सगळ्यांवर प्रेम करा
समस्येचं मूळ कारण
भेदभावाची भावना लगेच नाहीशी होत नसते. जसा एखादा आजार बरा होण्यासाठी वेळ लागतो आणि त्यासाठी बरीच खटपट करावी लागते, तसंच भेदभावाची भावना नाहीशी होण्यासाठीही वेळ लागतो आणि त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. तर मग मनातून ही भावना काढून टाकण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
बायबल कशी मदत करतं?
“प्रेमाचे वस्त्र घाला, कारण हे ऐक्याचे परिपूर्ण बंधन आहे.”—कलस्सैकर ३:१४.
या शास्त्रवचनातून आपण काय शिकतो? हेच, की आपण जेव्हा इतरांसाठी चांगल्या गोष्टी करतो तेव्हा त्यांच्यातलं आणि आपल्यातलं प्रेम वाढतं. जसजसं हे प्रेम वाढतं तसतशी भेदभावाची आणि द्वेषाची भावना मनातून नाहीशी होते.
तुम्ही काय करू शकता?
समाजातल्या ज्या गटाबद्दल तुमच्या मनात नकारात्मक भावना आहे त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. त्यासाठी खूप मोठमोठ्या गोष्टी करायची गरज नाही. पुढे सांगितलेल्या छोट्याछोट्या गोष्टीही तुम्ही करू शकता. जसं की:
तुम्ही इतरांसाठी जितक्या चांगल्या गोष्टी कराल तितकीच भेदभावाची भावना तुमच्या मनातून नाहीशी होईल
प्रवास करत असताना तुम्ही त्यांना आपली सीट देऊ शकता किंवा त्यांचं सामान उचलायला त्यांना मदत करू शकता. असं करून तुम्ही दाखवता की तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे.
त्यांना तुमची भाषा नीट बोलता येत नसली, तरी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा.
ते वेगळं का वागतात हे समजत नसलं तरी त्यांच्याशी धीराने वागा.
ते आपल्या समस्या सांगतात तेव्हा त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.