व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५

“वेळेचा चांगला उपयोग करा”

“वेळेचा चांगला उपयोग करा”

“तुम्ही कसं चालता याकडे बारकाईने लक्ष द्या; मूर्खांसारखं नाही, तर बुद्धिमानांसारखं चाला. वेळेचा चांगला उपयोग करा.”​—इफिस. ५:१५, १६.

गीत ४९ यहोवा आमचा दुर्ग!

सारांश *

१. यहोवासोबत वेळ घालवण्यासाठी आपण काय करतो?

 आपलं ज्यांच्यावर प्रेम असतं त्यांच्यासोबत वेळ घालवायला आपल्याला आवडतं. जसं की, पत्नी-पत्नीला एकमेकांच्या सहवासात, तर तरुणांना आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवायला आवडतो. आणि मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवायला तर सगळ्यांनाच आवडतो. पण सगळ्यात जास्त आपल्याला आपल्या स्वर्गातल्या पित्यासोबत वेळ घालवायला आवडतो. आपण त्याला प्रार्थना करतो, त्याचं वचन वाचतो, त्याच्या उद्देशावर आणि त्याच्या सुंदर गुणांवर मनन करतो, तेव्हा आपण त्याच्यासोबत वेळ घालवत असतो. खरंच, आपण यहोवासोबत घालवत असलेला वेळ आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे!—स्तो. १३९:१७.

२. यहोवासोबत वेळ घालवायला आपल्याला आवडत असलं तरी काय होऊ शकतं?

यहोवासोबत वेळ घालवायला आपल्याला आवडत असलं, तरी सध्याच्या धावपळीच्या जीवनात त्यासाठी म्हणावा तितका वेळ आपल्याला मिळत नाही. कारण नोकरी, कुटुंबाच्या जबाबदाऱ्‍या आणि इतर आवश्‍यक कामांमध्ये आपला बराच वेळ जातो. त्यामुळे प्रार्थना, अभ्यास किंवा मनन या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळच नाही असं आपल्याला वाटू शकतं.

३. आणखी कोणत्या गोष्टींमुळे आपला वेळ वाया जाऊ शकतो?

आणखी एका गोष्टीमध्ये आपला नकळत वेळ जाऊ शकतो. आपण जर काळजी घेतली नाही तर आपला बराचसा वेळ अशा गोष्टींमध्ये जाऊ शकतो, ज्या मुळात चुकीच्या नाहीत. पण त्यांमुळे यहोवासाठी आपल्याजवळ वेळच उरणार नाही. उदाहरणार्थ मनोरंजन आणि अशाच इतर गोष्टी. अधून-मधून आपण सगळेच मनोरंजनासाठी वेळ काढतो आणि ते गरजेचंसुद्धा आहे. पण काही वेळा या गोष्टीतच आपला इतका वेळ जाऊ शकतो, की त्यामुळे आध्यात्मिक गोष्टींसाठी आपल्याकडे वेळच उरणार नाही. म्हणून या गोष्टींसाठी आपण किती वेळ देतो, याचा विचार करणं गरजेचं आहे.—नीति. २५:२७; १ तीम. ४:८.

४. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

या लेखात आपण हे पाहू, की आपल्या जीवनात योग्य गोष्टींना महत्त्व देणं का गरजेचं आहे. तसंच आपण हेसुद्धा पाहू, की यहोवासोबत घालवण्यासाठी काढलेल्या वेळचा आपण सगळ्यात चांगला वापर कसा करू शकतो, आणि वेळेचा चांगला उपयोग केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो.

योग्य निवड करा आणि योग्य गोष्टींना जीवनात महत्त्व द्या

५. आयुष्यात पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी इफिसकर ५:१५-१७ ही वचनं एका तरुण व्यक्‍तीला कशी मदत करू शकतात?

जीवन जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग निवडा.  आयुष्यात पुढे काय करायचं असा प्रश्‍न तरुणांना नेहमी पडतो. एकीकडे शाळा-कॉलेजमधले शिक्षक आणि सत्यात नसलेले नातेवाईक त्यांना कदाचित चांगलं करिअर करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्याचं प्रोत्साहन देतील. पण यासाठी सहसा भरपूर वेळ द्यावा लागतो. दुसरीकडे, आईवडील आणि मंडळीतले भाऊबहीण त्यांना यहोवाच्या सेवेला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायला सांगतील. मग अशा वेळी यहोवावर प्रेम करणाऱ्‍या तरुण व्यक्‍तीला योग्य निर्णय घेण्यासाठी कोणती गोष्ट मदत करू शकते? इफिसकर ५:१५-१७ ही वचनं वाचल्यामुळे आणि त्यांवर मनन केल्यामुळे तिला योग्य निर्णय घ्यायला मदत होऊ शकते. (वाचा.) ही वचनं वाचल्यावर ती स्वतःला असं विचारू शकते: ‘मी काय करावं अशी “यहोवाची इच्छा” आहे? मी कोणता निर्णय घेतला तर यहोवाला आनंद होईल? कोणता निर्णय घेतल्यामुळे मला माझ्या वेळेचा सगळ्यात चांगला वापर करता येईल?’ हे कधीही विसरू नका, की सध्याचे “दिवस वाईट आहेत” आणि सैतानाच्या या जगाचा लवकरच नाश होणार आहे. त्यामुळे आपण आयुष्यात अशाच गोष्टींची निवड करायचा प्रयत्न केला पाहिजे, ज्यांमुळे यहोवाला आनंद होईल.

६. मरीयाने काय करायची निवड केली, आणि ती योग्य निवड होती असं का म्हणता येईल?

योग्य गोष्टींना महत्त्व द्या.  वेळेचा चांगला उपयोग करण्यासाठी काही वेळा आपल्याला अशा गोष्टींमध्येसुद्धा निवड करावी लागेल, ज्या मुळात चुकीच्या नाहीत. हे समजून घेण्यासाठी बायबलमधल्या मार्था आणि मरीयाचा अहवाल आपल्याला मदत करेल. येशू त्यांच्या घरी गेला तेव्हा मार्थाला त्याच्यासाठी काय करू आणि काय नको, असं झालं होतं. पाहुणचार करण्यात पुढे असलेल्या मार्थाने लगेच येशूसाठी मोठा स्वयंपाक करायला घेतला. पण मरीया येशूच्या जवळ बसून तो शिकवत असलेल्या गोष्टी ऐकू लागली. खरंतर, मार्था जे काही करायचा प्रयत्न करत होती त्यात चुकीचं असं काहीच नव्हतं. पण येशूने म्हटल्याप्रमाणे मरीयाने ‘जे जास्त चांगलं ते निवडलं होतं.’ (लूक १०:३८-४२, तळटीप) त्या दिवशी आपल्या घरात काय स्वयंपाक केला होता, हे कदाचित मरीया नंतर विसरून गेली असेल, पण येशूने शिकवलेल्या गोष्टी ती कधीच विसरली नसेल, हे आपण खातरीने म्हणू शकतो. जसं मरीयाने येशूसोबत घालवलेला तो वेळ तिच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता, तसंच यहोवासोबत आपण घालवत असलेला वेळ आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा असला पाहिजे. पण त्या वेळेचा आपण सगळ्यात चांगला वापर कसा करू शकतो?

यहोवासोबत घालवण्यासाठी काढलेल्या वेळेचा सगळ्यात चांगला उपयोग करा

७. प्रार्थना, अभ्यास आणि मनन या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या का आहेत?

हे लक्षात घ्या की प्रार्थना, अभ्यास आणि मनन हे आपल्या उपासनेचाच एक भाग आहेत.  आपण प्रार्थना करतो तेव्हा खरंतर आपण आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्‍या स्वर्गातल्या पित्यासोबत बोलत असतो. (स्तो. ५:७) आणि आपण बायबलचा अभ्यास करतो तेव्हा या विश्‍वातल्या सगळ्यात बुद्धिमान व्यक्‍तीचं म्हणजे “देवाचं ज्ञान” घेत असतो. (नीति. २:१-५) आणि शेवटी, आपण यहोवाबद्दल शिकलेल्या गोष्टींवर मनन करतो तेव्हा आपण यहोवाच्या सुंदर गुणांवर, तसंच तो आपल्यासाठी आणि सर्व मानवांसाठी पुढे करणार असलेल्या अनेक चांगल्या गोष्टींवर विचार करतो. वेळेचा चांगला उपयोग करण्याचा यापेक्षा उत्तम मार्ग असूच शकत नाही. पण यहोवासोबत घालवण्यासाठी आपण जो काही वेळ काढतो त्यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल?

व्यक्‍तिगत अभ्यासासाठी तुम्ही एखादी शांत जागा शोधू शकता का? (परिच्छेद ८-९ पाहा)

८. येशूकडून आपल्याला काय शिकायला मिळतं?

शक्य असेल तर एक शांत जागा निवडा.  येशूचंच उदाहरण घ्या. पृथ्वीवरचं आपलं सेवाकार्य सुरू करण्याआधी त्याने ४० दिवस ओसाड रानात घालवले. (लूक ४:१, २) तिथल्या शांत वातावरणात तो आपल्या पित्याला प्रार्थना करू शकला आणि आपल्यासाठी त्याची काय इच्छा आहे, यावर मनन करू शकला. यामुळे लवकरच येणाऱ्‍या परीक्षांना तोंड द्यायला तो तयार झाला. येशूच्या या उदाहरणातून तुम्ही काय शिकू शकता? तुमच्या कुटुंबात जर बरेच लोक असतील, तर एकांतात प्रार्थना करणं कदाचित तुम्हाला नेहमीच शक्य नसेल. अशा वेळी तुम्ही बाहेर एका शांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करू शकता. ज्युली नावाची एक बहीण हेच करते. ती आणि तिचे पती फ्रान्समध्ये एका छोट्याश्‍या घरात राहत असल्यामुळे तिला प्रार्थना करण्यासाठी म्हणावा तसा एकांत मिळत नाही. त्यामुळे ज्युली म्हणते: “मी दररोज एका बागेत फिरायला जाते. तिथे एकांतात मी मनमोकळेपणाने यहोवाशी बोलते.”

९. सेवाकार्यात व्यस्त असतानाही येशूने नेहमी काय केलं?

पृथ्वीवर असताना येशूचं जीवन खूप व्यस्त होतं. तो जिथे-जिथे जायचा तिथे लोकांचा जमाव त्याच्या मागे यायचा आणि येशूला त्यांना भरपूर वेळ द्यावा लागायचा. एकदा तर त्याला पाहण्यासाठी संपूर्ण गाव त्याच्या दारात जमा झालं होतं. पण तरीसुद्धा “दुसऱ्‍या दिवशी पहाटे, अंधार असतानाचा तो उठून बाहेर गेला आणि एकांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करू लागला.” अशा प्रकारे येशूने नेहमीच आपल्या पित्याला प्रार्थना करण्यासाठी वेळ काढला.—मार्क १:३२-३५.

१०-११. मत्तय २६:४०, ४१ या वचनांत सांगितल्याप्रमाणे येशूने शिष्यांना काय करायला सांगितलं, पण काय झालं?

१० आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री आपलं सेवाकार्य संपवताना, येशूने पुन्हा एकदा आपल्या पित्याशी एकांतात बोलण्यासाठी एक शांत ठिकाण शोधलं. त्यासाठी तो गेथशेमाने बागेत गेला (मत्त. २६:३६) त्याच वेळी येशूने आपल्या शिष्यांना प्रार्थनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

११ त्या वेळी काय घडलं त्याकडे लक्ष द्या. ते गेथशेमाने बागेत आले तेव्हा खूप उशीर झाला होता. कदाचित मध्यरात्र उलटून गेली होती. येशूने आपल्या शिष्यांना, “माझ्यासोबत जागे राहा,” असं सांगितलं आणि प्रार्थना करायसाठी तो पुढे गेला. (मत्त. २६:३७-३९) पण तो प्रार्थना करत असताना शिष्य झोपी गेले. ते पाहून येशू त्यांना म्हणाला: “जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.” (मत्तय २६:४०, ४१ वाचा.) पण शिष्य किती थकलेले आहेत आणि ते किती तणावाखाली आहेत हे येशूला माहीत होतं. ही गोष्ट लक्षात घेऊन तो म्हणाला: “मन तर उत्सुक आहे, पण शरीर दुर्बळ आहे.” त्यानंतर आणखी दोन वेळा तो प्रार्थना करायला गेला, आणि त्या वेळीसुद्धा त्याचे शिष्य प्रार्थना करण्याऐवजी झोपलेले आहेत असं त्याने पाहिलं.—मत्त. २६:४२-४५.

तुम्ही जास्त थकलेला नसता त्या वेळी यहोवाला प्रार्थना करू शकता का? (परिच्छेद १२ पाहा)

१२. थकल्यामुळे किंवा निराश झाल्यामुळे तुम्हाला जर प्रार्थनाच करावीशी वाटत नसेल, तर तुम्ही काय करू शकता?

१२ प्रार्थना करण्यासाठी चांगली वेळ निवडा.  कधीकधी आपण इतके तणावाखाली असतो किंवा इतके दमलेले असतो, की आपल्याला प्रार्थना करायची इच्छाच होत नाही. आपल्यापैकी बऱ्‍याच जणांच्या बाबतीत असं होऊ शकतं. पण असं होतं तेव्हा आपण काय करू शकतो? ज्यांना रात्री झोपायच्या आधी प्रार्थना करायची सवय होती त्यांच्यापैकी काहींना असं दिसून आलं आहे, की संध्याकाळी जेव्हा आपण फार थकलेलो नसतो त्या वेळी प्रार्थना करणं जास्त चांगलं आहे. काहींना असंही जाणवलं आहे, की सरळ बसून किंवा गुडघे टेकून प्रार्थना केल्यामुळे मन लावून प्रार्थना करता येते. पण जर चिंतेमुळे किंवा खूप निराश झाल्यामुळे तुम्हाला प्रार्थनाच करावीशी वाटत नसेल तर काय? अशा वेळी तुम्हाला कसं वाटतं ते यहोवाला सांगा. आपला प्रेमळ पिता आपल्याला नक्कीच समजून घेईल.—स्तो. १३९:४.

सभांमध्ये असताना मेसेज आणि ई-मेल चेक करायचं तुम्ही टाळू शकता का? (परिच्छेद १३-१४ पाहा)

१३. बायबलचा अभ्यास करताना किंवा सभांमध्ये असताना आपलं लक्ष कशामुळे भरकटू शकतं?

१३ अभ्यास करताना लक्ष विचलित होऊ देऊ नका.  प्रार्थनेसोबतच बायबलचा अभ्यास केल्यामुळे आणि सभांना उपस्थित राहिल्यामुळेही यहोवासोबतचं आपलं नातं आपण आणखी घट्ट करू शकतो. पण बायबलचा मन लावून अभ्यास करण्यासाठी आणि सभांमध्ये लक्ष देऊन ऐकण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्यासाठी तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता. जसं की, ‘बायबलचा अभ्यास करताना किंवा सभांमध्ये लक्ष देऊन ऐकताना सहसा कोणत्या गोष्टींमुळे माझं मन विचलित होतं? फोनकॉलमुळे, मेसेजमुळे किंवा ई-मेलमुळे माझं लक्ष भरकटतं का?’ आज बहुतेक लोकांकडे मोबाईल आणि टॅब आहेत. या गोष्टी गरजेच्या असल्या, तरी काही संशोधकांचं असं म्हणणं आहे, की त्या फक्‍त जवळपास जरी असल्या, तरी आपलं लक्ष लगेच विचलित होऊ शकतं. मानसशास्त्राचे एक प्रोफेसस म्हणतात, “त्यामुळे कामात तुमचं लक्ष लागत नाही आणि तुमचं मन इकडे-तिकडे भरकटू लागतं.” म्हणूनच आपल्याला संमेलन आणि अधिवेशन सुरू होण्याआधी इतरांना  त्रास होऊ नये, म्हणून आपले फोन आणि टॅब सायलेंट मोडवर ठेवायला सांगितलं जातं. बायबलचा अभ्यास करताना आपणही असंच करू शकतो. त्यामुळे आपल्यालाही  त्रास होणार नाही आणि आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर लागेल.

१४. फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांप्रमाणे यहोवा आपल्याला लक्ष एकाग्र करायला कशी मदत करू शकतो?

१४ लक्ष एकाग्र करण्यासाठी यहोवाकडे मदत मागा.  बायबलचा अभ्यास करताना किंवा सभेत असताना तुमचं लक्ष जर भरकटत असेल, तर यहोवाकडे मदत मागा. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल, तर आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष एकाग्र करणं मुश्‍कील होऊ शकतं. पण ते करणं गरजेचं आहे. म्हणून यहोवाला प्रार्थना करा. तो तुम्हाला तुमच्या मनाचं आणि ‘विचारांचं’ संरक्षण करण्यासाठी त्याची शांती देईल.—फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा. (तळटीप)

यहोवासोबत वेळ घालवल्यामुळे अनेक फायदे होतात

१५. यहोवासोबत वेळ घालवल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?

१५ आपण जर यहोवाशी बोलण्यासाठी, त्याचं ऐकण्यासाठी आणि त्याच्याबद्दल विचार करण्यासाठी वेळ काढला, तर त्यामुळे आपल्याला बरेच फायदे होऊ शकतात. एक फायदा म्हणजे, तुम्हाला चांगले निर्णय घेता येतील.  बायबल म्हणतं: “बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल.” (नीति. १३:२०) त्यामुळे विश्‍वातल्या सगळ्यात बुद्धिमान व्यक्‍तीसोबत तुम्ही वेळ घालवता तेव्हा तुम्हीसुद्धा बुद्धिमान होता. शिवाय, त्यामुळे यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, आणि त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टी कशा टाळल्या पाहिजेत हेही तुम्हाला समजेल.

१६. यहोवासोबत वेळ घालवल्यामुळे आपण चांगले शिक्षक कसे बनू शकतो?

१६ दुसरा फायदा म्हणजे, तुम्ही चांगले शिक्षक बनू शकता.  एखाद्यासोबत बायबलचा अभ्यास करताना त्याला यहोवासोबत जवळचं नातं जोडायला मदत करणं हाच आपला मुख्य उद्देश असतो. यहोवाशी आपण जितकं जास्त बोलू आणि त्याच्याविषयी जितकं जास्त शिकू तितकंच त्याच्यावरचं आपलं प्रेम वाढेल. आणि आपल्या बायबल विद्यार्थ्याच्या मनातही तितकंच प्रेम वाढवायला आपल्याला मदत होईल. येशूचंच उदाहरण घ्या. यहोवाबद्दल तो इतकं मनापासून आणि प्रेमळपणे बोलायचा की त्यामुळे शिष्यांनाही यहोवावरचं प्रेम वाढवायला मदत झाली.—योहा. १७:२५, २६.

१७. प्रार्थनेमुळे आणि अभ्यासामुळे आपला विश्‍वास कसा मजबूत होतो?

१७ तिसरा फायदा म्हणजे, आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो.  आपण जेव्हा देवाकडे मार्गदर्शनासाठी, सांत्वनासाठी किंवा मदतीसाठी प्रार्थना करतो तेव्हा काय होतं? ज्या-ज्या वेळी यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो, त्या-त्या वेळी त्याच्यावरचा आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो. (१ योहा. ५:१५) याशिवाय आणखी कोणत्या गोष्टीमुळे आपला विश्‍वास मजबूत होऊ शकतो? वैयक्‍तिक अभ्यासामुळे. कारण “वचन ऐकल्यावरच विश्‍वास ठेवला जातो,” हे कधीही विसरू नका. (रोम. १०:१७) पण विश्‍वास मजबूत करण्यासाठी फक्‍त ज्ञान घेणंच पुरेसं नाही. त्यासाठी आपल्याला आणखी एक गोष्ट करण्याची गरज आहे. ती कोणती ते पुढे पाहू या.

१८. मनन करणं का गरजेचं आहे? समजावून सांगा.

१८ शिकत असलेल्या गोष्टींवर आपण मननसुद्धा केलं पाहिजे. ७७ वं स्तोत्र रचणाऱ्‍या देवाच्या सेवकाचाच विचार करा. यहोवा आपल्यावर आणि इतर इस्राएली लोकांवर नाराज आहे असं वाटून तो खूप दुःखी झाला होता. त्या विचाराने त्याची झोप उडाली होती. (२-८ वचनं) मग त्याने काय केलं? तो यहोवाला म्हणाला: “मी तुझ्या सर्व कार्यांवर मनन करीन. त्यांच्यावर मी खोल विचार करीन.” (वचन १२) पूर्वी यहोवाने आपल्या लोकांसाठी किती काही केलं होतं, हे त्या स्तोत्रकर्त्याला माहीत होतं. पण तरीसुद्धा त्याच्या मनात असा प्रश्‍न आला, की “देव कृपा करायला विसरलाय का? की आपल्या रागामुळे त्याने दया दाखवायचं साडून दिलंय?” (वचन ९) पण मग, यहोवाने पूर्वी जी अद्‌भूत कार्यं केली होती आणि आपल्या लोकांना कशी दया दाखवली होती यावर त्याने मनन केलं. (वचन ११) याचा काय परिणाम झाला? त्याला याची खातरी पटली, की यहोवा आपल्या लोकांना सोडून देणार नाही. (वचन १५) त्याच प्रकारे, यहोवाने आत्तापर्यंत आपल्या लोकांसाठी आणि खास तुमच्यासाठी किती काही केलं आहे, यावर जर तुम्ही मनन केलं, तर त्याच्यावरचा तुमचाही विश्‍वास आणखी मजबूत होईल.

१९. यहोवासोबत वेळ घालवल्यामुळे आपल्याला आणखी कसा फायदा होईल?

१९ चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे, यहोवावरचं तुमचं प्रेम आणखी वाढेल.  दुसऱ्‍या कोणत्याही गुणापेक्षा प्रेमाचा हा गुण, तुम्हाला देवाच्या आज्ञा पाळायची, त्याच्यासाठी त्याग करायची आणि कुठल्याही परीक्षेचा धीराने सामना करायची प्रेरणा देईल. (मत्त. २२:३७-३९; १ करिंथ. १३:४, ७; १ योहा. ५:३) यहोवासोबतचं हे प्रेमाचं नातं दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा कितीतरी मौल्यवान आहे!—स्तो. ६३:१-८.

२०. यहोवासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी तुम्ही काय करायचं ठरवलं आहे?

२० हे कायम लक्षात असू द्या, की प्रार्थना, बायबलचा अभ्यास आणि मनन या गोष्टी आपल्या उपासनेचाच भाग आहेत. त्यामुळे येशूसारखंच, यहोवासोबत वेळ घालवण्यासाठी एक शांत ठिकाण निवडा. लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टी दूर ठेवा. बायबलचा अभ्यास करताना आणि सभांमध्ये लक्ष एकाग्र करण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. अशा प्रकारे तुम्ही जर आत्ता वेळेचा चांगला उपयोग केला, तर येणाऱ्‍या नवीन जगात यहोवा तुम्हाला सर्वकाळाच्या जीवनाचं बक्षीस देईल.—मार्क ४:२४.

गीत २७ यहोवाला इमानी राहा!

^ आपला सगळ्यात चांगला मित्र कोणी असेल तर तो यहोवा आहे. त्यामुळे त्याच्यासोबतची आपली मैत्री आपल्याला जपायची आहे आणि त्याला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं आहे. कोणालाही जाणून घेण्यासाठी वेळ लागतो. अगदी तसंच, यहोवासोबतची मैत्री वाढवण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. पण त्यासाठी सध्याच्या धावपळीच्या जीवनातून आपण वेळ कसा काढू शकतो? आणि त्यासाठी जर आपण वेळ काढला, तर आपल्याला कसा फायदा होईल?