ताऱ्यांमध्ये तुम्हासाठी काय आहे?
ताऱ्यांमध्ये तुम्हासाठी काय आहे?
“पुढील जुलैमध्ये पृथ्वी मंगळाला टक्कर देणार आहे असे फल-ज्योतिष शास्त्र वर्तवते, हे तुम्ही ऐकले का?” कोल पोर्टरच्या गाण्यातील हे शब्द, मनुष्याचे भविष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे ताऱ्यांशी संबंधित आहे हा सामान्य व प्राचीन विश्वास व्यक्त करतात. * परंतु, आकाशातील गोलांमध्ये आणि या पृथ्वीवरील मनुष्याच्या जीवनामध्ये खरोखरचा काही संबंध आहे का? असे आहे तर, मानवजातीवर त्याचा कसा परिणाम होतो? जर नाही तर, तारे कोणता उद्देश पूर्ण करतात?
बर्लीनच्या भिंतीचे पाडणे व पूर्वीच्या सोविएत संघाचे जलद विभाजन, राजकीय नेत्यांमध्ये आत्मविश्वासाची उणीव, आफ्रिका व युरोपमध्ये वाढणारा वंशद्वेष, भारत व आयर्लंडमधील धार्मिक शत्रुत्व, इतक्या देशांना दुखावणारी वाढती महागाई व तरुणांचे बंड—या काही अलिकडील घटनांबद्दल आपण पाहिले तर, पुष्कळ लोक भविष्यामध्ये आस्था राखून आहेत हे जाणणे आश्चर्याचे नाही. हॅमबर्गच्या विद्यापीठाच्या एका अहवालानुसार, दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतर १९९२ हे सर्वात कलहाचे वर्ष होते. त्यामध्ये वेगवेगळ्या देशात ५२ सशस्त्र लढाया घडल्या. शांतीप्रिय लोक स्वाभाविकपणे विचारतात: ‘आम्ही स्थिरता, शांती व सुरक्षिततेसाठी कोठे पाहू शकतो?’
भविष्याच्या अनिश्चिततेमुळे, भविष्य-कथनाचे विविध प्रकार भरभराटीस आले आहेत. बहुतेककरून, फल-ज्योतिष हा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे. फल-ज्योतिष, खगोलशास्त्रापासून भिन्न असून, “तारे व ग्रहांच्या स्थिती व दिशेमुळे, मानवी घटना व पृथ्वीच्या घटनांवर होणाऱ्या प्रभावाचे वर्तविलेले भविष्य आहे.” आज, लाखो लोक त्यांच्या भविष्याबद्दल काही माहिती मिळवण्यासाठी त्यांची जन्म-कुंडली पाहिल्यावाचून राहू शकत नाहीत. *
फल-ज्योतिषी भविष्य सांगण्याचा दावा करतात अशी इतर क्षेत्रे म्हणजे, वैवाहिक समस्यांचा परिणाम, आरोग्य समस्या, राजकीय नेत्यांचे वर येणे व पतन पावणे, नवा व्यापार सुरु करण्याचा मुहूर्त, व लॉटरी जिंकण्यासाठी निवडावेत ते क्रमांक, हे होय.
रुटर्स बातमीने असा अहवाल दिला की, नॅन्सी रीगन ही नियमितपणे फल-ज्योतिषी जोन क्वीग्ली हिच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात असे. तिच्या पतीने, जो त्यावेळी अमेरिकेचा राष्ट्रपती होता, केव्हा त्याची भाषणे द्यावीत, त्याच्या विमानाने केव्हा उड्डान घ्यावे व केव्हा उतरावे याबद्दल ती सल्ला घेत असे. द न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडियाने प्रकट केले की, “पोप ज्यूलियस दुसरे [१५०३-१३] यांनी त्यांच्या राज्याभिषेकाचा दिवस ठरवण्यासाठी व पॉल तिसरे [१५३४-४९] यांनी प्रत्येक सभेची उचित वेळ ठरवण्यासाठी फल-ज्योतिषाचा वापर केला होता.” रोख्यांच्या खरेदीविक्रीच्या कट्ट्यात भांडवलदारांना, सल्ला देण्यासाठी फल-ज्योतिषाचा वापर करणाऱ्या स्वीस कंपनीचा डायरेक्टर, अल्फ्रेड हुग, उत्तम परिणामांची हमी देतो. “ते ताऱ्यांमध्ये लिहिले आहे,” असे तो खात्रीपूर्वकतेने सांगतो.
स्पष्टतः, मनुष्यांच्या जीवनावर ताऱ्यांचा परिणाम होतो असे पुष्कळांना वाटते. पण, फल-ज्योतिषाची सुरवात कशी झाली? पवित्र शास्त्र या प्राचीन पुस्तकामध्ये, फल-ज्योतिष व फल-ज्योतिषी यांच्याबद्दल काही सांगण्याजोगे आहे का? (g94 7/8)
[तळटीपा]
^ “प्राचीन चीनमध्ये, . . . आकाशातील चिन्हे तसेच नैसर्गिक आपत्ती, सम्राट व त्याच्या सरकारचे कार्य तसेच दुष्कृत्यांना प्रतिबिंबित करतात असा विश्वास केला जात होता.”—द इंटरनॅशनल एन्सायक्लोपिडिया ऑफ ॲस्ट्रोनॉमी.
^ फल-ज्योतिष म्हणजे, “एखाद्या विशिष्ट समयी (जसे एखाद्याच्या जन्माच्या वेळी) ग्रह व राशींच्या स्थितींची पद्धतशीर मांडणी.” एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या भविष्यातील घटनांचे भाकीत करण्याच्या प्रयत्नासाठी फल-ज्योतिषी याचा उपयोग करतात.