व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मातेच्या दुधासाठी पुरावा

मातेच्या दुधासाठी पुरावा

मातेच्या दुधासाठी पुरावा

कल्पना करा की, बाळाचा एक असा आहार आहे जो स्वादिष्ट, पचनासाठी सोपा आणि वाढत्या बालकांच्या पौष्टिकतेच्या सर्व गरजा पुरवतो. त्याचप्रमाणे तो आहार, रोगाविरुद्ध संरक्षण देणारे आणि रोगावर उपचार करणारे “अद्‌भुत औषध” देखील आहे. फुकट आणि पृथ्वीवरील सर्व कुटुंबांना सहजगत्या उपलब्ध असणारा तो आहार आहे.

अशक्य, असे तुम्ही म्हणता का? होय, अशाप्रकारचे उत्पादन औद्योगिक शास्त्रज्ञांनी तयार केले नसले तरी ते अस्तित्वात आहे. ते म्हणजे मातेचे दूध.

मानवाच्या संपूर्ण इतिहासामध्ये या आश्‍चर्यकारक अन्‍नाला, बालकाच्या काळजीसाठी महत्त्वाचे समजले गेले आहे. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्र आम्हास सांगते की, फारोच्या मुलीला मोशे बालक सापडला तेव्हा तिने त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या बहिणीला एक “दाई” आणावयास सांगितले. (निर्गम २:५-९) नंतर, ग्रीक तसेच रोमी समाजांमध्ये, श्रीमंत पालकांच्या बालकांना दूध पुरवण्यासाठी सामान्यतः, आरोग्यपूर्ण दाईंना ठेवले जात होते. परंतु, अलिकडील दशकांमध्ये, आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या बालकासाठी असलेल्या आहाराच्या मात्रेच्या तुलनेत अंगावरचे दूध हलक्या प्रतीचे आहे असे लोकांना दर्शवणाऱ्‍या जाहिरातींमुळे स्तनपान करणे फारच कमी झाले आहे. आज, अधिकाधिक मातांना, “स्तनपान सर्वात उत्तम आहे,” ही गोष्ट समजू लागल्यामुळे त्या पद्धतीची पुन्हा सुरवात झाली आहे.

सर्वात उत्तम पौष्टिकता

बालकांना भरवण्यासाठी निर्माणकर्त्याने तयार करून ठेवलेल्या पद्धतीमध्ये शास्त्रज्ञांना काही सुधारणा करता आली का? जवळजवळ नाहीच. युनिसेफ (युनायटेड नेशन्स्‌ चिल्डरन्स्‌ फंड) अशी म्हणते: “बालकांच्या जीवनातील पहिल्या चार ते सहा महिन्यांमध्ये खाण्यातील तसेच पिण्यातील सर्वात उत्तम असणारे अन्‍न हे केवळ अंगावरचे दूध आहे.” अंगावरील दुधात, आवश्‍यक प्रथिने, वाढ घडण्यासाठी उत्तेजक घटक, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, एन्झाईम्स्‌, जीवनसत्वे आणि मौल हे सर्व असते. हे बाळाच्या जीवनातील पहिल्या काही महिन्यांमध्ये, आरोग्यपूर्ण वाढीसाठी महत्त्वपूर्ण असते.

नवजात बालकांसाठी, अंगावरील दूध केवळ उत्तम अन्‍नच नसून त्यांच्यासाठी आवश्‍यक असणारा तो एकमेव आहार आहे. द वर्ल्ड हेल्थ ॲसेंम्ब्लीने मे १९९२ मध्ये पुन्हा निग्रहाने सांगितले की “जीवनातील पहिल्या चार ते सहा महिन्यात, बालकाच्या सामान्य पौष्टिकतेच्या आवश्‍यकतांना पुरवण्यासाठी अंगावरील दुधाव्यतिरिक्‍त कोणत्याही अन्‍नाची किंवा द्रव्याची किंवा पाण्याची देखील गरज नसते.” गरमीत किंवा कोरड्या हवामानात देखील बाळाची तहान भागवू शकेल एवढे पुरेसे पाणी या अंगावरील दुधात असते. बाटलीने अधिक पाणी किंवा गोड पाणी पाजणे केवळ अनावश्‍यकच नव्हे तर त्यामुळे बाळ स्तनपान करण्याचे सोडून देऊ शकते, कारण बालकांना बाटलीने पिण्याची सापेक्षतः सोपी पद्धत अधिक आवडते. अर्थात, जीवनातील पहिल्या काही महिन्यांनंतर हळूहळू बाळाच्या आहारात इतर पदार्थ किंवा द्रव्यांचा समावेश करण्याची आवश्‍यकता आहे.

बालकांच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी व प्रगतीसाठी कोणताही पर्यायी आहार, अशा उत्कृष्ठ संतुलित पदार्थांचे अन्‍न पुरवणार नाही. पुनरुत्पादनक्षम आरोग्य—सार्वत्रिक वादविषय [इंग्रजी] हे पुस्तक असे म्हणते: “अंगावरील दुधाचा पर्याय शोधून काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. बालकांच्या आहाराविषयीच्या ऐतिहासिक साहित्यामध्ये, अंगावर पाजलेल्या बालकांपेक्षा अंगावर न पाजलेल्या बालकांना संसर्ग आणि कुपोषण होण्याचा अधिक धोका आहे यासाठी पुष्कळ पुरावा मिळतो.”

स्तनपान जीव वाचवते

डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन) प्रमाणे, बाळाच्या पहिल्या चार ते सहा महिन्यांसाठी सर्व मातांनी त्यांच्या बालकांना केवळ अंगावरील दूधच दिले, तर जगभरातील प्रत्येक वर्षी होणारे दहा लाख बालकांचे मृत्यू टाळले जातील. स्टेट ऑफ द वर्ल्डस्‌ चिल्ड्रन १९९२ हा युनिसेफचा अहवाल असा म्हणतो: “उत्तमरित्या स्तनपान केलेल्या बाळापेक्षा, गरीब समाजातील बाटलीने पाजलेल्या बाळाला जवळजवळ अतिसाराच्या रोगामुळे १५ पटीने आणि न्यूमोनियामुळे ४ पटीने मरण पावण्याची शक्यता अधिक आहे.”

ते का बरे? त्याचे एक कारण असे की, दुधाची पावडर मातेच्या दुधापेक्षा हलक्या प्रतीची तर असतेच, परंतु त्याचबरोबर त्याच्यात अस्वच्छ पाणी मिसळून अधिक पातळ केले जाते आणि मग निर्जंतुक न केलेल्या बाटल्यांमधून दिले जाते. अशाप्रकारे, बाटलीतील दूध सहजपणे वानू आणि विषाणूंनी दूषित होऊ शकते ज्यामुळे अतिसाराचे रोग आणि श्‍वसनक्रियेचे संसर्ग होतात. हेच रोग प्रगतीशील देशांमध्ये अधिकांश बालकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत आहेत. त्याउलट, अंगावरील दूध सहजपणे दूषित होत नाही, त्यात काही मिसळण्याची गरज नसते, ते नासत नाही आणि अती पातळ देखील होत नाही.

स्तनपान केल्यामुळे जीव वाचतात, याचे दुसरे एक कारण म्हणजे, मातेच्या दुधात बालकाला रोगाविरुद्ध सुरक्षित ठेवणारी प्रतिद्रव्ये असतात. अतिसाराचा रोग किंवा इतर संसर्ग झाले तरी, अंगावर पाजल्या जाणाऱ्‍या बाळांच्या बाबतीत ते कमी गांभिर्याचे आणि उपचार करण्यास सोपे असू शकतात. त्याचप्रमाणे संशोधक असे सुचवतात की, अंगावर पाजल्या जाणाऱ्‍या बालकांना दंतरोग, कर्करोग, मधुमेह आणि काही रोगांच्या बाबतीत असणारी संवेदनशीलता होण्याची शक्यता कमी असते. आणि जोराने चोखण्याची आवश्‍यकता असल्यामुळे, स्तनपानाद्वारे, बालकांच्या चेहऱ्‍याच्या अस्थी आणि स्नायूंची नीट वाढ होण्यास मदत होते.

मातेसाठी लाभ

स्तनपानामुळे केवळ बालकालाच लाभ होत नाही; ते मातेला देखील लाभदायक आहे. एक कारण म्हणजे, बाळाच्या चोखण्यामुळे ऑक्सीटॉसिन नावाचा एक संप्रेरक निर्माण होतो व यामुळे केवळ भरपूर दुधच सुटत नाही तर गर्भाशयाचे आकुंचन देखील होते. प्रसूतीनंतर लगेचच गर्भाशयाचे आकुंचन झाल्यास, दीर्घकाळापर्यंत रक्‍तस्त्राव होण्याची शक्यता कमी असते. स्तनपानामुळे अंडाशयातून अंडबीजाचे बाहेर पडणे तसेच मासिक पाळी देखील पुढे ढकलली जाते. यामुळे पुढील गर्भधारणा उशीराने होते. गर्भधारणांमधील दीर्घ अंतर, म्हणजेच आरोग्यपूर्ण माता आणि बालके, होय.

स्त्रियांसाठी आणखी एक मोठा लाभ म्हणजे, स्तनपानामुळे अंडाशयाचा आणि छातीचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. काही तज्ज्ञ असे म्हणतात की, स्त्रीने आपल्या अपत्यास स्तनपान दिल्यामुळे, तिने जर ते दिले नसते त्यापेक्षा, होणाऱ्‍या छातीच्या कर्करोगाची शक्यता अर्धी आहे.

स्तनपानाच्या लाभांबद्दल सांगत असताना, माता आणि बालकामधील जवळीकीकडे दुर्लक्ष करता कामा नये. यामध्ये केवळ आहार देणेच समाविष्ट नसून, स्पर्श, त्वचेचा त्वचेशी संपर्क आणि शारीरिक ऊब मिळत असल्यामुळे माता आणि बालकामध्ये एक महत्त्वपूर्ण जवळीक वाढवण्यात, स्तनपान मदत करते. त्याचप्रमाणे, बालकाची मानसिक तशीच समाजिक वाढ होण्यास ते मदत करू शकेल.

स्तनपान करण्याचा निर्णय घेणे

काही गरजा पूर्ण केल्या तर, जवळजवळ सर्वच माता आपल्या मुलांना पुरेसे दूध पुरवण्यासाठी शारीरिकरित्या समर्थ आहेत. जन्म दिल्यानंतर लगेचच म्हणजे प्रसूतीनंतरच्या पहिल्या तासातच, स्तनपानास सुरवात करावी. (पहिलेच अंगावरील दूध, जो कोलोस्ट्रम नावाचा एक पिवळा दाट पदार्थ असतो तो बाळाला काही संसर्गांपासून संरक्षण देतो.) त्यानंतर, बालकांना त्यांच्या भुकेप्रमाणे पाजावे, याचाच अर्थ ठराविक वेळेप्रमाणे नसून रात्रीसुद्धा पाजावे. बाळाला पाजताना त्याला योग्य स्थितीत ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. एक अनुभवी आणि सहानुभूती दाखवणारा सल्लागार या बाबतीत पुष्कळ मदत पुरवू शकेल.

अर्थात, एखादी माता तिच्या बालकास अंगावर पाजील किंवा नाही हे तिच्या शारीरिक क्षमतेपेक्षा काही अधिक गोष्टींवर अवलंबून आहे. स्टेट ऑफ द वर्ल्डस्‌ चिल्ड्रन १९९२ असा अहवाल देते: “आपल्या मुलांना सर्वात उत्तम सुरवात देण्याकरता मातांना दवाखान्यांतील पाठिंब्याची आवश्‍यकता आहे; परंतु त्यांना स्तनपान करण्याचे चालूच ठेवायचे असेल तर त्यांना मालकांच्या, कामगार-संघांच्या, समाजाच्या आणि पुरुषांच्या पाठिंब्याची गरज देखील भासेल.” (g93 9/22)

[१३ पानांवरील चौकट]

विकसनशील जगात स्तनपान

१. पहिल्या चार ते सहा महिन्यातील कालावधीत अंगावरील दूध हे बालकासाठी सर्वात उत्तम आहार आहे.

२. जन्मानंतर होईल तितक्या लवकर बालकांनी स्तनपान करण्यास सुरवात करावी. वास्तविकतेत, प्रत्येक माता आपल्या बाळाला अंगावर पाजू शकते.

३. बाळाच्या गरजांसाठी पुरेसे दूध सुटण्याकरता वारंवार चोखणे फार जरुरीचे आहे.

४. बाटलीने पाजल्यामुळे गंभीर आजार तसेच मृत्यू ओढवला जाऊ शकतो.

५. स्तनपान, बालकाच्या दुसऱ्‍या वर्षापर्यंत किंवा शक्य असल्यास त्याहून अधिक काळासाठी चालू ठेवावे.

माहितीचा स्रोत: युनिसेफ, डब्ल्यूएचओ आणि युनेस्कोने मिळून प्रकाशित केलेले, जीवनासाठी माहिती [इंग्रजी].

[१४ पानांवरील चौकट]

स्तनपान आणि एड्‌स

एप्रिल १९९२ च्या शेवटाला डब्ल्यूएचओ आणि युनिसेफ यांनी, एड्‌स आणि स्तनपान यातील संबंधावर विचार करण्यासाठी एकत्र मिळून तज्ज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय गटाला बोलावले. एड्‌सबद्दलच्या, डब्ल्यूएचओ जागतिक कार्यक्रमाचे निर्देशक, डॉ. मायकल मरसन यांनी त्या सभेच्या गरजेविषयीचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले: “बाळाला जिवंत राहण्यासाठी स्तनपान हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. स्तनपानाद्वारे एड्‌सने बालकाचा मृत्यू होण्याच्या धोक्याचे संतुलन, स्तनपानाशिवाय इतर कारणांमुळे मृत्यू संभवण्याच्या जोखिमीसोबत व्हायला हवे.”

डब्ल्यूएचओप्रमाणे, एचआयव्हीने संक्रमित असलेल्या मातांना जन्मलेल्या बाळांपैकी एक तृतीयांश बाळांना तो रोग जडतो. त्या रोगाचा संचार बहुधा गर्भधारणा आणि प्रसूतीच्या दरम्यान होत असला, तरी स्तनपानाद्वारे देखील त्याचा संचार होऊ शकतो यासाठी पुरावा आहे. तरीसुद्धा, डब्ल्यूएचओ असे म्हणते, “एचआयव्हीने संक्रमित असलेल्या मातांद्वारे अंगावर पाजल्या जाणाऱ्‍या अधिकांश बालकांना स्तनपानाद्वारे संसर्ग होत नाही.”

तज्ज्ञांनी असे म्हणून समाप्ती केली: “जेथे मुलांच्या मरणासाठी संसर्गजन्य रोग आणि कुपोषण ही प्रमुख कारणे आहेत आणि जेथे मुलांच्या मरणाचे प्रमाण अधिक आहे तेथे, गरोदर स्त्रियांना त्याचप्रमाणे एचआयव्हीने संक्रमित असलेल्या स्त्रियांना देखील स्तनपान करणे हा सामान्य सल्ला देण्यास हवा. हे यासाठी कारण, अंगावर न पाजल्या जाणाऱ्‍या बाळाच्या इतर कारणांमुळे मरण्याच्या धोक्यापेक्षा त्यांच्या बाळाला स्तनपानाद्वारे एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.

“त्याउलट, ज्या परिस्थितींमध्ये संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यू हे बालकाच्या मरणाचे मुख्य कारण नाही आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी आहे, . . . तेथे एचआयव्हीने संसर्गदूषित झालेल्या गरोदर स्त्रियांसाठी हा सामान्य सल्ला दिला जातो की त्यांनी त्यांच्या बाळाला अंगावर पाजण्यापेक्षा, आहारासाठी एका सुरक्षित पर्यायाचा उपयोग केला पाहिजे.”