व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २

येशूच्या लहान भावाकडून शिका

येशूच्या लहान भावाकडून शिका

“देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब.”​—याको. १:१.

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

सारांश *

१. याकोबचं कुटुंब कसं होतं?

 येशूचा भाऊ याकोब, आध्यात्मिक वातावरण असलेल्या एका कुटुंबात वाढला. त्याच्या आईवडिलांचं, म्हणजे योसेफ आणि मरीयाचं यहोवावर खूप प्रेम होतं आणि त्याची ते मनापासून सेवा करायचे. शिवाय, याकोबचा मोठा भाऊ पुढे वचन दिलेला मसीहा बनणार होता. आणि हासुद्धा याकोबसाठी एक आशीर्वादच होता. अशा कुटुंबात वाढणं हा याकोबसाठी खरंच एक मोठा बहुमान होता!

येशूसोबत एकाच कुटुंबात वाढत असताना याकोबला आपल्या मोठ्या भावाला जवळून ओळखता आलं (परिच्छेद २ पाहा)

२. याकोबकडे सुरुवातीलाच येशूचा शिष्य बनायची संधी होती, असं का म्हणता येईल?

याकोबला आपल्या मोठ्या भावाकडून शिकण्यासारखं बरंच काही होतं. (मत्त. १३:५५) उदाहरणार्थ, येशूला शास्त्रवचनांचं खूप चांगलं ज्ञान होतं. इतकं, की तो १२ वर्षांचा असताना यरुशलेममधले गुरूजन त्याचं ज्ञान पाहून थक्क झाले होते. (लूक २:४६, ४७) बंधू नेथन एच. नॉर नेहमी म्हणायचे: “तुम्ही एखाद्या व्यक्‍तीसोबत काम करता तेव्हा तिला आणखी चांगल्या प्रकारे ओळखू लागता.” * आणि तेच याकोबच्या बाबतीतही घडलं असावं. त्याने आपल्या भावासोबत कदाचित सुतारकाम केलं असेल. आणि त्यामुळे त्याला आपल्या भावाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखता आलं असेल. इतकंच नाही, तर ‘येशू बुद्धीने आणि शरीराने तसंच देवाच्या आणि माणसांच्या कृपेत कसा वाढत गेला,’ हेही याकोबने पाहिलं असेल. (लूक २:५२) त्यामुळे आपल्याला कदाचित असं वाटेल, की याकोब हा येशूच्या पहिल्या शिष्यांपैकी एक असायला पाहिजे होता. पण तसं घडलं नाही.

३. येशूच्या सेवाकार्यादरम्यान याकोब त्याचा शिष्य बनला नाही असं आपण का म्हणू शकतो?

येशू पृथ्वीवर आपलं सेवाकार्य करत होता तोपर्यंत याकोब त्याचा शिष्य बनला नाही. (योहा. ७:३-५) उलट ‘येशूला वेड लागलंय,’ असं म्हणणाऱ्‍या नातेवाइकांमध्ये याकोबसुद्धा असावा. (मार्क ३:२१) तसंच, येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलं तेव्हा याकोब आपल्या आईसोबत, मरीयासोबत तिथे होता असं कुठेही वाचायला मिळत नाही.—योहा. १९:२५-२७.

४. या लेखात आपण काय शिकणार आहोत?

पण नंतर याकोबने येशूवर विश्‍वास ठेवला आणि तो ख्रिस्ती मंडळीत एक जबाबदार बांधव बनला. या लेखात आपण याकोबकडून शिकता येतील अशा दोन गोष्टी पाहू या: (१) आपण नम्र का असलं पाहिजे? आणि (२) आपण चांगले शिक्षक कसे बनू शकतो?

याकोबसारखं नम्र राहा

पुनरुत्थानानंतर येशू याकोबला भेटला तेव्हा याकोबने हे नम्रपणे मान्य केलं, की येशू हाच मसीहा आहे. आणि तेव्हापासून तो येशूचा शिष्य बनून विश्‍वासूपणे त्याची सेवा करत राहिला (परिच्छेद ५-७ पाहा)

५. आपल्या पुनरुत्थानानंतर येशू याकोबला भेटला तेव्हा याकोबमध्ये कोणता बदल घडून आला?

मग याकोब येशूचा शिष्य केव्हा बनला? पुनरुत्थान झाल्यानंतर येशू “याकोबला आणि मग सगळ्या प्रेषितांना दिसला.” (१ करिंथ. १५:७) त्या भेटीनंतर याकोबच्या जीवनाला एक नवीन वळण मिळालं आणि तो येशूचा शिष्य बनला. यरुशलेममध्ये माडीवरच्या खोलीत येशूचे शिष्य पवित्र शक्‍ती मिळण्याची वाट पाहत होते, तेव्हा त्यांच्यामध्ये याकोबसुद्धा होता. (प्रे. कार्यं १:१३, १४) पुढे त्याला पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाचा सदस्य म्हणून सेवा करायची संधीसुद्धा मिळाली. (प्रे. कार्यं १५:६, १३-२२; गलती. २:९) आणि इ.स. ६२ च्या काही काळाआधी देवाने त्याला अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पत्र लिहिण्याची प्रेरणा दिली. त्या पत्राचा आज आपल्या सगळ्यांनाच फायदा होतो, मग आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची. (याको. १:१) पहिल्या शतकातला यहुदी इतिहासकार योसिफस याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य याजक हन्‍नाचा मुलगा हनन्या (महायाजक) याच्या आदेशावरून याकोबला ठार मारण्यात आलं. पण पृथ्वीवरचं जीवन संपेपर्यंत याकोब यहोवाला विश्‍वासू राहिला.

६. याकोबमध्ये आणि त्याच्या काळातल्या धार्मिक पुढाऱ्‍यांमध्ये काय फरक होता?

याकोब नम्र होता.  असं का म्हणता येईल? येशू हा देवाचा मुलगा आहे याचा स्पष्ट पुरावा याकोबला मिळाला तेव्हा त्याने नम्रपणे तो मान्य केला. पण यरुशलेममधल्या शास्त्री-परूशी आणि मुख्य याजकांनी तसं केलं नाही. उदाहरणार्थ, येशूने लाजरला मेलेल्यातून जीवंत केलं आहे, ही गोष्ट ते नाकारू शकत नव्हते. पण येशूला यहोवाने पाठवलं आहे, हे मान्य करण्याऐवजी त्यांनी उलट येशूला आणि लाजरला, दोघांनाही मारून टाकायचा प्रयत्न केला. (योहा. ११:५३; १२:९-११) पुढे जेव्हा येशूचं पुनरुत्थान झालं, तेव्हा त्यांनी ही गोष्ट लोकांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. (मत्त. २८:११-१५) आपल्या गर्विष्ठ वृत्तीमुळे त्या धार्मिक पुढाऱ्‍यांनी येशूला मसीहा म्हणून स्वीकारलं नाही.

७. गर्विष्ठपणामुळे काय होऊ शकतं?

आपण काय शिकतो: आपण गर्विष्ठ असू नये. उलट यहोवाकडून शिकायला आपण नेहमी तयार असलं पाहिजे.  ज्याप्रमाणे एखाद्या रोगामुळे रक्‍तवाहिन्या कठीण होऊन हृदय नीट काम करत नाही आणि प्रतिसाद देत नाही, त्याचप्रमाणे गर्विष्ठपणामुळे आपलं मन कठोर होऊन यहोवाच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद देणार नाही. परूश्‍यांचं मन इतकं कठीण झालं होतं, की येशूवर देवाची पवित्र शक्‍ती आहे आणि तो देवाचा मुलगा आहे याचा सुस्पष्ट पुरावा समोर असतानाही ते ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हते. (योहा. १२:३७-४०) ही गोष्ट इतकी गंभीर होती, की त्यामुळे ते सर्वकाळाच्या जीवनाची आशा गमावून बसले. (मत्त. २३:१३, ३३) यातून आपण एक महत्त्वाची गोष्ट शकतो. ती म्हणजे, आपण देवाच्या वचनाला आणि त्याच्या पवित्र शक्‍तीला आपल्या स्वभावात आणि विचारसरणीत बदल करू दिला पाहिजे आणि त्यांप्रमाणे जीवनात निर्णयही घेतले पाहिजेत. (याको. ३:१७) याकोब यहोवाकडून शिकायला तयार होता, कारण तो नम्र होता. आणि त्याच्या नम्रतेमुळेच तो पुढे एक चांगला शिक्षकही बनला. त्याबद्दल आपण पुढे पाहू या.

याकोबसारखं चांगले शिक्षक व्हा

८. कोणत्या गोष्टीमुळे आपण चांगले शिक्षक होऊ शकतो?

याकोब काही खूप शिकलेला नव्हता. त्यामुळे त्याच्या काळातल्या धर्मगुरूंनी त्यालाही पेत्र आणि योहानसारखंच “अशिक्षित आणि सर्वसाधारण” समजलं असावं. (प्रे. कार्यं ४:१३) पण पुढे याकोब खूप चांगला शिक्षक बनला आणि ही गोष्ट त्याने लिहिलेल्या पत्रातून दिसून येते. याकोबसारखंच कदाचित आपलंही खूप जास्त शिक्षण झालेलं नसेल. पण यहोवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या प्रशिक्षणामुळे आपणसुद्धा चांगले शिक्षक बनू शकतो. तर चला आता आपण हे पाहू, की याकोब एक चांगला शिक्षक कसा होता आणि त्याच्याकडून आपण काय शिकू शकतो.

९. याकोबच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल काय म्हणता येईल?

याकोबने वापरलेले शब्द आणि स्पष्टीकरणं खूप सोपी होती.  त्यामुळे आपल्याला काय करण्याची गरज आहे आणि आपण ते कसं केलं पाहिजे हे ऐकणाऱ्‍यांना लगेच समजायचं. उदाहरणार्थ, मनात बदल्याची भावना न ठेवता आपण अन्याय सहन करायला तयार असलं पाहिजे ही गोष्ट त्याने किती साध्या पद्धतीने शिकवली याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं: “ज्यांनी धीराने संकटं सोसली ते धन्य! ईयोबच्या धीराबद्दल तुम्ही ऐकलं आहे आणि शेवटी यहोवाने त्याला ज्या प्रकारे आशीर्वादित केलं त्यावरून यहोवा दयाळू आणि खूप कृपाळू आहे हेही तुम्ही पाहिलं आहे.” (याको. ५:११) तुम्ही लक्ष दिलं का, याकोबने स्वतःच्या मनाचं शिकवलं नाही, तर शिकवताना नेहमी शास्त्रवचनांचा आधार घेतला. त्याने देवाच्या वचनाचा उपयोग करून लोकांना हे समजायला मदत केली, की जे ईयोबप्रमाणे यहोवाला एकनिष्ठ राहतात त्यांना तो नक्की प्रतिफळ देतो. हा मुद्दा शिकवण्यासाठी, याकोबने अगदी साध्या शब्दांचा आणि स्पष्टीकरणाचा उपयोग केला. आणि अशा प्रकारे त्याने स्वतःकडे नाही, तर यहोवाकडे लोकांचं लक्ष वेधलं.

१०. बायबल विद्यार्थ्याला शिकवताना आपण याकोबच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

१० आपण काय शिकतो:  आपण नेहमी साध्यासोप्या पद्धतीने शिकवलं पाहिजे आणि शिकवताना बायबलचा वापर केला पाहिजे. आपल्याला बायबलचं किती ज्ञान आहे हे दाखवायचा आपण कधीच प्रयत्न करू नये. तर यहोवाची बुद्धी किती अफाट आहे आणि त्याला आपली किती काळजी आहे हे दाखवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. (रोम. ११:३३) त्यासाठी आपण जे काही शिकवतो ते नेहमी शास्त्रवचनांवर आधारित असलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या बायबल विद्यार्थ्याला एखादी समस्या असेल, तर आपण त्याला असं म्हणू नये, की ‘मी  तुझ्या जागी असतो तर असं केलं असतं.’ याउलट, आपण त्याला  बायबलमधल्या उदाहरणांवर विचार करायला, तसंच या विषयाबद्दल यहोवा कसा विचार करतो आणि त्याच्या भावना काय आहेत हे समजून घ्यायला मदत केली पाहिजे. त्यामुळे बायबल विद्यार्थी आपल्याला नाही, तर यहोवाला खूश करण्याचा नेहमी प्रयत्न करेल.

११. याकोबच्या दिवसांत भाऊबहिणींमध्ये कोणत्या समस्या होत्या? (याकोब ५:१३-१५)

११ याकोब खूप समंजस होता.  याकोबने लिहिलेल्या पत्रातून स्पष्टपणे दिसून येते, की आपल्या भाऊबहिणींच्या कमतरता काय आहेत याची याकोबला जाणीव होती. आणि त्यावर मात करण्यासाठी त्याने त्यांना स्पष्ट सल्लाही दिला. उदाहरणार्थ, काही ख्रिश्‍चनांची समस्या अशी होती, की दिलेला सल्ला ते लगेच लागू करत नव्हते. (याको. १:२२) काही जण श्रीमंतांच्या पुढे-पुढे करणारे होते. (याको. २:१-३) तर असेही काही जण होते ज्यांचा आपल्या जिभेवर ताबा नव्हता. (याको. ३:८-१०) या गोष्टी खूप गंभीर होत्या. त्यामुळे आपण जर त्या भाऊबहिणींच्या लक्षात आणून दिल्या, तर ते नक्की बदलतील असा विचार याकोबने केला. त्यामुळे त्याने सडेतोडपणे, पण तितक्याच प्रेमाने त्यांना सल्ला दिला. आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी वडिलांकडे ती मागावी असं प्रोत्साहनही त्याने त्यांना दिलं.—याकोब ५:१३-१५ वाचा.

१२. आपल्या बायबल विद्यार्थ्यांबद्दल आपण कसा विचार केला पाहिजे?

१२ आपण काय शिकतो: आपण समंजस असलं पाहिजे आणि इतर जण स्वतःमध्ये बदल करतील असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे.  आपण ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करतो त्यांना कदाचित बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे बदल करायला कठीण जात असेल. (याको. ४:१-४) उदाहरणार्थ, काहींना आपल्या वाईट सवयी कायमच्या सोडून देण्यासाठी आणि स्वतःमध्ये ख्रिस्ती गुण उत्पन्‍न करण्यासाठी वेळ लागू शकतो. पण याकोबसारखंच त्यांना कुठे बदल करायची गरज आहे हे दाखवण्याचं धैर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. तसंच ते कधीच बदलणार नाहीत असा विचार आपण करू नये. उलट, यहोवा नम्र मनाच्या लोकांना त्याच्याकडे यायला मदत करेल आणि त्यांना स्वतःमध्ये बदल करायची ताकद देईल असा भरवसा आपण ठेवला पाहिजे.—याको. ४:१०.

१३. याकोब ३:२ मध्ये सांगितल्याप्रमाणे याकोबने कोणती गोष्ट मान्य केली?

१३ याकोबने स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवला.  येशूचा भाऊ असल्यामुळे किंवा मोठमोठ्या जबाबदाऱ्‍या असल्यामुळे, आपण कोणीतरी विशेष आहोत किंवा इतर भाऊबहिणींपेक्षा महत्त्वाचे आहोत, असा याकोबने कधीच विचार केला नाही. उलट त्याने त्यांना, ‘माझे प्रिय बांधव’ असं म्हणून आपण त्यांच्यातलेच एक आहोत हे दाखवून दिलं. (याको. १:१६, १९; २:५) शिवाय, आपण नेहमी बरोबर असतो, आपल्याकडून कधीच चुका होत नाहीत असं त्याने कधीच दाखवलं नाही. उलट, “आपण सगळेच बऱ्‍याच वेळा चुकतो” असं म्हणून त्याने हे मान्य केलं, की तोसुद्धा त्यांच्यासारखाच एक आहे.—याकोब ३:२ वाचा.

१४. आपणही चुकतो ही गोष्ट विद्यार्थ्याला सांगितल्यामुळे त्याला कसा फायदा होईल?

१४ आपण काय शिकतो: आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण सगळेच चुकतो.  आपण कधीच असा विचार करू नये, की आपण ज्यांना शिकवतो त्यांच्यापेक्षा आपण खूप श्रेष्ठ आहोत. कारण आपण जर असं दाखवलं, की आपल्याकडून कधीच चुका होत नाहीत, तर त्यांना असं वाटेल, की यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागणं खूप कठीण आहे आणि आपल्याला ते कधीच जमणार नाही. पण आपण जर त्यांना सांगितलं, की आपल्यालाही सुरुवातीला स्वतःमध्ये बदल करायला कसं कठीण गेलं आणि ते बदल करायला यहोवाने कशी मदत केली, तर त्यांना हे कळेल की त्यांनाही ते जमू शकतं.

याकोबने साधीसोपी आणि प्रभावी उदाहरणं वापरली (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५. याकोबने कशा प्रकारची उदाहरणं वापरली? (याकोब ३:२-६, १०-१२)

१५ याकोबने सोपी आणि प्रभावी उदाहरणं वापरली.  यासाठी पवित्र शक्‍तीने त्याला नक्कीच मदत केली असेल. पण त्यासोबतच त्याच्या मोठ्या भावाने, येशूने जी उदाहरणं वापरली होती त्यांतूनही तो सोप्या पद्धतीने कसं शिकवायचं याबद्दल बरंच काही शिकला असावा. म्हणूनच याकोबने स्पष्ट आणि समजायला सोपी असलेली उदाहरणं आपल्या पत्रात वापरली.—याकोब ३:२-६, १०-१२ वाचा.

१६. आपण सोपी आणि प्रभावी उदाहरणं का वापरली पाहिजे?

१६ आपण काय शिकतो: आपण सोपी आणि प्रभावी उदाहरणं वापरली पाहिजेत.  शिकवताना आपण योग्य उदाहरणं वापरतो, तेव्हा विद्यार्थ्याच्या मनात त्या गोष्टीचं चित्र उभं करायला आपण मदत करतो. त्यामुळे बायबलच्या महत्त्वाच्या शिकवणी लक्षात ठेवायला विद्यार्थ्याला मदत होते. अशी प्रभावी उदाहरणं वापरण्यात येशू माहीर होता. आणि या गोष्टीचं अनुकरण त्याच्या भावाने, याकोबने केलं. तर चला आता आपण याकोबने दिलेलं एक उदाहरण पाहू या आणि ते इतकं प्रभावी का आहे ते बघू या.

१७. याकोब १:२२-२५ मध्ये याकोबने दिलेलं उदाहरण प्रभावी का आहे?

१७ याकोब १:२२-२५ वाचा. या वचनांत याकोबने आरशाचं उदाहरण वापरलं. हे उदाहरण खूप प्रभावी होतं असं म्हणता येईल. कारण त्यातून त्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवायची होती. ती म्हणजे, आपण देवाचं वचन नुसतंच वाचलं नाही पाहिजे, तर त्याप्रमाणे वागलंही पाहिजे. हे समजवण्यासाठी त्याने आरशात आपला चेहरा पाहणाऱ्‍या माणसाचं उदाहरण दिलं. हे उदाहरण रोजच्या जीवनातलं असल्यामुळे लोकांना ते लगेच समजलं. या उदाहरणात याकोब आरशात पाहणाऱ्‍या एका माणसाबद्दल सांगतो. आरशात पाहताना त्याला आपल्या चेहऱ्‍याला काहीतरी लागल्याचं दिसतं. पण ते न काढता तो तसाच बाहेर निघून जातो. त्या माणसाचं हे वागणं जसं मूर्खपणाचं आहे, तसंच बायबलचं वाचन करत असताना स्वतःमध्ये बदल करायची गरज असल्याचं जाणवत असतानाही काहीच न करणं मूर्खपणाचं आहे, हे याकोबला सांगायचं होतं.

१८. उदाहरणं वापरताना कोणत्या तीन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे?

१८ याकोबसारखंच आपल्यालाही साधीसोपी आणि प्रभावी उदाहरणं वापरायची असतील, तर आपण तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे: (१) आपल्याला जो मुद्दा समजावून सांगायचा आहे त्याला जुळणारं ते उदाहरण असलं पाहिजे. (२) समजायला सोपं असेल असं उदाहरण आपण वापरलं पाहिजे. आणि (३) जो मुद्दा समजावून सांगायचा आहे तो त्या उदाहरणातून स्पष्ट झाला पाहिजे. अशी उदाहरणं तुम्हाला सुचत नसतील, तर वॉचटॉवर पब्लिकेशन्स इंडेक्स  यात “उदाहरणं” (Illustrations) या शीर्षकाखाली तुम्हाला भरपूर उदाहरणं मिळतील. असं म्हणतात, की चांगली उदाहरणं माईकसारखी असतात. जसं माईकमुळे आपला आवाज आणखी स्पष्टपणे ऐकू येतो, अगदी तसंच चांगल्या उदाहरणांमुळे मुख्य मुद्दा आणखी स्पष्टपणे समजतो. पण तुम्ही जर प्रत्येक गोष्टीसाठी उदाहरणं वापरली, तर विद्यार्थी गोंधळून जाऊ शकतो. त्यामुळे फक्‍त मुख्य मुद्दे समजावण्यासाठीच उदाहरणं वापरा. यामुळे आपली शिकवण्याची कौशल्यं वाढतील. पण आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, की इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठी नाही, तर जास्तीत जास्त लोकांनी यहोवाच्या आनंदी कुटुंबात यावं म्हणून आपण आपली शिकवण्याची कौशल्यं वाढवतो.

१९. आपल्या भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे हे कशावरून दिसून येईल?

१९ याकोबसारखं आपण एका परिपूर्ण भावासोबत वाढलो नसलो, तरी ख्रिस्ती भाऊबहिणींनी बनलेल्या एका मोठ्या कुटुंबात राहून यहोवाची सेवा करण्याचा खूप मोठा बहुमान आपल्याला आहे. आपण भाऊबहिणींसोबत वेळ घालवतो, त्यांच्याकडून शिकतो आणि त्यांच्यासोबत मिळून प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करतो तेव्हा आपण दाखवतो, की त्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे. आपण याकोबच्या मनोवृत्तीचं आणि त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीचं अनुकरण करतो, तेव्हा आपण यहोवाचा गौरव करतो. तसंच, चांगल्या मनाच्या लोकांना स्वर्गातल्या आपल्या प्रेमळ पित्याकडे यायलाही मदत करतो.

गीत ३५ देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता

^ याकोब हा येशूचा लहान भाऊ होता. त्यामुळे तो देवाच्या परिपूर्ण मुलाला बाहेरच्या लोकांपेक्षा जास्त चांगलं ओळखत होता. पुढे याकोब पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती मंडळीत पुढाकार घेणारा एक जबाबदार बांधव बनला. त्यामुळे येशूच्या या लहान भावाच्या जीवनातून आणि त्याने लिहिलेल्या पत्रातून आपल्याला काय शिकायला मिळतं, ते या लेखात आपण पाहू या.

^ नेथन एच. नॉर हे नियमन मंडळाचे सदस्य होते. १९७७ साली त्यांचं पृथ्वीवरचं आयुष्य संपलं.

^ चित्राचं वर्णन: आपल्या जिभेवर आपला ताबा नसेल, तर काय होऊ शकतं हे समजावण्यासाठी याकोबने लहानशा आगीचं उदाहरण दिलं. हे उदाहरण रोजच्या जीवनातलं असल्यामुळे लोकांना ते लगेच समजलं.