संकटांच्या विळख्यात जग
४ | मनातली आशा जपा
हे महत्त्वाचं का आहे?
जगातल्या समस्यांमुळे येणाऱ्या चिंतेचा लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही जणांना तर असं वाटतं, की ही परिस्थिती कधीच सुधारणार नाही. आणि म्हणूनच काही जण . . .
-
भविष्याचा विचार करायचं सोडून देतात.
-
दुःख विसरण्यासाठी दारू किंवा ड्रग्जच्या आहारी जातात.
-
जगण्यापेक्षा मेलेलं बरं असा विचार करतात. ते म्हणतात, ‘जगण्यात काय अर्थच नाही!’
तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?
-
काही समस्या तात्पुरत्या असतात आणि कधीकधी आपण अपेक्षा केलेली नसतानाही त्यातून काही चांगलंसुद्धा घडतं.
-
तुमची परिस्थिती जरी बदलली नाही तरी समस्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.
-
बायबल आपल्याला खरी आशा देतं. सगळ्या समस्या कायमच्या मिटतील असं ते सांगतं.
तुम्ही आत्ता काय करू शकता?
बायबल म्हणतं: “उद्याची चिंता कधीही करू नका, कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल. ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.”—मत्तय ६:३४.
उद्या काय होईल याबद्दल जास्त चिंता करत बसू नका. आज जे करता येण्यासारखं आहे ते करायचा प्रयत्न करा.
पुढे कोणत्या वाईट गोष्टी होऊ शकतात, याचा तुम्ही विचार करत बसला, तर तुमचा ताण वाढेल आणि चांगल्या भविष्याची तुमची आशा हळूहळू कमजोर होत जाईल.
बायबल खरी आशा देतं
बायबलच्या एका लेखकाने देवाला म्हटलं, की “तुझे शब्द माझ्या पायांसाठी दिव्यासारखे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाशासारखे आहेत!” (स्तोत्र ११९:१०५) बायबल दिव्यासारखं आणि प्रकाशासारखं कसं आहे यावर विचार करा:
आपण अंधारात चालत असतो, तेव्हा हातात दिवा असेल तर पुढचं पाऊल कुठे टाकायचं ते आपल्याला कळतं. त्याच प्रकारे बायबलमध्ये रोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेले सल्ले दिले आहेत. महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा हे सल्ले आपल्याला खूप मदत करू शकतात.
प्रकाशामुळे आपल्याला दूरपर्यंत पाहायला मदत होते. त्याचप्रमाणे, बायबल आपल्याला भविष्यात काय घडेल हे समजून घ्यायला मदत करतं.