व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पालक आपल्या मुलांना स्वतःच्या उदाहरणातून प्रेम करायला शिकवतात

आव्हानावर मात करण्याचा एक मार्ग

नैतिक शिक्षण

नैतिक शिक्षण

शाळेच्या सहलीला जात असताना काही तरुण मुलांनी त्यांच्यातल्या एका मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला. ते सगळे मुलं कॅनडातल्या एका प्रतिष्ठित शाळेतले होते. या घटनेनंतर, ओटावा सिटिझन  या बातमीपत्रात लेनर्ड स्टर्न यांनी असं म्हटलं:”हुशार असणं, चांगलं शिक्षण घेणं, श्रीमंत असणं या गोष्टी मुलांना वाईट वागण्यापासून थांबवू शकत नाही.”

स्टर्न यांनी पुढे म्हटलं: “पालकांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्यांनी आपल्या मुलांना चांगलं आणि वाईट याबद्दल शिकवावं अशी अपेक्षा सहसा तुम्ही कराल.” पण वास्तविकतेत, बऱ्‍याच पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणजे त्यांना चांगली नोकरी मिळेल आणि ते भरपूर पैसे कमवू शकतील.”

हे खरं आहे की शालेय शिक्षण गरजेचं आहे. पण सर्वात उत्तम दर्जाचं शालेय शिक्षणसुद्धा मुलांना वाईट विचार करण्यापासून किंवा चुकीच्या इच्छांपासून रोखू शकत नाही. तर, एक चांगली व्यक्‍ती बनण्यासाठी आपल्याला उच्च नैतिक शिक्षण कुठून मिळू शकतं?

नीतिमूल्यांबद्दल आणि देवाबद्दल मार्गदर्शन देणारं शिक्षण

बायबल हे आरशासारखं आहे. आपण त्यात बघतो तेव्हा आपल्याला आपल्या कमतरता आणि मर्यादा अगदी स्पष्टपणे दिसून येतात. (याकोब १:२३-२५) पण बायबलमुळे आणखी मदत होते. ते आपल्या जीवनात बदल करण्यासाठी मदत करू शकतं. तसंच चांगले गुण विकसित करण्यासाठी मदत करू शकतं त्यामुळे आपण शांती आणि एकतेने राहू शकतो. ते गुण म्हणजे चांगुलपणा, दयाळूपणा, सहनशीलता, आत्मसंयम आणि प्रेम. प्रेम याला “ऐक्याचे परिपूर्ण बंधन” असं म्हटलं आहे. (कलस्सैकर ३:१४) पण प्रेम एवढं खास का आहे? बायबल या गुणाबद्दल काय सांगतं याकडे लक्ष द्या.

  • “प्रेम सहनशील आणि दयाळू असते. प्रेम हेवा करत नाही, बढाई मारत नाही, गर्वाने फुगत नाही; प्रेम असभ्यपणे वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, लगेच चिडत नाही, आपल्याविरुद्ध केलेल्या चुकांचा हिशोब ठेवत नाही. ते अनीतीमुळे [वाइटामुळे] आनंदित होत नाही, तर सत्यामुळे आनंदित होते. प्रेम सर्वकाही सहन करते, . . . ,सर्व बाबतींत धीर धरते. प्रेम कधीही नाहीसे होत नाही.”​—१ करिंथकर १३:४-८.

  • “प्रेम आपल्या शेजाऱ्‍याचे वाईट करत नाही.”​—रोमकर १३:१०.

  • “पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा, कारण प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकते.”​—१ पेत्र ४:८.

तुमच्यावर प्रेम करणाऱ्‍या लोकांसोबत तुम्ही असता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला नक्कीच सुरक्षित आणि निश्‍चिंत वाटत असेल. कारण तुम्हाला माहीत आहे की त्यांना तुमच्या भल्याची काळजी आहे आणि ते तुम्हाला कधीच जाणूनबुजून नुकसान पोहोचवणार नाहीत.

प्रेम आपल्याला इतरांच्या फायद्यासाठी त्याग करायला आणि आपल्या जीवनशैलीत बदल करायला प्रवृत्त करतं. उदाहरणार्थ, एका व्यक्‍तीला (आपण त्यांना जॉर्ज म्हणू) त्यांच्या नातवासोबत वेळ घालवण्याची खूप इच्छा होती. पण एक समस्या होती. त्यांना सिगरेट ओढण्याची सवय होती आणि त्यांनी त्यांच्या नातवाजवळ असताना सिगरेट ओढू नये अशी त्यांच्या जावयाची इच्छा होती. तर मग, जॉर्ज यांनी काय केलं? ५० वर्षांपासून सिगरेट ओढण्याची सवय असूनसुद्धा जॉर्ज यांनी आपल्या नातवासाठी ती सवय सोडली. खरंच, प्रेमामध्ये खूप शक्‍ती असते.

बायबल आपल्याला चांगुलपणा, दयाळूपणा आणि खासकरून प्रेम यांसारखे चांगले गुण विकसित करायला मदत करतं

प्रेम हा एक असा गुण आहे जो आपल्याला विकसित करावा लागतो. मुलांना प्रेम करायला शिकवण्यात आईवडिलांचा मोठा वाटा असतो. पालक आपल्या मुलांचं संगोपन करतात, त्यांचं संरक्षण करतात आणि मुलं समस्येत असल्यास किंवा आजारी असल्यास ते त्यांची काळजी घेतात. विचारशील पालक आपल्या मुलांसोबत चर्चा करतात आणि त्यांना शिकवतात. तसंच, ते त्यांच्या मुलांना शिस्त लावतात आणि चांगलं व वाईट याबद्दल त्यांना योग्य मार्गदर्शन देतात. यासोबतच, सुज्ञ पालक आपल्या मुलांसमोर एक चांगलं उदाहरण ठेवून त्यांचे आदर्श बनतात.

पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही पालक या सर्व जबाबदाऱ्‍या पूर्ण करत नाहीत. याचा अर्थ असा होतो का की त्यांची मुलं कधीच एक चांगली व्यक्‍ती बनू शकत नाहीत? मुळीच नाही! कारण बरेच लोक समस्या असलेल्या कुटुंबांमध्ये लहानाचे मोठे झाले असूनही, त्यांनी पुढे आपल्या जीवनात मोठमोठे बदल केले. ते प्रेमळ आणि भरवशालायक व्यक्‍ती बनले आहेत. यात असेही काही जण आहेत, ज्यांच्याबद्दल इतरांनी पूर्णपणे आशा सोडून दिली होती. याविषयी आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.