कुटुंबांसाठी मोलाचा सल्ला | पालक
मुलांना सेक्सविषयी शिक्षण द्या
हे कठीण का आहे
काही दशकांपूर्वी, आपल्या मुलाला किंवा मुलीला सेक्सबद्दल माहिती देण्याची संधी कदाचित सर्वात आधी पालकांना मिळायची. आणि ते मुलांच्या वयाप्रमाणे हळूहळू त्यांना गोष्टी समजावून सांगू शकत होते.
पण आज हे सर्व बदललं आहे. “मुलांना लहानपणीच सेक्सबद्दल जास्त माहिती मिळत आहे. प्रसार माध्यमांतून लहान मुलांना सेक्स सूचक माहिती दाखवली जाते.” असं द लॉलिटा इफेक्ट या पुस्तकात म्हटलं आहे. पण यामुळे मुलांवर चांगला परिणाम होतो की वाईट?
तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे
सेक्स सूचक गोष्टी सगळीकडे सहज उपलब्ध आहेत. टॉक टू मी फर्स्ट या आपल्या पुस्तकात डेबरा रॉफमन लिहितात, “संभाषण, जाहिराती, चित्रपट, पुस्तकं, गाणी, टिव्ही, मेसेजेस, स्पोर्ट्स, फोन आणि कम्प्यूटर या सर्व गोष्टीत सेक्स सूचक चित्र आणि भाषा वापरली जाते. अनेकांना [तरुणांना, किशोरवयीन आणि लहान मुलांनादेखील] कळत नकळत वाटू शकतं की सेक्स हीच . . . सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”
मार्केटिंगचा देखील दोष आहे. जाहिरात करणारे आणि दुकानदार लहान मुलांसाठी असभ्य कपड्यांची जाहिरात करतात आणि विकतात. ते लहान वयातच मुलांना आपण कसं दिसतो यावर विचार करायला लावतात. “मुलांना वाटतं की त्यांच्या सोबत्यांनी त्यांना स्वीकारावं आणि मार्केटिंग करणाऱ्यांना लहान मुलांचा हा स्वभाव माहीत असतो आणि ते याच गोष्टीचा फायदा घेतात,” असं सो सेक्सी सो सून या पुस्तकात म्हटलं आहे. “या सर्व सेक्स सूचक चित्रांचा आणि उत्पादनांचा हेतू मुलांना सेक्सबद्दल शिकवण्याचा नसून त्यांच्या उत्पादनांची जास्त विक्री व्हावी हा असतो.”
फक्त माहिती पुरेशी नाही. कार कशी चालते हे माहीत असणं आणि ती काळजीपूर्वक चालवणं यात जसा फरक आहे, तसाच फरक सेक्सबद्दल माहिती असणं आणि त्या माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेणं यात आहे.
मूळ मुद्दा: आज तुम्हाला आपल्या मुलांना मदत करण्याची सर्वात जास्त गरज आहे. ज्यामुळे त्यांना त्यांच्या “ज्ञानेंद्रियांना” प्रशिक्षण देता येईल. तेव्हाच ते “चांगले आणि वाईट” या मधला फरक ओळखू शकतील.—इब्री लोकांस ५:१४.
तुम्ही काय करू शकता
पुढाकार घ्या. मुलांशी सेक्सबद्दल बोलणं तुम्हाला कितीही अवघड वाटत असलं, तरी ती तुमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारा.—बायबल तत्त्व: नीतिसूत्रे २२:६.
चर्चा छोट्या ठेवा. सेक्सबद्दल एकदाच खूप मोठी चर्चा करण्यापेक्षा, लहान-लहान चर्चा करा. जसं की सोबत प्रवास करताना किंवा घरातली कामं करताना. असे प्रश्न विचारा ज्यामुळे तुमच्या मुलांना मनमोकळपणाने त्यांचं मत मांडता येईल. उदाहरणार्थ, “तुला अशा जाहिराती आवडतात का?” असा प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही विचारू शकता, “जाहिरात करणारे आपली उत्पादनं विकण्यासाठी अशी चित्र का वापरतात?” मुलांनी उत्तर दिल्यावर, तुम्ही विचारू शकता, “तुला याबद्दल काय वाटतं?”—बायबल तत्त्व: अनुवाद ६:६, ७.
मुलांच्या वयानुसार माहिती द्या. मुलं शाळेत जायच्या वयाची झाली, की त्यांना त्यांच्या गुप्त इंद्रियांची नावं सांगा आणि ते लैंगिक शोषणापासून स्वतःला कसे वाचवू शकतात हेही शिकवा. मुलं जसजशी मोठी होऊ लागतात तसतसं त्यांना प्रजननाविषयी थोडक्यात माहिती द्या. ते जेव्हा पौगंडावस्थेत येतात तोपर्यंत त्यांना सेक्सविषयीच्या शारीरिक आणि नैतिक बाजूंची पूर्ण माहिती असली पाहिजे.
नैतिक मूल्यं शिकवा. आपल्या मुलांना लहानपणीच प्रामाणिकपणा, एकनिष्ठा आणि आदर या नैतिक मूल्यांविषयी शिकवा. यामुळे जेव्हा सेक्सचा विषय निघेल तेव्हा त्यांच्याशी बोलण्यासाठी तुम्ही आधीच पाया घातला असेल. तसंच तुमची मूल्यं स्पष्टपणे सांगा. उदाहरणार्थ, जर लग्नापूर्वी सेक्स चुकीचं आहे असं तुमचं मत आहे तर ते स्पष्टपणे सांगा. आणि ते चुकीचं आणि हानिकारक का आहे तेसुद्धा समजावून सांगा. “ज्या तरुणांना माहीत असतं की त्यांच्या पालकांना, तरुणांनी लग्नापूर्वी सेक्स करणं मान्य नाही. अशा तरुणांची लग्नापूर्वी सेक्स करण्याची शक्यता कमी असते,” असं बियॉन्ड द बिग टॉक या पुस्तकात म्हटलं आहे.
चांगलं उदाहरण ठेवा. तुम्ही शिकवत असलेल्या मूल्यांनुसार जगा. उदाहरणार्थ, तुम्ही अश्लील विनोदांवर हसता का? छोटे किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घालता का? फ्लर्ट करता का? तुम्ही जी नैतिक मूल्यं आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहात त्यांचा प्रभाव अशा वागण्यामुळे कमी होतो.—बायबल तत्त्व: रोमकर २:२१.
सकारात्मक बोला. सेक्स ही देवाकडून देणगी आहे. योग्य वेळी म्हणजे लग्नानंतर पती आणि पत्नी त्याचा आनंद घेऊ शकतात. (नीतिसूत्रे ५:१८, १९) तुमच्या मुलांना ही जाणीव करून द्या की योग्य वेळी तेही या देणगीचा आनंद घेऊ शकतील. आणि लग्नाआधी सेक्स केल्याने ज्या चिंतांचा आणि समस्यांचा सामना करावा लागतो त्यांपासून ते दूर राहू शकतील.—१ तीमथ्य १:१८, १९. (g16-E No. 5)