वाचकांचे प्रश्न
कोणाच्याही “जिवावर उठू नकोस,” या लेवीय १९:१६ मधल्या आज्ञेचा काय अर्थ होतो? आणि त्यातून आपण काय शिकू शकतो?
यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं, की “तुम्ही पवित्र असलं पाहिजे.” त्यासाठी तो त्यांना म्हणाला: “तू आपल्या लोकांमध्ये कोणाची बदनामी करत फिरू नकोस. तू आपल्या शेजाऱ्याच्या जिवावर उठू नकोस. मी यहोवा आहे.”—लेवी. १९:२, १६.
या वचनात, ‘जिवावर उठणं’ असं जे म्हटलं आहे त्यातून मूळ हिब्रू भाषेतल्या वाक्यप्रचाराचा अर्थ चांगल्या प्रकारे व्यक्त होतो. पण मुळात त्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय असावा? बायबलमधल्या लेवीय पुस्तकाबद्दल असलेल्या एका यहुदी संदर्भग्रंथात असं म्हटलं आहे: ‘मूळ हिब्रू भाषेतल्या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ काय होता हे सांगता येत नसल्यामुळे वचनातल्या या भागाचा अर्थ समजणं कठीण आहे.’
काही विद्वान, या वाक्यप्रचाराचा संबंध आधीच्या वचनाशी लावतात. त्यात म्हटलं आहे: “न्यायनिवाडा करताना अन्याय करू नका. फक्त गरीब आहे म्हणून एखाद्याला दया दाखवू नका आणि श्रीमंताचा पक्ष घेऊ नका. तर आपल्या शेजाऱ्याचा न्यायनिवाडा करताना न्यायाने वागा.” (लेवी. १९:५) जर तसं असेल, तर १६ व्या वचनात, एखाद्याच्या “जिवावर उठू नकोस,” अशी जी आज्ञा दिली आहे तिचा अर्थ असा होऊ शकतो, की देवाच्या लोकांनी व्यवसायाच्या किंवा कौटुंबिक गोष्टींच्या बाबतींत आणि कोर्टकचेरीच्या प्रकरणात कोणालाही फसवू नये. आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी कोणाचीही फसवणूक करू नये. आणि हे बरोबरच आहे. पण १६ व्या वचनातल्या या वाक्यप्रचाराचा अर्थ आणखी चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ शकतो.
या वचनाचा सुरुवातीचा भाग जर वाचला, तर तिथे म्हटलं आहे, की “तू आपल्या लोकांमध्ये कोणाची बदनामी करत फिरू नकोस.” हे खरं आहे, की एखाद्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल बोलल्यामुळेसुद्धा कधीकधी समस्या निर्माण होऊ शकतात. पण एखाद्याची बदनामी करण्याचे परिणाम त्याहूनही गंभीर असू शकतात. (नीति. १०:१९; उप. १०:१२-१४; १ तीम. ५:११-१५; याको. ३:६) बदनामी करणारा सहसा एखाद्या व्यक्तीचं नाव खराब करण्यासाठी मुद्दाम तिच्याविषयी खोट्या गोष्टी बोलतो. तिच्याबद्दल खोटी साक्ष द्यायलाही तो तयार असतो; मग त्यामुळे त्या व्यक्तीचं काही बरंवाईट होणार असेल, तरीही त्याला पर्वा नसते. नाबोथच्या बाबतीत असंच घडलं. त्याची बदनामी करण्यासाठी दोन माणसांनी खोटी साक्षी दिली आणि त्यामुळे नाबोथला दगडमार करून ठार मारण्यात आलं. (१ राजे २१:८-१३) थोडक्यात, लेवीय १९:१६ या वचनातल्या शेवटच्या भागात सांगितल्याप्रमाणे, बदनामी करणारा अशा प्रकारे एखाद्याच्या जिवावर उठू शकतो.
याशिवाय, बदनामी करणाऱ्याच्या मनात त्या व्यक्तीबद्दल किती द्वेष आहे हेसुद्धा दिसून येतं. १ योहान ३:१५ मध्ये म्हटलं आहे: “जो कोणी आपल्या बांधवाचा द्वेष करतो तो खुनी आहे आणि तुम्हाला माहीत आहे की खुनी असलेल्या कोणत्याही माणसात सर्वकाळाचं जीवन राहत नाही.” इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, एखाद्याच्या ‘जिवावर उठू नकोस’ असं म्हटल्यानंतर पुढच्याच वचनात यहोवा असं म्हणतो: “आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष करू नकोस.”—लेवी. १९:१७.
म्हणून लेवीय १९:१६ मध्ये जी आज्ञा देण्यात आली आहे त्यातून ख्रिश्चनांना खूप महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. आपण कोणाबद्दलही मनात वाईट विचार करू नये आणि त्याची बदनामीही करू नये. थोडक्यात, आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नसल्यामुळे, किंवा तिच्याबद्दल आपल्याला ईर्ष्या वाटत असल्यामुळे जर आपण तिची बदनामी केली, तर त्यावरून हेच दिसून येईल की आपण तिचा द्वेष करतो. ख्रिश्चनांनी कधीच कोणाचा द्वेष करू नये.—मत्त. १२:३६, ३७.