व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

फुलपाखराच्या जीवनातील एक दिवस

फुलपाखराच्या जीवनातील एक दिवस

फुलपाखराच्या जीवनातील एक दिवस

तुमचे दररोजचे काम तणावपूर्ण आणि कठीण वाटत असल्यास, परिश्रमी फुलपाखराबद्दल विचार करा. पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की फुलपाखराचे काम स्वप्ननगरीतील विहारासारखे आहे. एका फुलावरुन दुसऱ्‍या फुलावर बागडणे, इकडून तिकडून थोडासा मध चाखणे, मनात येईल तेव्हा ऊन खात बसणे, या गोष्टींमुळे फुलपाखरू, स्वच्छंद जीवन पद्धतीचे एक विशिष्ट उदाहरण वाटते.

परंतु किटकांच्या जगात, दिसते तसे नसते. फुलपाखरे महत्त्वाचे काम करणारे व्यग्र प्राणी आहेत आणि सतत वेळ निघून जात असल्यासारखे गडबडीत असतात. फुलपाखराबरोबर त्याच्या विशिष्ट कामाच्या दिवसात आपण देखील सहभागी होऊ या.

सूर्यप्रकाशातील न्याहारी

सकाळी उठताना, तुम्हाला अशक्‍तपणा जाणवतो का? सकाळी सकाळी खिन्‍न असणे ही फुलपाखरांमधील नेहमीची एक गोष्ट आहे. काही वेळा सकाळी ते खरोखरीच उडू शकत नाहीत. सभोवतालच्या वातावरणाप्रमाणे बदलणारे शरीराचे तापमान ही त्यांची समस्या आहे. पानावर बसून एक थंडीची रात्र काढल्यावर, त्यांचे रक्‍त इतके थंड होते की त्यांना हलता येत नाही आणि उडायला तर मुळीच येत नाही. म्हणून त्यांना सूर्यासाठी थांबायला हवे.

सूर्योदयानंतर, फुलपाखरू सूर्याच्या गरम किरणांच्या दिशेत पंख उघडून बसते. सूर्यप्रकाशाचे ऊर्जेत रुपांतर करणाऱ्‍या लहान यंत्राप्रमाणे उघडलेली पंखे, लगेचच ऊर्जा शोषून घेतात आणि मग फुलपाखरू उडून जाते. परंतु वातावरण ढगाळ असेल, तर काय? समशीतोष्ण भागांमध्ये, फुलपाखरांना सूर्यप्रकाश मिळेपर्यंत स्तब्ध—एका सोयीस्कर फांदी किंवा फुलावर निष्क्रिय अवस्थेत—बसावे लागते. हा काही आळशीपणा नाही. ते खरोखरच जरुरीचे आहे.

दिवस उष्ण नसला तर, फुलपाखरू पुढील सूर्यप्रकाशाचा उपचार घेण्यासाठी वेळोवेळी थांबते. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्‍या मोटारीप्रमाणे त्याला सूर्याच्या ऊर्जेची गरज भासते. उष्ण कटिबंधात, फुलपाखरांना आधी पहाटे किंवा पावसाची एक सर पडल्यावर ऊन खात बसावे लागेल. साधारणपणे सांगावयाचे झाल्यास, जितके वातावरण थंड, तितक्या जास्त वेळासाठी ते ऊन खात बसते. एकदा शक्‍ती मिळवल्यावर ते पुन्हा त्याच्या कामास लागते.

‘पहिल्या सुगंधातच प्रेम’

सोबती शोधणे हे सर्वात निकडीचे काम असते. काही आठवड्यांचीच आयुर्मर्यादा असल्यामुळे वेळ दवडून चालणे जमणार नाही. आणि फुलपाखरांच्या जगात सोबती शोधणे काही सोपे काम नव्हे—त्यासाठी शूराप्रमाणे धीराची आणि चिकाटीची आवश्‍यकता असते.

“पाहत्या क्षणी प्रेमात पडणे” ही गोष्ट फुलपाखरांमध्ये अजाण आहे. त्यांची लघुदृष्टी असते, आणि दुसऱ्‍या एका जातीला आपलीच जात समजण्याची ते बहुधा चूक करतात. यामुळे त्यांचा पिच्छा व्यर्थ ठरतो आणि मागणी घालणाऱ्‍या फुलपाखराला त्याच्या डोळ्यांनी त्याला फसवल्याचे कळते तेव्हा या पिच्छेचा अंत होतो.

मादी बहुधा ग्रहणक्षम नसते व त्यामुळे जीवन अधिकच कठीण होते. अतिउत्सुक नर तिच्या भोवती सतत हवेतील एक नृत्य करीत या आशेने उडत असतो की ती थोड्या वेळानंतर पाघळेल. परंतु, मादी उडून जाते तेव्हा त्या नेत्रदीपक फुलपाखरांच्या नृत्याचा अनपेक्षित अंत होतो आणि दुर्दैवी नराला त्याचा शोध पुन्हा चालू ठेवावा लागतो.

नर सोबतीच्या विविध रंगांबद्दल मादी इतकी उत्तेजित नसते, हेही आश्‍चर्यकारक आहे. फुलपाखरांचे भडक रंग ‘उत्क्रांतीचा फायदा’ पुरवतात असे डार्वीनने आनंदाने गृहीत धरले, परंतु, त्याला पुष्टी देणारा कोणताही पुरावा नाही. एका प्रयोगामध्ये, किरमिजी आणि काळ्या नर फुलपाखरांच्या पंखांना संपूर्णतः काळा रंग लावल्यावरही उत्तर अमेरिकेतील अनर्शिया अमेथिया या जातीच्या मादींनी त्यांच्यासोबत संयोग होऊ दिला. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नर फुलपाखराच्या उडण्याची पद्धत, त्याचा धीर, आणि त्याहून अधिक म्हणजे अद्वितीय “प्रेम-गंध”.

प्रेम-गंध, यामध्ये फेरमोन नावाचा एक रासायनिक पदार्थ असतो. हे, नर फुलपाखराचे सर्वात शक्‍तिशाली आकर्षण आहे. तो गुंगी आणणारा सुगंध असतो, व त्याच्या जातीच्या मादींवर त्याचा प्रभाव होईल अशाप्रकारे बनवलेला असतो. संयोगाच्या वेळी, या “सुगंधा”चा तो तिजवर “फवारा” टाकण्याचा प्रयत्न करतो. तथापि, प्रेम-गंध यशस्वी होण्याची कोणतीही हमी देत नाही, तरी शेवटी इच्छुक मादी मिळाल्यावर त्याचा चांगला परिणाम होतो.

मधाची एक चव

या सोबती शोधण्याच्या प्रयत्नात जितकी शक्‍ती खर्च केली ती सर्व भरुन काढली पाहिजे. म्हणूनच, फुलपाखरांना मध चाखण्याची इच्छा असते. या अधिक शक्‍तिवर्धक अन्‍नाची जाहिरात, फुले त्यांच्या आकर्षक आकार आणि रंगांद्वारे देतात. फुलावर बसल्यावर फुलपाखरू, कुशलतेने फुलाच्या तळाशी त्याचे शुंड (सोंडेसारखी लांब नळी) टोचून मध चोखते.

मध चोखत असताना, या किटकाच्या केसाळ अंगाला फुलातील परागकण चिकटतात व अशाप्रकारे ते दुसऱ्‍या फुलावर परागकण घेऊन जातात. अशा विशिष्ट कामाच्या दिवशी, शेकडो फुलांची फलधारणा होते. परंतु, उष्ण कटिबंधातील वनात फुले विपुल नसतात. मग, उष्ण कटिबंधातील फुलपाखरे बहुधा काय पितात?

उष्ण कटिबंधातील फुलपाखरांना कुजलेल्या फळांवर चरण्याऐवजी दुसरे काही आवडत नाही. पिकलेले फळ जमिनीवर पडते तेव्हा त्यामधून त्यांच्यासाठी भरपूर साखरेचा शक्‍तिवर्धक साठा पुरवला जातो.

फुलपाखरांना मीठ देखील आवडते. बहुधा ओल्या जमिनीच्या भागातील खारट ओलावा किंवा एखाद्या वेळी कुतुहलाने बघणाऱ्‍या मानवाच्या हाताचा घाम चोखत असताना तुम्हाला ती आढळून येतील. भडक रंगाचे शूर फुलपाखरू (ड्रायस इयुलीया), मगरीचे अश्रू चाटत असताना देखील आढळले आहे.

सोबती शोधण्यात व्यग्र असताना, फुलांची फलधारणा करताना आणि खात पित असताना, आपल्या या पंख असलेल्या मित्राला शत्रूंवर देखील डोळा ठेवायला हवा. तो असाहाय्य दिसू शकतो परंतु, कोणाच्या कचाटीत न सापडण्यासाठी त्याच्याजवळ पुष्कळ चाली आहेत.

धोका टाळणे

एखाद्या कुरणात भडक रंगाचे फुलपाखरू, किटकभक्षक पक्ष्यासाठी बहुतेक आकर्षविणारा अन्‍नाचा घास असू शकेल. परंतु फुलपाखराच्या नागमोडी मार्गाने, विचित्र उडण्याच्या पद्धतीमुळे त्याला पकडणे अतिशय अवघड जाते. पुष्कळ पक्षी थोडे प्रयत्न केल्यावर माघार घेतात. एखाद्या पक्ष्याने त्याला पकडल्यावरही तो किटक, पक्ष्याच्या चोचीत त्याच्या पंखाचा तुकडा सोडून त्याच्या तावडीतून सुटण्यामध्ये यश मिळवतो.

दृष्टी ही आणखी एक संरक्षक गोष्ट आहे. फुलपाखरांची लघुदृष्टी असली तरी, त्यांचे संयुक्‍त डोळे हालचाल ओळखण्यात फारच कार्यक्षम असतात. धोक्याची चाहूल लागताच ते लगेचच उडून जातील, याचा फुलपाखराचा फोटो घेण्यास ज्याने प्रयत्न केला त्याला चांगलाच अनुभव आहे.

हळूहळू उडणाऱ्‍या फुलपाखरांकडे आणखी एक संरक्षण करण्याचे साधन आहे—त्यांचा बेचवपणा. डिंभाच्या रुपात असताना विषारी झाडांचा पाला खाल्ल्यामुळे ते असे बनतात. एखाद्या वेळेस पक्ष्याने त्यास खाल्ले तर पुन्हा दुसऱ्‍या फुलपाखराच्या वाटेला जात नाही. ही बेचव फुलपाखरे—जसे मोनार्क—भडक रंगाची असल्यामुळे खरोखरीच पक्ष्याला दूर राहण्यासाठी एक उघड इशारा करतात.

प्रवासाचा शेवट

द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया असे नमूद करते की बहुतेक फुलपाखरे काही आठवड्यांपेक्षा अधिक काळ जगत नाहीत परंतु, काही जाती १८ महिन्यांपर्यंत जगू शकतात. हिंवाळ्याच्या थंड महिन्यांमध्ये किंवा उष्ण कटिबंधात शुष्क हवामानात ती सुप्तावस्थेत जातात.

फुलपाखरांची कमी आयुर्मर्यादा असताना देखील, ती आश्‍चर्यकारक कृत्ये करू शकतात. मागच्या शतकात मोनार्क फुलपाखराने, आफ्रिकेच्या किनाऱ्‍यापासून दूर असलेल्या कॅनरी द्वीपांवर ते राहू शकतील इतक्या मोठ्या संख्येमध्ये अटलांटिक महासागर पार केला. आणखी एक पर्यटक, द पेंटेड लेडी, उन्हाळ्यात उत्तर आफ्रिकेपासून, युरोपच्या उत्तरेपर्यंत नियमित प्रवास करते.

कमी आयुष्यात देखील ही न दमणारी फुलपाखरे फुलांची, झुडुपांची आणि झाडांची फलधारणा करण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्याहून अधिक म्हणजे, त्यांच्या अस्तित्वामुळे गावातील सृष्टीला, सौंदर्य आणि आनंदाची एक छटा येते. त्यांच्याविना वसंत ऋतू हा वसंत ऋतू ठरला नसता. (g93 10/8)

[२० पानांवरील चित्र]

पहाटेच्या वेळी ऊन खात असताना

[२१ पानांवरील चित्र]

फुलातून मध चोखत असताना

[२२ पानांवरील चित्र]

जमिनीवरील ओलावा शोषून घेताना

[चित्राचे श्रेय]

Courtesy of Buckfast Butterfly Farm