कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | पालक
वयात येणाऱ्या आपल्या मुलांना मदत करणं
एक आव्हान
तळहातावरच्या फोडाप्रमाणे तुम्ही ज्याला इतकं जपलं ते तुमचं बाळ, पाहता पाहता किशोरावस्थेत येतं. किशोरावस्थेतून लवकरच ते प्रौढ बनण्याच्या मार्गावर आहे. पण किशोरावस्था आणि प्रौढावस्था यांच्या मधल्या काळात त्याला पौगंडावस्थेतून जावं लागतं.
पौगंडावस्थेत आलेल्या तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनात पुष्कळ गोंधळ चाललेला असतो. लैंगिक विकास होत असतानाच्या या काळात त्याच्या मनावर दडपण येऊ शकतं. मग, पालक या नात्यानं तुम्ही आपल्या पाल्याला कशी मदत कराल?
तुम्हाला माहीत आहे का?
प्रत्येक मुलाचा किंवा मुलीचा वयात येण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो. काही मुलं-मुली अगदी आठव्या वर्षीच वयात येतात तर काही १५ व्या वर्षी किंवा त्यानंतरही वयात येतात. लेटिंग गो विथ लव्ह अॅण्ड कॉन्फिडन्स नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे, की “सहसा मुला-मुलींचा वयात येण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो.”
पौगंडावस्थेमुळे असुरक्षितता जाणवू शकते. इतरांना माझ्याबद्दल काय वाटेल, याचा ही मुलं-मुली प्रमाणापेक्षा जास्तच विचार करत असतात. जयंत * नावाच्या एका तरुणानं म्हटलं: “मी माझ्या दिसण्याकडे, माझ्या वागण्या-बोलण्याकडे जरा जास्तच लक्ष द्यायला लागलो. चारचौघांत असताना मला वाटायचं, की लोकांना माझं वागणं विचित्र तर वाटत नाहीए ना.” त्यातल्या त्यात, चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर अशा तरुण-तरुणींचा आत्मविश्वास आणखीनच कमी होऊ शकतो. सतरा वर्षांची कीर्ती म्हणते: “माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आले तेव्हा मला स्वतःचीच किळस वाटायची. मला आठवतं मी खूप रडायचे, स्वतःला कुरूप म्हणायचे.”
इतर मुला-मुलींच्या मानानं लवकर वयात येणाऱ्यांना खास आव्हानांना तोंड द्यावं लागतं. मुलींना खासकरून याचा सामना करावा लागू शकतो. छातीची किंवा नितंबांची वाढ होऊन त्यांना गोलवा येतो तेव्हा इतर जण त्यांना चिडवतील. “अशा मुली, शरीरसंबंधांचा अनुभव असलेल्या मोठ्या मुलांच्या लगेच नजरेत येऊ शकतात; आणि हे या मुलींसाठी धोकादायक ठरू शकतं,” असं अ पेरेन्ट्स गाईड टू द टीन यिअर्स नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे.
वयात येणं म्हणजे प्रौढ बनणं नव्हे. नीतिसूत्रे २२:१५ मध्ये म्हटलं आहे: “बालकाच्या [तरुणाच्या] हृदयात मूर्खता जखडलेली असते.” त्यामुळे वयात आल्यावर तो शहाणा बनतो असं नाही. एखादा मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतर एकदम मोठा किंवा मोठी दिसेल. पण याचा अर्थ, “त्याच्यात किंवा तिच्यात, सुज्ञ निर्णय घेण्याचं, जबाबदारपणे वागण्याचं, स्वतःवर ताबा ठेवण्याचं किंवा इतर बाबतीत प्रौढांसारखं वागण्याचं शहाणपण येतं, असं म्हणता येणार नाही,” असं यू अॅण्ड युअर अडोलेसेंट नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे.
तुम्ही काय करू शकता
मुलगा-मुलगी वयात येण्याआधीच त्यांच्याशी बोला. वयात आल्यावर नेमकं काय होत असतं हे तुमच्या मुलाला किंवा मुलीला आधीच माहीत असणं योग्य ठरेल. मुलीला तुम्ही पाळीविषयी आणि मुलाला स्वप्नावस्थेविषयी (झोपेत असताना वीर्यस्खलन होणं याविषयी) सांगू शकता. पौगंडावस्थेत तसे इतरही बदल हळूहळू होत असतात; पण वर सांगितलेले बदल अचानक होतात. यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी गोंधळून किंवा घाबरून जाऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींची आपल्या मुलांबरोबर चर्चा करताना, सकारात्मक पद्धतीनं बोला. या अवस्थेत असताना त्यांच्यात होणारे शारीरिक व मानसिक बदल, पौगंडावस्थेतून प्रौढावस्थेत पदार्पण करताना त्यांच्याच फायद्याचे आहेत, असं त्यांना सांगा.—बायबलमधील तत्त्व: स्तोत्र १३९:१४.
संकोच न बाळगता पूर्ण माहिती द्या. जॉन नावाच्या एका तरुणानं म्हटलं: “माझे आईबाबा जेव्हा माझ्याबरोबर ‘या विषयावर’ बोलू लागले तेव्हा त्यांनी मला स्पष्ट किंवा खरंखरं काय ते सांगितलं नाही. त्यांनी मला सरळसरळ सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं, असं मला आता वाटतं.” सतरा वर्षांच्या अॅलना हिलाही असंच वाटतं. ती म्हणते: “माझ्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी आईनं मला सांगितलं खरं, पण मानसिक रीत्या होणाऱ्या बदलांविषयीसुद्धा तिनं मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं.” या दोन्ही तरुणांच्या बोलण्यावरून काय कळतं? वयात आल्यानंतर शारीरिक रीत्या व मानसिक रीत्या कोणते बदल होतात या विषयावर आपल्या मुलांबरोबर बोलणं सोपं नसलं तरी, तुम्ही त्यांच्याशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे.—बायबलमधील तत्त्व: प्रेषितांची कृत्ये २०:२०.
असे प्रश्न विचारा ज्यामुळे ते बोलू लागतील. मुलांना या विषयावर सहज बोलता यावं म्हणून तुम्ही, वयात आलेल्या इतर मुला-मुलींबद्दलचा विषय काढू शकता. जसं की, तुम्ही आपल्या मुलीला विचारू शकता: “तुझ्या वर्गातल्या कुठल्या मुलीनं तुला पाळी आल्याचं काही सांगितलं का?” “ज्या मुलींना लवकर पाळी आली त्यांची इतर जणी थट्टा करतात का?” तुमच्या मुलाला तुम्ही विचारू शकता: “ज्यांच्या अजून मिशा फुटल्या नाहीत, ज्यांची अजून उंची वाढत नाहीत अशा मुलांची इतर मुलं थट्टा करतात का?” इतरांबद्दल बोलताना मग तुमच्याही मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या भावना व्यक्त करायला, त्याला/तिला नेमकं कसं वाटतं, ते सांगताना संकोच वाटणार नाही. आणि ते जेव्हा त्यांच्या मनातलं तुम्हाला सांगत असतात तेव्हा, “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा” असावे, या बायबलमधील सल्ल्याचं पालन करा.—याकोब १:१९.
आपल्या किशोरवयीन मुलांना व्यावहारिक बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता वाढवण्यास मदत करा. (नीतिसूत्रे ३:२१) पौगंडावस्थेत फक्त शारीरिक किंवा मानसिक बदल होतात असं नाही. तर त्यांच्यात तर्क करण्याची कलादेखील विकसित होते. यामुळे प्रौढावस्थेत गेल्यावर ते योग्य निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे पौगंडकाळात असलेल्या आपल्या मुलीच्या/मुलाच्या मनात, चांगली मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करा.—बायबलमधील तत्त्व: इब्री लोकांस ५:१४.
हार मानू नका. आईवडील जेव्हा पौगंडावस्थेविषयी बोलत असतात तेव्हा पुष्कळ मुलं-मुली त्यांच्याबरोबर बोलायला कचरतात, असं पालकांना वाटू शकतं. पण खरं तर तसं नसतं. “मुलं जरी आईवडिलांचं बोलणं ऐकण्यात त्यांना काही रस नाही असं दाखवत असले, त्यांना कंटाळा आलाय, त्यांना ऐकायला किळस वाटतेय किंवा ते ऐकून न ऐकल्यासारखं करत असले तरी, तुमचा प्रत्येक शब्द ते लक्षपूर्वक मनात साठवत असतात,” असं यू अॅण्ड युअर अडोलेसेंट या पुस्तकात म्हटलं आहे.▪ (g16-E No. 2)
^ परि. 8 या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.