व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | घरात शांती कशी टिकवाल?

घरातील शांती तुम्ही कशी टिकवून ठेवू शकता?

घरातील शांती तुम्ही कशी टिकवून ठेवू शकता?

घरातील शांती टिकवून ठेवायला बायबलमध्ये काही व्यावहारिक मदत दिली आहे का? काही लोकांची मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्यांना बायबलमधील कोणते सल्ले फायदेशीर ठरले हे त्यांनी सांगितलं. तुमच्या कुटुंबात वाद टाळण्यासाठी, शांती टिकवून ठेवण्यासाठी आणि नातेसंबंध कायम मजबूत ठेवण्यासाठी कोणते मुद्दे उपयोगी पडतील ते पाहा.

शांती टिकवून ठेवायला मदत करणारी बायबल तत्त्वं

एकमेकांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगा.

“तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना; तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पाहा.”फिलिप्पैकर २:३, ४.

“आपल्या जोडीदाराला आपल्यापेक्षा आणि इतरांपेक्षा महत्त्वाचं समजणं चांगलं आहे हे आम्ही शिकलो.”—लग्न होऊन १९ वर्षं झालेली एक पत्नी.

कुठलाही पूर्वग्रह न ठेवता जोडीदाराचं बोलणं लक्ष देऊन ऐका.

“भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे.”तीत ३:१, २.

“जोडीदाराशी भांडण्याच्या सुरात बोलण्याचं टाळलं तर घरातील बराच तणाव कमी होऊ शकतो. आपल्याला त्याचं मत पटत नसलं तरी त्याचं बोलणं समंजसपणे ऐकून घेणं महत्त्वाचं आहे.”—लग्न होऊन २० वर्षं झालेली एक पत्नी.

सहनशीलता आणि सौम्यता दाखवायला शिका.

“बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ [सौम्य बोलणं] हाड फोडते.”नीतिसूत्रे २५:१५.

“वाद तर नेहमीच होत राहतील, पण त्याचे परिणाम चांगले होतील की वाईट हे आपल्या मनोवृत्तीवरून ठरेल. आपण सहनशीलतेनं वागणं खरंच जरूरी आहे कारण असं केल्यानं वाद मिटतात.”—लग्न होऊन २७ वर्षं झालेली एक पत्नी.

शिवीगाळ करण्याच्या किंवा एकमेकांना मारण्याच्या थरापर्यंत जाऊ नका.

“क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा.”कलस्सैकर ३:८.

“माझा नवरा स्वतःवर ताबा ठेवतो याचं मला कौतुक वाटतं. तो माझ्यावर कधीच ओरडत नाही, अपमान करत नाही, आणि माझ्याशी धीरानं वागतो.”—लग्न होऊन २० वर्षं झालेली एक पत्नी.

लगेच वाद मिटवा आणि क्षमा करायला तत्पर राहा.

“एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा.”कलस्सैकर ३:१३.

“आपण तणावात असतो तेव्हा नेहमी शांत राहणं तितकं सोपं नसतं, आणि कधीकधी आपण आपल्या जोडीदाराला दुखावतील अशा गोष्टी बोलतो किंवा करतो. अशावेळी क्षमा करणं खरंच महत्त्वाचं आहे. यशस्वी विवाहासाठी एकमेकांना क्षमा करणं गरजेचं आहे.”—लग्न होऊन ३४ वर्षं झालेली एक पत्नी.

निस्वार्थपणे एकमेकांसाठी छोट्यामोठ्या गोष्टी करण्याची सवय लावा.

“द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल; . . . कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.”लूक ६:३८.

“मला कुठल्या गोष्टींनी आनंद होतो हे माझ्या पतीला चांगलं माहीत आहे, त्याच्या वागण्या बोलण्यातनं तो मला नेहमी आश्चर्याचे सुखद धक्के देत असतो. मीदेखील सतत हाच विचार करते, की मी त्याला कशी खुष ठेवू शकते. यामुळं आम्ही नेहमी आनंदी होतो, आजही आहोत.”—लग्न होऊन ४४ वर्षं झालेली एक पत्नी.

आपल्या घरात शांती टिकवण्याचा प्रयत्न करणं कधीच सोडू नका

या सावध राहा! नियतकालिकात ज्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या ते जगभरातील अशा लाखो लोकांपैकी आहेत, ज्यांना बायबलमुळं घरातील शांती टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ते गुण वाढवायला मदत मिळाली. * कुटुंबातील काही सदस्य सहकार्य देत नसले तरीही घरात शांती टिकवण्याचा तुमचा प्रयत्न व्यर्थ जाणार नाही. कारण बायबलमध्ये हे वचन दिलं आहे: “जे लोक शांततेसाठी काम करतात ते आनंदी असतात.”—नीतिसूत्रे १२:२०, इझी-टू-रीड व्हर्शन. (g15-E 12)

^ परि. 24 आपलं कौटुंबिक जीवन सुखी कसं होऊ शकतं याबद्दल अधिक माहितीसाठी, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील १४ वा अध्याय पाहा. हे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलं आहे आणि www.pr418.com/mr वरही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी BIBLE TEACHINGS > HELP FOR THE FAMILY या टॅबखाली पाहा.