व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आव्हानांवर मात देणारं सरकार

“त्याच्या . . . शांतीला अंत नसणार”

“त्याच्या . . . शांतीला अंत नसणार”

संयुक्‍त राष्ट्र संघ जगातल्या सर्व लोकांना प्रोत्साहन देतं आहे की सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावं, मानवी हक्कांचा आदर करावा, आणि पर्यावरणाची काळजी घ्यावी. यू एन क्रॉनिकल  या मासिकात मेहर नासेर यांनी यामागचं कारण दिलं आहे. त्यांनी म्हटलं: “बदलतं वातावरण, गुन्हेगारी, वाढती असमानता, न सोडवलेले वाद, मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेले लोक, जगभरात पसरलेला आतंकवाद, संसर्गजन्य रोग यांसारख्या गोष्टींचा परिणाम प्रत्येक देशातल्या लोकांवर होत आहे.”

एक जागतिक सरकार असावं असं इतर काहींचं मत होतं. त्यात इटलीतला कवी, तत्त्वज्ञानी आणि राजकारणी डान्टे (इ.स. १२६५-१३२१) आणि भौतिकशास्त्रज्ञ ॲल्बर्ट आइन्स्टाइन (इ.स. १८७९-१९५५) हे होते. डान्टेचा विश्‍वास होता की राजकीय रीत्या विभाजित असलेल्या जगात शांती येऊ शकत नाही. त्याने येशूच्या शब्दांचा उल्लेख करून म्हटलं: “ज्या राज्यात फूट पडते ते राज्य नष्ट होतं.”​—लूक ११:१७.

दुसऱ्‍या विश्‍वयुद्धात दोन अणू बॉम्बचा वापर केला गेला. याच्या काही काळानंतर, ॲल्बर्ट आइन्स्टाइनने संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंबलीला उद्देशून वृत्तपत्रात एक पत्र प्रकाशित केलं. त्याने म्हटलं: “संपूर्ण जगात सुरक्षा आणण्यासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टी करा. जागतिक सरकार स्थापित करण्यासाठी मजबूत पाया घाला.”

पण या शक्‍तिशाली सरकारचे भाग असलेले राजनैतिक नेते, भ्रष्ट आणि जुलूम करणारे नसतील किंवा अधिकार चालवण्याच्या लायकीचे असतील अशी खात्री आपण बाळगू शकतो का, की ते इतर दुष्ट शासकांप्रमाणेच असतील? या प्रश्‍नांवर विचार करताना ब्रिटिश इतिहासकार लॉर्ड ॲक्टन यांचे शब्द आठवतात. त्यांनी म्हटलं: “सत्ता हाती आली की नीती भ्रष्ट होते आणि संपूर्ण सत्ता हाती आली की नीती संपूर्णपणे भ्रष्ट होते.”

मानवांना खरी शांती अनुभवायची असेल तर त्यांच्यात एकता असणं गरजेचं आहे. पण हे कसं शक्य आहे? असं खरंच होऊ शकतं का? बायबल सांगतं की असं होऊ शकतं. पण कसं? भ्रष्ट राजनैतिक नेत्यांनी मिळून बनलेल्या सरकारांद्वारे नव्हे तर देवाने स्थापित केलेल्या सरकाराद्वारे असं होऊ शकतं. या सरकारद्वारे दिसून येईल की सर्व सृष्टीवर फक्‍त देवाचा अधिकार आहे. पण हे कोणतं सरकार आहे? बायबल याला ‘देवाचं राज्य’ असं म्हणतं.​—लूक ४:४३.

“तुझं राज्य येवो”

येशूने आपल्या शिष्यांना देवाच्या राज्याविषयी प्रार्थना शिकवली. त्याने म्हटलं: “तुझं राज्य येवो. तुझी इच्छा . . . पृथ्वीवरही होवो.” (मत्तय ६:९, १०) देवाचं राज्य पृथ्वीवर देवाची इच्छा  पूर्ण होण्याची खात्री करेल आणि यामुळे जे स्वार्थी आहेत आणि अधिकार मिळवण्याच्या मागे लागतात अशांना काहीच स्थान नसेल.

देवाच्या राज्याला “स्वर्गाचं राज्य” सुद्धा म्हटलं आहे. (मत्तय ५:३) हे सरकार पृथ्वीवर  राज्य करेल पण ते पृथ्वीवरून  नव्हे तर स्वर्गातून तसं करेल. जरा विचार करा की हे सरकार कसं असेल. या जागतिक सरकारला पैसे किंवा कर यांसारख्या गोष्टींची गरज नसेल. खरंच, पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांसाठी ही किती मोठी सुटका असेल!

“राज्य” हा शब्द सुचवतो की देवाचं राज्य एक बादशाही  सरकार आहे. या राज्याचा राजा येशू ख्रिस्त आहे आणि यहोवाने त्याला नियुक्‍त केलं आहे. येशूबद्दल बायबल सांगतं:

  • “त्याच्या खांद्यावर सत्ता राहील . . . त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.”​—यशया ९:६, ७.

  • “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली . . . त्याचे राज्य अविनाशी आहे.”​—दानीएल ७:१४.

  • “जगाचं राज्य आता आपल्या प्रभूचं [देवाचं] व त्याच्या ख्रिस्ताचं झालं आहे.”​—प्रकटीकरण ११:१५

येशूने शिकवलेल्या प्रार्थनेची पूर्णता होईल आणि देवाचं राज्य या पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण करेल. या सरकारच्या अधीन असलेल्या लोकांना पृथ्वीची काळजी घेण्यासाठी शिकवलं जाईल. यामुळे पृथ्वीला पुन्हा एकदा चांगल्या परिस्थितीत आणलं जाईल आणि ती फलदायी होईल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देवाच्या राज्याद्वारे पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांसाठी एक शैक्षणिक कार्यक्रम चालवला जाईल. सर्वांना एकाच प्रकारच्या स्तरांबद्दल शिकवलं जाईल. तिथे कोणताही वाद किंवा विभाजन नसेल. तिथे लोक “नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल,” असं यशया ११:९ या वचनात सांगितलं आहे.

पृथ्वीवर सगळीकडे लोक एकतेने आणि शांतीने राहतील. अशाच प्रकारचं जग संयुक्‍त राष्ट्र संघाला आणायचं होतं. स्तोत्र ३७:११ या वचनात म्हटलं आहे की “ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” थोड्याच काळानंतर “गुन्हे,” “प्रदूषण,” “गरीबी” आणि “युद्ध” यांसारखे शब्द आपल्या बोलण्यातून नाहीसे होतील. पण हे कधी होईल? आणि देवाचं राज्य पृथ्वीचा ताबा कधी घेईल? ते हे कशा प्रकारे घडवून आणेल? आणि तुम्हाला या राज्य शासनाचा फायदा कसा होऊ शकतो? या सर्व प्रश्‍नांवर आता आपण चर्चा करू या.