकतो?
१८ येशूला तुमच्या भावना कळतात. आपण दुःखी असतो आणि आपला एखादा जवळचा मित्र आपल्याला धीर देतो, आणि खासकरून असा मित्र ज्याने आपल्यासारख्याच समस्यांचा सामना केला आहे, तर आपल्याला किती बरं वाटतं! येशू अशाच एका मित्रासारखा आहे. आपण खचून जातो आणि आपल्याला मदतीची गरज असते, तेव्हा आपल्याला कसं वाटतं हे त्याला कळतं. आपण कितपत सहन करू शकतो हे त्याला माहीत आहे. त्यामुळे “गरज असेल तेव्हा” तो नक्कीच आपल्या मदत करेल. (इब्री ४:१५, १६) गेथशेमाने बागेत यहोवाने एका स्वर्गदूताद्वारे पुरवलेली मदत येशूने स्वीकारली. त्याचप्रमाणे आज यहोवा आपल्याला जी काही मदत पुरवतो ती आपण स्वीकारली पाहिजे. मग ती मदत कोणत्याही मार्गाने असो. जसं की, प्रकाशनांतून, व्हिडिओतून आणि भाषणांतून किंवा मग ख्रिस्ती वडील आणि आपले भाऊबहीण आपल्याला भेटायला येतात त्यातून.
१९. परीक्षांचा सामना करत असताना आपल्याला यहोवा कशी मदत करतो? अनुभव सांगा.
१९ यहोवा तुम्हाला शांती देईल. परीक्षेत असताना आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्याला ‘सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली त्याची शांती’ देतो. (फिलिप्पै. ४:६, ७) देवाकडून मिळणाऱ्या शांतीमुळे आपलं मन शांत होतं आणि आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत होते. लुसी नावाच्या एका बहिणीने ही गोष्ट कशी अनुभवली त्याचा विचार करा. ती म्हणते: “बऱ्याचदा मला फार एकटं-एकटं असल्यासारखं वाटतं. त्यामुळे यहोवाचं माझ्यावर प्रेमच नाहीए असं कधीकधी मला वाटतं. पण त्या वेळी मी लगेच यहोवाशी बोलते आणि मला कसं वाटतं ते त्याला सांगते. त्यानंतर मला खूप बरं वाटतं.” या बहिणीचा अनुभव दाखवतो, की प्रार्थना केल्यामुळे आपल्याला खरंच मनाची शांती मिळू शकते.
२०. या लेखातून आपण काय-काय शिकलो?
२० खरंच, येशूचे अश्रूसुद्धा आपल्याला किती काही शिकवून जातात! आपण बरंच काही शिकलो. जसं की, दुःखात असलेल्या आपल्या भाऊबहिणींना आपण धीर दिला पाहिजे आणि त्यांची मदत केली पाहिजे. तसंच, जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आपण याची खातरी बाळगू शकतो, की यहोवा आणि येशू आपल्याला त्या दुःखातून सावरायला मदत करतील. यहोवा आणि येशूला लोकांबद्दल दया वाटली. आपणही त्याच भावनेने लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगायचा होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला हे जाणून किती दिलासा मिळतो, की यहोवा आणि येशू या दोघांनाही आपलं दुःख कळतं! त्यांना आपली परिस्थिती माहीत आहे आणि आपण शेवटपर्यंत विश्वासू राहावं म्हणून त्यांना आपल्याला मदत करायची इच्छा आहे. लवकरच यहोवा आपलं सुंदर अभिवचन पूर्ण करेल: तो आपल्या “डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.” (प्रकटी. २१:४) तेव्हा तो दिवस येईपर्यंत आपण शिकलेल्या गोष्टी लागू करत राहू या.
गीत २१ जे दयाळू ते धन्य!
^ असे काही प्रसंग होते जेव्हा येशूला खूप दाटून आलं, आणि तो रडला. या लेखात अशा तीन घटनांबद्दल आपण पाहू या, आणि त्यातून काय शिकायला मिळतं ते बघू या.
^ काही नावं बदलण्यात आली आहेत.
^ चित्रांचं वर्णन: येशूने मरीया आणि मार्थाचं सांत्वन केलं. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे, त्यांचं आपणही असंच सांत्वन केलं पाहिजे.
^ चित्रांचं वर्णन: येशू निकदेमला रात्रीच्या वेळीही शिकवायला तयार होता. आपणही लोकांच्या सोयीप्रमाणे त्यांच्यासोबत अभ्यास करायला तयार असलं पाहिजे.
^ चित्रांचं वर्णन: शेवटपर्यंत विश्वासू राहण्यासाठी येशूने यहोवाला प्रार्थना केली. परीक्षांचा सामना करताना आपणही तेच केलं पाहिजे.