व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपचार करताना फक्‍त आजारपणाच्या लक्षणांवर नाही, तर मूळ कारणांवर उपाय करणं गरजेचं आहे

आव्हान

समस्येच्या मुळापर्यंत जाणं

समस्येच्या मुळापर्यंत जाणं

आज ज्या गोष्टींमुळे आपल्या शांतीला आणि सुरक्षेला धोका आहे, त्यांच्यावर ताबा मिळवणं मानवांना शक्य होईल का? आपल्याला आपलं भविष्य सुरक्षित करणं शक्य होईल का? एखादी समस्या सोडवण्यासाठी तिच्या मुळापर्यंत जाणं खूप गरजेचं असतं.

उदाहरणार्थ, टॉम नावाच्या एका माणसाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं कारण काय होतं? टॉमला ज्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं तिथल्या एका डॉक्टरने म्हटलं: “त्याच्या आजारपणाची लक्षणं दिसू लागली, तेव्हा कोणीही त्याला नेमकं काय झालंय हे तपासून पाहिलं नाही.” असं दिसून येतं की टॉम आधी ज्या डॉक्टरांकडे गेला होता, त्यांनी त्याची पूर्ण तपासणी न करता, फक्‍त त्याला थोडंफार बरं वाटावं म्हणून काही औषधं दिली होती.

आज आपणही जगाच्या समस्या सोडवण्यासाठी त्या डॉक्टरांसारखीच पद्धत वापरत आहोत का? उदाहरणार्थ, गुन्हेगारी कमी करण्यासाठी आज अनेक सरकार नियम बनवतात, ठिकठिकाणी कॅमेरे बसवतात आणि पोलीस दल वाढवतात. हे खरं आहे की हे सर्व उपाय काही प्रमाणात यशस्वी ठरले आहेत, पण समस्येचं मूळ कारण कोणीच शोधून काढत नाही. सहसा लोक जे गुन्हे करतात त्यावरून त्यांचे विचार, भावना आणि इच्छा दिसून येतात आणि हीच समस्येची मूळ कारणं आहेत.

डॅनियल दक्षिण अमेरिकेच्या एका अशा देशात राहतो जिथली अर्थव्यवस्था ढासळली आहे. तो म्हणतो: “आधी परिस्थिती अशी नव्हती. लोक शस्त्र घेऊन चोरी करायला येतील अशी भीती नव्हती. पण आज या देशात असं एकही शहर किंवा गाव उरलेलं नाही, जे सुरक्षित आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे लोकांची खरी वृत्ती समोर आली आहे. लोक खूप लोभी झाले आहेत आणि इतरांच्या जिवाची व मालमत्तेची त्यांना मुळीच काळजी नाही.”

आशिया खंडातल्या मध्यपूर्व देशात चालू असलेल्या युद्धामुळे एक माणूस तिथून दुसरीकडे पळून गेला. तिथे त्याने बायबल अभ्यास केला. तो म्हणतो: “माझ्या शहरात राहणाऱ्‍या बऱ्‍याच तरुण मुलांना आमच्या कुटुंबातल्या लोकांनी आणि धार्मिक व राजनैतिक पुढाऱ्‍यांनी युद्धात भाग घेण्याचं प्रोत्साहन दिलं, ते बोलले आम्हाला शूरवीर समजलं जाईल. आमच्या विरुद्ध असणाऱ्‍या लोकांनाही तेच सांगण्यात आलं होतं! हे सर्व पाहून मला जाणीव झाली की मानवी शासकांवर भरवसा ठेवल्यामुळे फक्‍त निराशाच हाती लागते.”

बोधवचनं सांगणाऱ्‍या एका प्राचीन पुस्तकात म्हटलं आहे:

  • “मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.”​—उत्पत्ति ८:२१.

  • “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?”​—यिर्मया १७:९.

  • “हृदयातूनच दुष्ट विचार, खून . . . अनैतिक लैंगिक कृत्ये, चोऱ्‍या, खोट्या साक्षी, निंदा या गोष्टी निघतात.”​—मत्तय १५:१९.

मानवांमध्ये असलेल्या चुकीच्या इच्छांवर मात करण्यासाठी मानवजात काहीच उपाय शोधू शकलेली नाही. याउलट त्या चुकीच्या इच्छा दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. मागच्या लेखात आपण ज्या समस्यांवर चर्चा केली त्यांतून हे स्पष्ट दिसून येतं. (२ तीमथ्य ३:१-५) आज खूप मोठ्या प्रमाणात ज्ञान व माहिती उपलब्ध आहे आणि आधीच्या तुलनेत आज मानव सहज एकमेकांशी संपर्क साधू शकतात. हे सर्व असूनही वाईट गोष्टी घडतच आहेत. जगाला शांतीपूर्ण आणि सुरक्षित बनवणं आपल्याला शक्य का झालेलं नाही? आपण स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा ठेवत आहोत का? जे अशक्य आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत का?

आपण अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत का?

लोकांमध्ये असलेली वाईट वृत्ती बदलण्याचा मार्ग जरी सापडला असला तरी आपण सर्वांसाठी हे जग सुरक्षित बनवू शकणार नाही. असं का? याचं कारण म्हणजे आपल्या मर्यादा.

आपल्याला पुढील सत्य मान्य करण्याची गरज आहे: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) आपल्याला स्वतःवर सत्ता चालवण्यासाठी निर्माण करण्यात आलं नव्हतं. जसं आपल्याला पाण्यात राहण्यासाठी किंवा आकाशात उडण्यासाठी बनवण्यात आलं नव्हतं, तसंच आपल्याला एकमेकांवर सत्ता चालवण्यासाठीही बनवण्यात आलं नव्हतं.

आपल्याला जसं पाण्यात राहण्यासाठी बनवण्यात आलं नव्हतं, तसंच आपल्याला एकमेकांवर सत्ता चालवण्यासाठीही बनवण्यात आलं नव्हतं

जरा विचार करा: जीवन कसं जगावं, किंवा कोणती नैतिक मूल्यं पाळावीत हे जर कोणी लोकांना सांगितलं तर सहसा त्यांना आवडतं का? सहसा लोकांना गर्भपात किंवा मुलांचं संगोपन या विषयांबद्दल इतरांच्या मतांनुसार चालणं आवडतं का? अशा विषयांवर एकमत नसल्यामुळे लोकांमध्ये वाद होतात. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर आपल्याला कळतं की बायबल जे सांगतं ते खरं आहे. एकमेकांवर सत्ता चालवण्याची किंवा इतरांसाठी निवड करण्याची क्षमता आणि अधिकार आपल्याजवळ नाही. तर मग आपण मदतीसाठी कोणाकडे पाहू शकतो?

निर्माणकर्त्याने आपल्याला बनवलं असल्यामुळे त्याच्याकडेच मदत मागणं सुज्ञपणाचं ठरेल. आज बऱ्‍याच लोकांना वाटतं की त्याला आपला विसर पडला आहे. पण हे खरं नाही. बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यांमधून मानवांबद्दल त्याची काळजी दिसून येते. त्या अद्‌भुत पुस्तकातील माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण आपल्याबद्दल बऱ्‍याच गोष्टी शिकतो. यामुळे आपल्याला मानवजातीच्या इतिहासात घडलेल्या दुःखद घटनांचं मूळ कारणही समजतं. जर्मनी देशातल्या एका विचारवंताने म्हटलं होतं की इतिहासात जे काही घडलं त्यातून मानवांनी आणि सरकारांनी काहीच धडा घेतलेला नाही. जर घेतला असता, तर त्यांनी आपल्या वागणुकीत बदल केला असता.

बायबलच्या ज्ञानामुळे आपलं संरक्षण होतं

एका बुद्धिमान व्यक्‍तीने म्हटलं होतं, “बुद्धी ही तिच्या सर्व परिणामांवरून सिद्ध होते.” (लूक ७:३५) या बुद्धीचं एक उदाहरण आपल्याला स्तोत्र १४६:३ या वचनात पाहायला मिळतं. तिथं म्हटलं आहे: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.” या सल्ल्याचं पालन केल्यामुळे आपण खोटी आशा बाळगणार नाही. केनिथ उत्तर अमेरिकेतल्या एका शहरात राहतो. त्या शहरात खूप मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पसरली आहे. तो म्हणतो: “एका नंतर एक नेते येतात आणि फक्‍त आश्‍वासनं देतात की आम्ही परिस्थिती सुधारू, पण त्यांना ते शक्य नाही. त्यांना मिळालेलं अपयश हे या गोष्टीचा पुरावा आहे की बायबलमध्ये दिलेला सल्ला अगदी योग्य आहे.”

आधी उल्लेख केलेला डॅनियल म्हणतो: “मानव स्वतःवर सत्ता चालवू शकत नाहीत, या गोष्टीवर दिवसेंदिवस माझा भरवसा वाढत चालला आहे. . . . तुमच्याकडे बँकेत खूप पैसा असला, किंवा म्हातारपणासाठी तुम्ही गुंतवणूक करून ठेवली, तर तुमचं भविष्य सुरक्षित होईल याची काहीच गॅरंटी नाही. या गोष्टीमुळे निराश झालेल्या बऱ्‍याच लोकांना मी पाहिलंय.”

बायबल आपल्याला खोटी आशा बाळगल्यामुळे होणाऱ्‍या दुःखापासून तर वाचवतंच, पण यासोबत ते आपल्याला आशाही देतं. याबद्दल आपण पुढे पाहू या.