व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तणाव कसा कमी कराल?

तणावमुक्‍त जीवन शक्य आहे!

तणावमुक्‍त जीवन शक्य आहे!

बायबलमध्ये दिलेल्या मार्गदर्शनामुळे आपल्याला विनाकारण येणारा तणाव टाळायला मदत होते. हे खरं आहे की आपण स्वतःच्या बळावर आपल्या जीवनातून तणाव काढू शकत नाही. पण आपला निर्माणकर्ता तो काढू शकतो. त्याने आपली मदत करण्यासाठी एका व्यक्‍तीची निवड केली आहे. ती व्यक्‍ती म्हणजे येशू ख्रिस्त. तो जेव्हा पृथ्वीवर मानव म्हणून होता तेव्हा त्याने बरीच आश्‍चर्यकारक कामं केली. आणि लवकरच तो संपूर्ण जगात त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात अद्‌भुत कामं करणार आहे. जसं की:

येशूने आजारी लोकांना बरं केलं होतं आणि भविष्यातही तो तसं करेल.

“लोक त्याच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे आजार व दुखणी . . . घेऊन आले आणि त्याने त्यांना बरे केले.”—मत्तय ४:२४.

येशू सर्वांना राहायला घर आणि पुरेसं अन्‍न देईल.

“ते [येशूच्या राज्यातली प्रजा] घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही.”—यशया ६५:२१, २२.

येशूच्या राज्यात संपूर्ण पृथ्वीवर शांती आणि सुरक्षा असेल.

“त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो. समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो . . . त्याचे वैरी धूळ चाटोत.”—स्तोत्र ७२:७-९.

येशू अन्याय पूर्णपणे काढून टाकेल.

“दुबळा व दरिद्री यांच्यावर तो दया करेल, दरिद्र्‌यांचे जीव तो तारेल. जुलूम व जबरदस्ती यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करेल.”—स्तोत्र ७२:१३, १४.

येशू दुःख आणि मृत्यू काढून टाकेल.

“मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”—प्रकटीकरण २१:४.