व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४९

इतरांशी कसं वागायचं याबद्दल लेवीय पुस्तकातून काय शिकायला मिळतं?

इतरांशी कसं वागायचं याबद्दल लेवीय पुस्तकातून काय शिकायला मिळतं?

“आपल्या सोबत्यावर स्वतःसारखं प्रेम कर.”—लेवी. १९:१८.

गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

सारांश *

१-२. आधीच्या लेखात आपण काय शिकलो, आणि या लेखात आपण काय शिकणार आहोत?

आधीच्या लेखात आपल्याला लेवीय पुस्तकातल्या १९ व्या अध्यायातून बऱ्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. उदाहरणार्थ, या अध्यायाच्या तिसऱ्‍या वचनात यहोवाने इस्राएली लोकांना आईवडिलांचा आदर करण्याची आज्ञा दिली होती. या वचनातला सल्ला आज आपण कसा पाळू शकतो यावर आपण चर्चा केली. आपण हे शिकलो की त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करायला आपण त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना भावनिक आधार दिला पाहिजे. आणि त्यांना यहोवाच्या जवळ राहायला मदत केली पाहिजे. याच वचनात इस्राएली लोकांना शब्बाथ पाळण्याची आज्ञासुद्धा देण्यात आली होती. आज आपण शब्बाथ पाळत नसलो तरी त्यामागचं तत्त्व नक्कीच पाळतो, हे आपल्याला शिकायला मिळालं. आध्यात्मिक गोष्टींसाठी नियमितपणे थोडा वेळ बाजूला काढून आपण हे तत्त्व लागू करू शकतो. या सगळ्या गोष्टींवरून आपण हेच दाखवतो, की लेवीय १९:२ आणि १ पेत्र १:१५ मध्ये सांगितल्यानुसार आपण पवित्र व्हायचा आटोकाट प्रयत्न करत आहोत.

आता या लेखामध्ये, आपण लेवीय १९ व्या अध्यायातल्या आणखी काही गोष्टी शिकणार आहोत. आपण हे पाहू, की शारीरिक कमतरता असलेल्यांबद्दल आपल्याला काळजी आहे, हे आपण कसं दाखवू शकतो. व्यवहारात आपण प्रामाणिक कसं राहू शकतो आणि इतरांना प्रेम कसं दाखवू शकतो. आपला देव पवित्र आहे, त्यामुळे आपणही पवित्र असलं पाहिजे. तर चला या अध्यायातून आणखी काय शिकायला मिळतं ते पाहू या.

शारीरिक मर्यादा असलेल्यांसोबत समजूतदारपणे वागा

लेवीय १९:१४ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण बहिऱ्‍या आणि अंध लोकांसोबत कसं वागलं पाहिजे? (परिच्छेद ३-५ पाहा) *

३-४. इस्राएली लोकांनी बहिऱ्‍या आणि अंध व्यक्‍तींसोबत कसं वागायचं होतं? (लेवीय १९:१४)

लेवीय १९:१४ वाचा. यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं, की शारीरिक मर्यादा असलेल्यांसोबत त्यांनी समजूतदारपणे वागावं. उदाहरणार्थ, ‘बहिऱ्‍या माणसाला शाप देऊ नकोस’ असं यहोवाने त्यांना सांगितलं होतं. म्हणजे त्यांनी अशा लोकांना धमकवायचं नव्हतं किंवा त्यांचं काहीतरी वाईट व्हावं असं बोलायचं नव्हतं. आणि खरंच हे किती योग्य होतं! कारण समोरची व्यक्‍ती आपल्याबद्दल काय बोलते हे त्याला समजत नाही आणि त्यामुळे त्याला काही उत्तर देता येत नाही.

पुढे त्याच वचनात असं म्हटलं आहे, की “आंधळ्यापुढे अडथळा ठेवू नकोस.” शारीरिक मर्यादा असणाऱ्‍या लोकांबद्दल एका संदर्भग्रंथात असं म्हटलंय, “प्राचीन काळातल्या मध्यपूर्व भागात अशा लोकांवर खूप जुलूम आणि अत्याचार केले जायचे.” काही जण तर द्वेष भावनेने किंवा विकृत आनंद मिळवण्यासाठी एखाद्या अंध व्यक्‍तीच्या वाटेत, तो पडावा म्हणून काहीतरी ठेवायचे. खरंच हे किती निर्दयीपणाचं होतं! पण यहोवाने नियमशास्त्रात अशी आज्ञा देऊन आपल्या लोकांना दया दाखवायला मदत केली.

५. शारीरिक मर्यादा असलेल्यांशी आपण प्रेमाने कसं वागू शकतो?

येशूनेसुद्धा शारीरिक मर्यादा असलेल्या लोकांना दया दाखवली. बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानला येशूने काय निरोप दिला ते आठवा. त्याने म्हटलं: “आंधळे आपल्या डोळ्यांनी पाहात आहेत. लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी शुद्ध केले जात आहेत. बहिऱ्‍यांना ऐकू येतंय, मेलेल्यांना जिवंत केलं जातंय.” येशूने केलेल्या या चमत्कारांसाठी ‘लोकांनी देवाची स्तुती केली.’ (लूक ७:२०-२२; १८:४३) येशूप्रमाणे आपणसुद्धा शारीरिक मर्यादा असलेल्यांशी दयाळूपणे वागायचा प्रयत्न करतो. आपणही त्यांच्याशी प्रेमाने, समजूतदारपणे आणि धीराने वागतो. हे खरं आहे, की यहोवाने आपल्याला चमत्कार करायची ताकद दिलेली नाही. तरीसुद्धा शारीरिक रितीने आणि आध्यात्मिक रितीने अंध असलेल्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्याचा बहुमान आपल्याला मिळालेला आहे. येणाऱ्‍या सुंदर नवीन जगात ते शारीरिक रितीने कसे पूर्णपणे सुदृढ असतील हा संदेश आपण त्यांना सांगतो. (लूक ४:१८) आणि आनंदाचा हा संदेश ऐकून कित्येक जण यहोवाची स्तुती करत आहेत.

व्यवहारात प्रामाणिकपणे वागा

६. लेवीय १९ अध्यायाच्या काही वचनांमध्ये कोणत्या गोष्टीबद्दल जास्त माहिती मिळते?

यहोवाने इस्राएली लोकांना दिलेल्या दहा आज्ञांमध्ये ज्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या त्यांबद्दल लेवीय पुस्तकाच्या १९ व्या अध्यायाच्या काही वचनांमध्ये आणखी जास्त माहिती देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, आठव्या आज्ञेमध्ये फक्‍त असं म्हटलं होतं: “चोरी करू नका.” (निर्ग. २०:१५) एखादी व्यक्‍ती कदाचित असं म्हणेल की मी जोपर्यंत दुसऱ्‍याच्या मालकीच्या गोष्ट घेत नाही, तोपर्यंत मी ही आज्ञा पाळतो. पण कदाचित दुसऱ्‍या मार्गाने ती व्यक्‍ती चोरी करत असेल.

७. व्यापार करणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीकडून आठवी आज्ञा कशी मोडली जाऊ शकत होती?

एखादा व्यापारी म्हणेल की मी आजपर्यंत कधीच कोणाच्या मालकीची वस्तू घेतलेली नाही. पण तो ज्या प्रकारे व्यवहार करत आहे, त्याबद्दल काय? लेवीय १९:३५, ३६ मध्ये यहोवाने इस्राएली लोकांना म्हटलं होतं: “मोजमाप करण्यासाठी किंवा तोलण्यासाठी तुम्ही चुकीची मापं वापरू नका.” त्याऐवजी त्यांनी अचूक तराजू, अचूक वजनं आणि अचूक प्रमाण वापरायचं होतं. त्यामुळे जो व्यापारी गिऱ्‍हाईकाला फसवण्यासाठी चुकीच्या तराजूचा किंवा वजनांचा वापर करायचा, तो एका अर्थाने चोरीच करत होता. लेवीय १९ अध्यायात पुढे जे म्हटलं आहे, त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते.

लेवीय १९:११-१३ मध्ये सांगितल्याप्रमाणे व्यवसाय करणाऱ्‍या एका ख्रिस्ती व्यक्‍तीने कोणते प्रश्‍न स्वतःला विचारले पाहिजेत? (परिच्छेद ८-१० पाहा) *

८. लेवीय १९:११-१३ मध्ये आठव्या आज्ञेबद्दल जास्त माहिती कशी मिळते, आणि आपण त्यातून काय शिकू शकतो?

लेवीय १९:११-१३ वाचा. लेवीय १९:११ मध्ये सुरुवातीला असं म्हटलं आहे: “तुम्ही चोरी करू नका.” आणि १३ व्या वचनात या गोष्टीचा संबंध बेईमानीने केलेल्या व्यवहाराशी लावला आहे. तिथे म्हटलं आहे: “तू दुसऱ्‍याशी अप्रामाणिकपणे वागू नकोस.” तर अप्रामाणिकपणे केलेल्या व्यवहाराचा संबंध चोरी आणि लुबाडणूक यांच्याशी केला आहे. आठव्या आज्ञेत फक्‍त इतकंच म्हटलं होतं, की “चोरी करू नका.” पण लेवीय पुस्तकात जी माहिती दिली आहे, त्यामुळे या आज्ञेमागचं तत्त्व समजून घ्यायला इस्राएली लोकांना मदत झाली. आज आपणसुद्धा या गोष्टींवर विचार करून बेईमानी करण्याबद्दल आणि चोरी करण्याबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे ते समजून घेऊ शकतो. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘लेवीय १९:११-१३ मध्ये जे म्हटलं आहे त्यानुसार मी माझी नोकरी आणि व्यवसाय प्रामाणिकपणे करतो का? माझ्या व्यवहारांमध्ये आणि कामाच्या सवयींमध्ये मला बदल करायची गरज आहे का?’

९. लेवीय १९:१३ मध्ये मजुरीबद्दल काय सांगितलं होतं, आणि का?

व्यवसाय करणाऱ्‍या एका ख्रिस्ती व्यक्‍तीने प्रामाणिकपणाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. लेवीय १९:१३ मध्ये शेवटी असं म्हटलं आहे: “तू मजुराची मजुरी रात्रभर, दुसरा दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नकोस.” प्राचीन इस्राएल राष्ट्रात बहुतेक लोक शेती करायचे. आणि शेतात काम करणाऱ्‍या मजुरांना दिवसाच्या शेवटी त्यांची मजुरी दिली जायची. आणि जर त्याला त्याची मजुरी दिली नाही, तर त्याचं कुटुंब त्या दिवशी उपाशी राहायचं. म्हणून यहोवाने असं स्पष्ट केलं होतं, की ‘मजूर गरीब आहे आणि त्याच्या मजुरीवरच त्याचं जीवन चालतं.’—अनु. २४:१४, १५; मत्त. २०:८.

१०. लेवीय १९:१३ मधून आपण काय शिकतो?

१० सहसा नोकरी करणाऱ्‍या लोकांना दररोज नाही तर महिन्याच्या शेवटी पगार मिळतो. पण तरी लेवीय १९:१३ मधलं तत्त्व आजही तितकंच लागू होतं. आज काही जण त्यांच्याकडे काम करणाऱ्‍या लोकांना अपेक्षेपेक्षाही खूप कमी पगार देतात. कारण त्यांना माहीत असतं, की या लोकांना आहे त्या पगारात काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे एका अर्थाने ते मजुराची मजुरी आपल्याकडे अडवून ठेवत असतात. त्यामुळे ज्या ख्रिस्ती व्यक्‍तीचा व्यवसाय आहे आणि ज्याच्याकडे लोक नोकरी करतात, त्याने या गोष्टीकडे खासकरून लक्ष दिलं पाहिजे. त्याने आपल्याकडे नोकरी करणाऱ्‍या लोकांना योग्य तो पगार दिला पाहिजे. आता लेवीय १९ व्या अध्यायात आणखी काय शिकायला मिळतं ते पाहू या.

आपल्या सोबत्यावर स्वतःसारखं प्रेम करा

११-१२. लेवीय १९:१७, १८ या वचनांतले शब्द वापरून येशूने कोणत्या गोष्टीवर भर दिला?

११ आपण इतरांचं वाईट करू नये अशी देव आपल्याकडून अपेक्षा करतो. पण देव आपल्याकडून इतकीच अपेक्षा करत नाही. लेवीय १९:१७, १८ (वाचा.) मधून ही गोष्ट आपल्याला स्पष्ट होते. या वचनात अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे: “आपल्या सोबत्यावर स्वतःसारखं प्रेम कर.” आपल्याला जर यहोवाचं मन आनंदित करायचं असेल, तर आपल्याला या आज्ञेप्रमाणे करणं महत्त्वाचं आहे.

१२ लेवीय १९:१८ मध्ये जी आज्ञा देण्यात आली आहे, त्यावर येशूनेसुद्धा कसा भर दिला ते पाहा. एकदा एका परूशी व्यक्‍तीने येशूला विचारलं: “नियमशास्त्रातली सगळ्यात महत्त्वाची आज्ञा कोणती?” तेव्हा येशूने त्याला म्हटलं, की सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची आज्ञा ही की ‘तू आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर.’ मग येशूने लेवीय १९:१८ मधले शब्द वापरून असं म्हटलं: “तिच्यासारखी दुसरी आज्ञा ही आहे: ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखं प्रेम कर.’” (मत्त. २२:३५-४०) आपण वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना प्रेम दाखवू शकतो. पण या बाबतीत लेवीय १९ अध्यायामध्ये आणखी माहिती मिळते.

१३. लेवीय १९:१८ मध्ये सांगितलेली गोष्ट योसेफच्या उदाहरणातून कशी स्पष्ट होते?

१३ इतरांवर प्रेम करायचा एक मार्ग म्हणजे लेवीय १९:१८ मध्ये दिलेला सल्ला लागू करणं. तिथे म्हटलं आहे: “तू बदला घेऊ नकोस किंवा आपल्या भाऊबंदांबद्दल मनात राग बाळगू नकोस.” तुम्ही पाहिलंच असेल, की कामावरच्या ठिकाणी किंवा शाळेमध्ये, नातेवाइकांमध्ये किंवा कुटुंबामध्ये काही जण वर्षानुवर्षं मनात राग बाळगून असतात. योसेफच्या भावांच्या मनातसुद्धा अशाच प्रकारचा राग होता. आणि या द्वेषामुळेच पुढे जाऊन ते त्याच्याशी खूप वाईट वागले. (उत्प. ३७:२-८, २५-२८) पण योसेफ त्यांच्याशी तसं वागला नाही. पुढे जेव्हा त्याला मोठा अधिकार मिळाला तेव्हा तो त्यांचा बदला घेऊ शकत होता. पण त्याने दया दाखवली. त्यांच्याबद्दल त्याने मनात राग धरला नाही. उलट, लेवीय १९:१८ मध्ये दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो वागला.—उत्प. ५०:१९-२१.

१४. लेवीय १९:१८ मधलं तत्त्व आजसुद्धा तितकंच लागू होतं, असं का म्हणता येईल?

१४ योसेफने आपल्या भावांबद्दल मनात राग धरला नाही किंवा बदला घेतला नाही. आणि असं करून त्याने आपल्यासाठी खूप चांगलं उदाहरण मांडलं. येशूने आपल्याला जी प्रार्थना शिकवली त्यात त्यानेसुद्धा हीच गोष्ट सांगितली. त्याने एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करायला सांगितलं. (मत्त. ६:९, १२) प्रेषित पौलनेसुद्धा ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “प्रिय बांधवांनो, सूड घेऊ नका.” (रोम. १२:१९) त्याने त्यांना असाही सल्ला दिला, की “कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तरी एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” (कलस्सै. ३:१३) यहोवाची तत्त्वं कधीच बदलत नाहीत. लेवीय १९:१८ मधलं तत्त्व आजसुद्धा तितकंच लागू होतं.

जखमेला सारखंसारखं हात लावल्यामुळे जखम चिघळते. त्याचप्रमाणे आपण आपलं मन दुखावणाऱ्‍या व्यक्‍तीचा किंवा गोष्टीचा सतत विचार करत बसलो तर आपल्यालाच त्रास होईल. त्यामुळे आपण ते विसरून जायचा प्रयत्न केला पाहिजे (परिच्छेद १५ पाहा) *

१५. इतरांना माफ करणं का चांगलं आहे हे उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१५ हे तत्त्व आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण दुखावलेल्या भावनांची तुलना जखमेसोबत करू शकतो. काही जखमा एकदम किरकोळ असतात, तर काही खोल असतात. उदाहरणार्थ, भाजी चिरताना कधीकधी आपलं बोट थोडंसं कापतं. आपल्याला ते दुखत असतं, पण एकदोन दिवसांत जखम लगेच भरून येते. आणि ती कुठे होती हेही आपल्याला कळत नाही. कधीकधी मनावरच्या जखमासुद्धा अशाच किरकोळ असतात. उदाहरणार्थ, काही वेळा आपल्या जवळची व्यक्‍ती असं काहीतरी करते किंवा बोलून जाते जे आपल्या मनाला लागतं. पण आपण ते जास्त मनाला लावून घेत नाही. पण कधीकधी शरीरावर झालेली एखादी जखम खूप खोल असते. त्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जाऊन टाके घालावे लागतात आणि बॅन्डेज लावावं लागतं. पण आपण जर ते बॅन्डेज काढून जखमेला सारखंसारखं हात लावत राहिलो तर ती जखम आणखी चिघळते. मनावर झालेल्या जखमेच्या बाबतीतसुद्धा असंच होऊ शकतं. एखाद्याने आपलं मन कदाचित खूप दुखावलं असेल. पण आपण जर त्याच गोष्टीचा सतत विचार करत बसलो आणि त्या व्यक्‍तीबद्दल मनात राग धरला, तर आपल्यालाच त्रास होऊ शकतो. त्याऐवजी लेवीय १९:१८ मधला सल्ला पाळणं किती चांगलं आहे!

१६. लेवीय १९:३३, ३४ मध्ये सांगितल्याप्रमाणे इस्राएली लोकांना विदेश्‍यांबद्दल काय सांगण्यात आलं होतं, आणि आपण त्यातून काय शिकू शकतो?

१६ यहोवाने जेव्हा इस्राएली लोकांना सांगितलं होतं, की तुम्ही आपल्या सोबत्यावर प्रेम करा तेव्हा त्यांना फक्‍त आपल्या देशातल्या किंवा वंशातल्या लोकांवर प्रेम करायचं नव्हतं. तर त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेशी लोकांवरही त्यांना प्रेम करायचं होतं. लेवीय १९:३३, ३४ (वाचा.) मध्ये ही गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगितली आहे. एखाद्या विदेश्‍याला त्यांनी स्वतःच्या देशाच्या रहिवाशासारखं वागवायचं होतं आणि त्याच्यावर स्वतःसारखंच प्रेम करायचं होतं. उदाहरणार्थ, इस्राएली लोकांनी गरिबांना आणि विदेश्‍यांना आपल्या शेतातलं उरलेलं पीक गोळा करू द्यायचं होतं. (लेवी. १९:९, १०) विदेश्‍यांवर प्रेम करायचा हा सल्ला आज आपल्यालाही लागू होतो. (लूक १०:३०-३७) आज लाखो लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये राहत आहेत. त्यांच्यापैकी काही जण आपल्या जवळपाससुद्धा राहत असतील. अशा लोकांसोबत आपण प्रेमाने आणि आदराने वागणं खूप महत्त्वाचं आहे.

सगळ्यात महत्त्वाचं काम

१७-१८. (क) लेवीय १९:२ आणि १ पेत्र १:१५ मधून आपण काय शिकतो? (ख) प्रेषित पेत्रने आपल्याला कोणतं महत्त्वाचं काम करायचं प्रोत्साहन दिलं आहे?

१७ लेवीय १९:२ आणि १ पेत्र १:१५ ही वचनं आपल्याला पवित्र राहण्याचं प्रोत्साहन देतात. आपण लेवीय १९ व्या अध्यायातल्या काही वचनांचं परीक्षण केलं आणि त्यातून यहोवाला खूश करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि टाळल्या पाहिजेत ते पाहिलं. या अध्यायात आणखी बरीच अशी वचनं आहेत ज्यांतून आपल्याला खूप काही शिकता येईल. * तसंच, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतूनसुद्धा ही गोष्ट कळते, की आपण या तत्त्वांचं पालन आजही केलं पाहिजे. पण त्यासोबतच प्रेषित पेत्रने आणखी एक गोष्ट सांगितली.

१८ यहोवाची सेवा करण्यात आणि इतरांची सेवा करण्यात आपण बरंच काही करत असू. पण पेत्रने एका गोष्टीवर खास भर दिला. पवित्र राहण्याबद्दल प्रोत्साहन देत असताना त्याने असं म्हटलं: “तुम्ही उत्साहाने काम करण्यासाठी आपलं मन सज्ज करा.” (१ पेत्र १:१३, १५) मग या कामात कोणत्या गोष्टी येतात? पेत्रने म्हटलं, की ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांनी ‘त्याच्या महान गुणांची संपूर्ण जगात घोषणा करावी.’ (१ पेत्र २:९) या कामात आज आपण त्यांना मदत करत आहोत. आपण प्रचाराचं आणि शिकवण्याचं हे काम नियमितपणे आणि आवेशाने करत राहतो. (मार्क १३:१०) खरंच, या कामात सहभाग घेण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! लेवीय १९ अध्यायातली ही तत्त्वं आपण मनापासून पाळतो तेव्हा आपण दाखवतो, की यहोवावर आणि आपल्या शेजाऱ्‍यावर आपलं प्रेम आहे. तसंच, आपण दाखवतो, की “आपल्या सर्व वागणुकीत” आपल्याला ‘पवित्र व्हायची’ इच्छा आहे.

गीत २८ नवे गीत

^ परि. 5 आज आपण मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही. त्यामुळे ते आपल्याला पाळायची गरज नाही. पण त्यामध्ये अशा बऱ्‍याच गोष्टींबद्दल सांगितलं आहे, ज्या आपण केल्या पाहिजेत किंवा टाळल्या पाहिजेत. त्या कोणत्या आहेत हे जाणून घेतल्यामुळे आपल्याला इतरांवर प्रेम करता येईल आणि देवाचं मन आनंदित करता येईल. या लेखात आपण लेवीय १९ अध्यायातून आणखी काही गोष्टी शिकणार आहोत.

^ परि. 17 लेवीय १९ व्या अध्यायतल्या इतर वचनांमध्ये पक्षपात करण्याबद्दल, इतरांची बदनामी करण्याबद्दल, रक्‍ताचं सेवन करण्याबद्दल, तसंच भूतविद्या व ज्योतिषविद्येबद्दल आणि अनैतिक लैंगिक कृत्याबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे, हे सांगितलं आहे.—लेवी. १९:१५, १६, २६-२९, ३१.—याच अंकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.

^ परि. 52 चित्रांचं वर्णन: एक साक्षीदार भाऊ, एका मूकबधीर भावाला डॉक्टरांशी बोलायला मदत करत आहे.

^ परि. 54 चित्रांचं वर्णन: पेंटींगचा व्यवसाय करणारा एक बांधव आपल्याकडे काम करणाऱ्‍या माणसाला त्याची मजुरी देत आहे.

^ परि. 56 चित्रांचं वर्णन: एक बहीण तिच्या बोटाला झालेली किरकोळ जखम लगेच विसरून जाईल. पण तितक्याच सहजपणे ती मोठी जखमही विसरून जाईल का?