जीवसृष्टीच्या अभ्यासातून काय दिसून येतं
सजीव गोष्टी आपल्या भोवती मोठ्या होताना, हालचाल करताना आणि संख्येने वाढत असताना आपण पाहतो. त्यामुळेच आपला पृथ्वी ग्रह इतका सुंदर आणि इतका वेगळा आहे. पृथ्वीवर असलेल्या सजीव सृष्टीबद्दल आज मानवांकडे पूर्वीपेक्षा जास्त माहिती उपलब्ध आहे. मग या सगळया माहितीतून जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली याबद्दल आपल्याला काय कळतं? खाली दिलेल्या माहितीचा विचार करा.
असं दिसतं की जीवसृष्टीची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक सजीव गोष्ट ही लहान-लहान पेशींनी बनलेली असते. एका कारखान्यासारखं या सूक्ष्म पेशी अत्यंत जटील असणारी हजारो कामं पार पाडतात. त्यामुळेच जीव जगू शकतात आणि नवीन जीवांना जन्म देऊ शकतात. जीवनासाठी आवश्यक असणारी ही गुंतागुंतीची किचकट रचना अक्षरशः सगळीकडे पाहायला मिळते. बेकरीत ब्रेड आणि केकसारखे पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यीस्टचाच विचार करा. यीस्ट हा एकपेशीय सूक्ष्म जीव (एक प्रकारची बुरशी) आहे. मानवी पेशीसोबत यीस्टच्या पेशीची तुलना केली तर तिची रचना खूप साधी आणि सोपी आहे असं आपल्याला वाटेल. पण पाहायला गेलं तर तिची रचनासुद्धा आपल्याला कल्पना करता येणार नाही इतकी किचकट आहे. यीस्टच्या पेशीलाही एक सुव्यवस्थित असं केंद्रक (न्युक्लिअस) असतं ज्यात डीएनए असतो. या डीएनएमध्ये अतिशय सूक्ष्म अशी काही “यंत्रं” असतात. रेणूंची ने-आण करणं, त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं आणि त्यांच्यात आवश्यक ते बदल करणं अशा प्रकारची अनेक कामं ते पार पाडत असतात. या सगळ्या गोष्टी या पेशीला जिवंत राहण्यासाठी खूप गरजेच्या असतात. जेव्हा यीस्टमधल्या या पेशीला अन्न मिळत नाही, तेव्हा ही पेशी हळूहळू काम करायचं बंद करून निष्क्रिय अवस्थेत जाते. पण याचा अर्थ ती मरते असं नाही. कारण बेकरीत पदार्थ बनवण्यासाठी तिचा वापर केला जातो, तेव्हा ती पुन्हा सक्रिय होऊन काम करू लागते.
मानवी पेशींना आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ कित्येक शतकं यीस्टमधल्या पेशींचा अभ्यास करत आले आहेत. तरीसुद्धा या पेशींबद्दल आणखी बरंच काही समजून घेणं बाकी आहे असं त्यांना वाटतं. स्वीडनच्या चामर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करणारे प्राध्यापक रॉस किंग अशी खंत व्यक्त करतात: “यीस्टसारख्या साध्याशा जिवाचं कार्य समजून घेण्यासाठीसुद्धा इतके प्रयोग करावे लागतील, की त्यासाठी लागणारे पुरेसे जीवशास्त्रज्ञसुद्धा आपल्याकडे नाहीत.”
यीस्टमधल्या साध्या पेशीच्या चक्रावून टाकणाऱ्या जटील रचनेकडे पाहून कोणीतरी तिची रचना केली असावी असं तुम्हाला वाटतं का? रचनाकाराशिवाय इतकी जटील रचना निर्माण होणं खरंच शक्य आहे का?
जिवाची उत्पत्ती जीवच करू शकतात. डीएनए, काही मूलभूत रेणूंच्या साखळीने मिळून बनलेला असतो. त्यांना न्युक्लिओटाईड असं म्हणतात. प्रत्येक मानवी पेशीत ३ अब्ज २० कोटी न्युक्लिओटाईड असतात. आणि त्यांची एका विशिष्ट पद्धतीने अचूक अशी मांडणी केलेली असते. त्यांच्यामुळेच पेशीला वेगवेगळी प्रथिनं आणि इन्झाइम तयार करता येतात.
अशा न्युक्लिओटाईडची साधीच पण अचूक अशी साखळी अचानकपणे निर्माण होण्याची शक्यता किती असेल हे तपासण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा त्याची शक्यता १०१५० (१ वर १५० शून्य) मध्ये १ इतकी दुर्मिळ असल्याचं दिसून आलं. अशा प्रकारची एखादी घटना खरंच घडून येणं, ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे.
शिवाय वस्तुस्थिती अशी आहे, की आजपर्यंत एकाही शास्त्रज्ञाला निर्जीव गोष्टीतून सजीव गोष्ट तयार करता आलेली नाही.
मानवप्राणी इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. मानवप्राण्यांमध्ये अशी काही वैशिष्ट्यं आहेत, जी इतर कोणत्याही प्राण्यामध्ये नाहीत. त्यामुळेच मानव जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. जसं की, त्याच्यामध्ये अप्रतिम कलागुण आहेत. सामाजिक जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्य आहेत. आणि आपल्या भावना व्यक्त करण्याची क्षमता आहे. आपण वेगवेगळ्या चवींचा आणि गंधांचा आस्वाद घेऊ शकतो. तसंच, आपण वेगवेगळ्या रंगांचा, आवाजांचा आणि दृश्यांचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. याशिवाय, आपण भविष्याचा विचार करून योजना आखू शकतो. आणि जीवनाचा उद्देश काय आहे, या गोष्टीचा विचार करू शकतो.
तुम्हाला काय वाटतं? आपल्यामध्ये असणारी ही सगळी वैशिष्ट्यं आपल्याला जगण्यासाठी आणि प्रजनन करण्यासाठी आवश्यक होती म्हणून निर्माण झालीत, की एका प्रेमळ निर्माणकर्त्याने ती आपल्याला दिली असतील?